Close

चांदण झाली रात्र (Short Story: Chandan Zali Ratra)

  • अचानक त्याची झोप उडाली. आपल्याला एखादं भयानक स्वप्न पडलं होतं का? त्यानं आठवून पाहिलं. तत्क्षणी त्याला काहीच आठवेना. त्यानं आपसूक अंगावर शर्ट चढवला. सविता तिच्या पलंगावर गाढ झोपली होती. तो दरवाजा उघडून बाहेर आला.

  • रात्री सविताचं आणि संजयचं जोरदार भांडण झालं होतं. तिला मुंबईला जायचं होतं. कारण दोन दिवसांनी तिच्या मामेबहिणीचं लग्न होतं. तो म्हणाला, “मग मी ही येतो तुझ्याबरोबर.” तर तिनं त्याला स्पष्ट नकार दिला. त्याचाच तिला भयंकर राग आला होता. त्याला वाटलं जिच्यावर आपण सहा वर्षापूर्वी जिवापाड प्रेम केलं, ती हीच का? अलीकडे हिचा स्वभाव एवढा चिडचिडा का झाला?
    काही वर्षांपूर्वी तिची भामरागड सारख्या आदिवासी लोकवस्तीच्या दुर्गम भागात उप जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. तेव्हाही संजयनं तिला विरोध केला. तेव्हा तिचा देशाभिमानी स्वभाव आडवा आला. तिनं आई-वडील-भाऊ-संजय या सर्वांचा विरोध पत्करून ही बदली आनंदानं स्वीकारली. तिथे राहायला तिला मोठं बंगलीवजा घर होतं. सवितानं त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवले होते. जर माझं प्रेम हवं असेल तर सारे मोहपाश सोडून इथे या आदिवासी भागात माझ्या सोबत राहायला लागेल. अन्यथा शहरी जीवनाचा उपभोग घ्यायचा असेल तर मला कायमचं विसरावं लागेल. त्यानं मग अजिबात वेळ न दवडता शहरी जीवनाला रामराम टाटाबाय करीत तो कायमचा भामरागडला राहायला गेला. तिथे पहिल्यांदा त्याने जनरितीप्रमाणे आप्त-स्वकीयांना निमंत्रण न देता अत्यंत साध्या पद्धतीने सविताशी विवाह केला. त्यालाच आता पाच-सहा वर्षे उलटून गेली होती. तो मुंबईत एक प्रख्यात चित्रकार म्हणून ओळखला जात होता. त्याची चित्रं मुंबईत नव्हे तर परदेशात भारी किमतीला विकली गेली होती. चित्रकलेतले त्याचे करिअर भराभर उंचावत असताना केवळ आपल्या प्रेमापायी त्याने त्या यशाला तिलांजली दिली. याचाच त्याच्या चित्रकार मित्रांना धक्का बसला होता. तिथे गेल्यावर त्याला गप्प बसवेना. तो मुळातच निसर्गप्रेमी असल्यामुळे तो निसर्गचित्रं रेखाटण्यासाठी सविताचा रोष पत्करून वेगवेगळी स्थळे शोधीत भटकंती करायला लागला. सुरुवातीला एकमेकांच्या संगतीत तासन्तास गुलुगुलु गुजगोष्टी करणारे ते प्रेमपक्षी आता मात्र व्यवहारी जगात आल्यावर एकमेकांशी कचाकचा भांडायला लागले. याचेच संजयला राहून राहून आश्चर्य वाटायला लागले.
    तिच्यात हा चमत्कारिक बदल एकाएकी घडला? म्हणतात ना ‘रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर असतं. ’ तसेच संजयच्या बाबतीत घडले. इथे आल्यावर तिला कोणीतरी क्ष व्यक्ती आवडायला लागली की काय? हे गुपित आपल्यापासून जाणूनबुजून लपवून ठेवायचे असेल? त्या अज्ञात व्यक्तीसोबत ती मामेबहिणीच्या लग्नाला तर जाणार नसेल? किंवा तिच्या वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकार्‍यांना एका शनीचे आधिपत्य आवडत नसेल म्हणून ते तिचा द्वेष करीत असतील? तिने हे खुल्या दिलाने आपल्याला सांगायला हवं! पण ती काहीच सांगत नाही. मग त्या प्रेमीजीवात हळूहळू एक अदृश्य दरी निर्माण व्हायला लागली. वेळी अवेळी बाहेर जाणे हे आता संजयच्या बाबतीत नित्याचंच झालं होतं. लॅन्डस्केप करण्यासाठी तो दूरच्या गावी गेला तर तीन चार दिवस त्या गावात मुक्काम ठोकीत असे. सिगारेटवर सिगारेट पेटवून मनसोक्त धूम्रपान करायचा. एखाद्या आदिवासीने दिलेल्या मोहाच्या किंवा जांभळाच्या दारूचा पुरेपूर आस्वाद घ्यायचा. पिठोरी अमावस्या किंवा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उत्तर रात्रीपर्यंत चाललेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होऊन तो अगदी धमाल उडवून द्यायचा.

  • सविताला त्याचं असं हे बेबंद वागणं अजिबात पसंत नव्हतं. त्याने काढलेलं आदिवासी तरुणीचं अनावृत्त पेंटिंग तिला अजिबात आवडलं नव्हतं. एकदा तिनं त्याला स्पष्ट शब्दात सुनावलं होतं, “संजय, तुझं हे चित्रांसाठी खेडोपाडी जाणं मला अजिबात आवडत नाही. आडगावातल्या दर्‍याखोर्‍यांतून तू फिरतोस. तिथल्या तरुण-तरुणीत तू मिसळतोस. तुझं हे वर्तन त्यांच्या जंगली आई-बापाना आवडणार नाही. तू परदेशी पाहुणा आहेस. आमच्या भोळ्या भाबड्या पोरींच्या नादी लागू नकोस, असं म्हणून ते तुला समजावीत बसणार नाहीत. तुझ्यावर जारणमारण करून तुला कायमचा लुळा-पांगळा करून टाकतील. नाहीतर या जगातून नाहीसा करतील.”
    “सविता, हा केवळ तुझा भ्रम आहे. गैरसमज आहे. ते लोक दयाळू असतात. माझ्यावर भरभरून प्रेम करतात.”
    “एके दिवशी हेच प्रेम तुला महागात पडेल. जिवाला जीव देणारे कधी तुझ्या जिवावर उठतील ते सांगता येणार नाही. पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही. तेव्हा वेळीच सावध हो, नाहीतर…. हे सर्व हिंदी सिनेमे आणि मराठी कादंबर्‍यांत पाहायला आणि वाचायला मिळतं. ते तद्दन खोटं असतं. ते सर्व लेखक/दिग्दर्शकांच्या मनाचे खेळ असतात.”
    “चित्रकला व निसर्गानं ओतप्रोत भरलेल्या जिवंत गावांपासून माझी कोणीच ताटातूट करू शकत नाही, हे माझ्या जीवनातलं त्रिवार सत्य आहे.”
    “मग व्यर्थ बोलण्यात काय तथ्य आहे? विषय संपल्यात जमा आहे.”
    “मी पण तेच म्हणतो. साप-साप म्हणून व्यर्थ भुई थोपटण्यात काहीच अर्थ उरत नाही.”
    अति झालं असं म्हणून कृतक कोपानं पाय आपटीत सविता तावातावानं आपल्या रुममध्ये निघून गेली. संजयला हे सर्व असह्य झालं होतं. त्याच्या हळव्या मनाला अनंत यातना होत होत्या. त्याला सरळसाधं जीवन हवं होतं. समोरचा निसर्ग त्याचा आता जिवाभावाचा मित्र झाला होता. त्याच्या सान्निध्यात त्याच्या चित्तवृत्ती बहरून येत. मनाची कुतरओढ करणं त्याला आता डोईजड झालं होतं. आता हे सारं संपवायला हवं. त्यानं मनाशी निग्रह केला. विचार करून करून त्याच्या डोक्याचा भुगा पडायला लागला. विचार करता करता त्याला कधी झोप लागली ते त्याचं त्यालाच कळलं नाही. अचानक त्याची झोप उडाली. आपल्याला एखादं भयानक स्वप्न पडलं होतं का? त्यानं आठवून पाहिलं. तत्क्षणी त्याला काहीच आठवेना. त्यानं आपसूक अंगावर शर्ट चढवला. सविता तिच्या पलंगावर गाढ झोपली होती. तो दरवाजा उघडून बाहेर आला.
    आकाश टिपूर चांदण्यानं मोहरलं होतं. त्या चंदेरी प्रकाशात दिवसा शांत वाटणारे विशाल वृक्ष रात्री मात्र सक्त पहारा देत उभे आहेत, असं वाटत होतं. हवेत विलक्षण गारवा होता. अचानक त्याच्या अंगावर थंड बर्फाळ हवेची शिरशिरी उठली. घरासमोरचा अरुंद बोळ पार करून तो मुख्य रस्त्यावर आला. कचकड्याच्या बाहुल्याला चावी दिल्यावर तो चालतो तसा तो चालायला लागला. त्याच्या मेंदूला कसल्या तरी विचित्र संवेदना जाणवायला लागल्या. आपल्या मनाविरुद्ध आपण बेलगामपणे जात आहोत. एवढं त्याला समजलं. चालता चालता त्याला एकाएकी आश्चर्याचा धक्का बसला. त्याला एवढंच जाणवलं की, त्याचं शरीर आता त्याचं राहिलं नव्हतं. त्याचं शरीर आता त्याच्या मनाच्या आज्ञा पाळायला तयार नव्हतं. ते आता कळसूत्री बाहुलं झालं होतं. अचानक झोपेतून उठवून त्याला अज्ञात दिशेला नेणारी अज्ञात शक्ती वेगळीच होती. आजूबाजूला काय आहे, याची त्याच्या मनावर नोंद होत नव्हती. समोर एक निसर्गरम्य टेकडी होती. चालता चालता तो अचानक ब्रेक लागल्यासारखा थांबला. त्याच्या समोरून कुणाची तरी धूसर सावली हवेच्या तालावर चालली होती. त्यानं डोकं झटकलं तर ते बधिर अवस्थेला पोचलं होतं. पुढे कोण आहे? पुरुष की कुठली तरी अनामिक शक्ती? काहीच समजेना!
    लख्ख चंद्रप्रकाश सार्‍या वातावरणाला तजेला देत होता. पायाखालचंही दिसत होतं. इतकी प्रखरता त्या प्रकाशात होती. तो चालतच होता. तेवढ्यात रानडुकरांची झुंड एका सरळ रेषेतून जवळजवळ त्याच्या अंगाला घासून गेली. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक निर्मनुष्य झोपडी त्याला दिसली. त्याला अचानक काहीतरी आठवल्यासारखं वाटलं. त्याच्या डोक्यात अतींद्रिय शक्तीने प्रवेश केला. या झोपडीत आपण कधीतरी आलो होतो. त्या झोपडीसमोर गुलमोहराचं एक झाड होतं. पाठीमागे एक पुरातन तलाव होता. त्याच्या काठावर दोन भक्कम दगडी होत्या. कित्येक शतकांपूर्वी कोणा अज्ञात शिल्पकारानं कोरीव काम करून कुठल्यातरी देवीचा मुखवटा कोरला होता. तिथले जुने जाणते वृद्ध गोंड सांगत की, हे पाच पांडवांचं काम असलं पाहिजे. वनवासात असताना रात्री त्यांचा मुक्काम एखाद्या घनदाट जंगलात असे, तेव्हा रात्रीचे ते दगडांच्या मूर्ती घडवीत. पहाटे पूर्व दिशेला शुक्राची चांदणी दिसायला लागली व गावात कोंबड्यानं बांग दिली की ते हातात असलेलं काम तिथेच टाकून आपला तिथला मुक्काम हलवीत असत. त्यामुळे त्यांचं ते काम त्या काळी अर्धवट राहिलेलं होतं, कारण खाली पायांचा आकार कोरलेला नव्हता. बर्फाळ थंड हवेचा लोट संजयच्या अंगअंगाला चाटून गेला आणि त्याला काहीतरी आठवलं या झोपडीत ती राहत होती झुमरू गोंडाची मुलगी सावली. त्याने एकदा तिचे चित्र काढले होते. ते पाहून ती त्याच्यावर फिदा झाली होती. नंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली पण ही तर फार पूर्वीची गोष्ट असावी कदाचित पूर्वजन्मीची, त्याला आता नेमकी आठवण कशी काय झाली? तो क्षणभर थांबल्यावर पुढे जाणारी ती काळसावलीही थांबली. तिच्या धूसर आकाराला हळूहळू मूर्त स्वरूप यायला लागलं. पाहता पाहता त्याला पूर्वी भेटलेली सावळी - सतेज सावली दिसायला लागली. अरे! ती तर या जगातून कधीच निघून गेली होती. चांदमारीच्या तळ्यात उडी मारून तिने स्वतःला संपवलं होतं. तिला या सुंदर जगाचा किंवा जगण्याचा का बरं कंटाळा आला असेल? तिच्या बाबतीत काही घातपात झाला नसेल कशावरून हे रहस्य आपल्याला कधीच कळलं नाही.

  • सावलीचा रेखीव चेहरा अत्यंत उत्तेजित झालेला दिसत होता. त्याला पाहून ती गालातल्या गालात हसली. तिच्या अगम्य गूढ व्यक्तित्वाची क्षणात त्याला भुरळ पडली. चांदणरात्रीच्या दुधेरी प्रकाशात ती एखाद्या स्वप्न देवतेसारखी चालायला लागली. मग तोही भारल्यागत चालायला लागला. दिवस-रात्र-कालगती आणि स्वतःलाही तो विसरून गेला. कुठूनतरी एक अज्ञात शक्ती त्याला पुढे जाण्यास परावृत्त करीत होती, असे त्याच्या मनाला राहून राहून वाटत होते, पण पुढे नेणारी शक्ती त्याहूनही प्रबळ असल्यामुळे तो कळसूत्री बाहुल्यासारखा पुढे चालत होता. कुठेतरी शेतमळ्यात धूसर काळोखात अचानक टिटवी ओरडली. क्षणात जादू झाल्यासारखी निद्राधीन झालेली वनसृष्टी जागी झाली व झाडांच्या फांद्यातून लहान चोरट्यांनी दंगा मस्ती करावी तसा वारा धिंगाणा घालायला लागला. त्याला त्याचे काही सोयरसुतक नव्हते. तो आपला पुढे पुढे आणि ती काळसावली त्याला घेऊन कुठल्या तरी अज्ञात प्रदेशाकडे चालली होती. अचानक तो थांबला. एका मोठ्या कातळाला त्याचा धक्का लागला. पुढे कोणा दानी महात्म्याने तहानलेल्या पांथस्थाला पाणी मिळावे म्हणून शंभर वर्षांपूर्वी बांधलेली विहीर होती. बरीच वर्षे ती वापरात नसल्यामुळे तिचे घोटीव दगड कोसळले होते. पाण्यात शेवाळाचा थर माजून चहूबाजूंनी रानवेलींनी घेरले होते. संजय आता पुढे जाणार व त्या विहिरीच्या दलदलीत फसणार हे त्रिवार सत्य होते पण तेवढ्यात त्याचा दंड पकडून त्याला कोणीतरी जोराने मागे ओढले. तो खाली पडला तेव्हा त्याच्या डोक्याला दगड लागून जखम झाली. ह्या जखमेतून भळाभळा रक्त वाहात होतं. त्यानं चमकून समोर पाहिलं तर तिथे सविता उभी होती. तिच्या डोळ्यातून घळा बदली घळा अश्रू वाहात होते. बरेच दिवस झाले या कथेचा शेवट काय करावा तेच मला कळत नव्हते, म्हणून सुखांत करून मी कथेला पूर्णविराम दिला.
  • विनायक शिंदे

Share this article