Close

आजी पडली… (Short Story: Aaji Padali)

  • प्रियंवदा करंडे
    आज पमीचा सहावा वाढदिवस. तिच्या एकुलत्या एका नवर्‍याने- मुकुंदाने, एकुलत्या एक मुलाने मिहीरने, एकुलत्या एक सुनेने अदितीने, एकुलत्या एक नातीने, अगदी जोरात साजरा केला. पमीला छानसं हिर्‍याचं ब्रेसलेटं, साडी अशा तिला हव्या असलेल्या गिफ्टस् मिळाल्या.

  • स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ अशी प्रतिज्ञा करणार्‍या लोकमान्य टिळकांच्या पावलांवर पाऊल टाकत जणू पमीने प्रतिज्ञा केली की, ‘पडणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि म्हणून मी पडणारच!’ त्याप्रमाणे लहानपणापासूनच पमी त्या प्रतिज्ञेप्रमाणे ‘पडत’ आली. पमी दीड वर्षाची झाली आणि चिमुरडी चालायला की हो लागली. पमीने पहिलं पाऊल टाकलं आणि तिची आई, ‘पमी चालू लागली, आम्ही नाही पाहिली’, असं गाणं टाळ्या वाजवत म्हणणार तोच पमी धप्पकन जमिनीवर पडली आणि तोंडावर आपटली. तिने जोरात रडून घर डोक्यावर घेतलं. थोड्या वेळाने पमीला दूधबीध पाजवून तिच्या आईने शांत केलं नि आई जेवायला बसली. गुटगुटीत पमी पुन्हा उभी राहिली. तिला माहित होतं की, ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे’ म्हणून तिने पुन्हा ‘चाली चाली’ करण्याचा प्रयत्न केला, पण बापडी पुन्हा पहिल्यासारखीच ती धाप्पकन जमिनीवर पडली आणि तोंडावर आपटली. तिने पुन्हा जोरात किंचाळून, रड, रड, रडून घर डोक्यावर घेतलं. पमीची आई आता मात्र ‘पमी चालू लागली, आम्ही नाही पाहिली,’ हे गाणं म्हणण्याच्या मूडमध्ये नव्हती. भुकेने कळवळून तिने वीस-पंचवीस घास पोटात रिचवले होते. तोच पमीची मोटली जमिनीवर आदळली. उष्ट्या हातानेच तिने पमीला बखोटीला धरून उठवलं. पमी आईकडे आता ती लाड करेल म्हणून आशेने बघत असतानाच आई करवादली, ‘कार्टे कशाला कडमडलीस? अग चालता येत नाही तर एका जागी बस आणि खेळ घेऊन खेळ ना.’ पण पमी वेगळीच मुलगी होती. तिने ‘अँ, अं, ऊं’ असं काहीतरी वेगळंच बोलत भिंतीकडे बोटाने खूण केली. ‘काय आहे तिथे कार्टे? माझा गरमागरम मेतकूट भात थंडगार झाला.’ असं म्हणत पमीच्या आईने भिंतीच्या दिशेने नजर टाकली. तिथे एक कोळी भिंतीवर चढताना दिसला. ‘अगबाई! म्हणजे पमीला ‘रमतगमत कोळी भिंतीवर चढे, भिजत पावसाने खाली तो पडे!’ हे गाणं देखील माहित आहे तर. अरे देवा!’ पमीची आई अगदी हवालदिल झाली. आता ही गब्दुल पमी कोळ्यासारखी चाली चाली करण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करणार म्हणजेच तोंडावर आपट आपट आपटणार. पमीच्या आईला- पार्वतीबाईंना आता जेवण गोड लागेना. त्यांनी आता पमी सारखी सारखी का पडते याचा मुळापासून शोध घ्यायचं ठरवलं. त्यांनी मग पमी चालायला लागली तेव्हा नीट पाहिलं, तो काय! पमी चक्क तिच्या पायाच्या चवड्यांवर चालत होती. ‘वा! मोठी बॅले डान्सरच लागून गेलीय,’ तिच्या आईला वाटलं.
    “कार्टे, नीट पावलं टेकवून चाल,” म्हणत पमीच्या आईने तिला एक हलकासा धपाटा मारला. तो काय, पमी आपली न पडता तुरूतुरू चालू लागली. धावू लागली. आता तिची आई शांतपणे गरमागरम मेतकूट भात घशाखाली ढकलू शकत होती. पार्वतीबाईंना आता मनात पमीबद्दल छान छान करिअर्स सुचायला लागल्या. तिला मांडीवर जोजवताना तिच्या आईला वाटायचं, खरंच! मी उद्याच्या राष्ट्रीय- अहं आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धावपटूला, जणू पी.टी. उषालाच पमीच्या रूपात खेळवत आहे. कधी कधी पमीच्या आईला पमी भारताची पंतप्रधान झाल्यासारखीच वाटली. घट्ट पाय रोवून चालणारी आपली कु. प्रमिला शंकरराव धडपडे देशाच्या कुटिल राजकारणात कधीच पडणार नाही तर दुसर्‍यांनाच पाडेल याची आता त्यांना खात्री वाटू लागली.
    बघता बघता पमी एकवीस वर्षांची तरुण मुलगी झाली आणि होऊ नये तेच घडलं. पमी मुकुंद देशमुखच्या प्रेमात पडली. एके दिवशी मैत्रिणींबरोबर हुंदडून पमी संध्याकाळी सात वाजता घरी येऊन दारातूनच ओरडली, “एऽऽ आऽऽई, मी किनई प्रेमात पडलेय.” ते ऐकून पार्वतीबाई नुसती गोंधळली. म्हणाली, ‘काऽऽय? म्हणजे? तू आता खानदानची इज्जत मातीत मिळवणार? तू माँ बननेवाली है? अहो, अहो, पमीने आपलं नाक कापलं…’ असं बोलता बोलता ती एकदम जमिनीवरच पडली.
    ‘अग… अग… पारू अग काय झालं? पमे, आईला पाणी दे,’ म्हणत शंकरराव तिच्याजवळ धावले. आईच्या तोंडावर पाणी मारताच ती पटकन उठून बसली. ‘अग आई, असं ग काय करतेस? हा बघ मुकुंद इंजिनिअर आहे. अग आम्ही दोघे प्रेम करतो ग एकमेकांवर.’ पमीने आईबाबांची मुकुंदशी ओळख करून देत म्हटलं, ‘पण पमीच्या आई, एवढ्या पॅनिक का झालात मगाशी?’ मुकुंदने पमीने आणलेला चहा घेत विचारलं, ‘अरे काय सांगू तुला? पमी लहानपणापासून पडत आलीय. शाळा, कॉलेज, रस्ता, घर, देश, विदेश कुठेही गेलं तरी पमी पडलीच म्हणून समजा.’ पमीच्या आईने धास्तावून म्हटलं.
    ‘अरे देवा! उद्या लग्नानंतर पमी अशीच पडत राहणार? काय ग पमे?’ आता मुकुंद हवालदिल होऊन विचारत होता.
    ‘नाही रे बाबा मक्या. गेली दोन वर्ष आपण फिरतोय. सांग, पडले का मी कधी? नाही ना?’ पमीन विचारलं. ‘मग? आता मी मुळीच पडणार नाही.’ पमी ठासून म्हणाली.
    ‘नक्की? ओके. मग ठीक आहे.’ मुकुंदने चहाचा रिकामा कप सेंटरपीसवर ठेवत म्हटलं. ‘म्हणजे? नाहीतर काय तू लग्न मोडणार होतास?’पमीने विचारलं. ‘नाही ग वेडे! पण आता एका अटीवर लग्न करेन. लग्नानंतर तू कधीही पडायचं नाही काय?’ मुकुंदाने मिस्कीलपणे विचारलं. ‘नाही पडणार! दिलं वचन.’ म्हणत पमीने त्याचा हात हातात घेऊन त्याला खात्री पटवून दिली.
    आज पमीचा सहावा वाढदिवस. तिच्या एकुलत्या एका नवर्‍याने- मुकुंदाने, एकुलत्या एक मुलाने मिहीरने, एकुलत्या एक सुनेने अदितीने, एकुलत्या एक नातीने, अगदी जोरात साजरा केला. पमीला छानसं हिर्‍याचं ब्रेसलेट, साडी अशा तिला हव्या असलेल्या गिफ्टस् मिळाल्या. तिच्या लग्नाला आता पंचेचाळीस वर्ष झाली होती आणि इतक्या वर्षात पमी एकदाही पडली नव्हती.
    ‘आज मी पमीला हे हिर्‍याचं ब्रेसलेट का देतोय सांगू? ती लग्नानंतर एकदाही पडली नाही म्हणून आणि हा मोत्यांचा नेकलेस वाढदिवसाची गिफ्ट म्हणून देत आहे,’ असं मुकुंदाने मोठ्या अभिमानाने म्हटलं तेव्हा पमी नुसती आनंदाने फुलून गेली.
    ‘आजोबा, आजी पडायची का सारखी?’ सात वर्षाच्या रिचाने विचारलं, तशी पमी अगदी सरसावून म्हणाली, ‘अग, नाही ग रिचा. आजोबा किनई माझी गंमत करताहेत. तेच पडतात ना. म्हणून मला चिडवतात.’
    ‘पण आजोबा कधी पडलेत?’ रिचाने भाबडेपणाने विचारलं. ‘अग रिचा, तुला पेस्ट्री खायचीय ना? आणि अग हो तुला किनई छानशी रिटर्न गिफ्टही द्यायचीय, तुझ्या आवडीची, तू येतेस ना आमच्याबरोबर रिचा?’ पमी विषय बदलत म्हणाली.
    ‘हो ग. आज्जू. मला तो वेस्टसाइड दुकानातला ड्रेस हवाय. आपण जाऊ या ना?’ पमीला मध्ये थांबवत मिहीर म्हणाला, ‘आई, काही तरी काय? अग तुम्ही डोंबिवलीहून सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा मार्केटच्या दुकानात जाणार?’ पमी म्हणाली, ‘होऽऽ. त्याच माटुंग्याच्या चाळीत मी
    21 वर्षे राहिले. तिथेच माझं बालपण… माहेर…’ तिला अडवत म्हणाला, ‘कळलं आई. ते खरं… गेल्या वेळेस मावशीकडे गेलो तेव्हा रिचाने त्या दुकानात ड्रेस पाहिला, पण आता डोंबिवलीतही सगळं मिळतं गं. तुम्ही तिघे ट्रेनच्या गर्दीत…’
    मिहीरला पुढे बोलू न देता पमी म्हणाली, ‘काही काळजी करू नकोस. आम्ही व्यवस्थित जाऊन येतो. चल रिचा, चला हो आजोबा.’ पमीने आपली पर्स घेत म्हटलं आणि तिघेही बाहेर पडले. शनिवारचा दिवस असल्यामुळे गाडीला तुफान गर्दी होती. तरी तिघेही कसेबसे माटुंग्याला पोहोचले. वेस्टसाइड दुकान येताच पमी म्हणाली, ‘रिचाला हवा तो ड्रेस आधी घेऊ.’
    ‘हो! हो!’
    रिचाने दुकानदाराला नेहमीप्रमाणे शेकडो ड्रेसेस काढायला लावले. नंतर एक जीन्सची पॅण्ट आणि त्यावर पिंक कलरचा टॉप निवडला. ‘आवडला ना बेबीला ड्रेस?’ म्हणत पमीने रिचाची पापी घेतली.
    ‘आजी सर्वांच्या पुढ्यात असं नाही करायचं.’ पमीला रिचाने फटकारलं. ‘हुश्शार ग माझी बेबी.’ पमी कौतुकाने म्हणाली. ‘अहो, आलोच आहोत तर छेडाच्या दुकानातून नमकीन, स्वीटस् घेऊया ना.’ म्हणत पमी लगालगा छेडाच्या दुकानाकडे चालत निघाली. आजोबा नि रिचा हातातल्या पिशव्या सावरत तिच्या पाठून जायला निघाले. दोन मिनिटांतच, ‘आजी पडली…’, असा लोकांचा आरडाओरडा कानी पडला. म्हणून मुकुंद आजोबांनी कुतूहलाने पाहिलं तर काय, त्याची पमी आणि रिचाची आजी म्हणजेच लोकांची ‘माँजी’ फूटपाथवरच्या उखडलेल्या पेव्हरब्लॉकमध्ये पाय अडकून धाडकन फूटपाथवर तोंडावर पडली होती. आजोबांच्या पोटात आता या गुटगुटीत पमीला उठवून उभी करण्याच्या विचारानेच गोळा आला. आजी अशी भर रस्त्यात पडलेली पाहून बापडी रिचा घाबरून गेली आणि ती रडत किंचाळत धावत सुटली. आजोबांची मात्र तारांबळ उडाली. ‘रिचू थांब, रिचा ऐक.’ म्हणते तेही तिला धरायला जावं का, असा विचार करतानाच एक तरुण स्वयंसेवक म्हणाला, ‘बाबा तुम्ही त्या छोकरीला बघा. आम्ही माँजीना सांभाळतो.’ आजोबांनी हुश्श केलं. आजीला उठवायच्या संकटून बचावल्यामुळे ते उत्साहाने रिचाला पकडायला भराभरा चालू लागले. इकडे आजीभोवती 8-10 तरुण, प्रौढ माणसे गोळा झाली. ‘माँजी’ तो तरुण स्वयंसेवक म्हणाला. ‘ऊठिये, पानी पिना माँजी.’ मग त्याने नि दोनचार जणांनी पमीला हाताला आधार देत उठवून बसवलं. तोच तिथे आजोबा आणि रिचाही आली. ‘माँजी, पानी पिजीए,’ तो तरुण म्हणाला. त्याने त्याची अर्धवट प्यायलेली बाटली पुढे केली. पमी आता पुरती भानावर आली होती. ती म्हणाली, ‘अं… अं…’ उष्टी पाण्याची बाटली तिला नको होती. तोच आजोबा म्हणाले, ‘अरे भाई, उसको मोसंबीका ज्यूस पिलाओ. बच्चीको देखो. मै लाता हूँ.’
    ‘नो नो आजोबा, मैं हूँ ना. मैं लाता हूँ.’ तो तरुण स्वयंसेवक उद्गारला.
    ‘मला ऑरेंज ज्यूस हवा.’ रिचाही आता तहानेने कळवळून म्हणाली. दोघींनी ज्यूस घेतला. आता माँजी ऊर्फ पमी एकदम ताजीतवानी झाली.
    ‘चक्कर आली होती का माँजी?’
    एकाने प्रेमाने तिची चौकशी केली. ‘अभी आगे चलके पाँव बराबर रखना,’असंही सांगितलं. आज त्यांच्या अंगात वृध्दांची सेवा करण्याचं भूत संचारलं होतं.
    ‘वं… व्हं…’ पमी बोलायला लागली.
    ‘अरे देवा…’ आजोबा उद्गारले.
    ‘क्या हुआ, माँजीको क्या चाहिऐ?’
    ‘व्हिस्की बोल रही है,’ आजोबांनी खुलासा केला.
    ‘कोई बात नही, अरे व्हिस्कीका बोतल लाना.’ स्वयंसेवक व्हिस्कीची बाटली घेऊन आला.
    ‘माँजी आप व्हिस्की पियेंगी?’
    ‘अरे बाळा, आजोबांना पाजव एक पेग. घाबरलेत बिचारे.’ पमी मुकुंदाच्या कळवळ्याने म्हणाली. शेवटी आजोबा एक पेग व्हिस्की प्यायले. उरलेली बाटली पिशवीत ठेवली. पमीला हात देऊन नंतर उभी केली. पमी थोडी तोल जात असल्यासारखी उभी राहिली. आजोबांच्या एका हातात रिचा आणि दुसर्‍या हातात खरेदीच्या पिशव्या होत्या. त्यामुळे त्या तरुण स्वयंसेवकाला ताबडतोब जाणवलं की, हे आजोबा आता या म्हातार्‍या आजीला कसं सांभाळून नेणार? त्याने ताबडतोब एक टॅक्सी थांबवली.
    ‘माँजी चलिये, मै आप तीनोंको आपके घर तक छोडनेको आता हूँ.’
    ‘अरे… अरे… पण…’
    पमीला बोलू न देता तो म्हणाला, ‘माँजी मैं आपका बेटाही हॅूं. माँजी, बाबा, बेबी, चलो चलो, बैठो टॅक्सीमें.’ त्या तिघांनाही मागच्या सीटवर बसवून तो पुढे ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसला.
    ‘चलो, अच्छा माँजी, आप कहाँ रहती है?’ त्याने विचारलं.
    ‘डोंबिवली बेटा. भगवान तुला लंबी उमर देईल. चलो.’ पमी म्हणाली.
    ‘क्या आप डोंबिवली रहते हो?’ त्या स्वयंसेवकाच्या आवाजात थोडा कंप जाणवत होता. त्याने जवळच्या बाटलीतलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं.
    पमीच्या घराजवळ टॅक्सी थांबली. पमी, मुकुंद आजोबा, रिचा उतरून त्या तरुण स्वयंसेवकाने पैसे देईपर्यंत तिथे थांबले. मग त्या तरुणाला पमी म्हणाली, ‘खूप उपकार झाले बाळा. गॉड ब्लेस यू.’
    पण आता तो स्वयंसेवकच इतका हवालदिल झाला होता की, तोच पडेल की काय, असं पमीला वाटलं. ‘थँक्यू’ म्हणत तो स्टेशनच्या दिशेने निघून गेला. रिचा पमीला बिलगत म्हणाली, ‘आज्जी तू ग्रेट आहेस.’
    ‘ग्रेट का ग?’ पमीने विचारलं.
    ‘तू पडल्यामुळे कित्ती आरामात आलो. ए आजी, आपण परत तिथे गेलो की, तू पुन्हा पड हं. ज्यूस, टॅक्सी सगळं मिळतं मग. आय लव्ह यू आजी.’ म्हणत रिचा धावत घराकडे पळाली.
    ‘ए आई, अगं तुला माहित आहे का? माँजी गिर गई आणि आम्हाला मज्जा आली…’
    रिचा आईला सगळा किस्सा सांगत होती. आता पमी
    आणि मुकुंदही तिच्या मजेत सामील झाले.

Share this article