हुसेन त्यांच्या मिशीला शेप देण्याचं काम मोठ्या एकाग्रतेने करायला लागला. त्याच्या छातीत धडधडत होतं. कारण मिशी म्हणजे राजेशची जान! शान! और पेहेचान! आज ही मिशी अशी काही कोरून करीन की साहेब डिट्टो क्लार्क ग्लेबलच वाटणार!
अरे वा! काय स्टायलिश दिसता हो तुम्ही केस कापून आल्यावर,” अलकाने राजेशच्या मानेवरून हात फिरवत म्हटलं, “मस्त गुळगुळीत फिल
आहे हो!”
“मग? मला स्पेशल ट्रिटमेंट असते. अग मी न सांगता तो सलूनमधला पोरगा माझे कानावरचे, नाकाबाहेर आलेले केस देखील कापतो!” राजेश रूबाबात म्हणाला.
“अरे वा! वट आहे एका माणसाची!” अलकाने
मस्करीत म्हटलं.
“मग? आता माझी ही मिशी! ही मिशी म्हणजे पुरुषी सौंदर्याचा कळस म्हणता येईल!”
आपली मिशी कुरवाळत राजेश आपल्याच धुंदीत बोलत होता. “तुला सांगतो अलके, अग ऑफिसमध्ये आमची रिसेप्शनिस्ट आहे ना, लिझा फर्नांडिस म्हणून, ती काय म्हणते ठाऊक आहे का, मिसेस अलका राजेश वाघमारे?”
“काय म्हणते?” अलकाने त्याच्या पुढ्यात गरमागरम वाफाळणारा चहा ठेवत म्हटलं. सलूनमधून आल्यावर राजेशला चहा हवा म्हणजे हवाच असतो, हे अलकाला माहित होतं. राजेशने चहाचा घोट घेऊन म्हटलं, “मिस लिझा, मला क्लार्क ग्लेबल म्हणते क्लार्क ग्लेबल! कळलं?” राजेश आपल्या देखणेपणावरच्या विश्वासाने म्हणाला.
“अच्छा? पण कोण हा इसम? तोही तुमच्यासारखा क्लार्क आहे का?” अलकाने विचारलं.
“नॉन सेन्स! मूर्ख! तुझी अक्कल फोडणीचा भात करण्यापुरतीच! अग क्लार्क ग्लेबल म्हणून हॉलिवूडचा मोस्ट हॅण्डसम अॅक्टर होऊन गेला, माझी मिशी डिट्टो त्या क्लार्क ग्लेबलसारखी आहे. म्हणून लिझा त्याच्या नावावरून माझं कौतुक करत असते. “राजेशने घटाघट चहा संपवला. कसली ही अरसिक बायको!
“पण खरंच राजेश, तुमची मिशी खरंच छानच आहे!” अलकाने प्रेमाने त्याला दाद दिली. राजेश लगेच खुलला. त्याच्या दिसण्याबद्दल तो फारच जागरूक होता. त्या विषयावर कुणी बोललं की तो अगदी भरभरून बोलत सुटायचा. “अग छान काय? नंबर वन आहे माझी मिशी! आणि ही अशी मेन्टेन केली आहे माझ्या त्या सलूनमधल्या हुसेन पोर्याने! ही अशी बारीक नि शेवटी निमुळती होत जाणारी मिशी म्हणजे या राजेश वाघमारेची शान आहे, जान आहे आणि अल्ला कसम यही मेरी पेहेचान है,” राजेश आपल्याच नादात बोलत राहिला.
त्याला त्याचे केस, हेअरस्टाईल, दाढी, मिशी या सगळ्या केशवरावांबद्दल कमालीचं प्रेम होतं. पण ते इतकं? अलकाला तर ते सगळं ऐकून नवर्याबद्दल भारी अभिमान वाटायला लागला. “तेव्हा अलका, म्हणून माझ्या केसांचा केअरटेकर हुसेन आहे ना, त्याला मी प्रत्येक वेळी दहा रुपये टिप देतो अग….”
“काय? अहो मला भाजीसाठी दहा रुपये जास्त देत नाहीत तुम्ही. खरं तर तुम्ही कंजूष मारवाडीच आहात, पण मग त्या पोर्याला टिप का देता?” आता अलका एकदम वैतागून गेली. मेला मी पाच रुपयाचा गजरा घेताना विचार करते. कारण काय तर नवरा चिडेल.
“फुलं झाडावरच शोभतात, पर्यावरणाचा समतोल राख माझे आई! चेहर्याला बुद्धीने शोभा येते, फुलांनी नाही,” असं तत्त्वज्ञानही सांगेल म्हणून आपण हौस देखील भागवत नाही गजर्याची! आणि हे मात्र टिप देऊन उधळपट्टी करतात काय!
“का देतो म्हणजे? मी रूबाबात राहतो म्हणून नोकरी टिकलीय्! अग आमच्या प्रायव्हेट कंपनीत दिसण्याला महत्त्व आहे, कळलं? चल, चल, मला बे्रकफास्ट दे. रविवार आहे म्हणून तू काय सगळ्याला बुट्टी मारणार? आणि हो, संध्याकाळी शॉपिंगला जायचंय् आपल्याला, मला मस्त शर्ट घ्यायचाय्.”
“शर्ट?” त्याला पोह्याची बशी देत तिने विचारलं. “हो, हो शर्ट! अग दिवाळीत आम्हाला पार्टी असते ना ऑफिसात! म्हणून घेणार नवा शर्ट!” राजेशने विषय संपवत म्हटले.
थ थ थ
“अरे राजेशसाहेब, या, या!” राजेश सलूनमध्ये गेला तशी हुसेन लगबगीने पुढे येत म्हणाला. सलूनमध्ये खरं तर गर्दी होती. पण हुसनने राजेशला लगेच जागा करून खुर्चीवर बसायला सांगितलं. “अरे पण, मी आधी आलोय्, मला का उठवलंस?” राजेशच्या आधी आलेलं गिर्हाईक-एक म्हातारा माणूस चिडून म्हणाला.
“अहो आजोबा, आज दिवाळीमधली अमावस्या आहे. तुम्ही केस नाही कापून घेत.” हुसेन समजावत म्हणाला. “अरे हो रे! बरं झालं आठवण केलीस,” म्हणत ते म्हातारे गृहस्थ काठी टेकत सलूनबाहेर पडले.
“अरे हुसेन, आज कुठाय् अमावस्या? आज तर दिवाळीचा पाडवा आहे!” राजेश म्हणाला.
“अहो साहेब, तुमच्यासाठी खोटं बोललो, तुम्ही यंग, हॅण्डसम.. डॅशिंग! बोला, आज काय काय करायचं?” हातात कातरी घेऊन हुसेनने विचारलं.
“आज संध्याकाळी आमची पार्टी आहे, ऑफिसमध्ये! तेव्हा हेअरसेटिंग कर, एकदम वेगळं, मस्त!… शिवाय..”
राजेशला मध्येच अडवत हुसेन म्हणाला “साहेब, तुम्हाला केस वर उभे केलेली स्टाईल मस्त दिसेल.” राजेशने तेवढ्यात 50 रुपयांची नोट त्याच्या हातात ठेवत म्हटलं, “ही टिप! आता जे जे मस्त दिसेल ते ते कर बाबा, पण पार्टीत मलाच भाव मिळाला पाहिजे.”
हाय अल्ला! 50 रुपये? खरंच, हे साहेब देवमाणूस आहेत, त्यांच्या टिपची परतफेड तर करायलाच पाहिजे, आज
यांना एकदम हिरो करून सोडूया! हुसेन मनात गहिवरून गेला होता.
“हो! साहेब! बघालच तुम्ही या हुसेनच्या कैचीची जादू?” म्हणत हुसनने त्याचे केस कापायला घेतले. नंतर दाढी, मग कानावरचे केस, नाकाबाहेरचे केस कापून झाले. शेवटी हुसेन त्यांच्या मिशीला शेप देण्याचं काम मोठ्या एकाग्रतेने करायला लागला. त्याच्या छातीत धडधडत होतं. कारण मिशी म्हणजे राजेशची जान! शान! और पेहेचान! आज ही मिशी अशी काही कोरून करीन की साहेब डिट्टो क्लार्क ग्लेबलच वाटणार! टिप घेतो तर काम नको करायला भरपूर? हुसेन राजेशवरच्या प्रेमाने, आदराने जास्तच सावधपणे काम करत होता. कात्री चालवत होता. तोच काय झालं त्याला कळेना! त्याने पटदिशी त्याची मिशीच सफाचट केली. एकदम पूर्णपणे कापून टाकली.
“हाय अल्ला! ये क्या हुआ? साहेब, माफ करा!” हुसेन रडवेल्या स्वरात म्हणाला. “काय झालं रे?” म्हणत राजेशने चेहर्यासमोर आरसा धरला. “अरे देवा! माझी मिशी?” तो किंचाळला.
“हे काय केलंस हुसेन?” राजेशने हुसेनला फैलावर घेतलं. “साहेब, तुम्ही मला भरपूर टिप देता, म्हणून विचार केला, तुमचं भरपूर काम करावं, टिपची परतफेड तर केली पाहिजे ना साहेब? म्हणून मी टेन्शन घेतलं आणि चूक झाली साहेब.” हुसेन केविलवाणेपणे बोलत होता.
“पण आता मी पार्टीला कसा जाऊ?” राजेशने हुसेनला रागाने विचारलं.
“साहेब, मी सांगतो, मी तुम्हाला डिट्टो क्लार्क ग्लेबलसारखी मिशी चिकटवून देतो. कुणालाच कळणार नाही. चालेल?”
“हो! कर आता काय करायचं ते!” राजेशला पर्यायच नव्हता ना!
राजेश घरी आला तर अलका म्हणाली, “काय छान
ग्लोइंग दिसतोय चेहरा तुमचा आणि मिशी तर फारच शोभतेय् तुम्हाला!”
चला! म्हणजे कुणाला माझी मिशी खोटी आहे हे कळणार नाही तर! राजेश आता निःशंक झाला.
संध्याकाळी तो पार्टीला जायला नवा ग्रे कलरचा ब्रॅन्डेड शर्ट आणि काळी रेमण्डची भारी पँट घालून तयार झाला तर अलकाने त्याची चक्क दृष्टच काढली. “एन्जॉय” म्हणत तिने त्याला निरोप दिला. राजेश ऐटीत कूल कॅबमध्ये बसून पार्टीच्या ठिकाणी ‘माय लव्ह’ रेस्तराँमध्ये पोचला.
“हाय! राजेश!’ लिझा त्याला पाहून त्याला मिठी
मारत म्हणाली.
“हाय! लिझा! यू आर लुकींग क्यूऽऽट,” राजेश
हसत म्हणाला.
“बट राजेश, यू आर लुकींग जस्ट क्लार्क ग्लेबल, तुझी मिशी किती…” लिझा त्याला अगदी बिलगून बोलत होती, तोच तिचे भुरभुरणारे केस राजेशच्या नाकापाशी गुदगुल्या करू लागले आणि त्याला जोराची शिंक आली.
“ओ सॉरी”, असं तो म्हणेपर्यंत त्याची मिशी तिच्या
हातात आली.
“अरे हे काय राजेश? तू तू खोटी मिशी लावून मला फसवत आलास? यू चीटर!” त्याला बाजूला ढकलत लिझा रागाने ओरडली. आणि राजेश कपाळावर हात मारून मनातल्या मनात आपण टिप का दिली म्हणून स्वतःला आणि हुसेनला शिव्या देत राहिला.
-प्रियंवदा करंडे