बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर जोरदार हिट झालेत. ९० च्या दशकात आलेला ‘मोहब्बतें’ चित्रपट आजही अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटाची कथा आणि सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे लाखो चाहत्यांना आजही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी नारायण शंकर हे पात्र साकारलं होतं. पण, तुम्हाला माहितीये का? या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी फक्त एक रुपया इतकच मानधन घेतलं होतं.
चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी नुकतीच ‘रेडिओ मिर्ची’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेविश्वातील सध्याचं वातावरण आणि आधीचं वातावरण यात नेमका कसा फरक आहे, यावर वक्तव्य केलं आहे. तसेच या दोन काळांमधील फरक सांगताना त्यांनी अमिताभ बच्चन यांचं एक उदाहरणसुद्धा दिलं आहे.
मुलाखतीमध्ये निखिल अडवाणी यांना सिनेसृष्टीतील आधीचा काळ आणि आताचा काळ कसा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आधीच्या व्यक्तींमध्ये प्रेम आणि माया होती. त्या काळी चित्रपट नात्यातील विश्वास आणि ताकद यांच्या आधारे बनवले जात होते.
यावेळी निखिल अडवाणी यांनी अमिताभ बच्चन यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “माझ्या सिनेविश्वातील कारकिर्दीच्या काळात मी, सुरुवातीला ‘यशराज फिल्म्स’बरोबर काम करत होतो. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा यांनी सिलसिला या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी मानधन म्हणून तुला किती पैसे हवेत, असं त्यांनी विचारलं. त्यावेळी अमिताभ यांनी मला एक घर खरेदी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला चांगली रक्कम द्या, असं अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रा यांना सांगितलं.”
निखिल अडवाणी यांनी पुढे सांगितलं, “काही वर्षांनी यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना ‘मोहब्बतें’साठी विचारलं. तसेच यावेळी पैसे किती घेणार हेदेखील विचारलं. मात्र, घर घेताना मागितली तेवढी रक्कम दिल्यानं आता मी फक्त एक रुपया घेणार, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं.”
“आधी चित्रपट पैशांवर नाही, तर लोकांच्या मनावर आणि नात्यांच्या मजबुतीवर टिकून असायचे. आजकाल सर्व काही पैशांवर ठरतं. आधी पैसे ठरतात आणि मग कोण काम करणार आणि कोण नाही हे ठरतं,” असंही निखिल अडवाणी म्हणाले. तसेच त्यांनी पुढे ‘दिलवाले दुल्हनियां’ व ‘मोहब्बतें’ या चित्रपटांची आठवणही सांगितली. पाम आंटी (पामेला चोपडा) नेहमी आम्हाला जेवण बनवून द्यायच्या. त्या प्रत्येकाची आवड-निवड विचारायच्या. ‘दिलवाले दुल्हनियां’ व ‘मोहब्बतें’ हे चित्रपट अशाच पद्धतीने बनले आहेत”, असंही निखिल अडवाणी म्हणाले.