झिपरी गावातील एक मुलगी एकदम झिपरीतून उठून मुंबईत आली. हे म्हणजे असं होतं की, फिश टँकमधल्या एका माशाला फिश टँकमधून बाहेर काढून समुद्रात सोडून देणं. मलाही असंच मुंबईत सोडून दिलं गेलं. पण ते अगदी गाजावाजा करत. बँडबाजा वाजवून. ङ्गसावधान - सावधानफ असं म्हणत.
पण मुंबई प्रथमच बघणारी मी सावधान कशी काय राहणार? भेंडाळून गेले होते अगदी. ना दिशेचे ज्ञान, ना गर्दीचं भान.
सायन नाका माहीत आहे तुम्हाला? बरोब्बर! सायन नाक्यावर एक गोलाकार इमारत आहे. मुख्य रस्ता ते गल्ली अशी छडीच्या दांड्यासारखी वळणारी. त्या शामसुंदर नावाच्या इमारतीत तळ मजल्यावर मी झिपरीतून निघून, तिथे येऊन विसावले.
अम्मा, बापूंची ही जानकी एकुलती एक मुलगी. दिसायला सोज्वळ, असे झिपरीतील प्रत्येक उंबरठा म्हणतो. शिवाय लांबलचक केस आणि गोरा वर्ण! अशा या जानकीला तसाच सोज्वळ पण राजबिंडा नवरा हवा, असे अम्मा जाता-येता म्हणत असे.
अम्मा! आईला मी अम्मा म्हणू लागले… गंमतच ती ही एक. घराच्या मागच्या गोठ्यात गायी आहेत दोन. त्या हम्मा… असं म्हणतात. त्यांचं ऐकून मी हम्मा असं बोलले. आईला वाटलं तिला हाक मारली. अम्मा! माझे पहिले बोबडे बोल ! हम्माचं अम्मा झालं आणि मग तेच राहिलं अगदी आत्तापर्यंत.
इथे मुंबईत हम्मा नाही आणि अम्माही नाही. कुठल्या कुठे आले. मुंबई! गजबज, रहदारी, गोंगाट, हॉर्न, पळापळ आणि रात्रसुद्धा आवाजाचीच. सतत ट्रक्सचे आवाज. काय इतकं आणत असतात. रोजच्या रोज? आणि… योगायोग म्हणायचा का हा? जानकीच्या नवर्याचं नाव ङ्गरामम. पत्रिका जुळली आणि मुलगा अगदी रामासारखा आहे, असं घर बोलू लागलं. जानकीने फक्त मान डोलवली. राम दिसला. तो साखरपुड्याच्या दिवशी आणि लगेचच चार दिवसांनी जानकी रामाची झाली. मुलगा एकटाच. ना आई- बाप… दूरचे काका होते. त्यांनी जमवलं हे लग्न.
पण जानकीची काहीही तक्रार नाही. राम खरंच जानकीला शोभेल असाच आहे. घर छान आहे ह्या जानकीचं. तीन मोठाल्या खोल्या. स्वयंपाकघरात एक अख्खी बाज मावू शकेल, इतकी मोकळी जागा आहे.
घर सजवण्यात पहिले काही महिने गेले. आणि हळूहळू सगळ्याची सवय होत गेली. झिपरी गावातील शांतता इथे शोधूनही सापडणार नाही. पण आता कोलाहलाचीही सवय झाली. आणि मग सगळ्याचीच सवय झाली. शेजारच्या चाचींची, भाभींची, खिडकीसमोर असणार्या बस स्टॉपची आणि इमारतीच्या गेटपाशी फळांची टोकरी घेऊन बसणार्या फळवालीची. जरा पुढे गेलं की, असणार्या सायन हॉस्पिटलची आणि सतत वाजणार्या अॅम्ब्युलन्सच्या सायरनची.
रोज रोज इतकी माणसं आजारी पडतात? रोज रोज इतके अपघात होतात?
झिपरीत कधी अॅम्ब्युलन्स बघितलीच नव्हती असं नाही. पण क्वचितच! सगळे आजार वैद्यकाका बरे करायचे. नाडी तपासायचे आणि विचारायचे, ङ्गहं, काल कैर्या जास्त खाल्ल्यास. होय ना? मी मग हो म्हणायची. ङ्गउद्यापासून पुढले आठ दिवस आंबट खाणं बंद! समजलं?फ ङ्गहोफ. ङ्गहे चूर्ण गरम पाण्यातून सकाळ संध्याकाळ घ्यायचं. पळा…फ
शामसुंदरच्या मागच्या गेटशी एक वैद्य आहेत. अगदी कळकट खोली आणि जुनी केव्हाची तरी गादी. त्यावर पिवळा राप चढलेली पांढरी चादर आणि एक कापसाचे गठ्ठे झालेला आणि मधूनच भोसके पडलेला लोड. नाना वैद्य म्हणतात त्यांना. पूर्वी खूप नाव होतं म्हणे त्यांचं. त्यांचे वडील मोठे धन्वंतरी होते. ही रीघ असायची. पण पुढे केव्हा तरी सायन हॉस्पिटल झालं आणि नाना वैद्य एकटे पडू लागले. खूप विश्वास असलेले अजूनही येतात. पण… नाना वैद्य पूर्ण वेळ म्हणजे सकाळी दहा ते साडेबारा आणि संध्याकाळी साडेचार ते सात खोली उघडून बसतात. कुठली कुठली जुनी पुस्तकं. आजही अभ्यास करत असतात. नेहमी म्हणतात. ङ्गहल्ली लोकांना मुळापासून बरं व्हायचं नसतं. वरवर उपचार, तेही तातडीचे हवे असतात. चालायचंच. पण ही विद्या आहे. ती कधीही वाया जात नाही. कितीही अभ्यास केला तरी काही तरी राहतंच!फ
मी नाना वैद्यांकडेच जाते मला बरं वाटेनासं झालं तर.
राम एकदा का ऑफिसला गेले की, मग मला फुरसतच फुरसत. लग्नाला चार वर्षे झाली पण अजून कूस उजवली नाही. कोण कोण काय काय उपाय सांगत असतात. मी मनोभावे करत असते. राम सांगायचे की आता खूप उपाय आहेत. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं आहे. हे देव, उपवास, व्रत वगैरे सोडून दे. खरं होतं त्याचं म्हणणं. पण मी दोन्ही गोेष्टी करायला तयार होते.
मग सहज नाना वैद्य आठवले. एकदा सकाळी तडक त्यांच्याकडे गेले. त्यांनी नाडी तपासली. रामला घेऊन या, असं म्हणाले. मी बरं म्हटलं. शामसुंदर इमारतीच्या मागच्या गेटमधून निघून बाहेर रस्त्यावर यावं लागायचं. आतून वळसा घालता यायचा नाही. मध्ये जाळीचं कुलूप बंद दार होतं. तशी निघाले मागच्या गेटमधून. रस्त्यावरच्या फुटपाथवरून चालत होते. वळसा घेतला आणि समोर अगदी अचानक एका सायकलस्वाराला एका गाडीने ठोकरलं. तो सायकलस्वार धाडकन पडला. मी धावले. लहानसा पोरगा तो… खरचटलं होतं त्याला. नाना वैद्याकडे नेलं. त्याच्या औषधाचे पैसे दिले. सायकल पार वाकडी झाली होती. वेणीच्या पिळ्यासारखी.
रामला सांगितलं तर ते म्हणाले, ङ्गकशाला उगीचच धावलीस? कोण कुठला आणि ज्याने ठोकर मारली तो पळून गेला असणार. हो ना? अगं ही मुंबई आहे. इथे असे अपघात होतच असतात. आपण पडू नये त्यात.फ
खरं ही असेल रामचं! पण डोळ्यासमोर काही होतं आणि आपण दुर्लक्ष करायचं, हे कसं काय जमतं?
अम्मा-बापू आले घरी राहायला आणि अम्माला ही रहदारी, गोंगाट बघून अगदी आश्चर्य वाटलं. अम्मा म्हणाली पण, ङ्गकशी काय झोप लागते गं तुम्हाला एवढ्या आवाजात?फ
पण सगळ्याची सवय होते हळूहळू. मी अगदी आनंदात आहे. हे बघून दोघेही तृप्त झाले. टँकमधला मासा समुद्रात पोहायला शिकला… गंमतच एक.
कुठे विचार कुठे घेऊन जातात! आता तो सायकलवाला, त्याचा अपघात आणि अम्मा-बापूंचं घरी येऊन जाणं… काही संबंध आहे का? पण विचार हे असेच… धावत राहतात सतत- सतत…
राम खरंच आले नाना वैद्यांकडे. नाना वैद्यांनी मला बाहेर थांबायला सांगितलं. काय बोलले, कुणास ठाऊक? पण रामना पटलं वाटतं.
आणि मग आशा पल्लवित झाल्या. सर्व गोंगाट, गडबड जी काही होती ती ह्या घराबाहेर होती. घर शांतच असायचं. राम गेले ऑफिसला की सर्व शांत शांत!
त्या घरात गडबड हवी होती. आवाज हवे होते.
नाना वैद्यांचा होरा खरा ठरला. जानकीला दिवस गेले. राम कित्ती आनंदला. मग काय? झिपरीत सर्वत्र बातमी पसरली. अम्मा-बापूंनी संपूर्ण झिपरीला सांगितलं. मी अगदी आनंद, सुख म्हणजे काय हे अनुभवलं. राम-जानकीचा आत्मा झाला आत्मज. आत्मजच्या भोवती घर फिरू लागलं. अम्मा-बापूंचा मुक्काम शामसुंदरमध्ये जास्त काळ होऊ लागला. नाना वैद्यांना तलम धोतर जोडी आणि उपरणं दिलं. त्यांनीही ते आनंदानं स्वीकारलं.
आत्मज भराभरा मोठा होत होता. काल घातलेले कपडे आज होईनासं होतं गेले. पोरगं फार लाघवी, गोंडस आहे, असं भाभी-चाची म्हणत. आहेच तो तसा.
शाळा! हो, आत्मज बालवाडीत. म्हणजे प्ले ग्रुपला जाऊ लागला. भारी हुषार! असं टिचर सांगतात.
त्याच्या गंमती त्या केवढ्या. प्ले ग्रुपच्या इमारतीत एक मांजराचं पिल्लू होतं म्हणे. ते सारखं भुकेने म्यांव म्यांव करत राहायचं. आत्मज रोज त्याच्या डब्यातला खाऊ त्याला द्यायचा.
रस्त्यावर भटकी कुत्री किती तरी! त्यातली काही शामसुंदरच्या आवारातही यायची. झालं! लगेचच हा निघाला त्यांना पोळी द्यायला.
मला हे आवडायचं त्याचं कनवाळू असणं. मी झिपरीत होते. लहान होते तेव्हा मी ही असंच काही करायचे.
एकदा गंमत झाली. आत्मज असेल दुसरीत. पतंग उडवायला गेला होता गच्चीवर आणि कसं कोण जाणे. मांजात एक पक्षी अडकला. आत्मजने सर्वांना सांगितलं. पतंग गेला तरी चालेल पण मांजा खेचायचा नाही. त्याने हळूवार मांजा उतरवत आणला. पक्ष्याला मोकळं केलं.
हा असा कसा? इतकं मन निर्मळ कसं? दुसर्यांचा इतका विचार? खूप विचार…
घराच्या खिडकी समोरच एक बस स्टॉप आहे. फूटपाथला लागून. काही दिवसांपासून पोळ्या भाजल्याचा वास येऊ लागला होता. मला नवल वाटलं होती की, ह्या बाजूला कुणाचंच स्वयंपाकघर नाही आणि इतक्या वर्षात कधी असा वास आला नव्हता. मग…?
मी एकदा न रहावून गेटमधून बाहेर आले. फूटपाथवर बघितलं. तर एक माणूस स्टॉपच्या आडोशाला चूल पेटवून त्यावर पोळ्या भाजत होता. मग नीट बघितलं तर… मला धक्काच बसला. त्या माणसाला दोन्ही पाय नव्हते. गुडघ्याच्या पर्यंतचे पायच नव्हते. तो भिकारी होता.
कसा काय आला इथे? आधी कुठे होता? आणि…
तसे सायन नाकाच्या सिग्नलला अनेक भिकारी असतात. त्यांना अनेकदा बघितलंही होतं. चांगले डोळस भिकारी आंधळ्याचं सोंग घेऊन भिक मागताना मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. माणसं फसतात. त्यांना दया येते. त्यांच्या आंधळेपणावर सहज विश्वास ठेवतात आणि भीक घालतात. मला फारच राग येतो. दोघांचाही. भीक मागणार्या खोट्या आंधळ्यांचा आणि अंध विश्वासाने भीक घालणार्यांचा.
पण हा खरंच लंगडा नव्हे तर अपंगच होता. चेहरा बघितलात तर अगदी तजेलदार. म्हणजे कोणे एके काळी हा चांगला गृहस्थ असणार. पण आता? काय ही दैना?
रामना मी त्याच्याबद्दल सांगितलं तर ते मलाच हसले. म्हणाले, ङ्गइथं काय घडतं ते तुला माहित नाही का? अगं भीक मिळावी म्हणून असे अपंग… जाऊ दे. तुला कळणार नाही. अथवा तुझा विश्वास बसणार नाही. मी त्यांना म्हटलं की, मला का नाही कळणार? आणि मी कधी अविश्वास दाखवलाय तुमच्यावर? तर म्हणाले की, ह्या भिकार्यांचा दादा असतो. तो भीक मागायला लावतो. सर्व पैसे स्वत: घेतो. माणूस अपंग, आंधळा, लुळा असला की भीक जास्त मिळते. मग त्यासाठी हात, पाय तोडायलाही कमी करत नाहीत हे दादा…
माझ्या अंगावर काटाच आला. झिपरीत असं काहीही नाही. झिपरीत तर भिकारीही नाहीत. कुणी एखादा ङ्गभिक्षां दे हीफ असं म्हणणारा क्वचित! पण भीक? नाहीच.
म्हणजे त्या माणसाचे पाय तोडले का कुणी? भाभी सांगत होती, इथं मुलंही पळवतात. म्हणजे? मुलांना पळवतात आणि करतात काय? भिकारी बनवतात..! नाही, मी आत्मजला सांभाळेन. त्याला नाही कुणी पळवून नेऊ शकत…!
राम ओरडलेच मला. नाही नाही त्या गोष्टी का बोलत बसते शेजारी-पाजार्यांशी? काही होत नाही आत्मजला. समजलं?
मी हो म्हणाले.
आणि अचानक आत्मज सांगत आला. ङ्गआई कणिक दे थोडी.फ मी विचारलं , ङ्गकशाला रे?फ तो म्हणाला, ङ्गतो बाहेर पाय नसलेला काका बसतो ना. त्याला हवी आहे. पोळी करायला. खूप उपाशी आहे.फ
मी आत्मजला ओरडलेच. ङ्गका बोललास तू त्याच्याशी? तू इमारतीबाहेर गेलासच का? घरात बस. नाही जायचं आता बाहेर. म
झालं…! लगेच स्वारीनं भोकाड पसरलं आणि मी भयंकर दचकले. खिडकीखालून आवाज आला.
ङ्गबेहेनजी, बच्चे को चिल्लाओ नहीं. मैने नही पुछा आटा. वो तो खुदही… छोड दो बेहेनजी- मै जा रहा हू. बच्चा बहुत प्यारा है. खयाल रखियो.फ
मला कसंतरीच झालं. खिडकीशी गेले तर तो खुरडत खुरडत जाताना दिसला. संध्याकाळची वेळ. दारात कुणी आलेला हात पसरून- रिकामं कसं पाठवायचं? मी घरासमोर निरांजन उजळवलं. नमस्कार केला आणि आत्मजकडे चार पोळ्या, भाजी दिली. म्हणाले, ङ्गदे त्याला नेऊन. पण फक्त आजच हं. रोज रोज नाही हं.फ आत्मज उड्या मारत पळाला. रडू कुठल्या कुठं गेलं. खरंच भारी कनवाळू पोर!
पण मग विनाकारण माझं लक्ष रोज त्या काकाकडे जाऊ लागलं. त्याला आत्मज काका म्हणू लागला. राम ना किती राग यायचा. ङ्गकाका काय? तो काय माझा भाऊ आहे?फ मी हसायचे. पण राम मग आणखीनच चिडायचे. ङ्गहसू नकोस आणि आत्मजने त्याच्याशी पुन्हा बोलता कामा नये. कोण कुठला भिकारी तो! मुंबईत भिकार्यांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिस, सरकारही काही करत नाही. कुठून येतात एवढे भिकारी मुंबईत?फ खरंच कुठून येतात? झिपरीला एकही भिकारी बघितला नाही कधी, हे पुन्हा पुन्हा मनात येत असे.
पण आत्मज! तो ऐकतो? रोज काही बाही त्या काकाबद्दल सांगत असे. स्कूल बस येईपर्यंत हा गेटपाशी उभा असतो आणि त्याच वेळात तो काका तिथे खुरडत खुरडत भीक मागत फिरत असतो. सकाळची घाईगर्दीची वेळ. वाहनं सुसाट असतात. सिग्नल पडला की, हा चालला. प्रत्येक गाडीच्या काचेवर ङ्गठक्ठक्फ करत… हिरवा सिग्नल झाला की हा रस्त्याच्या मध्यावर. रोड डिव्हायडरवर. भितीच वाटायची ते बघताना. मग पुन्हा लाल सिग्नल होइपर्यंत थांबायचा. मिळालेली चिल्लर शर्टाच्या खिशात मोजून मापून टाकायचा.
मला माझंच आश्चर्य वाटलं. इतकं निरीक्षण केलं मी त्याचं.
अशीच दुपारची वेळ. आत्मज शाळेत गेलेला. राम ऑफिसला. भाजी निवडत बसले होते. टी. व्ही. वर काही तरी चालू होतं आपलं. तेवढ्यात आवाज आला. ङ्गबेहेनजी- बेहेनजीफ!
मी दचकले, ङ्गकोण?फ
ङ्गपानी चाहिये था… आज टँकर आया नही, तो पानी मिला नही. एक बॉटल पानी दो बेहेनजी…फ
हे असं? भिकारी सरळ सरळ खिडकीखाली उभा… उभा नाही बसलेला! बसलेला? नाही… काहीही असो पण आलेला. पाण्याला नाही म्हणू नये. उठले. खिडकीपाशी गेले. मोठा गडवा घेऊन. कळकट प्लॅस्टिकची बाटली… ग्रीलमधूनच ओतलं पाणी त्यात. सांडलं…लवंडलं.. पण ती बाटली काही हातात घेतली नाही.
ङ्गमाफ करना बेहेनजी. आपको तकलीफ दी.! रोज टँकरवाला पानी देता है, आज आयाही नही.. माफी…फ
मी नुसतीच मान हलवली. हे वाढतंच चाललंय असं वाटलं. राम ना आवडणार नाही. पण सांगायला तर हवंच. शामसुंदरच्या गेटवर एक पहारेकरी हवाच. शेजारच्या टॉवरच्या गेटवर असतो चोवीस तास तसा. म्हणजे असं कुणी आत येऊ शकणार नाही. तो ही एक जीव आहे.
भाभीला हे सांगितलं तर ती चिडलीच. ङ्गअसं कसं दिलं पाणी? लहान मुलं आहेत इमारतीत. असा इमारतीत यायला लागला आणि उद्या एखाद्या मुलाला पळवून नेलं तर?फ
पण मला समजेना की अपंग माणूस कसं काय कुणाला पळवून नेईल? भाभी म्हणाली, असतात त्यांच्या टोळ्या. नीट बघायचं सर्व आधी. पाणी हवं, दोन पैसे द्या. असं सांगत यायचं. निरीक्षण करायचं. मग टोळीच्या सरदाराला माहिती पुरवायची. आणि मग तो सरदार सर्व काही प्लॅन करतो. मुलं पळवून नेतात. त्यांना अपंग करतात आणि भीक मागायला लावतात. तू तो सिनेमा नाही बघितलास? सर्व दाखवलंय त्यात…फ
असेलही. आता मात्र मी जागरूक झाले. तो आला. काही मागितलंच तर सरळ खिडकी लावून टाकायची. आत्मजला मोठी तंबी दिली. त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही. एवढंच नाही तर आत्मजबरोबर मी गेटपाशी उभी राहू लागले आणि पुन्हा त्याला घेण्यासाठीसुद्धा गेटपाशी उभी राहू लागले.
रामने विचारलंच, ङ्गअगं खिडकीतून दिसते ना बस आलेली, मग कशासाठी बाहेर जाऊन थांबतेस?फ
मी म्हटलं, ङ्गमला त्या त्याच्या काकाची भिती वाटते. हा पोरगा त्याच्याशी बोलेल पुन्हा… नकोच ते.फ
राम हसले फक्त.
ङ्गतुम्ही काही तरी करा ना. त्याला इथून जायला सांगा.फ
ङ्गमी कसं सांगणार? फूटपाथ आपल्या मालकीचा नाही आहे.फ
ङ्गपण…फ
ङ्गतो खूप वर्ष आहे ना इथे…फ
ङ्गहो.फ
ङ्गआता तो तरी कुठे जाणार?फ
ङ्गहे तुम्ही बोलताय?फ
ङ्गत्याने आतापर्यंत कधी कुणाला काही त्रास दिला? बघितलंयस?फ
ङ्गनाही.फ
ङ्गतो शिवीगाळ करतो? ओरडतो? बडबडतो?फ
ङ्गनाही.फ
ङ्गमग?फ
ङ्गतो चांगला आहे का?फ
ङ्गएक भिकारी! चांगला, वाईट…आपला काय संबंध? उगीचच विचार करत बसतेस.फ
ङ्गतो एकदा पाणी मागायला आला होता.फ
ङ्गघरात?फ
ङ्गघरात कसा येईल? खिडकीपाशी.फ
ङ्गदिलंस?फ
ङ्गपाण्याला नाही कसं म्हणायचं?फ
ङ्गअजून काही मागितलं?फ
ङ्गनाही.फ
ङ्गपुन्हा आला होता?फ
ङ्गनाही. पण एक वॉचमन तर इमारतीत ठेवू शकतो ना? सेल्समन येतात, फळवाला येतो, कोण कोण येतात दुपारचे… नकोच ते आणि तो पण…फ
ङ्गमी बोलेन मिटिंगमध्ये इमारतीच्या. ठीक?फ
सगळं सोपंच वाटतं राम ना! असेलही. त्या भाभीने विनाकारण डोक्यात काही तरी घोळ निर्माण केला माझ्या.
एकदा मी खूपच आजारी पडले. फणफणले होते. नाना वैद्य घरी आले. त्यांनी तपासलं आणि पूर्ण आराम करण्यास सांगितलं. आत्मजला त्यांच्या खोलीवर बोलावून घेतलं आणि चूर्णाच्या पुड्या दिल्या.
रामची नुसती धावपळ होत होती. आत्मजला तयार करायचं. चहापाणी करायचं. थोडा स्वयंपाकही करायचा. आमटी-भात करत होते. भाभी पोळी-भाजी द्यायच्या. ऑफिसला मात्र जावंच लागायचं.
मला रोज चिंता वाटायची. आत्मज इमारतीच्या गेटशी एकटाच असायचा. स्कूल बस कधी लवकर यायची. कधी उशिरा.
आत्मज फार शहाणं बाळ! म्हणायचा, ङ्गआई तू आराम कर. मी मोठा झालोय आता. मी नीट जाईन आणि नीट येईन शाळेतून. काका असतो माझ्या सोबत. मी स्कूल बसमध्ये चढलो की मगच जातो भीक मागायला आणि मी यायच्या वेळेला तिथेच थांबून असतो. मी उतरलो, आता आलो गेटमधून की मला टाटा करतो.फ
खरंच, कशी असतात ना माणसं! आपण उगीचच त्यांचं वरवरचं रूप बघून त्यांच्या बद्दल एक समज करून घेतो.
नाना वैद्यांच्या पुड्यांनी मी पूर्ण बरी झाले. अशीच जरा बाहेर पडू लागले हळूहळू. आत्मजला सोडायला गेटपाशी आले. सहज लक्ष गेलं त्या काकाकडे. तो येतच होता गेटपाशी. पण मला बघून हसला.
ङ्गबेहेनजी, तबियत ठीक है अब?फ
ङ्गहां.फ
ङ्गआपका बच्चा बहुत समझदार है. लेकीन भोला है. उसे कहना, रास्ते पे किसी गैर से बात नही करनी चाहिए. लोगों का क्या भरोसा? ये दुनिया… ठीक है. चलता हूं…फ
ङ्गशुक्रिया…फ
ङ्गबेहेनजी, दो रुपया हो तो दे दो. चावल लाना है. दो रुपया कम गिर रहे है.फ
मी घरात जाऊन दहा रुपये घेऊन आले.
ङ्गलो.फ
ङ्गइतने?फ
ङ्गरख लो.फ
ङ्गशुक्रिया. बच्चे की फिक्र ना करो. हम हूं यहां. खयाल रखूंगा उसका.फ
ङ्गअं?फ
ङ्गमेरे बिवी, बच्चे अॅक्सिडेंट में गुजर गये और मै अपाहिज बन गया. ट्रक चलाता था. बम्बई से दिल्ली. दिल्ली से बम्बई. मै अपाहिज हो गया और सारे रिश्तेदारोंने मूंह फेर लिया. चलता है. जब तक पैसा है, तब तक रिश्तेदार है… ये आपका बच्चा मुझे मेरे बच्चे की याद दिलाता है. चलता हूं बेहेनजी.फ
कोणाचं आयुष्य कधी, कसं बदलेल सांगता येत नाही. म्हणतात ना, प्रत्येक जण आज सुपात तर उद्या जात्यात जाणारच.
मी राम ना त्याची कर्मकहाणी सांगितली. त्यांनाही वाईट वाटलं. मग तेही त्याला कधी दोन तर कधी पाच रुपये देऊ लागले.
परदु:ख शीतल असतं. रोजच्या कामांमध्ये तो फारसा आठवायचा नाही. रोज दुपारी आणि रात्री पोळ्या भाजल्याचा खरपूस वास मात्र यायचा. जसा दुधवाला येतो. पेपरवाला येतो तसाच तो वास येतो.
आत्मजला सुट्टी लागली. आम्ही तिघं झिपरीला गेलो. मोकळं अंगण, सारवलेली जमीन, गोठ्यातल्या गायी, म्हशी… आत्मज अगदी खूष असतो झिपरीला आला की. शिवाय झाडाला लगडलेले आंबे. कितीही काढा आणि खा. झोपाळ्यावर झुलत बसा. विटी, दांडू खेळा. मजाच मजा असते आत्मजची. शहरात वाढलेल्या मुलांना गाव आवडत नाही साधारणपणे. आत्मजचं तसं नव्हतं. अम्मा, बापूही लहान होऊन जातात त्याच्याबरोबर.
सुट्टी संपत आली म्हणून आत्मज अगदी हिरमुसला. पुन्हा पुढच्या सुट्टीत खूप राहणार, असं सांगून तो माझ्या बरोबर यायला तयार झाला.
मोठी शाळा, पुढचा वर्ग- पुस्तकं, युनिफॉर्म सर्व काही घाई सुरू झाली. रेनकोट, नवीन डबा…
पाऊस नुसता कोसळत होता. ट्रॅफिक जॅम झालेले दिसत होते. मी खिडकीशी उभी. बस येण्याची वाट बघत! तेवढ्यात काही आवाज येऊ लागला. कण्हण्याचा. कोण बरं? जरा वाकून बघितलं तर ङ्गतोफ कुडकुडत होता. ओला चिंब झालेला. मी तर त्याला विसरूनच गेले होते.
ङ्गक्या हुआ?फ
ङ्गबेहेनजी… शायद बुखार है. पैर बहुत दर्द कर रहे है.फ
ङ्गदवा ली?फ
ङ्गनही.फ
ङ्गपैर को क्या हुआ?फ
ङ्गरोड का काम चल रहा था. रात के अंधेरे में सली दिखाई नहीं दी. बुरी तर्हासे चुभ गई.फ
ङ्गमै दवा देती हूँ रुको.फ
खिडकीतून औषध दिलं. पाण्याची बाटली दिली. दोन पाव दिले खायला. तो तिथेच तसाच आडवा झाला खाऊन. रामचा जुना शर्ट आणि एक जुनी चादर दिली.
इमारतीतील माणसं आरडाओरडा करू लागली. कारण तो तिथेच माझ्या खिडकीखाली पुढचे पाच-सहा दिवस पडून होता. शेवटी नाईलाजाने त्याला बाहेर पडावं लागलं. माझ्याबद्दल पण तक्रार करत होते सगळे. मी त्याला रोज खायला देत होते ना. नाना वैद्यांकडून औषधसुद्धा आणून दिलं होतं. पण नाना वैद्य म्हणाले, ङ्गआजार बरा होण्यातला नाही. हा काही फार काळ जगणार नाही.फ
मला उगीचच वाईट वाटलं होतं. कोण कुठला… पण… माणुसकीही काही असतेच ना!
आला एकदा असाच खुरडत खुरडत खिडकी खाली.
ङ्गबेहेनजी, ओ बेहेनजी.फ
ङ्गक्या हुआ?फ
ङ्गआपका बहुत रेहेम.फ
ङ्गबोलो…फ
ङ्गएक काम था. मेरा ये छोटासा बॅग आप रखोगे? अपने घर में?फ
ङ्गमैं? ना बाबा…फ
ङ्गरखो! आखरी तमन्ना है मेरी इसमें. जब तक जिंदा हूं, तब तक खोलो मत. मरने के बाद खोलो. रखो.फ
ती कळकट झोळी खिडकीखाली ठेवून तो निघून गेला. मला त्याच्या वेदना त्याच्या चेहर्यावर अगदी स्पष्ट दिसत होत्या. जाण्यापूर्वी कष्टपूर्वक हसला. ङ्गबेटे का खयाल रखना. बडा प्यारा बच्चा है. चलता हूं.फ
असं काहीसं म्हणाला जाण्यापूर्वी…
माझे डोळे भरून आले.
राम मला म्हणाले की, मनाही त्या गोष्टीत उगीचच भावुक होतेस.फ होते मी तशी. सिनेमा बघतानासुद्धा रडू येतं, काही दु:खद प्रसंग असेल तर! आणि इथं तर जीता-जागता माणूस होता!
पहाटेचा सुमार अथवा रात्रीचा तिसरा प्रहर होता. काही आवाज येत होते. मला वाटलं स्वप्न चालू आहे. दूर कुठून तरी कुणी तरी बोलत आहे. तेवढ्यात मिटलेले डोळे दिपले. खिडकीच्या काचेवरून एक प्रकाश आत शिरू बघत होता. मी उठले. खिडकी उघडली. तर रस्त्यावर एक पोलिसाची गाडी उभी होती. हेडलाइट चालू होते. काही तरी गडबड होती खास.
राम ना उठवलं मी. ते ही आले खिडकीत. म्हणाले, ङ्गबघून येतो.फ
मी खिडकीशीच. राम तिथे जाताना दिसले रस्त्यावर. त्यांनी काही बघितलं. मला ङ्गखूण केली आत जाफ, अशी. मी खिडकी लावली. आत पलंगावर बसले. थोड्या वेळाने राम आले.
ङ्गसंपलं. तो गेला. वारला.फ
ङ्गहो?फ
ङ्गकुणी तरी पोलिसांना कळवलं. बेवारशी म्हणून उचलून नेलं त्याला.फ
ङ्गबेवारशी? आपण ओळखत होतो त्याला.फ
ङ्गमग? त्याचे अंत्यसंस्कार आपण करायला हवे होते का?फ
ङ्गका नाही?फ
ङ्गत्याला ओळखणारे सगळेच आहेत शामसुंदरमधले. वरचे मोडक बघत होते खिडकीतून. मला बघितलं आणि त्यांनी खिडकी बंद केली.फ
ङ्गमोडकांचं राहू दे. पण…फ
ङ्गपोलिसांचा ससेमिरा सुरू झाला असता. नसत्या चौकशा. प्रश्न… नकोच ते. ही मुंबई आहे. तुझी झिपरी नाही. इथे कोणाला मदत करायला जावं तर आपल्याच अंगाशी येतं.
ङ्गअहो पण…फ
ङ्गझोप. मी ही झोपतो.फ
आता ङ्गबेहेनजीफ म्हणून हाक येणार नाही कानावर. आता समोरच्या रोड डिव्हायडरवर तो दिसणार नाही. सायन नाक्यावरचा एक भिकारी कमी झाला. आता खरपूस भाजलेल्या पोळ्यांचा सुगंध येणार नाही.
किती नकळत एका साध्याशा, सर्वसामान्य- नाही सामान्यातून सामान्य गोष्ट आयुष्याशी जोडली गेली होती!
ङ्गबेहेनजी!ङ्घ
अचानक आवाज-हाक आली त्याची! छेः हा भासच.
गोष्टी जशा नकळत जोडल्या जातात. सवयीच्या होतात. तशाच त्या सहजी नकळत विसरल्याही जातात.
आत्मजची वार्षिक परीक्षा संपली. त्याची त्या वर्षाची पुस्तकं, वह्या गोळा करत बसले होते. वह्यातील कोरी पाने वेगळी करत होते. रफ वापरासाठी एक वही तयार करणार होते.
आत्मजचं कपाट आवरता आवरता अचानक एक कळकट्ट झोळी हाताला लागली आणि मला तो आठवला. ही त्याची झोळी.!
तो ती झोळी खिडकीखाली ठेवून निघून गेला होता. नाईलाजाने ती मी घरी घेऊन आले होते. अक्षरश: चिमटीत पकडून. मेलेलं झुरळ जसं चिमटीत धरून नेतात ना केराच्या टोपलीपर्यंत! अगदी तस्सं.
कॉटखाली ढकलून दिली होती. नंतर ती झोळी सारखी मला खुणावत असायची. उघडून बघण्याचा मोह सतत होत असे. पण जर कुणी विश्वासाने काही सांगितलं आहे. तर विश्वास जपायला हवा ना…
मग मोह होऊ नये तर ती नजरेआड असावी… माळ्यावर टाकून देण्याचा विचार होता. पण वाटलं न जाणो काय असेल आत… मग आत्मजच्या पुस्तकांच्या कपाटात अगदी मागे सारून ठेवली होती.
तो तर गेला… तेव्हा नाही आठवलं… आणि आता अचानक… चिमटीतच धरून उघडली.
एक लिफाफा मिळाला… उघडला… आत एक पिवळसर चुरगळा झाल्यासारखा कागद. एखाद्या जख्खड म्हातार्याच्या अंगावरच्या सुरकुत्यांसारखा. त्या सुरकुत्या सरळ ताणायचा प्रयत्न केला…सुरकुत्या जरा मोकळ्या- ताठ झाल्या.
अगदी मोत्यासारखं अक्षर. सुरेख, खाडाखोड नाही… काही नाही… एक सलग. वाचू लागले.
ङ्गमैं तरुणसिंह रमोला. हिमाचल में रेहनेवाला. हम चार भाई. बडी हवेली जैसा घर था हमारा. पिताजीने सिखाया सब को स्कूल तक. मां सबसे प्यारी थी मेरी. मां तो मां ही होती है.
नजर लग गई शायद. पहाड टूट गया. घर उथर-फुथर हो गया. हम दो भाई बचे. बाकी सब पहाड के नीचे दब गए. हम दोनो छोटे थे वैसे. जिंदा रहेना था. वापस घर बनाना था.
एक दुसरे को साथ देके बडे हो गये. भाई फॅक्टरी मे लग गया. काम करने के लिए. उसी फॅक्टरी का मैं ड्रायव्हर बन गया. माल इधर-उधर ले जाना, मेरा काम बन गया.
घर बसाया हमने. छोटासा ही सही लेकीन उसी जगह बनाया. और फिर दोनो की शादी हुई. बच्चे हुए.
मेरी औरत, मेरा बच्चा और मै एक दिन सैर करने निकले अपनी ट्रक से. और दुर्घटना हुई. दोनोंको मैने खो दिया और मै अपाहिज बन गया. भाईने संभालनेसे इन्कार किया. वो भी क्या करता? इतना पैसा था नही-उसकी खुद की कमाई…
मैं इधर उधर घुमते घुमते बम्बई पहुंचा. और फिर यहीं का हो गया.
मैने खुब देखी दुनिया. चार दिन कोई दोस्त भी शायद खयाल करते मेरा. लेकिन मुझे मंजूर नही था. भिकारी बन गया. भीक मांगता रहा. अपने हाथों से अपना खाना पकाता रहा. जी लिया.
लेकिन एक बात बता दूं. भीक मांगना आसान नही है. बहुत मुश्किल है और लाचार होके जीना भी आसान नही. मुझे याद है, जब मैने भूक के मारे पहली दफा कटोरा पकडा था हाथ में और एक बडी गाडी के पास खडा हुआ. कोई चार-पाच लडके थे गाडी के अंदर. हंसी मजाक चल रहा होगा. किसी एकने कांच खोली. मैने बडी आशा से कटोरा उपर किया था. फिर हंसी की आवाज सुनी. कांच बंद हो गयी. कटोरा निचे करके देखा तो कटोरे में सिगरेट थी बुझाई हुई.
भीक मांगना आसान काम नही है. पैर जलते थे धूप में. घुटनो के उपर कटे हुए दोनो पैर. कपडा बंधा हुआ सा, घिसटता यहां से वहां, वहां से और वहां जाते रहने का. धूप, सर्दी, बारिश… मौसम कौनसा भी हो, घसिटते रेहेना.
लेकिन एक बात ठान ली थी. दिन में सिर्फ सौ रुपये जमा करने है. तीस रुपये में दिन गुजर जाता था. बाकी के बचाके रखने के लिये. सौ पूरे हुए तो उस दिन का काम खतम.
रोज सौ नही मिलते थे. फिर दुसरा दिन. उम्मीद के साथ सौ पूरे करने की उम्मीद.
दिनकी दुनिया अलग है और रात की दुनिया अलग है. बहोत कुछ देखा रात के अंधेरे मे. खूब हंसा और खूब रोया भी.
फिर भी मेरी तकदीर अच्छी है. मुझे किसीने सताया नही. वो दादा भी कभी आया नही मेरे पास हफ्ता लेने के लिये.
बेहेनजी मिली तो उसने भी खयाल रखा. अब मेरा एक काम बताना चाहता हूं. बेहेनजी आप ये काम कर देना.
मैने कुछ पैसे रखे है. इसी बॅग में है. वो पैसे आप मुझ जैसे कोई अपाहिज को दे देना. जिसको उसके रिश्तेदार पुछते नही. संभालते नही. ऐसे किसी को…
बच्चे को संभालना. अब मैं उस पर नजर नही रख पाऊंगा. ट्रॅॅफिक बहुत है यहा. रोड क्रॉस करने मत देना.
बेटे को संभालना…
अब चलता हूं…
पत्र संपलं होतं, माझे डोळे पाण्याने भरून वाहू लागले. मला समजलं नाही.
मी आता सरळ सरळ ती झोळी हातात धरली. उघडली. आत एक छोटंसं पुडकं होतं. त्यात नोटा होत्या. मोजल्या. साडेपंधरा हजार! एका भिकार्याकडे साडेपंधरा हजार!
स्वत: कळकट- जुनेरं वापरत राहिला आणि कुणा एका न बघितलेल्या अपंगासाठी पैसे साठवत राहिला… तो नक्की कसा होता? तो केवळ माणूस होता. लोकांची बोलणी खात, हात पसरत जगत राहिला. दया, कणव गोळा करत एक मानाचं आयुष्य दयनीय झालं. आणि हे त्याचं पत्र- इच्छापत्र- मृत्यूपत्र?
हो. मृत्यू इच्छापत्र. कुठल्याही साक्षीदाराशिवाय लिहिलं गेलेलं. कोणत्याही वकिलासमोर मांडलं न गेलेलं. कोर्टाचा शिक्का नसलेलं. आणि तरीही हे त्याचं इच्छापत्र कायद्याच्या सीमा रेषेपेक्षा जास्त खरं आहे. जास्त उच्च आहे आणि ते मी तंतोतंत पाळणार आहे.
मी त्याच्या इतकाच खरा अपंग शोधते आहे. मला ते पैसे त्याला द्यायचे आहेत. शोध चालू आहे.