Close

जिया खानच्या आत्महत्येबद्दल सूरज पंचोलीच्या आईचं वक्तव्य; म्हणाली, “सूरज पंचोलीची निर्दोष मुक्तता होईपर्यंत १० वर्षे खूप कठीण काळातून जावं लागलं” (Zarina Wahab Says Jiah Khan Tried To Kill Herself 4 5 Times Before Meeting Sooraj Pancholi)

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सूरज पांचोलीची आई झरीना वहाबने जिया खान आत्महत्या प्रकरणावर धक्कादायक प्रतिक्रिया दिलीय. जियाने त्याआधीही चार-पाचवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यामुळे माझ्या मुलाच्या (सूरज पांचोली) वैयक्तीक जीवनावर खूप मोठा परिणाम झाला, असं झरीना यांनी म्हटलंय. २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. अशातच आता सूरजची आई झरीनाने या प्रकरणावर धक्कादायक खुलासा केला आहे.

जिया खानने सूरज पंचोलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना आत्महत्या केली होती. अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईमधील जुहू परिसरातील घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. जियाचा मृत्यू झाला, त्यावेळी ती २५ वर्षांची होती. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजसोबतच्या नात्याबाबत लिहिलेले पत्रही पोलिसांना सापडले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी सूरजला आरोपी केलं होतं. तसेच त्याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच आरोपांतर्गत सूरजवर १० वर्षे खटला चालवण्यात आला. अखेर त्याची एप्रिल २०२३ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली. जियाच्या आत्महत्या प्रकरणावर सूरजची आई अभिनेत्री झरीना वहाबने एका मुलाखतीत भाष्य केलंय.

जिया खानने सूरज पंचोलीला भेटण्यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा झरीनाने केला आहे. “तिने त्याआधीही ४-५ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण नशीब असं होतं की ती माझ्या मुलाबरोबर असताना हे सगळं घडलं,” असं झरीना लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

सूरज हा अभिनेता आदित्य पंचोली व झरीना वहाब यांचा मुलगा आहे. जियाने आत्महत्या केली तेव्हा सूरज तिला डेट करत होता. जियाने आत्महत्या केल्यावर सूरजला अटक झाली होती. या प्रकरणाचा कुटुंबावर कसा परिणाम झाला, त्याबाबत झरीनाने सांगितलं. १० वर्षे हे सगळं सहन करावं लागलं असंही झरीना म्हणाली.

“आम्ही सर्वजण खूप वाईट काळातून गेलो, पण माझा एका गोष्टीवर विश्वास आहे: ‘जर तुम्ही खोटं बोलून कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करत असाल तर तुम्हाला त्याची व्याजासह परतफेड करावीच लागते.’ सूरज दोषी नव्हता, आम्ही सगळं सहन केलं, १० वर्षे लागली पण तो त्यातून निर्दोष बाहेर पडला आणि मी आनंदी आहे. या घटनेचा सूरजच्या करिअरवरही परिणाम झाला,” असं झरीना म्हणाली.

सूरजने २०१५ साली ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात अथिया शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत होती. या व्यतिरिक्त सूरजने ‘बी हॅप्पी’, ‘हवा सिंग’, ‘टाइम टू डान्स’, ‘सॅटेलाइट शंकर’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Share this article