सर्व महिलांना जीवनातील एका टप्प्यादरम्यान रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत असला तरी अनेक महिलांना रजोनिवृत्तीमुळे त्यांचे आरोग्य व स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहिती नसते. या स्थितीबाबत फारशी चर्चा करण्यात आलेली नाही, ज्यामुळे महिलांना जीवनातील या भावी टप्प्यासाठी सुसज्ज राहणे अवघड होते. रजोनिवृत्तीमुळे विविध प्रकारचे बदल होऊ शकतात. काही महिलांना पीरियडदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्याचे वाटू शकते, आत्म-शोधाची भावना जागृत होऊ शकते आणि पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता निर्माण होऊ शकते. पण या टप्प्यादरम्यान महिलांच्या शरीरात बदल होण्यासोबत इस्ट्रोजेन पातळ्यांमध्ये घट होते हे लक्षात असणे देखील महत्त्वाचे आहे.
या बदलांमुळे महिलांना रजोनिवृत्तीनंतर आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित असणे आवश्यक आहे. मुंबईतील सूर्या हॉस्पिटल येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या संचालक डॉ. सुचित्रा पंडित म्हणाल्या, ''भारतातील रजोनिवृत्ती घेणाऱ्या महिलांवर आधारित संशोधनांमधून निदर्शनास आले की नोंदणी झालेली सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे वेदनादायी चमक व रात्रीच्या वेळी घाम येणे, तसेच इतर लक्षणे जसे झोप न लागणे, चिंता, चिडचिड, सांधेदुखी आणि योनीमार्गात कोरडेपणा.
इंडियन मेनोपॉज सोसायटीने केलेल्या संशोधनामध्ये या लक्षणांचे प्रमाण ७५ टक्के असल्याचे आढळून आले. या लक्षणांबाबत जागरूकता हळूहळू वाढत असली तरी आम्हाला अंदाज आहे की कमी महिलांना रजोनिवृत्तीचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित आहे. ज्यामुळे अधिकाधिक महिलांना रजोनिवृत्तीनंतरच्या सामान्य स्थितींबाबत माहित असण्याची अधिक गरज आहे. इस्ट्रोजेन पातळ्या कमी झाल्यामुळे महिलांना ऑस्टियोपोरासिस, हृदयसंबंधित आजार आणि मसल मास लॉसचा मोठा धोका असू शकतो. रजोनिवृत्तीच्या हाडे व हृदयाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित असल्याने त्यांना परिणामांना ओळखण्यासोबत त्यावर प्रतिबंध ठेवण्यास किंवा लवकर निराकरण करण्यास मदत होऊ शकते.''
अॅबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, ''महिलांना रजोनिवृत्तीचा हाडे व हृदयाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत समजण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे. अॅबॉट व इप्सोसने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८२ टक्के व्यक्तींचा विश्वास आहे की रजोनिवृत्तीचा महिलांच्या वैयक्तिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. यामुळे महिलांना रजोनिवृत्तीदरम्यान व त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रजोनिवृत्तीनंतर होणारा सर्वात सामान्य आजार म्हणजे ऑस्टियोपोरोसिस, जो ५० वर्षांवरील तीनपैकी एका महिलेला होतो. इस्ट्रोजेनच्या पातळ्यांमध्ये घट झाल्यामुळे हा आजार होतो, परिणामत: हाडांची झीज होते व स्नायूबळ कमकुवत होते, ज्यामुळे ते तुटण्याचा धोका वाढतो. आज भारतातील जवळपास ६१ दशलक्ष व्यक्तींना ऑस्टियोपोरोसिस आहे आणि त्यांच्यापैकी ८० टक्के महिला आहेत.
रजोनिवृत्तीनंतर महिलांना स्नायूबळ कमकुवत होण्याचा देखील धोका असतो. वाढत्या वयासह हालचाल, संतुलन व ताकदीसाठी स्नायूबळ मजबूत असणे आवश्यक आहे. स्नायूबळ कमी होणे किंवा सार्कोपेनिया महिलांमध्ये झपाट्याने वाढत होते, रजोनिवृत्तीमुळे पुरूषांच्या तुलनेत जवळपास एक दशक अगोदर महिलांना त्यांचा त्रास होत आहे. यासोबत इतर गुंतागूंती देखील होतात जसे वजन कमी होणे आणि पायऱ्या चढण्यासारखी सोपी कामे करताना त्रास होतो.
थकवा व ऊर्जा कमी होणे या चेतावणी लक्षणांकडे लक्ष द्या, त्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. स्नायूबळ वाढवण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकता, जसे ताकदीसाठी व्यायाम, स्नायूंसाठी फायदेशीर ठरणारे व्यायाम, पौष्टिक आहाराचे सेवन आणि पुरेशी झोप घेणे.
रजोनिवृत्तीनंतर हृदयविषयक आजाराचा धोका देखील वाढतो. यामागील कारण म्हणजे इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे लिपिड पातळ्यांमध्ये बदल होऊ शकतात, जसे कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होऊ शकते.
थोडक्यात, वाढत्या वयासह महिलांनी नियमित तपासणी, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. कोणत्या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे माहित असल्यास तुम्ही व तुमचे प्रियजन रजोनिवृत्तीनंतर उत्तमप्रकारे जीवन जगू शकतात आणि जीवनातील या टप्प्याचा सहजपणे स्वीकार करू शकतात.