नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले
"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.
मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.
आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!