Close

सुरक्षित सेक्स करण्यासाठी टिप्स (Tips For Safe Sex)

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मूलाबाळाचं लोढणं लवकर नको असतं. त्यांना प्लॅनिंग करायचं असतं. त्यात कामजीवनाचा पुरेपूर आनंद घेणं, हा देखील मुख्य कार्यक्रम असतो. अन् हे संतती नियोजन करण्याचे सगळेच मार्ग त्यांना ठाऊक नसतात. अशा काही जोडप्यांसाठी सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत या काही टिप्स

सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कंडोमचा वापर करणे होय. कंडोम हे सगळ्यात सोपे संतती नियोजनाचे साधन आहे. त्या शिवाय काही इन्फेक्शन्स्, एडस् व अन्य गुप्तरोगांपासून तुमचा बचाव करते. मात्र कंडोम्सचा वापर करताना काही खबरदार्‍या घेणे आवश्यक ठरते. लुब्रिक्रेटेड कंडोम्सच वापरावेत. कंडोमला लावण्यात आलेल्या या वंगणयुक्त रसायनामुळे स्त्री आणि पुरुष अशा दोघांच्याही लैंगिक अवयवांचे घर्षण सहज होते. केवळ तेलकट कंडोम तेवढेसे प्रभावी ठरणार नाही. फार जुना झालेला, वंगण वा ओलावा सुकलेला अथवा एक्सपायरी डेट झालेला कंडोम वापरू नये. तो फाटण्याची व त्यातून वीर्य गळण्याची क्रिया घडू शकते.
काही लोकांची अशी समजूत असते की, अधिक सुरक्षिततेसाठी एकाच वेळी दोन कंडोम्स वापरावेत. तसं करू नये. कारण घर्षण करतेवेळी ते दोन्ही कंडोम्स निघून जाण्याची शक्यता बळावते. तेव्हा स्वतःच्या गैरसमजुतींवर विश्वास न ठेवता, कंडोमच्या वेष्टनावर ज्या काही सूचना दिल्या असतात, त्या काळजीपूर्वक वाचून वापर करावा.


फिमेल कंडोम
काही पुरुषांना कंडोमचा वापर करणे आवडत नाही. संभोग सुखात त्यांना अडसर वाटतो. परंतु त्यांना संतती नियमन पण करायचे असते. सुरक्षित संबंध हवे असतात. अशा परिस्थितीत महिलांसाठी बाजारात मिळणार्‍या फिमेल कंडोमचा वापर करावा. हे कंडोम तुलनेने महाग मिळतात पण या कंडोमने देखील संतती निरोधन होऊ शकते. मात्र शरीरसंबंध ठेवताना मेल आणि फिमेल अशा दोन्ही कंडोमचा वापर करू नये. व्हजाईनल रिंग असे आणखी एक महागडे साधन मिळते. त्याचाही वापर स्त्रीने करायला हरकत नाही. कंडोम, फिमेल कंडोम आणि व्हजाईनल रिंग आदी साधनांचा वापर केल्यावर लगेचच योनीमार्ग साफ करू नये. कारण त्यांना लावलेल्या वंगणयुक्त रसायनामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात, जे तुमचा इन्फेक्शन पासून बचाव करतात.


गर्भनिरोधक गोळ्या
वरील साधनांमुळे स्त्री व पुरुषांच्या इंद्रियास कवच होत असल्याने, काही जोडप्यांना ते नकोसे वाटतात. यौनसंबंध नैसर्गिक व्हावे आणि संतती निरोधनसुद्धा व्हावे, असे त्यांना वाटते. यावर उपाय म्हणजे संतती प्रतिबंधक गोळ्या घेणे. या कॉन्ट्रासेप्टीव पिल्स बाजारात सहज उपलब्ध असतात. या महिलांसाठी आहेत. मात्र, डॉक्टरी सल्ल्याने त्यांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर असते. ही गोळी नियमितपणे दररोज घ्यायची असते. एखाद्या दिवशी जर घ्यायला विसरलात तर, दुसर्‍या दिवशी दोन गोळ्या घ्याव्यात. पुढे मग दररोज एक घेण्याचा नियम पाळावा. कधी गोळी घ्यायला विसरलात किंवा कंडोम वा अन्य साधने हाताशी नसतील, अन् कामक्रीडा केलीच तर दुसर्‍या दिवशी इमर्जन्सी कॉन्ट्रोसेप्टीव गोळी पण घेता येते. काही स्त्रियांच्या मनात या गोळीविषयी गैरजमज आढळून येतो. त्यांना असा भ्रम असतो की, या गोळ्या घेतल्याने प्रजनन क्षमेतवर परिणाम होतो. पण ते खरं नाही. सदर गोळ्यांनी मासिक पाळीवर परिणाम होतो. प्रजनन क्षमतेवर नाही. तेव्हा असुरक्षित संभोगावर हा उत्तम उपाय आहे. असुरक्षित संभोग केल्यास तीन दिवसांच्या आत ही गोळी घेतली तर प्रभावी ठरते.


परस्पर सामंजस्य हवे
खरं पाहता, मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करणे, अत्यंत सुरक्षित मानले जाते. कारण या काळात गर्भधारणा होऊ शकत नाही. परंतु या काळात स्त्रीची मानसिक व शारीरिक स्थिती ठीक नसते. तेव्हा या काळात शरीरसंबंध ठेवण्याचा आग्रह धरता येत नाही. मात्र ज्या स्त्रीला शारीरिक पीडा कमी होत असते, तिच्यासह हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. मात्र तिच्या होकारानेच पुरुषांनी पुढे जावे.
एकूणच शरीरसंबंध हे स्त्री-पुरुषांच्या परस्पर संमतीने व सहयोगानेच ठेवायला हवेत. तरच त्यामध्ये मौज मिळते. तेव्हा या संबंधित काही अडचणी असतील तर त्या परस्पर सामंजस्याने सोडवल्या पाहिजेत. आपल्याकडे अजूनही सेक्स विषयक समस्या मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत. परंतु आपण पती-पत्नी आहोत, ही मौज दोघांनी मिळून करायची आहे. उन्मुक्त शरीर आणि मनाने एकत्र यायचे आहे. ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून, जर काही अडचणी, समस्या असतील तर विनासंकोच त्याबाबत एकमेकांशी बोलले पाहिजे. अन्यथा समाधानकारक सुख तर मिळणार नाहीच. शिवाय इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.
सुरक्षित सेक्सबाबत घेण्याची मोठी खबरदारी म्हणजे निरोगी राहणे. स्त्री व पुरुषांनी आपले शरीर, अवयव यांची दररोज स्वच्छता ठेवली पाहिजे. निगा राखली पाहिजे. जेणेकरून रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही आणि अन्य काही गुंतागुंत होणार नाही.

Share this article