Close

आकर्षक केसांसाठी (For Attractive Hairs)

काळेभोर, लांबसडक, घनदाट, मुलायम, चमकदार ही विशेषणं आपल्या केसांसाठीही वापरली जावीत, असं वाटत असेल, तर हे उपाय करून पाहाच.


मध्यंतरी आखूड केसांची लाट आली होती, आजकाल सर्वांना लांबसडक केस खुणावू लागले आहेत. खरं म्हणजे, आखूड असोत वा लांबसडक, केस आरोग्यदायी असले तरच आकर्षक दिसतात. म्हणूनच केस वरकरणी आकर्षक बनविण्यापेक्षा मुळांपासून आरोग्यदायी बनविण्यावर भर द्यायला हवा. यासाठी केस निरोगी राखण्यासोबतच, त्यांना आवश्यक पोषणमूल्येही पुरवायला हवीत. त्यासाठी हे काही उपाय-

आरोग्यदायी केसांसाठी
लोखंडी भांड्यात आवळ्याची पूड भिजवून ठेवा. नंतर ती केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित प्रकारे लावा.
परवरची पाने वाटून त्यांचा रस काढून घ्या. हा रस केसांच्या मुळाशी लावा.
असे किमान 2-3 महिने सतत करा.
केस शाम्पूने स्वच्छ धुऊन झाल्यानंतर पाण्यात मध व लिंबूरस एकत्र करून केसांवर घाला. यानंतर केसांवर पुन्हा पाणी घालू नका. पंधरा दिवसातून एकदा अशा प्रकारे हेअर रिंझ करा.
केस धुण्यासाठीच्या पाण्यामध्ये लिंबूरस एकत्र करा.
दही व अंडे एकत्र चांगले फेटून घ्या. हे मिश्रण केसांवर लावून सुकू द्या. नंतर केस थंड पाण्याने धुवा.
आठवड्यातून एकदा केसांच्या मुळाशी नारळाचे दूध लावून मालीश करा. सुकल्यावर सौम्य शाम्पूने केस धुवा.
केसांच्या मुळाशी ताक लावून 10-15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा.

कोंड्यापासून मुक्तीसाठी हेअर मास्क
व्हिनेगरने केसांच्या मुळाशी मसाज करा. सुकल्यावर केस स्वच्छ धुवा. जोपर्यंत कोंडा केसातून पूर्णतः जात नाही, असे दररोज करा.
आपल्या डँड्रफच्या शाम्पूमध्ये 2 अ‍ॅस्पिरिनच्या गोळ्या एकत्र करून, या शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
मूठभर मेथी रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक वाटून केसांच्या मुळाशी लावा. 15-20 मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.

तेलकट केसांसाठी हेअर मास्क
1 कप मेंदी पूड, प्रत्येकी 1 टेबलस्पून रिठा पूड, आवळा पूड, कापूरची पूड, कडुनिंबाची पूड, संत्रे पूड, मेथी पूड, हरडा पूड व बहेडा पूड, एका लिंबाचा रस आणि 1 कप दही हे सर्व
साहित्य चांगले एकजीव करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसाच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावा. 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.
तेलकट केस धुण्यासाठी वेळ नसेल, तर कॉर्नफ्लोअरची ट्रिक अजमावता येईल. केसांना मध्यभागी भांग पाडून दुभागून घ्या. एका वाटीत कॉर्नफ्लोअर घेऊन मेकअपमधील ब्लशच्या ब्रशने ते भांगेवर केसांच्या मुळाशी लावा. साधारण 10 मिनिटांनंतर संपूर्ण केसांवर व्यवस्थित कंगवा करून, कॉर्नफ्लोअर काढून टाका. केसांचा तेलकटपणा निघून जाईल.
मिनिटांत चिकचिकीत केसांपासून मुक्ती हवी असेल, तर थोडी टाल्कम पावडर केसांच्या मुळांशी लावा.

कोरड्या केसांसाठी हेअर मास्क
एका अंड्यामध्ये 3 टेबलस्पून मध एकत्र करून चांगले फेटून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. अर्ध्या-एका तासानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा.
कोणत्याही तेलामध्ये 1 टेबलस्पून मध एकत्र करून केसांना व्यवस्थित लावून घ्या. तासाभरानंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
सुक्या केसांवर मेयॉनिज लावून 10-20 मिनिटांकरिता शॉवर कॅप लावून ठेवा. नंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित ऑलिव्ह ऑईल लावून घ्या. त्यावर शॉवर कॅप लावून 20 मिनिटे झाकून ठेवा. केसांवर गरम पाण्यात बुडवून हलकेच पिळलेला टर्किशचा टॉवेलही लावून ठेवता येईल.
20 मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
1 चांगले पिकलेले केळे पूर्णतः स्मॅश करून, त्यात प्रत्येकी 1 टेबलस्पून क्रीम व मध एकत्र करून चांगले एकजीव करा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावून घ्या. गरम पाण्यात बुडवून हलकेच पिळलेला टर्किशचा टॉवेल केसांवर नीट गुंडाळा. तास-दीड तासानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

मेंदीचा हेअर पॅक
10 ग्रॅम मेंदी, प्रत्येकी 5 ग्रॅम शिकेकाई, आवळा व ब्राह्मी, प्रत्येकी 2 ग्रॅम मुलतानी माती व कॉफी पावडर, अर्धा टीस्पून आंबे हळद, 5 टीस्पून भृंगराज पावडर, 1 अंडे व 1 कप दही या सर्व साहित्याचे एकजीव मिश्रण तयार करून केसांना व्यवस्थित लावा. 2 तासांनंतर केस आधी पाण्याने धुवा आणि नंतर शाम्पू करून धुवा. यामुळे केस मजबूत आणि आरोग्यदायी होतात.

आवळा-शिकेकाई हेअर पॅक
2 फेटलेले अंडे, 2 स्मॅश केलेले केळे, प्रत्येकी 2 टीस्पून आवळा पूड, रिठा पूड व शिकेकाई पूड, 2 टेबलस्पून मेथी पूड.
हे सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावून घ्या. साधारण
45 मिनिटांनंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा. या पॅकमुळे केसांना आवश्यक पोषणमूल्ये मिळतात व केस मुलायम होतात.

निस्तेज केसांसाठी हेअर पॅक
2 अंडे, 1 कप ताजे घट्ट दही, प्रत्येकी 1 टेबलस्पून बदामाचे तेल व ऑलिव्ह ऑईल, 1 टीस्पून एरंडेलाचे तेल, 1 कप मेंदी पूड व 1 टेबलस्पून शिकेकाई पूड
हे सर्व साहित्य एकत्र करून चांगले फेटून घ्या. मिश्रण घट्ट वा पातळ करण्यासाठी आवश्यकतेनुसार दही व मेंदी पूडचा वापर करा. हा हेअर पॅक केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावून 30 मिनिटांनंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा.

स्पेशल हेअर पॅक
प्रत्येकी 1 टेबलस्पून आवळा पूड, रिठा पूड व शिकेकाई पूड एक कप पाण्यामध्ये एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करा.
हे मिश्रण लोखंडी भांड्यात रात्रभर झाकून ठेवा. सकाळी या पाण्याने केस स्वच्छ धुवा. केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतील.

Share this article