“आपली आई खरंच रिटायर होते का? खऱ्या आयुष्यात ती रिटायर होते का? खरंच नाही…” अशा भावना अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका सोमवार दि. २ डिसेंबर पासून दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाह चॅनलवरून प्रसारित होणार आहे. त्या निमित्ताने त्या बोलत होत्या. आई श्यामच्या आईसारखीच असली पाहिजे. यातली आई तशीच आहे. तिचा पाय मुलांमध्ये, घरामध्ये अडकला आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
नोकरीतून निवृत्त झाल्यावर संसारातून रिटायर व्हायचं नि गावी जाऊन निवांत जीवन जगायचं हे या मालिकेतील बाबाचं स्वप्न आहे. “मध्यमवर्गीय लोकांचं असं स्वप्न असतं. आपण वेगळं राहूया, असं त्यांना वाटत असतं. हे नायकाचं पुढचं स्टेटमेन्ट आहे. हा आजचा विचार आहे.” असे मालिकेचे नायक मंगेश देसाई यांनी सांगितले. मालिकेचे प्रोमोज् या प्रसंगी दाखविण्यात आले. मंगेश व निवेदिता यांनी या मालिकेची झलक दाखविणारा एक छानसा नाट्यप्रवेश या समारंभाच्या सुरुवातीला रंगमंचावर सादर केला.
“आपल्या आयुष्यातील हिरो-हिरॉईन आपले आई-बाबा असतात. त्यांची ही दररोज घडणारी गोष्ट आहे. ते जीवनाच्या चक्रात असे अडकले असतात की ते कधी रिटायर होत नाहीत. हे या मालिकेचे सूत्र आहे. ही गोष्ट वा कथा नसून प्रत्येकाला संवाद साधावासा वाटेल, अशी कल्पना आहे,” असे स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी सांगितले. “ही मालिका ज्येष्ठ नागरिकांची प्रेमकहाणी आहे. ही मालिका मी सुरू केली अन् माझा आई-वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला,” अशी भावना निर्माती मनवा नाईक यांनी व्यक्त केली. तर “ही गोष्ट मुद्दाम लिहिली गेली नाही, गप्पांमधून स्फुरलेली आहे,” असे लेखक सचिन दरेकर म्हणाले. पटकथा चिन्मय मांडलेकरची असून संवाद स्वरा यांनी लिहिलेले आहेत. रोहिणी निनावे यांनी मालिकेचे शीर्षक गीत लिहिले असून त्याला नीलेश मोहरीर यांनी स्वरबद्ध केले आहे.