Close

स्मार्ट पालक होण्यासाठी… (To Be A Smart Parent…)

मुलांना चांगल्या सवयी, शिस्त लावण्याच्या नावाखाली सतत ओरडणं, धाक दाखवणं, त्यांच्यात भीती निर्माण करणं म्हणजे उत्तम पालक होणं नव्हे. स्मार्ट पालक म्हणजे नक्की काय? याबाबत केलेलं हे मार्गदर्शन…


ल्ली मुलं वयापेक्षा जरा जास्तच मोठी होत आहेत. त्यांना बर्‍याच गोष्टींचे ज्ञान लहान वयातच मिळत आहे. त्यामुळे मुलांचं संगोपन करणे म्हणजे पालकांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. अशा वेळी पालकांनी मुलांच्या केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित न करता त्यांच्या भावनिक आणि इतर गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. चांगल्या सवयी लावताना मुलांना मारणं, ओरडणं, सतत धाकात ठेवणं म्हणजे मुलांचे उत्तम संगोपन नव्हे. स्मार्ट पालक होण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करा.

प्रेमाने समजवा
माझा 9 वर्षांचा मुलगा मित्रांबरोबर दिवसभर खेळत असतो. परीक्षा जवळ आली आहे. तरी अभ्यास तर दूरच पण अजून त्याने पुस्तकांनाही हात लावलेला नाही. अशी तक्रार केली आहे मुंबईत राहणार्‍या एका आईने. ही तक्रार एकाच आईची नसून अशा अनेक आया हीच तक्रार करत असतात. मुलांच्या या सवयीने हैराण होण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा. खेळण्याबरोबरच अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे, हे मुलांना समजवा. मित्र अभ्यास करून पुढे जातील, आणि तू मागे राहशील. उत्तम आयुष्य जगण्यासाठी आणि करियरसाठी अभ्यास करणं किती महत्त्वाचे हे मुलांना पटवून द्या.

मुलांची हिंमत वाढवा
स्पर्धेच्या युगात तुमचा मुलगा/ मुलगी टिकून राहावे असं तुम्हाला वाटतं असेल तर विशेष काळजी घ्या. एखाद्या परीक्षेत मुलांना कमी मार्क मिळाले किंवा एखाद्या स्पर्धेत मुलगा/ मुलगी हरले. तर त्यांना ङ्गतो/ती तुझ्यापेक्षा हुशार असल्याने जिंकला/जिंकली. तुला काहीच येत नाही.फ असं सांगण्यापेक्षा मुलांना प्रेमाने जवळ घेऊन ङ्गकाही हरकत नाही. या वेळी हरलं तर काय झालं? पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न कर. तू मेहनत तर केली होतीस ना! जर तुमचा मुलगा/ मुलगी एखाद्या गोष्टीत कमी पडत असेल तर त्याच्या कमतरतेवर मात करण्याचा प्रयत्न करा.

मुलांची तुलना करू नये
छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना ओरडू नये. मुलांची उपेक्षा करू नये. जर तुमचा मुलगा/ मुलगी शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुसर्‍या मुलांपेक्षा कमकुवत असेल तर त्याला दूर करण्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करा आणि त्याच्या कमतरतेसह त्याचा/ तिचा स्वीकार करा. गरज भासल्यास एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन त्याच्या/तिच्यामधील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यांची तुलना कधीही इतर मुलांशी करू नये.

वेळ देणं गरजेचं
मुलांसाठी खूप काही करण्याच्या प्रयत्नात अनेकदा पालक मुलांकडून असे क्षण हिरावून घेतात, ज्यांची मुलांना अधिक गरज असते. मुलांच्या सर्व गरजा भागवण्यासाठी दिवस- रात्र मेहनत करणारे पालक बरेचदा मुलांना वेळच देऊ शकत नाहीत. अशा वेळी मुलं त्यांचं स्वत:चं विश्‍व बनवतात. त्यामुळे उत्कृष्ट पालक होण्यासाठी दिवसातील काही वेळ हा मुलांसाठीच राखून ठेवा. असं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांसाठी राखून ठेवलेला हा वेळ केवळ मुलांचा अभ्यास घेण्यासाठी आणि त्यांना ओरडण्यासाठी नसून त्यांना फिरायला नेण्यासाठी, त्यांच्यासोबत मस्ती करण्यासाठीही असू द्या.

तणाव स्वत:पुरताच मर्यादित ठेवा
ऑफिस आणि घरचा तणाव घेऊन ज्यावेळी तुम्ही मुलांसमोर येतात, त्यावेळी मुलं तुमच्याबरोबर राहण्यापेक्षा इतर ठिकाणी वेळ घालवणं अधिक पसंत करतात. मुलांना पालक नेहमी आनंदी असावेत असंच वाटतं असतं. जेणेकरून ते आपले प्रश्‍न तुमच्याबरोबर मांडू शकतात. दुसर्‍यांचा राग काढण्यासाठी मुलांना ओरडणे, मारणे चुकीचे आहे. चांगले पालक तेच असतात जे आपले दु;ख, प्रश्‍न मुलांसमोर व्यक्त न करता स्वत:पुरते मर्यादित ठेवतात.

इतरांसमोर ओरडू नये
मुलांना इतरांसमोर मारणे, ओरडणे हा विषय नेहमीच चर्चेचा ठरतो. काही देशांमध्ये मुलांना मारणं, ओरडणं हा दंडनीय अपराध आहे. परंतु भारतात मुलांना मारणं, ओरडणं किरकोळ बाब आहे. मुलांना जर तुम्ही चारचौघात मारलं, ओरडलं तर त्याचा मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

मुलांचे मित्र बना
बरेचदा असं होतं की, मुलं आई-वडिलांपेक्षा मित्रमंडळी, शेजारी, नातेवाइकांबरोबर खूप ङ्गकम्फर्टेबलफ असतात. अशा परिस्थितीला पालक स्वत:च जबाबदार असतात. नकळत्या वयात मुलं आई-वडिलांना अनेक प्रश्‍न विचारत असतात. अशा वेळी कामात व्यस्त असलेले पालक मुलांच्या या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करतात. आणि तेव्हापासूनच मुलं एकटेपणा अनुभवायला लागतात. आणि आपल्या प्रश्‍नांची उत्तरे ते घराबाहेर शोधू लागतात. आणि मग मुलं त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आई-वडिलांपासून लपवू लागतात आणि त्याचा आईवडिलांना त्रास होऊ लागतो. हा त्रास टाळण्यासाठीच मुलांचे मित्र बना. त्यांच्याशी चांगल्या-वाईट सगळ्या गोेेेष्टी शेअर करा. मुलांच्या सर्व समस्यांचं निरासन तुम्ही करू शकता, असा विश्‍वास मुलांमध्ये निर्माण करा. मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करा.

चांगल्या कामाचे कौतुक करा
जेव्हा मुलं एखादं चुकीचं काम करतात, तेव्हा तुम्ही त्यांना आवर्जून ओरडता. मग ज्या वेळी मुलं काही चांगलं काम करतात, त्यावेळी त्यांचे कौतुक कां नाही करत? एखादं चांगलं काम केल्यानंतर मुलं आईवडिलांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवतात. कौतुकाची थाप पाठीवर न पडल्यास ते नाराज होतात आणि पालकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत. इतकंच नाही तर अनेकदा असं घडलं तर मुलांच्या मनात आपले आईवडिल सतत ओरडतच असतात, अशी भावना निर्माण होते. त्यामुळे त्यांनी एखादं चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करा. त्याबद्दल त्याला काहीतरी छोटसं बक्षीसही द्या. जेणेकरून पुढच्या वेळी तो अधिक उत्साहाने, जोमाने काम करेल. हो पण, एखाद्या गोष्टीचं आमिष दाखवून मुलांना अभ्यास, काम करायला सांगू नका.

लेक्चर देऊ नका
छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांना तासन्तास लेक्चर देणे सोपे आहे. परंतु सारखं सारखं लेक्चर दिल्यावर तुम्हालाही ज्याप्रमाणे ऐकायला कंटाळा येतो आणि तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं टाळता, तसंच मुलांच्या बाबतीतही होतं. तुम्ही तासन्तास मुलांना लांबलचक भाषण ऐकवाल तर ते तुम्हाला कंटाळून टाळू लागतील.

चांगले संस्कार द्या
मुलांवर चांगले संस्कार करा. याची सुरुवात तुमच्यापासूनच करा. लहान मुलं मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे काही चांगल्या सवयी आपणच स्वत:ला लावून घ्याव्यात. जेणे करून या सवयी मुलांना लागतील आणि तुम्हाला तक्रार करण्याची संधीच मिळणार नाही.

Share this article