व्हेजिटेबल फ्रँकफर्टर
साहित्य : 100 ग्रॅम उकडून स्मॅश केलेले बटाटे, 100 ग्रॅम लाल भोपळ्याचा गर, 100 ग्रॅम चेड्डार चीज स्ट्रिप्स, 10 ग्रॅम बारीक चिरलेली लसूण, 100 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 20 ग्रॅम बारीक चिरलेली गाजर, 20 ग्रॅम बारीक चिरलेले बेबी कॉर्न, 20 ग्रॅम चिरलेले मशरूम, 20 ग्रॅम बारीक चिरलेली शतावरी, चिमूटभर जायफळ पूड, चिमूटभर लाल मिरची पूड, चिमूटभर काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, 150 ग्रॅम ब्रेड क्रम्स, 30 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 30 ग्रॅम मैदा, तळण्यासाठी तेल.
कृती : तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा हलका तपकिरी होईपर्यंत परतवून घ्या. नंतर त्यात सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून काही मिनिटं शिजवा. थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्या. मिश्रण थंड झालं की, त्यात बटाटा आणि भोपळ्याचा गर आणि जायफळ पूड घाला.
मिश्रण चांगलं एकजीव करा. आता चीजची एक स्ट्रिप घेऊन, त्यावर सारण पसरवा. कॉर्नफ्लोअर, मैदा आणि पाणी यांचं मिश्रण तयार करून घ्या. सर्वप्रथम या मिश्रणात व्हेजिटेबल फ्रँकफर्टर घोळा. नंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
कच्च्या केळ्याचा बेक्ड समोसा
साहित्य : 100 ग्रॅम बारीक चिरलेले कांदे, 5 ग्रॅम बारीक चिरलेलं आलं, 5 ग्रॅम करी पावडर, 10 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 ग्रॅम बारीक चिरलेली हिरवी मिरची, 200 ग्रॅम कच्च्या केळ्याचा उकडून स्मॅश केलेला गर, 1 टेबलस्पून तेल, 5 ग्रॅम मोहरी, 4 फिलो शीट्स, स्वादानुसार मीठ.
कृती : तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आलं घालून सोनेरी रंगावर परतवा. त्यात कच्च्या केळ्याचा गर एकत्र करा. नंतर करी पावडर आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
आता फिलो शीट्स घेऊन प्रत्येकाचे तीन भाग करा. प्रत्येक शीटवर 2 टेबलस्पून सारण घेऊन, ती समोशाच्या आकाराप्रमाणे दुमडा. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करून घ्या. हे समोसे नॉन-स्टिक बेकिंग ट्रेमध्ये ठेवून, 15-20 मिनिटं बेक करा. समोसे सोनेरी रंगाचे व्हायला हवे. गरमागरम बेक्ड समोसे ताज्या पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.