दिवाळीचा आनंद उपभोगण्याची एक पद्धत म्हणजे गोडधोड, तिखट पदार्थांची रेलचेल. हा फराळ घरच्या घरी बनवण्यासाठी या काही रसिपीज्
रवा नारळाचे लाडू
साहित्य: 2 कप बारीक रवा, 1 कप खवलेला ताजा नारळ, दिड कप साखर, 1 कप पाणी 3 ते 4 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड,25 बेदाणे.
कृती: रवा मध्यम आचेवर 4 मिनिटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे. जेणेकरून रवा जळणार नाही. रंग बदलेस्तोवर भाजू नये, अगदी हलकेच भाजावे. नंतर परत रवा भाजायचा आहे. भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेस्तोवर (10 मिनिटे) तसेच ठेवावे. कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले की रवा व नारळाचे मिश्रण घालावे. 8 ते 10 मिनिटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने रवा आणि तुपाचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले की साधारण 3 ते 4 मिनिटांनी पाकाचा थेंब पहिले बोट आणि अंगठा यात पकडून उघडझाप करावी. जर एक तार दिसली की पाक तयार आहे असे समजावे. ही तार अगदी सेकंदभरच दिसेल. किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले की 3 ते 4 मिनिटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला की गॅस बंद करावा. लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरुवातीला पातळ दिसेल पण काही वेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे. मिश्रण आळले की लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.