मूग डाळीचे लाडू
साहित्य: 1 कप रवाळ मूग डाळ पीठ, अर्धा कप तूप, अर्धा कप पीठीसाखर, पाव कप दूध, 1 लहान चमचा वेलचीपूड, आवडीनुसार बेदाणे व बदाम, पिस्ता यांचे काप.
कृती: मूगडाळ जराशी रवाळ दळून आणावी. तूप पातेल्यात गरम करायचे. त्यात मूगडाळीचे पीठ मध्यम आचेवर खमंग भाजावे. पिठाचा रंग बदलला आणि खमंग भाजले गेले की त्यावर दुधाचा हबका मारावा व ढवळावे. गॅस बंद करून पातेले खाली उतरवावे. भाजलेले पीठ कोमटसर झाले की त्यात पिठीसाखर घालावी. बर्याचदा मिक्स करताना पिठीसाखरेची गोळी होते त्याची नीट काळजी घ्यावी. नीट मिक्स करावे. वेलची पूड, सुकामेवा घालावा व लाडू वळावे.
बुंदीचे लाडू
साहित्य: 250 ग्रॅम डाळीचे पीठ (मोठ्या अडीच वाट्या), 250 ग्रॅम तूप, 350 ग्रॅम साखर, दीड वाटी पाणी (पीठ भिजवण्यासाठी)
कृतीः डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. नंतर त्यात 1 टेबलस्पून कडकडीत तुपाचे मोहन घालावे व पीठ भिजवावे. गुठळी राहू देऊ नये. भज्याचा पिठाइतपत असावे. नंतर कढईत तूप तापत ठेवावे व बुंदीच्या झार्यावर वरील पीठ थोडे घालून झारा ठोकून बुंदी पाडाव्या. कढईजवळ कढईच्या उंचीपेक्षा जरा उंच येईल असा पाट धरावा. पाटावर झारा ठोकावा. लालसर रंगावर आल्या की बुंदी काढाव्या अशा सर्व बुंदी पाडून घ्याव्या. प्रत्येक वेळी झारा पाण्याने साफ करून घ्या. साखरेत पाणी घालून एकतारीपेक्षा जरा जास्त असा पाक करावा. पाकात बुंदी टाकाव्या. नंतर बुंदी पाकात मुरल्यावर लाडू वळावे.