माहेर हेच तिचे विसाव्याचे स्थान. आईवडील म्हणजे तीर्थाचे सागर. माहेर म्हणजे केळीचे दाट हिरवेगार वन. कल्पनेतच माहेरच्या वाटेवरल्या पाणंदीचे दर्शन तिला आनंद देते. आणि मग त्याच क्षणी तिचे मन वार्याच्या वेगाने माहेरी धाव घेते. ती नववधू सासरी अजून रूळलेली नाही.
-माधुरी महाशब्दे
वाह ही स्त्रीच्या जीवनातील मंगलदायी घटना. तिच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण. या क्षणाने एका मुग्ध बालिकचे जबाबदार स्त्रीत, गृहिणीत परिवर्तन होते. कळी उमलते तिचे उमलत जाऊन सुंदर फुलात रूपांतर होते तसेच. आता पूर्वीसारखे मुलीचे लग्न बालपणी होत नाही. तरी कन्या हे परक्याचे धन ही आपली विचारधारा आजही आहे. बालपणापासून तिच्यावर तसे संस्कार केले जातात. सासर हे आता तुझे घर आहे. तिथे सर्वांशी जुळवून घेऊन तुला तिथेच रूजायचे आहे. अशी शिकवण पाठवणीच्या वेळी दिली जाते. सोयरीक जुळवताना सासर माहेरचा परस्पर जिव्हाळा जपायचा ही जाणीव असते. म्हणून त्या ऋणानुबंधाची गोडी कमी झालेली दिसत नाही. माहेरच्या मातीत उगवलेली, आईवडिलांच्या माया ममतेच्या मळ्यात फुललेली व भावंडांच्या रूसव्या फुगव्यात, रागालोभात, जिव्हाळ्यात न्हाऊन निघालेली ही स्त्री-जीवनाची वेल कुण्या परक्या मांडवावर जाऊन तरारते, फुलते. परकं असलेलं सासर आपलसं करते. त्याचा स्वर्ग करते. पण या वेलीची फुलं असतात माहेरच्या मातीत. त्या मातीत ओढ तिच्या मनीमानसी ताजी असते. तो मृदगंध कधी एखाद्या दुखावल्या सांजवेळेला तिला व्याकूळ करतो. काळजापर्यंत गेलेल्या वेदनेने तिचे डोळे पाणावतात.
विवाहानंतर माहेर हे तिचे विसाव्याचे ठिकाण असले तरी ते तिचे घर रहात नाही. सासर, सासरची माणसे हेच तिचे घर होते. त्या घराशी नव्याने नाते जोडताना कित्येकदा मनाला मुरड घालावी लागते, तडजोड करावी लागते. कधी ती जुळवून घेते व सुखीही होते. तरीही माहेर सोडून सासरी जाताना तिची अवस्था शकुंतलेसारखी होते. हरिणाच्या पाडसाला कवेत घेऊन व्याकूळ होणारी शकुंतला व आजची ललना यांची भावावस्था सारखीच! सासरी तिला माहेरची सय, आईवडिलांची माया, सार्यांचे प्रेम, जिव्हाळा इतकेच नव्हे तर घर, परिसर, वृक्षवेली, पशुपक्षी साद घालतात. बहिणाबाई म्हणतात,
''माझ्या माहेराच्या वाटे
जरी आले पायी फोड,
अशी माहेराची ओढ''
लेकीची व्याकुळता मायच जाणे.
मग बहिणाबाई म्हणतात,
''लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते.''
लोकसाहित्यातील माहेर
आईचे अंतःकरण हे मायाममतेचे मोहोळच जणू. लेकीची सासरी पाठवणी करताना आपल्या फुलासारख्या नाजूक लेकीला सासरच्या रामरगाड्यात नवे नवे वाटेल, तिला आईबाबांची सय येत राहील म्हणून ती माय तिच्याबरोबर चंद्रज्योतीसारखी
पाठराखीण धाडते.
सासुर्याला जाती माता फिरूनी ग पाहती
माझ्या बाळीला सांगी देती
संग मुराळी चंद्रज्योती
हीच माय विहीणबाईला विनंती करते
हात जोडून इनंती विहीणबाई तुझी
बाळ उनाड ग माझी, सई घ्यावी पदरात
बालपण ओलांडून सासरी नववधूचे मन एकदम रमणार नाही हे ध्यानात घेऊन पहिल्या वर्षी सर्व सणांना मुलींना माहेरी बोलावून घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. मंगळागौर, दिवाळी, संक्रांत, नागपंचमी, भाऊबीज असे सण कधी येतात, त्याची नववधू आतुरतेने वाट पहात असते. माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. कारण तिचं मन माहेरी रेंगाळत असते.
आईला सोडून सासरी आलेली लेक सासरी कधी कष्टी झाली, सासूचा सासूरवास सोसत असली की मनातली तळमळ, दुःख याला वाट करून देण्यासाठी तिला सासरी जिवाभावाचं कुणी नसतं. मग ती व्याकुळतेने पाखरालाच साद घालते.
रूणझुणत्या पाखरा रे। जा माझ्या माहेरा
कमानीचा दरवाजा रे। त्यावरी बैस जा
घरच्या आईला रे। सांगावा सांग जा
दादाला सांग जा रे। ने मला माहेरा
माहेर हेच तिचे विसाव्याचे स्थान. आईवडील म्हणजे तीर्थाचे सागर. माहेर म्हणजे केळीचे दाट हिरवेगार वन. कल्पनेतच माहेरच्या वाटेवरल्या पाणंदीचे दर्शन तिला आनंद देते. आणि मग त्याच क्षणी तिचे मन वार्याच्या वेगाने माहेरी धाव घेते. ती नववधू सासरी अजून रूळलेली नाही. माहेरचा मायेचा धागा तिला बांधून ठेवत आहे. त्याचे नाजूक बंध सुटता सुटत नाहीत.
जिवाला वाटतं पाखराच्या पायी जावं
वाड्यावरी उतरावं बंधुजीच्या॥
माहेरची ओढ तिच्या मायसाठीच नाही तर भावाची माया, आठवही तिला मनोमन माहेरी घेऊन जाते. आपल्या बहिणीला बरे नाहीसे ऐकून शुक्राची चांदणी उगवायच्या आत भाऊराया तिच्या घरी आला आहे. दारी चाफ्याच्या कळ्या पडलेल्या पाहून त्याला बहिणीच्या आजारपणाची गोष्ट उमगली आहे. त्या कळ्यांनी भावाला संदेश दिला. किती संवेदनशील, भावूक कल्पना! बहीण भावंडातील प्रेमाचा धागा असा अतूट आहे. ती सासरच्यांना सांगते, ''माझ्या भावाचे स्वागत करा प्रेमाने. मला दुसरे काही नको.'
सासरचे सुखनिधान
तिला केवळ माहेरच प्रिय आहे असं नाही तर सासरही आता आपलं वाटू लागलं आहे. सासरी तिचे सुखनिधान आहे. त्या प्रेमाच्या कोमल भावूक भावबंधाचे वर्णन सखीला सांगते- जणू मनीचं गुपितच.
गोड भरताराचं सुख सये, सांगता येता जाता भरदिवसा डोलला ग बाई, सख्या पाणी पिता
आता लेक सासरी सुखाने नांदते आहे, रूळली आहे, त्याचे एकीकडे आईला समाधान आहे. माहेरची सय येत असली तरी लेकीचं मन आता सतत माहेरी धाव घेत नसेल असे वाटून माय म्हणते-
म्हायराची वाट इसरली पोरी
तानीबाईच्या माज्या हाती पाळण्याची दोरी
लेकीची कूस उजवण्याचे स्वप्न माय पहाते. लेकीला मुलगा झाल्यावर सासरी तिला मानाचे स्थान प्राप्त होते. ही आपली पारंपारीक समजूत.
माय तर विसाव्याचे स्थान असतेच. पण प्रेमाने भाऊही बहिणीचे माहेरपण प्रेमाने करतो. कर्तृत्ववान, श्रीमंत, दिलदार भाऊ बहिणीची पाठवणी करतो. तिचं माहेरपण करतो.
काळी चंद्रकळा पोत किती मऊ
घेणार बंधू व्यापारी माझा भाऊ
स्त्री गीतांचे जन्मस्थान म्हणून जातं, ऊखळ यांना महत्त्व आहे. दळण कांडण करताना मनातल्या वेदना दुःख, जात्याशी गुजगोष्टी करून व्यक्त करते.
माहेरचे सुख उपभोगून ती सासरी जायला निघते तेव्हा
हसता हसता माहेरी गेले दिस।
दळता, कांडता सासरी निघे कीस
एखाद्या भाग्यवान सासुरवाशिणीला प्रेमळ सासर लाभते. सासू सासर्यांचे प्रेम लाभते. तिच्यावर ते मायेची पखरण करतात. ती स्वतःला धन्य समजते. ती ही मग त्यांच्यावर प्रेम करते.
ङ्गसासू नि सासरा, माझ्या देव्हारीचा देव
पडावं त्यांच्या पाया, न्हाई मनी दुजाभावफ
सासू सासर्यांच्या मायेची सावली जिला लाभते आणि दुधात साखर पडल्याचे भाग्य लाभते ते पतीच्या प्रेमाच्या रूपाने. त्याच्या प्रेमाच्या गुलाबी रंगात ती न्हाऊन निघते. अभिमानाने म्हणते,
शेताच्या बांधावरी केलं शेल्याचं बुजगावणं
काय सांगू सई, शेला राजमानं केली खूण
अशा सुखाच्या राशीत ती सुखाने नांदत असते, तृप्त असते.
मनाचा खोडसाळपणा
लोकसाहित्यात सासुरवाशिणीच्या मनाचा खोडसाळपणाही गमतीशीर रीतीने व्यक्त होतो. सासरची माणसं तिला माहेरी धाडायला तयार नाहीत. सासू तिची अडवणूक करते.
सासू म्हणते,
कारल्याचं बी पेर ग सूनबाई मग जा माहेरी
मग कारल्याला कोंब फुटू दे,
मग कारली लागू दे,
मग त्याची भाजी कर.
सूनबाई म्हणते,
आता तरी जाऊ द्या माहेरी. अहो पतिराज मला मूळ आले
तर पतिदेव हाती काठी घेतात, पाठी लावतात विसर आता माहेरच्या गोष्टी.
सासरच्या अशा वागणुकीने मग सूनबाई रागावते. खोडसाळपणे म्हणते.
आला माझा सासरचा वैद्य।
डोक्यात टोपी फाटकी
कपाळाला टिकला शेणाचा।
तोंडात विडा काळा काळा
अंगात सदरा चिंध्या चुंध्या
नेसायला धोतर फाटले तुटके
पायात जोडा लचका बुचका
हातात काठी जळके लाकूड
कसा ग दिसतो
भिकार्यावाणी बाई भिकार्यावाणी।
हीच सासुरवाशीण मग माहेरच्या वैद्याबद्दल सांगते, ङ्गआता माझ्या माहेरचा वैद्य.
डोक्याला टोपी जरतारी
कपाळाला टिकला केशरी
तोंडात विडा लाल कस्तुरीचा
अंगात सदरा रेशमी
नेसायला धोतर जरीकाठी
पायात जोडा पुणेरी
हातात काठी पंचरंगी
कपाळाला गंध केशरी
कसा ग दिसतो
राजावाणी बाई राजावाणी।
आठवणींचा वळेसर
लोकसाहित्याप्रमाणे भावगीतातूनही माहेरच्या आठवणींचा सुंदर वळेसर गुंफला गेला आहे. कधी अपूर्व स्मृती तर कधी अनुभवलेले सुंदर क्षण, तर कधी भावंडांबरोबरचे सुखाचे दिवस. मातेचे वात्सल्य, कधी प्रिय व्यक्ती या सार्यांच्या स्वप्नील आठवणी मनात पिंगा घालतात. कधी ती सासरी निघालेली, व्याकुळलेली लाडकी लेक असते तर कधी सासरचे माप ओलांडणारी, बावरलेली नववधू असते. लग्न ठरलेली, आनंदाने बहरून जाणारी, आतुरलेली तरुणी असते. तिच्या सार्या भावभावनांचे स्पंदन भावकाव्यातून हळूवारपणे व्यक्त होते.
लेक लाडकी या घरची,
होणार सून मी त्या घरची
संपताच भातुकली
चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदुखुदू हसते
होऊन नवरी लग्नाची
लाडक्या लेकीची पाठवणी करताना तिची आई हळवी होऊन विहीणबाईला सांगते.
दिला पोटचा गोळा
लेक समजुनी तिजला अपुली
माया पाखर घाला।
तुम्हीच तिला आता आईच्या ठायी
पदरात घातली नऊ मासाची पुण्याई।
माय मग लेकीला समजावते. भरल्या गळ्याने आशीर्वाद देते-
ङ्गआवर आसू, सुखाने जा आपुल्या घरी
भाग्यवंती हो, औक्षवंती हो
आशिर्वाद माझा.
पण मायच्या अंतःकरणाचा पीळ असा व्यक्त होतो.
लाडके झालीस तू पाहुणी
माहेराची माया जळते लज्जा होमातुनि
वात्सल्याला पीळ पाडुनी
चाललास पाखरा
जन्मभरी जपलेले
सगळे तुटले धागे
गहिवरले डोळे पाहती वळुनी का मागे
पायखुणांचे ठसे राहिले भिजलेल्या अंगणी
लेकीच्या बाळलीला, रूसवे फुगवे, फुलत गेलेले तारुण्य सार्या आठवणी मायच्या मनात दाटून येतात. ती लेकीला सांगते,
गंगा यमुना डोळ्यात उभ्या का
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा
आठवले सारे सारे गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगते जा
बघु नकोस मागे मागे
लाडके चल पुढे
नको विसरूस परि आईला जा,
दिल्या घरी तू सुखी रहा।
आता सासरच तिचे घर. म्हणून आई मग
उपदेश करते.
तिची आठवणी करताना म्हणते,
जा मुली शकुंतले सासरी
आवरी डोळ्यांमधल्या सरी
वडील मंडळी असतील कोणी
त्यांच्या अर्ध्या वचनी
दोन्ही कुळांचे नाव वाढवी
पतिव्रतेची पदवी मिळवी
सासरी तुज वाण नसावी
लक्ष्मी तू साजिरी
माहेरची सय
नववधूच्या वेशातली ती बावरलेली ललना सासरी येते तेव्हा तिचे हृदय धडधडत असते. उंबरठ्यावरील माप ओलांडताना तिच्या चेहर्यावरील बावरलेपण पाहून प्रेमळ सासू म्हणते,
लिंबलोण उतरता अशी
का झालीस तू बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
प्रेमळ सासूने केलेले स्वागत तिला दिलासा देते खरे, पण तिच्या मनातली माहेरची सय ताजीच असते. मनाची घालमेल कोणाजवळ व्यक्त करेल?
माझिया माहेरा जा
देते, तुझ्या सोबतीला आतुरलेले माझे मन
वाट दाखवाया नीट
माझी वेडी आठवण अंगणात पारिजात
तिथे घ्यावा हो विसावा
हळूच उतरा खाली, फुले नाजूक मोलाची
माझ्या मायमाऊलीच्या काळजाच्या ग तोलाची
तुझी ग साळुंखी आहे बाई सुखी
सांगा पाखरांनो एवढा निरोप माझा
स्त्री मनाची स्पंदने किती हळुवारपणे व्यक्त होतात! सासरी आलेली ती लेक आता जबाबदार गृहिणी झाली आहे.
उंबरठ्यावर माप ठेविले
मी पायाने उलथून आले.
आले तुझिया घरी
कराया तुझीच रे चाकरी
माहेरची माया तोडुनी
इकडे आले सख्या धावुनी
वृत्ती होई बावरी
सासर आपलं मानल्या नंतरही माहेरची ओढ कमी होईल? ती मनात असलेच. तिच्या मनाचा हा हळूवार कोपरा कधी तरी आपली व्याकुळता व्यक्त करतोच.
खेड्यामधले घर कौलारू
मानस लागे तिथे विहरू
माहेरची प्रेमळ माती
त्या मातीतून पिकते प्रीती
कण सावरती माणिक मोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू
आयुष्याच्या पाऊलवाटा
किती तुडवल्या येता जाता
परि आईची आठवण येता
मनी वादळे होती सुरू
दुजाभाव नाही
माहेरच्या स्मृती मनी जागवत ती सासरी ही समरस झालेली आहे. आता ते ङ्गतिचे घरफ आहे. आनंदाचे निधान आहे. सासर माहेर दोन्ही घराबद्दल तिच्या मनात दुजाभाव उरलेला नाही. त्या भावना ती अशा व्यक्त करते.
हे माहेर, सासर ते
ही काशी, रामेश्वर ते
उजळी कळस दो घरचे
चंद्रिका पूर्ण चंद्राची
माहेर जसे तिच्या हक्काचे तसेच सासरही जिव्हाळ्याचे. दोन्ही घरची नाती जिव्हाळ्याने जुळावीत अशी तिची इच्छा.
ङ्गङ्घकृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर येऊन मिळालं सासरला.फफ
लोकगीते, भावगीते यातून माहेरची गाणी आहेतच. पण संतसाहित्यातही माहेरला तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे.
संत तुकारामांनी पंढरपूरलाच आपले माहेर मानले आहे. सासुरवाशिणीला जशी माहेरी जाण्याची ओढ असते तशीच ओढ तुकोबांना पंढरीला जाण्यासाठी होती.
विठ्ठल सोयरा सज्जन विसावा
जावून त्याच्या गावा भेटाया।
तेथे मी विठ्ठल माऊलीला भेटेन.
तुकोबा म्हणतात,
ङ्गङ्घमाझिया माहेरी सुखा काय उणे
न लगे येणे जाणे।
तुका म्हणे
एखादे व्याकुळ पाडस हरिणीला आळवावे तसे तुकोबा विठोबाला आळवतात.
प्रेमरस पान्हा पाजी माझे आई।
धाव वो विठाई सारे सोनी
अमूल्य ठेवा
लोकसाहित्याला फार जुनी परंपरा आहे. स्त्री जीवनाच्या सर्व पैलूंचे दर्शन घडवणारी लोकगीते ही अमूल्य ठेवाच म्हणावा लागेल. तसेच मराठी भावगीतातूनही स्त्रीमनाच्या हळूवार भावनांना वाट करून दिली गेली आहे. संतसाहित्यही यास अपवाद नाही. मातेचा, तिच्या मायेचा महिमाच तसा आहे.
विवाहानंतर स्त्री जीवनात एक स्थित्यंतर येते. आयुष्याच्या या वळणावर एकीकडे ती आतुरलेली असते तर दुसरीकडे मनी हळूवार ही झालेली असते. आजची आधुनिक, उच्चशिक्षित, स्वावलंबी स्त्री सर्वार्थाने कणखर आहे. जीवनात सार्यालाच सामोरे जाण्याचे मनोबल तिच्यात आहे. माहेरचे, बालपणापासूनचे संस्कार घेऊन तिने मोठी झेप घेतलेली आहे. तरीही आयुष्यात एखादा कठीण प्रसंग आलाच तर मानसिक आधारासाठी ती माहेरच्या मायेच्या माणसांकडे विश्वासाने पहाते. माहेरची मायेची, प्रेमाची माणसं हाच तिचा मोठा आधार असतो. कोणत्याही प्रसंगाने ती कोलमडून पडत नाही. इतकी कणखर आहे तरीही तिच्या मनाचा एक हळूवार कोपरा नेहमीच माहेरच्या माणसांसाठी, घरासाठी आसुसलेला असतो. सासरी सुखाने न्हाऊन निघालेली ती कौतुकाची सून असली तरीही एखाद्या सांजवेळी बाळपणीच्या आठवणींनी मातेच्या मायेने तिच्या मायेच्या स्पर्शाने ङ्गतीफ व्याकुळते.