विराजने एक नाजूकसा वेगळ्या प्रकारचा निळसर रंगाचा सुरेखसा मोठा शंख दिला होता. तो आगळा वेगळा आहेर दोघांनाही फार आवडला होता. पिंगलाने तो कानाला लावला आणि एकदम ओरडली…
पिंगला आणि मानव यांचे लग्न झाले. दोघेही उच्चशिक्षित, चांगल्या नोकरीतील. प्रेमवीर बनलेले. प्रेमप्रकरण गाजल्यावर लग्नात बांधलेले. मानव देखणा आणि हुशार होता. त्याच्या मागे सतत मुली असत. पण शेवटी अबोल पिंगलानेच त्याला जिंकले होते. या अबोलीवर विराजही प्रेम करत होता, ते पिंगलाला माहीत नसावे. त्याने एक-दोन वेळा तिला वाटेत अडवायचा प्रयत्नही केला होता. पण नेमका त्याच वेळेला मानव पोहचला होता… अगदी फिल्मी स्टाईलमध्ये. त्यानंतर त्यांनी समुद्र कट्ट्यावर बसून नारळपाणीही घेतले होते. थोड्या गप्पा मारल्या होत्या आणि परतले होते. तसे ते दोघे चांगले मित्र होते. त्यांचा सात जणांचा ग्रुप होता. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. पण पिंगलाचे मानवशी लग्न ठरल्यामुळे विराज दुखावला होता, हे खरे.
लग्न समारंभाला सारे जमले होते. लग्नानिमित्त सार्यांनी खूप मजा केली होती. गप्पा, चेष्टा, मस्करी यांना ऊत आला होता. खूप मजा येत होती. सर्व उत्साहात होते. आहेराची खोक्यावर खोकी रचली जात होती.
लग्नानंतर दोन दिवसांनी त्यांनी निवांतपणे आहेर उघडायला सुरुवात केली. आहेर खूप छान छान होते. त्याच बरोबर कुणी कुणी काय दिलेय, ही उत्सुकता होतीच. कुणाचा ताजमहाल होता. कुणाचा हॅप्पी मॅन होता. कुणाची फ्रेम होती, तर कुणाचे काश्मिरी कपल होते. विराजने एक नाजूकसा वेगळ्या प्रकारचा निळसर रंगाचा सुरेखसा मोठा शंख दिला होता. तो आगळा वेगळा आहेर दोघांनाही फार आवडला होता. पिंगलाने तो कानाला लावला आणि एकदम ओरडून म्हणाली, “मानव हे बघ…”
“काय?”
“अरे बघ म्हणजे ऐक! कानाला लाव हा शंख आणि नीट ऐक.”
मानवने ऐकले. त्याला त्यातून समुद्राची गाज स्पष्टपणे ऐकू येत होती. त्याने हसून पिंगलाकडे पाहिले. पिंगलाने त्याच्या कानाचा शंख पुन्हा आपल्या कानाला लावला, नंतर तो मानवने पुन्हा आपल्या कानाशी धरला. असा त्यांचा हा खेळ
सुरू झाला.
मानव म्हणाला, “गाज किती स्पष्ट ऐकू येतोय ना?”
“हो.”
“स्पष्ट आणि मोठ्यानेही.”
“हो ना.”
“वाटतंय आपण समुद्रावरच आहोत.”
“हो.”
“त्याने कुठून मिळवला असेल हा अद्भुत शंख?”
“हूं.”
“त्याची भेटच अद्भुत आहे. आवडली ना?”
“हो. खूप आवडली.”
“खरंच आवडली?”
पिंगलाने चमकून मानवकडे पाहिले. तो तर मोबाईलवर बोलत होता आणि शंख तर आपल्या हातात आहे. मग हे कुणी विचारले?… आपण खरेच वेड्या आहोत. मानवनेच तर विचारले असणार! अजून आहे कोण इथे? त्याने या शंखाबद्दल आत्ता कित्ती प्रश्न विचारले. तसाच हा प्रश्न आणि मग त्याने फोनवर बोलायला सुरुवात केली असणार.
“हो असेच असणार!… नाही. कुठेतरी काही तरी चुकतेय…” तिला वाटले, हा आवाज नक्कीच मानवचा नाही.
“मानवचा नाही? नाही. मग कुणाचा? इथं तर आपल्या दोघांशिवाय कुणीच नाही. मग? कुणाचा?”
तिने शंख पुन्हा कानाला लावला. त्यातून प्रश्न आला, “खरंच आवडली माझी भेट?”
“तोच आवाज. तोच… नक्कीच! हा आवाज त्याचाच… विराजचाच. पण हे कसे शक्य आहे?” तिने पाहिले, मानव हातवारे करत मोबाईलवर बोलण्यात गढला होता. पिंगलाने कानाचा शंख टेबलावर ठेवून दिला.
फोन थांबवून मनोज म्हणाला, “विराजचा फोन होता.”
“काय? विराजचा?”
“हो. त्यात एवढे आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे?”
“तसे नाही रे, पण मानव मला भीती वाटतेय!”
“भीती? कशाची? कुणाची?”
“मानव, तू विश्वास ठेवणार नाहीस. पण मला त्या शंखातून आवाज ऐकू आला.”
“माहीत आहे. त्यातून समुद्राची गाज ऐकू येतेय. हाच तर आवाज आपण मघापासून ऐकतो आहोत. किती छान येतोय ना आवाज?”
“मानव त्यातून मला चक्क प्रश्न ऐकू आला.”
“प्रश्न? शंखातून?”
“हो. तू विश्वास ठेवणार नाहीस. पण तो आवाज त्याचाच होता… विराजचा!”
“हूं.”
“हूं करू नकोस. त्याने विचारलं, खरंच आवडला शंख? आवडली माझी भेट?”
“हो? छान?”
“मानव, हे चेष्टेवर नेऊ नकोस.”
“अगं, तो काय फोन आहे का? लावला कानाला आणि लागला बोलायला!”
“मानव, मी त्याचा अनुभव घेतलाय. आत्ता! तू, त्याच वेळी त्याच्याशीच बोलत होतास.”
“हो ना? मग एकच विराज दोन ठिकाणी कसा बोलू शकेल? आपण तो शंख पुन्हा पॅक करून ठेवून देऊ. भानगडच नको.”
“भानगड कसली?”
“अगं, भानगड म्हणजे. हेच की, आपण… म्हणजे तू ती शंखाची गाज ऐकायला जायचीस आणि शंख विचारायचा तुला. पिंगला, मी आवडलो का तुला? तू काय करतेस? वगैरे…”
“मानव, चेष्टा करू नकोस. मी हा अनुभव घेतलाय आत्ताच. तुला जेव्हा त्याचा अनुभव येईल ना, तेव्हाच तुझा विश्वास बसेल माझ्या बोलण्यावर. परत सांगते, चेष्टा नको.”
“चिडू नकोस गं. गंमत केली.”
“ठीक आहे. तो काय बोलत होता एवढा वेळ फोनवर?”
“कोण?”
“शंख!… कोण काय?… विराज काय बोलत होता?”
“काही नाही. हेच. शंख आवडला का? त्याची गाज ऐकली का? भेट आवडली का… वगैरे.”
“हूं.”
“पिंगला, खरंच किती सुंदर आहे ना हा शंख! वेगळाच आहे. मला वाटते आपण तो या शोकेसमध्ये ठेवावा. येणार्या सर्वांना दिसेल.”
“चालेल.” तिने संमती दिली खरी, पण ती त्या शंखाला मनातून फारच घाबरली होती. काय करावे ते तिला सुचतच नव्हते. त्यांनी ती आगळी-वेगळी वस्तू म्युझियममध्ये ठेवावी, तशी शोकेसमध्ये ठेवून दिली.
श्रावण महिना सुरू झाला. पाऊस सुरू होता. उद्या नारळी पौर्णिमा होती. दुसर्या दिवशी सकाळीच पिंगला तिच्या भावाकडे गेली राखी पौर्णिमेसाठी. अनायसे रविवार आला होता. दिवसभर ती माहेरी राहून सोमवारी परस्पर कामावर जाणार होती. तिने मानवलाही सोबत यायला आग्रह केला. त्याला बहीण नव्हती. पिंगलाला वाटले, आपली धाकटी बहीण गौतमी मानवला राखी बांधेल. त्याने दिवसभर घरी एकटे राहण्यापेक्षा ते बरे. हा विचार मानवलाही पटला. त्यांचा दिवस छान आनंदात गेला. तिथेही या अद्भुत विचित्र शंखाची गोष्ट निघालीच. पण पिंगलाने त्या बोलण्यात भाग घेतला नाही.
सोमवारी संध्याकाळी ऑफिस करून दोघे घरी परतले. पिंगला अजूनही त्या माहेरच्याच मूडमध्ये होती. जेवणखाण सारे आवरून ते झोपायला निघाले. मानवने जाता जाता सहज शोकेसकडे पाहिले आणि त्याने पिंगलाला हाक मारली.
“काय झाले?” तिने विचारले.
मानवने शोकेसकडे हात करत म्हटले, “हे बघ शंख कुठाय?”
“म्हणजे?” तिने शोकेसमध्ये धुंडाळत म्हटले. “मानव, तूच तर नाही ना बरोबर घेतलास, त्या सर्वांना दाखवण्यासाठी?”
“वाः मी बरोबर घेतला असता, तर तुला कशाला विचारले असते?”
“असेल रे, मग जाईल कुठे?” म्हणत तिने पुन्हा मागेपुढे नीट पाहिले. पण तो शंख कुठेच सापडला नाही.
“आता घरातल्या वस्तू गायब व्हायला लागल्या की काय?” मानवने म्हटले.
शंख सापडत नसल्याचे पिंगलालाही नवलच वाटले. अशी वस्तू जाईल कुठे? कशी?… तिला वाटत राहिले. तरीही तिला त्या भयप्रद शंखापासून सुटकाच झाल्यासारखे वाटले होते. ती पुन्हा पुन्हा तो शंख उगीचच शोधत होती.
मानव म्हणाला, “सोडून दे. त्या गोष्टीचा फार विचार करू नकोस.” तरीही दोघांच्या मनातून तो विलक्षण शंख काही जात नव्हता.
सकाळी उठल्याबरोबर नकळतच पिंगलाचे लक्ष शोकेसकडे गेलेच. तिने मानवला हाक मारली, “मानव लवकर ये. हे बघ.”
तोही लगेच आला. त्याला वाटले, आता काय झाले? आता कोणती वस्तू गायब झाली?
पिंगला म्हणाली, “मानव हे बघ. हा बघ शंख.”
खरंच शंख थोडीशी जागा बदलून तिथेच होता. त्याने तो घाईने काढून कानाला लावला. त्याची गाज अजूनही आहे का, हे त्याला पाहायचे होते. पण त्याने शंख कानाला लावताच त्यातून भांडेभर पाणी त्याच्या अंगावर सांडले. या आकस्मिक घटनेने तो घाबरला. त्याने शंख तिथेच ठेवला.
यात इतके पाणी कसे? हे दोघांनाही समजेना. त्याने कपडे झटकले. शंख झटकला आणि पुन्हा कानाशी धरला. त्यातून समुद्राची मोठी गाज ऐकू आली. लाटांचा खळखळाट ऐकू आला. क्षणातच सारे थांबले आणि त्यातून स्पष्ट शब्द ऐकू येऊ लागले… “काल गेलो होतो समुद्रावर. काल आमचा मोठा सण होता… नारळी पौर्णिमा. म्हणून गेलो होतो घरी. जातभाईंना भेटायला. आलो परत रात्र संपता संपता, तर तेवढे पाणी बरोबर येणारच ना?”
मानवने पिंगलाला पाहिले. पिंगलाला त्याच्या नजरेत भीती दिसत होती. त्याने शंख तिच्या कानाला लावला. तिने तो हाताने नीट धरला. शंखामधून प्रश्न आला, “येणार का माझ्याबरोबर समुद्रावर?”
“काय? समुद्रावर?”
“हो. पोहायला. खूप मज्जा येईल.”
पिंगलाने घाबरून तो शंख घाईने परत जागेवर ठेवला.
मानवने विचारले, “काय झाले?”
“तो मला विचारत होता की, येणार का समुद्रावर पोहायला?”
“काय? पोहायला? कोण विचारत होते?”
“तो… विराज.”
“काही तरी काय? त्याने तर मला सांगितले की…”
“काय सांगितले?”
“की, काल नारळी पौर्णिमा होती, म्हणून तो गेला होता समुद्रावर…”
“काय? आणि मला विचारतोय की…”
“पण पिंगला, मला शंखातून तसे ऐकू आले आणि तू म्हणतेस की तुझ्याशी विराज बोलला.”
“हो. पण शंखातून शब्द ऐकू येतात यावर तरी तुझा विश्वास बसला ना? मला भास झाला नव्हता, हे पटले ना?”
“हो. तो भास नाही, हे पटलेय.”
मानवने तो शंख भीत भीतच पुन्हा कानाला लावला. पण आता त्यातून फक्त सुमद्राचा खळखळाटच ऐकू येत होता. तो पिंगलाला म्हणाला, “ऐक. समुद्राचा छान खळखळाट ऐकू येतोय.”
“नको. भीती वाटते. पण मानव, शंख तुझ्याशी एक बोलतो आणि माझ्याशी वेगळेच का बोलतो? याचा अर्थ काय?”
“काय?”
“हेच की, शंख कुणाच्या हातात आहे, हे तो जाणतोय.”
“हूं. असेल. पण कसे? त्या निर्जीव शंखाला हे कसे समजते?”
“खरे आहे.”
“मानव, मला वाटते. तो शंख आपण पुन्हा पॅक करून कुठेतरी कपाटात ठेवू देऊया.”
“म्हणजे काय होईल?”
“काय होईल काय? असला विचित्र शंख डोळ्यापुढे ही नकोय.”
त्या शंखावरून उगीच वाद नको, म्हणून मानवने लगेच तो शंख पुन्हा होता तसा त्या खोक्यात बंद करून ठेवला. खोके कपाटातच पाठीमागे ठेवून दिले.
पिंगलाला विचारले, “झाले समाधान?”
खरे तर पिंगलाचे समाधान झालेच नव्हते. तिला ती वस्तू… ती विचित्र शक्ती घरातच नको होती. पण निदान आता त्याचे रोज दर्शन तरी होणार नव्हते. पिंगलाला वाटले, फोन करून विराजला सांगावे की, तुझी ती शंखाची भेटवस्तू परत घेऊन जा. पण तसे सांगणे योग्य झाले नसते. आणि लग्नानंतर चार महिन्यांत त्याची गाठही पडली नव्हती. परवा मानवचे त्याच्याशी फोनवर जे काही बोलणे झाले, तेवढेच. विराजच काय, पण त्यानंतर कुणीच भेटले नव्हते.
आणि एकाने धक्कादायक बातमी दिली… विराजचा मृत्यू झाला!
मानवला विवेकचा फोन आला होता. त्याने हे सांगितले.
“कधी? काय झाले?”
मानवचा घाबरा आवाज ऐकून पिंगलाने विचारले, “काय रे? काय झाले?”
“अगं विराजचा मृत्यू झालाय.”
“काय? कधी?… परवाच तर तो फोनवर तुझ्याशी बोलत होता ना?”
“पिंगला, त्याच्या मृत्यूला म्हणे दीड महिना झालाय.”
“काय? दीड महिना? पण हे कसे शक्य आहे?”
“त्याचा मृत्यू म्हणे समुद्रात बुडून झाला.”
“समुद्रात बुडून? दीड महिन्यापूर्वी? नाही… कसे शक्य आहे हे? त्यानेच मला विचारले होते की, समुद्रावर पोहायला येणार का माझ्याबरोबर?”
“हो, तू सांगितलेस. पिंगला, विवेक सांगत होता की त्याने आत्महत्या केली.”
“काय? आत्महत्या? पण का? मानव काही तरी गडबड आहे.”
या घटनेने दोघेही बेचैन होते. दोनच दिवसांत मानवला रात्री स्वप्न पडले. स्वप्नात चक्क तो शंख आला होता. म्हणाला, “मला कोंडून का ठेवलेय? मला मोकळे राहायची सवय आहे. मी समुद्राच्या लाटेत रमणारा आहे. मला बाहेर काढा.”
मानवने हे स्वप्न पिंगलाला सांगितले आणि तो शंख पुन्हा शोकेसमध्ये ठेवला. ठेवण्यापूर्वी त्याने तो भीत-भीतच कानाला लावला. त्यातून सुमद्राच्या आवाजाबरोबरच विराजचा आवाज आला… “मानव, मला कोंडून ठेवू नकोस. कारण मी त्या शंखामध्ये वास्तव्याला आहे.”
“म्हणजे? पण तू म्हणे…”
“हो. निराशेपोटी मी जिवाला मुकलो. मी आत्महत्या केली. मीही मोठी चूक केली.”
“पण का? का केलेस तू असे?”
“प्रेमभंगातून निराशा… निराशेतून अविचार… अविचारातून ही चूक.”
“प्रेमभंग?”
“हो. पण मी तिला बरोबर नेणार!”
“कोणाला?”
पण उत्तर नाही आले. समुद्राचा खळखळाट फार वाढला होता. त्याचा आवाज बंद झाला होता. त्याच्या बोलण्याचा अर्थ मानवला लागत नव्हता. पण हे तो पिंगलाला बोलला नव्हता.
एके रात्री त्याला जाणवले की, शंखातून पाणी वाहतेय. घरभर पाणी पाणी झालेय. तो घाबरला. त्याच्या नाकातोंडात पाणी जात होते. त्याचा जीव गुदमरला. तो धडपडू लागला. ओरडू लागला. त्या आवाजाने पिंगला जागी झाली. तिने पाहिले, मानव हातपाय झाडत ओरडत होता.
तिने मोठा दिवा लावला. तो पूर्णपणे भिजला होता. त्याच्या केसातून, कपड्यातून पाणी निथळत होते. तिने त्याला हाका मारल्या. तो जागा झाला आणि त्याने डोळे उघडले तर, तो अजून थरथरतच होता.
“काय झाले? कपडे कसे ओले?” पिंगलाने विचारले.
मानवने स्वतःकडे पाहिले. खरेच तो अजूनही निथळत होता.
“काय झाले?” पिंगलाने पुन्हा विचारले.
“मला फार भीतीदायक स्वप्न पडले.”
“स्वप्न?”
“हो. स्वप्नात सगळीकडे पाणीच पाणी झालेले आणि…”
“पण विराज, स्वप्नाने कपडे कसे ओले होतील? आणि अंथरूण-पांघरूण तर कोरडे आहे!”
“हो?”
“हो. बघ ना! मानव, हा प्रकार काय आहे? त्या शंखामुळेच हे सारे घडतेय.”
“खरे आहे.”
“आपण तो शंख घरात ठेवायला नको.”
“हूं. बरोबर आहे. पण त्याचे करायचे काय?”
“समुद्रात फेकायचा.”
“हूं.”
“उद्याच जाऊ. तसेच करू.”
“तू ठीक आहेस का? आता ऊठ. कपडे बदल. डोके पूस. मी कॉफी करते. गरम कॉफी घे, चांगले वाटेल.”
दुसर्या दिवशी दोघे समुद्रावर गेले. तिथे जाताच पिंगलाने खोक्यातून तो विचित्र भयानक शंख बाहेर काढला आणि सारी शक्ती एकवटून तिने तो समुद्रात लांबवर भिरकावून टाकला. पाण्याने हातपाय धुतले आणि हात झटकतच ती समुद्रातून बाहेर आली.
मानव म्हणालाच, “किती पुढे गेली होतीस?”
“हो. पण शंख फेकून दिल्यावर खूप छान वाटतेय. खूप मोकळे मोकळे वाटतेय. सुटका झाल्यासारखे…”
“खरे आहे. आता शांतपणे राहता येईल.”
पुढचे चार दिवस त्यांचे खरेच ताणविरहित गेले. त्यांना अतिशय छान वाटत होते. पण एके दिवशी ती अंघोळीला गेल्यावर अंघोळ करताना बाथरूममध्ये पाणी साठत गेले. पाण्याची पातळी वाढत गेली. ती घाबरली. पाणी कमरेच्या वर गेल्यावर ती दार उघडण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण पाण्याच्या रेट्यामुळे ते आतल्या बाजूस उघडलेच जात नव्हते. तिने दारावर हात बडवायला सुरुवात केली.
“काय झाले?” मानवने बाहेरून विचारले. पण उत्तर न देता ती दार वाजवतच राहिली. आता पाणी गळ्यापर्यंत आले होते. तिचे दार वाजवणे थांबले होते. मानवच्या हाकेलाही तिचे उत्तर येत नव्हते. मानव घाबरला. त्याने दारावर धडका देऊन देऊन दार उघडले. पिंगला बेशुद्ध झाली होती. मानवने तिला तसेच उचलून बेडवर ठेवले. त्याला काही समजेना. असे काय झाले की पिंगला बेशुद्ध पडली? पाल-झुरळ म्हणावे, तर ती आरडाओरडा करत घाबरून दार उघडून बाहेर आली असती. पण एवढे झाले तरी काय की तिला दरवाजाही उघडता येईना आणि ती बेशुद्ध झाली?
त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. हाका मारल्या. थोड्या वेळाने पिंगलाने डोळे उघडले. आपण बाथरूममध्ये नाही, याची तिची खात्री झाली. सोबत हेही लक्षात आले की, तिचे सर्व कपडे लख्ख कोरडे होते!… पाणी कुठेच नव्हते! ती अधिक घाबरली… बावरली आणि रडू लागली.
मानवने विचारले, “काय झाले एवढे घाबरायला? झुरळ, पाल… की दोन्ही एकदम दिसले?” तिने मानवकडे पाहिले आणि त्याला घट्ट मिठी मारून मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. त्याने तिला थोडे शांत होऊ दिले आणि मग विचारले, “कॉफी घेणार का? काय झाले? कशाची भीती वाटली?”
पिंगलाचे थांबलेले रडे पुन्हा सुरू झाले. तिने रडत रडतच सारा प्रकार मानवला सांगितला आणि म्हणाली, “मानव, विश्वास ठेव माझ्यावर…”
“ अगं आहे विश्वास, सांग.”
“मानव, मी शॉवर खाली उभी राहून अंघोळ करायला सुरुवात केली होती.”
“काय? पण कपडे?”
“तू घातलेस का मला?… मला काही समजलेच नाही.”
ती काय सांगत होती, ते आता मानवलाच काही समजत नव्हते. ते ऐकता ऐकता मानव चक्रावत होता. त्याची भीती वाढत होती. त्याला वाटले होते की, शंख टाकून दिल्यावर हे सारे थांबेल! पण आता हा तर जिवाशीच खेळ सुरू झाला होता. आता यातून मार्ग काय काढायचा? कुणाला विचारायचे? कुणाला काय सांगायचे? मित्र तर चेष्टाच करतील.
त्याने तिला थोडे शांत केले. गरमागरम कॉफीचा मग तिच्या हातात ठेवत मानव म्हणाला, “पिंगला, आपण दोन-तीन दिवसांची रजा काढू आणि बाहेर जाऊन येऊ.”
“चालेल. पण समुद्राच्या ठिकाणी नको.”
“आपण कोल्हापूरला जाऊ, अंबाबाईचे दर्शन घेऊ. नंतर माझ्या मामांकडे जाऊ.”
“हो चालेल. मी अंबाबाईचा नवस बोलेन.”
“हूं. चल उद्याच जाऊ.”
दोघे उत्साहाने फिरून आले. त्यांना उभारी आली होती. मनही ताजेतवाने झाले होते. घरी आल्यावर त्यांचे नवीन जीवन सुरू झाले होते. पण पिंगला अंघोळीला घाबरतच होती. ती बाथरूमचे दार अर्धे उघडे ठेवूनच स्नान पटापट उरकत होती. आता काही घडले नव्हते. तरी दोघांचा धास्तावलेला जीव शांत झाला नव्हता.
गणपती आले. घरोघरी गणपती बसले. रस्तोरस्ती सार्वजनिक गणपतीची धूम सुरू झाली. पाहता पाहता अनंत चतुर्दशी आली. समुद्रावर गणेशासोबतच गणेश भक्तांची दाटी झाली होती. तो सोहळा पाहायला जाणे दोघांनीही टाळले होते. घरीच टी.व्ही.वर ते त्या मिरवणुकीचा आनंद घेत होते.
रात्री उशिरापर्यंत मिरवणूक पाहून त्यांनी टी.व्ही. बंद केला आणि झोपी गेले. दुसरे दिवशी ऑफिसला सुट्टी होती. उठायची घाई नव्हती. त्याला उशिरानेच जाग आली. पिंगला जागेवर नव्हती. ‘उठली असेल लवकर.’ म्हणत तो आणखी लोळला. त्याने ठरवले, तिने आवाज देईपर्यंत उठायचे नाही. पण पाच-दहा मिनिटांतच त्याला उगीच लोळायचा कंटाळा आला. तो किचनमध्ये गेला. पिंगला तिथे नव्हती. हॉलमध्ये नव्हती. ‘गेली असेल अंघोळीला.’ असं समजून तो चहा करायला लागला. चहा झाला तरी तिची अंघोळ संपली नव्हती. तो बाथरूमकडे गेला आणि तिथेच थबकला. बाथरूम उघडा होता. टॉयलेट बाहेरून बंद होता. तो घाबरला.
“बापरे! गेली कुठे? कधी गेली? आपल्याला समजले कसे नाही?” त्याने बाहेर जाऊन पाहिले. दार आतून बंद होते.
“म्हणजे? हा काय प्रकार आहे?”
त्याचे डोळे चक्रावले. त्याला वाटले की, आपल्याला कधी मधे जाग आली तर आपण पुढचे दार नीट बंद आहे ना, याची पुन्हा एकदा खात्री करत असतो. त्याप्रमाणेच आपण रात्री केले असणार. आतून उघडे असलेले दार आपणच कडी बंद केले असणार. म्हणजे त्यापूर्वीच पिंगला घराबाहेर… नाही नाही… असे नाही होणार! पिंगला घरात नाही हे त्याच वेळी आपल्या ध्यानात नक्कीच आले असते. पण आता ती गेली कुठे? तिला शोधायचे कुठे? तिने घर सोडून जावे असे कधीच काही घडले नाही. किती प्रेम आहे आपले एकमेकांवर. त्याने तिच्या माहेरी भावाला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला. पण त्याला वाटले फोन करून काय विचारायचे? ‘पिंगला तिथे आलीय का?’ असे विचारले तर ते सारेच घाबरतील. पण विचारायला तर हवेच. त्याने फोन लावला. भावाने म्हटले, “बोला मानव, काय काम काढलेत सकाळी सकाळी? सारे ठीक आहे ना?”
“हो. सारे ठीक आहे. नाही सहजच फोन केला. जमले तर घरी यायचा विचार होता. म्हटले घरी आहात का विचारावे.”
“या या. घरीच आहे.”
“ठीक आहे. ठेवतो.”
“हो. पिंगला काय करतेय?”
“आ… पिंगला ना… अंघोळीला गेलीय.”
“ठीक आहे. ठेवतो.”
मानवने विचार केला… याचा अर्थ पिंगला तिथे नाही. मित्रमैत्रिणींकडे एवढ्या अपरात्री किंवा पहाटे कशाला जाईल? थोडा वेळ वाट पाहून त्याने पोलिसांत जायचे ठरवले. कारण कधी कधी लवकर जाग आली, तर तिला बाहेर फिरायला जायची सणक येते. त्याने तिचे चप्पल, सँडल, बुटाचे जोड पाहिले. बहुतेक सारे जागेवर होते. त्याने तासभर वाट पाहिली. तो तास त्याच्यासाठी फारच कठीण काळ होता. त्याने सरळ पुन्हा पिंगलाच्या भावाला फोन केला आणि घरी बोलावून घेतले. त्याला घडलेला सारा प्रकार सांगितला.
भाऊ म्हणाला, “मानव, तुमच्या आधीच्या फोनवरून मला जाणवले होतेच की काही तरी गडबड आहे. चला. पोलिसांत कळवायला हवे.”
“हो. पण हे झाले कसे? ती बाहेर गेलीच कशी?”
“आता या विचारांचा काहीच उपयोग नाही. चला. चहा झाला का?”
“कुठला चहा? ती घरातच असेल म्हणून मी दोघांचा चहा केला होता. पण तो तसाच पडलाय.”
भावानेच तो चहा गरम केला. मानवला चहा घ्यायला लावला. उरलेला स्वतः घेतला आणि दोघे पोलीस ठाण्यात गेले. भावानेच रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसी प्रश्नांना उत्तरे दिली. फोटो दिला आणि दोघे घरी परतले.
रस्त्यावरून अजून मिरवणुका जातच होत्या. या गोंधळात पोलीसही केस हाती घेणार नाहीत, हेही त्यांना माहीत होते. पोलिसांनी तसे सांगितलेच होते की, ते हरवलेल्या व्यक्तीचा तपास तक्रार नोंदवल्यापासून चोवीस तासांनी करतात.
“बापरे, चोवीस तासांनी! म्हणजे पिंगला चोवीस तास… म्हणजे उद्यापर्यंत घरी येणारच नाही का?”
“मानव, शांत व्हा. हरवलेली व्यक्ती कदाचित चोवीस तासांत स्वतःच घरी परतेल. ती रात्रीपर्यंत घरी येईल. असा विचार का करत नाही तुम्ही?”
पण चोवीस तास उलटूनही पिंगला काही घरी परतली नाही. मानवचे पोलीस ठाण्यात खेटे चालूच होते. सोबत पिंगलाचा भाऊही जात होता. पोलीस तपास सुरूच होता. सर्वत्र नाकाबंदी केली होती. पण तिचा काही पत्ता लागत नव्हता. शेवटी चौथ्या दिवशीच्या संध्याकाळी पिंगलाचे प्रेतच पोलिसांना सापडले. ते समुद्राकाठी पडले होते. प्रेताची ओळख पटवायला त्यांनी मानवला बोलावले.
मृतावस्थेतील पिंगला पाहून मानवचा शोक अनावर झाला. भावालाही दुःख झालेच होते. कोण कुणाला सावरणार? प्रेताचा पंचनामा झाल्यावर, ते ताब्यात मिळाले. पिंगलाच्या हातात शंख होता. तोच शंख! अद्भुत. मानवने शंख काढून घेतला, पुन्हा समुद्रात भिरकावण्यासाठी. वर उचलला. त्यातून मानवला समुद्राची गाज ऐकू आली. स्पष्ट. समुद्राकाठी असून, समुद्राच्या खळाळणार्या मोठ्या आवाजातही शंखातून येणारा आवाज स्पष्ट जाणवत होता. नकळतच मानवने तो कानाला लावला. त्याला त्यातून आवाज ऐकू आला. तो लक्षपूर्वक ऐकू लागला. त्याने ओळखले, हा आवाज त्याचाच होता… विराजचा. तो बोलत होता, “मानव, मी माझे प्रेम मिळवलेय. पिंगला माझे पहिले प्रेम होती. तिने तुझ्याशी लग्न केले. यात अर्थातच तिचा दोष नाहीच. पण मी ठरवले होते, तिला परत मिळवायचेच. आणि मी तिला मिळवलेच.”
त्याचे बोलणे थांबले होते. त्याचबरोबर शंखाची गाजही थांबली. मानवचे दुःख डोळ्यांतून वाहत होते. त्याचे दोन अश्रू त्या शंखावर पडले. त्याने तो शंख सर्व शक्तीनिशी समुद्रात दूरवर फेकून दिला.
बिचारी पिंगला! ती या प्रेमाबाबत अनभिज्ञच होती. निष्पाप पिंगलाचा त्या खुनशी विराजने जीव घेतला होता. मानवच्या घरात आज पिंगला नाही. तिचा हसरा फोटो मात्र आहे. मानव त्या फोटोशीच बोलत असतो. रोज त्यापुढे फुले ठेवतो. उदबत्ती लावतो. अश्रूंची श्रद्धांजली अर्पितो.
एका रात्री त्याला झोप येत नव्हती. तो उठून पिंगलाच्या फोटो पुढे गेला. फोटोत पिंगलाच नव्हती. नुसतीच रिकामी चौकट होती. तो गदगदीत स्वरात म्हणाला, “पिंगला, तू आपल्या घरी फोटो रूपातही नाही राहणार का? विराज, मीही तुझ्या प्रेमाविषयी अनभिज्ञच होतो रे. पिंगलाला निदान फोटो रूपात तरी इथे राहू दे.”
त्याने हात जोडले. डोळे मिटले. त्याला फुलांच्या सुगंधाचा दरवळ जाणवला. त्याने डोळे उघडले. त्याचा दुःखी चेहरा नकळत हसरा झाला होता. फोटोत पिंगला परतली होती. त्याचबरोबर घरात मंदशी शंखाची गाजही ऐकू येत होती.
- उर्मिला भावे