मोबाईल नाही आई. हा डी.डी. आहे. डिटेक्टिव्ह डिटेक्टर. तुझ्या न सापडणार्या वस्तू शोधायचं उपकरण. सांग बघू, तुला आता कोणती वस्तू हवीय?
इतकी हुशार व्यक्ती विसरभोळी कशी बुवा असू शकते? आईच्या बाबतीत हा प्रश्न मैत्रेयला कायम पडत आलाय. विज्ञान शाखेची पदव्यूत्तर पदवी घेतलेली आई पुढे संशोधन करणार होती. पण आपल्या आजोबांनी वरसंशोधन करून आपल्या आईला लग्नाच्या बेडीत अडकवलं आणि तिखटा-मिठाच्या बरण्यांच्या रगाड्यात आईचं संशोधन जेवणाच्या टेबलापुरतचं मर्यादित राहिलं, कागदोपत्री उमटलंच नाही. लहानपणापासून हे सगळं ऐकत असल्यामुळे आपण विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यायचा आणि संशोधनच करायचं, असं मैत्रेयने ठरवलं होतं. बुद्धीमत्ता आनुवंशिकतेने आली होतीच. तिला प्रयत्नांची जोड देऊन मैत्रेयने एम.एस.सी.ला विशेष गुणवत्तेसह प्रथम वर्ग मिळवला. युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत अभ्यासक्रमातील प्रयोगांच्या जोडीला इतरही प्रयोग करायची संधी मिळाल्यावर तर मैत्रेयला प्रयोगशाळा छोटी पडू लागली.
आईच्या विसरभोळेपणाचे चटके लहान वयापासून बसले असल्यामुळे, त्यावर उपाय म्हणून एक उपकरण आपण बनवायचंच, असं मैत्रेयने पक्कं ठरवलं होतं. मग त्याच दिशेने तो प्रयोगशील झाला. शाळेत असताना, शाळेची बस खाली येऊन उभी राहिली तरी आईला मैत्रेयचा खाऊचा डबा कुठे ठेवलाय तेच आठवायचं नाही. कधी गणवेशातील पँटच सापडायची नाही. छोटंसं ते स्वयंपाकघर. पण त्यात अमका चमचा, तमकी वाटी, चाळणी, गाळणी अशा रोजच्या वापरातल्या वस्तूही कुठे शोधाव्या असं होऊन जायचं तिला.
“इथे खिडकीजवळ ठेवली होती कातर.“ असं म्हणत सकाळी सकाळी दुधाच्या पिशव्या कापायला गेलं की भुसकन् दूध पिशवीतून उसळणार. मग दूध तर फुकट जाणारच, पण ते सांडलेलं दूध पुसण्यात, दूध पुसलेला फडका धुण्यात वेळ जाणार तो वेगळा.
शेवटी दूध तापत ठेवलं आणि कांदे चिरण्यासाठी सुरी हवी झाली, की मग कातरच येत राहणार हातात. अशा वेळी, दुधाच्या पिशव्या कापण्यासाठी वापरलेली सुरी कुठे ठेवली ते आठवणारच नाही. दिवाळीसारख्या सणावारांना लागणारं चकलीपात्र, करंज्या-शंकरपाळी कापायची कातणी, झारा या वस्तू शोधण्यात तर किती तास जातील ते सांगताच येणार नाही. तळलेल्या चकली-चिवड्यामधलं तेल निथळत ठेवायसाठीची मोठी गाळणी तर चिवड्यातलं तेल आपोआप निथळून येईल, पण सापडणार नाही. शेवटी तर मैत्रेयच्या बाबांनी सांगायला सुरुवात केली, “नंदा, उद्या चकली करणार आहेस ना तू मग आजच चकलीपात्र, गाळणी, झारा, कढई असं सगळं शोधून ठेव. नाहीतर आपण बाहेरून तयार चकलीच आणू सरळ.”
“वा रे कुमार! मी भाजणी भाजून दळून आणलीत एवढी ती काय बाहेरून चकली आणायसाठी?”
“त्याची थालीपीठं करून खाऊ आपण.” कुमारने म्हणायचं. शेवटी कुमारने कामवाल्याबाईंना सांगून ठेवलं, की दिवाळीची साफसफाई करतानाच दिवाळीसाठी फराळ करायसाठी लागणारं साहित्य सापडेल. सापडेल तसं एका पिशवीत गोळा करून ठेवायचं. बाईंनी त्याप्रमाणे केलंही. पण ऐनवेळी नंदाला ती पिशवीच सापडेना. म्हणजे कातणी, चकलीपात्र, झारा, गाळणी सगळं एकदमच गुल. पूर्वी निदान यातली एकतरी वस्तू सापडायची शक्यता होती. पण आता तर कोणतीही वस्तू सापडायची शक्यता नाही.
अमकी साडी मिळेल तर तिच्यावरचा ब्लाऊज मिळणार नाही. तमका ब्लाऊज मिळेल तर त्याच्या वरची साडी मिळणार नाही. शेवटी साडीच्या घडीच्या आत ब्लाऊजची घडी ठेवायला सुरुवात केली, तर आता जोडीनेच दोघं गुल. अमका सिनेमा पाहू किंवा तमकं गाणं ऐकू असं मनात आलं, तर नेमकी ती सी.डी. सोडून बाकी ढिगभर सिड्या सापडतील. शेवटी ज्या सापडतील, त्यातलंच गाणं ऐकायचं त्यातलाच सिनेमा पाहायचा, अशी कायम विसरभोळेपणाशी तडजोड.
कुमारची ऑफिसला जायची वेळ झाली तरी नंदाला तिने ठेवलेले रूमाल, सॉक्स कधीच वेळेवर सापडणार नाहीत. शेवटी कुमारने स्वतःच रात्री झोपण्यापूर्वी आपल्या वस्तू एकत्र करून ठेवायला सुरुवात केली. पण नंदाने समजा आपली कोणती वस्तू शोधायसाठी त्या ठिकाणाच्या आसपास ढवळाढवळ केली, तर सकाळी कुमारच्या नशिबी पुन्हा शोधाशोध आहेच. मग भांडाभांड, कटकटी हे, ते. लहानपणापासूनच हे सगळं पाहत आल्यामुळेच मैत्रेयने आईसाठी ते अत्याधुनिक उपकरण बनवायला घेतलं.
उपकरण छोटंसंच असणार आहे, पण अत्यंत उपयुक्त. अगदी मोबाईलच्या पडद्याएवढा छोटा पडदा. आपण मोबाईलमध्ये जशी आप्तेष्टांची, मित्रमंडळींची नावं सेव्ह करतो, तशी त्या उपकरणात सर्व वस्तूंची नावं सेव्ह केलेली असणार. वस्तूच्या नावाच्या पुढ्यात वस्तूचा क्रमांक असणार. त्यात क्रमांकाची एक छोटी ‘चिप’ मूळ वस्तूवर लावलेली असणार. ही चिप अगदी वॉटरप्रुफ, हिटप्रुफ, हे प्रुफ, ते प्रुफ वगैरे. म्हणजे ती वस्तू धुवा, गॅसवर चढवा, फ्रीजमध्ये ठेवा, कुठेही ठेवा; ती चीप निघणार नाही म्हणजे नाही.
आईने फक्त त्या उपकरणामध्ये त्या वस्तूचं नाव काढायचं, क्रमांकावर ‘क्लिक’ करायचं. मग ती वस्तू जिथे कुठे असेल तिथे तिच्या चिप मधून विशिष्ट प्रकारचा आवाज यायला लागणार. त्या आवाजाच्या दिशेने आई गेली की आईला ती वस्तू मिळालीच पाहिजे. या उपकरणासाठी एक चार्जरही बनवायचा. म्हणजे ‘चार्ज’ गेला तर पुन्हा चार्ज करता यावं यासाठी.
आपला पी.एच.डी. चा अभ्यास करता करता हे उपकरण बनवायचं काम मैत्रेय युद्धपातळीवर करत होता. आपल्या बुद्धीमती आईचं फक्त या विसरभोळेपणामुळे किती नुकसान होतंय, ते या उपकरणामुळे थांबेल. आई-बाबांमध्ये उडणार्या खटक्यांना आळा बसेल ही खात्रीच होती त्याला. रात्री उशिरा-उशिरापर्यंत प्रयोगशाळेत बसून त्याने मोठ्या कष्टाने ते उपकरण बनवलं. पण वस्तूंना चिकटवायच्या चिप्स बनवायला खूप मेहनत करावी लागली त्याला. चार्जर बनवणं फारच सोपं होतं त्या मानाने. मग सुट्टीच्या दिवशी आईसोबत बसून त्याने आईला उपयुक्त असणार्या सर्व वस्तूंची यादी बनवली. स्वतःच्या आणि बाबांच्या वस्तू, मौल्यवान वस्तू, कपडे, भांडी-कुंडी, सौंदर्यप्रसाधने (फणी, टिकल्या, पावडरचा डबा, साबण, इत्यादी.) असे यादीमध्ये विभाग केले. मग पुन्हा ते एबीसीडी अशा क्रमाने उपकरणात नोंदवले. त्यांना क्रमांक दिले. मग ते क्रमांक असलेल्या चिप्स त्या त्या वस्तू शोधून त्यांच्यावर चिटकवल्या. उपकरणात आवाज लहान-मोठा करायचीही सोय केली. कारण वस्तू बंद कपाटात किंवा फ्रीजमध्ये असली तर तिच्या ‘चिप’मधून येणारा आवाज कानापर्यंत पोहोचायला हवा ना?
रिमोट कंट्रोल पद्धतीने त्या त्या वस्तूंचा क्रमांक दाबला की त्या त्या वस्तूला लावलेल्या ‘चिप’ मधून आवाज येणार. थोडक्यात म्हणजे वस्तू म्हणणार, ‘मी इथे आहे. मी इथे आहे.’ मैत्रेयच्या प्रबंधाचं काम अजून बाकी होतं. पण हे उपकरण तयार झालं तेव्हा ‘आपला प्रबंधच जणू पूर्ण झालाय,’ असा आनंद झाला त्याला. मग एके दिवशी आई घरात नाहीये असं पाहून त्याने आपल्या उपकरणाची चाचणीही घेतली. चिप्स चिकटवून चारच दिवस झाले होते. पण या चार दिवसांत एकेका वस्तूच्या जागा इतक्या बदलल्या होत्या, की आईच्या गुणवत्तेने चकित व्हायची पाळी आली त्याच्यावर. असो. पण त्याचं उपकरण काम तर छान करत होतं. सारखं सारखं ‘उपकरण उपकरण’ कसलं म्हणायचं, म्हणून त्याने त्याचं नामकरणही केलं, ‘डी.डी.’ म्हणजे डिटेक्टिव्ह डिटेक्टर!
स्वतःच्या बुद्धीमत्तेवर खूश झाला मैत्रेय. ‘नशीब की आईकडून बुद्धीमत्तेबरोबर हा विसरभोळेपणा नाही आलाय आपल्याकडे,’ त्याच्या मनात नेहमीप्रमाणे आलंच.
आईच्या वाढदिवसाला पुढच्या आठवड्यात तो ही भेट आईला देणार होता. पण एवढा ‘डी.डी.’ तयार आहे, तर आठवडाभर थांबायचं कशाला. मैत्रेयला धीर धरवेना. आई बाहेरून आल्या आल्या मैत्रेयने सुरेख चकचकीत कागदात गुंडाळलेला, वर रिबन बांधलेला डी.डी. आईच्या हातात दिला. “आई, यावर्षी तुला वाढदिवसाची खास भेट. मी स्वतः बनवलेली भेट. अगदी तुझ्या उपयोगाची वस्तू आहे. तुला आवडेल बघ.”
नंदाने वरची रिबन, कागद काढून
डी.डी ला बाहेर काढलं. “अरे मोबाईल तर आहे माझ्याकडे. परत कशाला आणलास?”
“मोबाईल नाही आई. हा डी.डी. आहे. डिटेक्टिव्ह डिटेक्टर. तुझ्या न सापडणार्या वस्तू शोधायचं उपकरण. सांग बघू, तुला आता कोणती वस्तू हवीय?”
“मला? चहा प्यायचाय आता. चांगला गरमागरम. सकाळी गाळणीच सापडत नव्हती. शेवटी बाबांच्या रूमालाने गाळला चहा. रूमाल शोधून चहा गाळेपर्यंत थंड झाला तो. चल, माझी गाळणी शोध बघू.” मैत्रेयने डी.डी. मधला भांडीकुंडी विभाग काढला. गाळणीचा क्रमांक शोधला. एकशे एकोणपन्नास. नंबर ‘क्लिक’ केला. कपड्यांच्या कपाटातून रिंग वाजायला लागली.
“तुझा डी.डी. काही कामाचा नाही मैत्रेय. गाळणी कपाटात असणं शक्य तरी आहे का?” खरं खोटं करण्यासाठी मैत्रेयने कपाट उघडलं. ‘सेफ’ मधून आवाज येत होता. सेफ उघडली. दागिन्यांच्या डब्यावर गाळणी. “ही बघ,” मैत्रेयने गाळणी काढून दाखवली.
“अय्या, तिथे कशी गेली? हं, बरोबर. सकाळी मी गाळणी काढली. चहा उकळत होता. म्हटलं, अर्क येईपर्यंत अंगठी काढून सेफमध्ये ठेवूया. पीठ मळताना पीठ जातं ना रे अंगठीत. डाव्या हातात गाळणी होती. ती अंगठीबरोबर ठेवली असणार सेफमध्ये.”
“नंदा, ए नंदा, या माझ्या रूमालाला हे डाग कसले?” कुमार ओरडत होता, म्हणून दोघं तिथे धावली. रूमालाला मधोमध गोल तपकिरी रंगाचा डाग.
“कुमार, अरे चहा गाळला ना त्याने सकाळी. थांब, आता पुन्हा त्यानेच गाळते. म्हणजे पूर्ण रूमालच तपकिरी झाला की डाग पडलाय ते कळायचंही नाही.” नंदाचं व्यक्तव्य ऐकून कुमार काही बोलणार, तेवढ्यात मैत्रेय म्हणाला, “बाबा, त्यापेक्षा नवीन रूमाल काढा ना वापरायला. हा रूमाल जुनाच तर झालाय.”
“नवा रूमाल कोण देणार शोधून मला?” कुमार वतवतला.
“थांबा, मी देतो.” मैत्रेयने डी.डी. वर रूमालाचा क्रमांक पाहिला. क्रमांक ‘क्लिक’ केला. शोकेस मधून रिंग ऐकू आली. मैत्रेयने शांतपणे शोकेस उघडली. छोट्याशा ताजमहालाच्या प्रतिकृतीखाली रूमालांची पिशवी सापडली.
“वा मैत्रेय, हे खूप छान आणि उपयुक्त उपकरण बनवलंय तू. चला उद्यापासून वेळेवर पोहोचेन मी ऑफिसला.” कुमार खूश झाला. नवं खेळणं आल्यावर जसं मूल तेच खेळणं घेऊन खेळतं, त्याचप्रमाणे संध्याकाळभर घरातून इकडून तिकडून रिंग वाजत होती. नेहमीपेक्षा नंदाचंही लवकर आटपलं. सगळ्या वस्तू पटापट सापडत गेल्या ना. उद्यापासून शोधाशोध करायला नको अशा समाधानात अख्खं घर शांतपणे झोपी गेलं.
‘आज काही लवकर उठायला नको. वस्तू पटापट मिळणार. म्हणजे शोधाशोधीचा खेळ वाचणार.’ असा विचार करून नंदानेही पहाटे दूधवाल्याकडून दुधाच्या पिशव्या घेऊन धुवायसाठी मोरीच्या कट्टयावर नेऊन ठेवल्या आणि पुन्हा ती अंथरूणात लवंडली. खिडकीतून प्रकाशाचा किरण डोळ्यात शिरला तेव्हा धडपडत उठली ती. ‘डी.डी.’ वस्तू शोधेल, पण स्वयंपाक तर आपल्यालाच करायचाय ना! नंदाने गॅस पेटवून चहा करत ठेवला. पण नेहमीप्रमाणे गाळणी सापडेना. ‘कालच सेफमधून आणून इथेच तर ठेवली होती. गेली कुठे काही हरकत नाही. डी.डी. वरून वस्तू शोधू. अरे, डी.डी. कुठे गेला? काल इथेच टेबलावर ठेवला होता. युद्धपातळीवर शोधाशोध झाली. डी.डी. सापडेना. चहाला उकळ आली. वास आल्यावर नंदाने घाईघाईने गॅस बंद केला. कालचा कुमारचा डाग पडलेला रूमालच घ्यावा. तर डाग पडलेला रूमालही सापडेना. हातात आला तो काल शोकेसमधून काढलेला नवा कोरा रूमाल. ती चहा गाळणारच होती. तेवढ्यात आवाज ऐकून कुमार पोहोचलाच होता म्हणून ठीक. तिच्या हातून नवा रूमाल काढून घेत कुमारने तणतणायला सुरुवात केली. आवाज ऐकून मग मैत्रेयही पोहोचला. म्हणाला, ‘डी.डी. कुठेय आई तुझा?’
“अरे तोच तोच तर सापडत नाहीये ना म्हणून तर.” बराच वेळ शोधल्यावर डी.डी. नंदाच्या उशीखाली सापडला. “अरे, हरवू नये म्हणून मीच तिथे ठेवला होता.” मग
डी.डी.च्या मदतीने गाळणी शोधली. यावेळी गाळणी तिच्या नेहमीच्या जागेवरच होती. पण ती तिथे नसणारच, अशा खात्रीने नंदाने तिथे शोधली नव्हती. मधल्या मधे चहाचा ‘आईस टी’ झाला होता. शेवटी तिघांसाठी नवा चहा करता करता नंदा म्हणाली, “मैत्रू, तुझा डी.डी. मस्तच आहे रे. पण तो हरवला तर त्याला शोधायसाठी एक दुसरा छोटासा डी.डी. आण बाबा. आणि या डी. डी. ला पण एक चिप चिकटवून टाक छानपैकी.”
सध्या मैत्रेयचं नवं काम युद्धपातळीवर चालू आहे. डी.डी.ला शोधायचा नवा डी.डी. बनवायचं काम.
-डॉ. सुमन नवलकर