काल १४ नोव्हेंबर रोजी सर्वत्र ‘बालदिन’ साजरा झाला. मात्र ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ अशी भावना असणाऱ्या ‘आई’च्या बाळंतपणात तिचे आरोग्य व बाळाचा जन्म सुखकर व्हावा, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी काय व कसे प्रयत्न केलेत, त्याचा लेखाजोखा मुंबईत सादर करण्यात आला. फेडरेशन ऑफ ओबस्टेटिक ॲन्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीज् ऑफ इंडिया अर्थात ‘फॉग्सी’ व नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲन्ड हेल्थकेअर प्रोवायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मातांच्या प्रसुती दरम्यान काळजी घेण्याच्या उपक्रमाची माहिती डॉक्टरांनी दिली.
काही खासगी सुतिकागृहातील आधुनिक सुविधांचा अभाव असल्याने व तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने प्रसुती दरम्यान मातामृत्यू जास्त होत असत. हे लक्षात आल्यावर केन्द्र सरकारने ‘वन नेशन, वन स्टॅन्डर्ड’ हे धोरण जाहीर केले. त्यानुसार ‘लक्ष्य मान्यता’ हा उपक्रम २५ राज्यात कार्यान्वित झाला. महाराष्ट्रात हा उपक्रम राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग व फॉग्सी यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून राबविला जात आहे.
निम्न व मध्यम उत्पन्न गटातील स्त्रियांना बाळंतपणात दिल्या जाणाऱ्या खासगी आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी काम करणारा हा फॉग्सीचा उपक्रम आहे. त्यानुसार एनएबीएच मार्फत ३ हजार हॉस्पिटल्स अधिस्वीकृत करण्यात आले आहेत, असे फॉग्सीच्या सचिव डॉ. माधुरी पटेल यांनी सांगितले. “आमच्या उपक्रमाद्वारे मान्यताप्राप्त सुतिकागृहात लोक जातील व तिथे मान्यताची पाटी बघून इथे चांगली सेवा मिळेल, अशी त्यांना खात्री पटेल. हे या उपक्रमाचे यश असेल,” असे मान्यताचे प्रमुख प्रशासक डॉ. हृषिकेश पै यांनी सांगितले.