Close

सान्वी मोठी होते (Short Story: Sanvi Mothi Hote)

-प्रा. माधुरी शानभाग

चित्रामावशीच्या मोठ्या, चित्रासारख्या बंगल्यात आपल्याला आता स्वतंत्र खोली देतील. अन् चारी ठाव खायला प्यायलाही चमचमीत मिळेल. फक्त विक्रमकाका डोक्यावर टपली देत टोमणे मारतात ते सहन केले की झाले.. तसे मायाही करतात पण त्यांचे बोलणे.. यावेळी आपण गप्प न बसता त्यांना टकटकीत उत्तरे द्यायची..

सान्वी, पुण्याहून चित्रामावशीचे पत्र आलेय, तिने अन् विक्रमकाकानी तुला एक वर्ष ठेवून घ्यायला मान्यता दिलेली आहे. अगदी आनंदाने.. जाशील ना?”
“नाही, अजिबात नाही, मावशी माझे लाड करते वगैरे ठीक आहे, पण विक्रमकाकाना आपल्या श्रीमंतीचा फार तोरा आहे. माझ्या वागण्याला ते गावंढळ म्हणत असतात. मला ते अजिबात आवडत नाही. आणि ते बाबांना ‘काय म्हणतोय तुझा सोशल वर्कर बाप,’ असे तुच्छतेने म्हणतात. ते तर मला अजिबात खपत नाही. मला तू दादासारखे हॉस्टेलला ठेव.”
“अगं दादा एरव्हीही हॉस्टेलला जाणारच होता, त्यात त्याला आय.आय.टी. पवईला प्रवेश मिळालाय, अन् तिथे हॉस्टेलची सोय आहे. आम्ही जाऊन सगळे बघून आलोय. तुला सिंहगड जवळच्या संस्थेच्या शाळेत एका वर्षासाठी प्रवेश मिळालाय हेच खूप झाले. पुढच्या वर्षी तू दहावीला इथे परत येशील. अन् मग तीन वर्षानी बारावी झाल्यावर तुला दादासारखे हॉस्टेलला जावेच लागेल. आता दोन दोन मुले हॉस्टेलला ठेवणे आम्हाला परवडणार आहे का? त्यात दादाला स्कॉलरशिप मिळालीय म्हणून जमतेय..”
“मग तुम्ही दोघे, तीन वर्षानी मेघालयला जा ना? आताच जायचे काय अडलेय..”
“हे बघ सान्वी, एका नव्या संस्थेने तिथे शाळा काढलीय. त्याची मुख्य म्हणजे चांगली घडी बसवण्यासाठी आम्हाला जावे लागतेय. तीन वर्षापूर्वी अरुणाचलला बाबा एकटेच गेले. अन् त्यांना अल्सरचा त्रास सुरू झाला.. आता सुदैवाने तिथे मुलींचे वस्तीगृह आहे म्हणून मलाही संस्था एक वर्षासाठी पाठवतेय.. हे सगळे तुला नीट सांगून झालेय.. परत परत हट्ट करू नको माझ्या सोन्या..”
“तोंडाने सोन्या म्हणतेस, पण तुझ्या या निर्णयावरून मला तिथे चित्रामावशीच्या घरात ढकलायला निघालीस.. चांगल्या आया असे मुलांना वार्‍यावर सोडून समाजकार्य करत भटकत रहात नाहीत..”
दारावरची बेल वाजली. अन् आईने माझ्याकडे दुर्लक्ष करून सरळ तिकडे मोर्चा वळवला.
बाबाच आले होते. आल्या आल्या त्यांनी आईच्या हातात तिकिटे दिली.
“पुण्याहून दहा मेला निघायचे आहे. तिथे ज्ञानप्रबोधिनीत हॉस्टेलमधे सान्वीची सोय होईल का ते एकदोन दिवसात कळेल.. आजच रातंजनकर पुण्याला फोन करून विचारतो म्हणालेत.. सान्वी बेटा, एकच वर्ष काढ. तिथून तुला प्रवेश मिळालेली शाळा जरा दूर पडेल, पण जायला यायला बसची सोय आहे असे रातंजनकर म्हणालेत. तिथे एकटी स्वतंत्र राहून अनेक गोष्टी शिकशील, मग दिवाळीच्या सुटीत तुला मेघालयला नेता येईल का पाहू..”
“संजय, अरे, सान्वीला पुण्याला हॉस्टेलला ठेवायची गरज नाही, आताच चित्रामावशीचे पत्र आलेय. परवा फोनही आला होता. विक्रमने सान्वीला जरूर ठेवून घे असे तिला सांगितलेय. तेवढेच संजयच्या सोशल वर्कला मदत
होईल म्हणे..”
“मला सान्वीचे तिथे रहाणे फारसे पसंत नाही पण ते खर्चाच्या दृष्टीने अगदी स्वस्तात पडेल. अन् चित्राचे तिच्यावर लक्षही राहील. आणि बाकी कसाही असो, त्याच्या डोळ्यात सान्वीबद्दलची खरीखुरी माया मी पाहिलीय.. येताजाता किती भेटी देत असतो. ही पोर मला देऊन टाक, असे चेष्टेत म्हणतो, ते उगाचच का? विक्रम माझी कितीही तोंडावर कितीही चेष्टा करू देत, पण मी मदत मागितली की काहीही करून उभी करून देतो. दरवर्षी आपली टीम घेऊन आपल्या सर्व शाळांच्या मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी करून देतो.. मागितली की औषधे पाठवतो.. एखादी अडलेला रोगी पाठवला तर त्याच्या उपचाराची सोय करतो..”
“त्यात प्रसिध्दी मिळते याचा भाग किती अन् मनापासून मदत किती.. हे आपल्याला कळतेच ना?”
“अग, चौदा सरून पंधरावे लागलेल्या मुलीला ठेवून घेतो म्हणालाय हेच खूप झाले ना?.. आणि सान्वी अलिकडे अगदी उध्दट झालीय, कोणत्याही बाबतीत जराही नमते घ्यायला नको, वाद किती घालते बघतेस ना? तिलाही जरा मावशीच्या सोबत राहून समजेल.. किती तडजोड करावी लागते बाईला आयुष्यात.. बाईलाच काय पुरुषालाही करावीच लागते..”
“हो रे, त्यात तिला जपणे सवरणे सारे संभाळेल चित्रा. अन् चारचौघात बोलावे, वावरावे कसे ते ही शिकवेल, मोठमोठ्या लोकात वावर असतो तिचा.”
“माझ्या इच्छेची कुणालाच पडलेली नाही..” मी मधेच तोंड घातले.
“आता पुरे, मी पोळ्या करते, तू ताटे घे. अन्को शिंबीर काप.. बाबांची आंघोळ होईतो जेवायची तयारी करू.. चल..”
आईचा आवाज अशावेळी अगदी नो अपील असा करडा होतो.
मी चडफडत उठले. जगातील सर्वात दुष्ट आई देवाने माझ्याच वाट्याला कां दिलीय.. असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत मी स्वैपाकघरात गेले. इन मिन तीन खोल्यांचे घर. चित्रामावशीच्या मोठ्या, चित्रासारख्या बंगल्यात आपल्याला आता स्वतंत्र खोली देतील. अन् चारी ठाव खायला प्यायलाही चमचमीत मिळेल. फक्त विक्रमकाका डोक्यावर टपली देत टोमणे मारतात ते सहन केले की झाले.. तसे मायाही करतात. पण त्यांचे बोलणे.. यावेळी आपण गप्प न बसता त्यांना टकटकीत उत्तरे द्यायची.. काकड्या अन् टोमॅटो कापता कापता माझ्या मनात चक्रे फिरू लागली.
आई आणि चित्रामावशीत किती फरक असावा. चित्रासारखी सुंदर अन् तशीच नीटनेटकी रहाणारी. सदैव बाहेर चालली आहे अशी तयारीत असणारी चित्रामावशी आणि स्वत:कडे अजिबात लक्ष न देणारी आई.. चित्रामावशीचा सुंदर, मोठा, बाग असलेला बंगला, खूप जोरात प्रॅक्टीस असलेला डॉक्टर नवरा आणि त्याच्याबरोबर सदैव मोठमोठ्या श्रीमंत लोकात वावरणे, दागिने, कपडे घालून मिरवणे. याउलट आई.. साड्या फाटेस्तोवर वापरणार. अलिकडे तर पंजाबी ड्रेसच घालते. का तर म्हणे धुऊन लगेचच घालता येतात. आता मेघालयला जाण्यासाठी जीन्सच्या पॅन्टी घेतल्यात.. सदैव शाळेचे अन् त्यातील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे विचार.. चांगला सरकारी पगार असलेली नोकरी आहे, पण दोघेही अगदी साधे राहून अनेकांची फी भरणार. नाहीतर सदैव पैशांच्या चणचणीत असलेल्या संस्थेच्या कामात खर्च करणार.. आपल्यालाही अगदी मोजके कपडे.. कशाला कमी नाही, पण चैन नावाचा प्रकारच नाही. तरीपण आपले घर आपल्याला सोडून एक वर्ष चित्रामावशीकडे जायला नको वाटते..कुणीतरी करकचून बांधून ठेवून गळ्यात पट्टा अडकवलाय असे रहाणे, श्वास कोंडून गुदमरल्यासारखे वाटते तिथे. कुणी भावंड नाही. चित्रामावशीला मूल झाले नाही. आईने एकदोन वेळा आश्रमातील मुले दत्तक घेणार का म्हणून छेडले, तर विक्रमना विचारून सांगते म्हणाली.. मग तिचे उत्तरच नाही आले.. काकाच नको म्हणाले असणार. एवढ्या मोठ्या बंगल्यात दोघेच रहातात.
ही संस्था आजोबानी काढली. दोन्ही मुलींना त्यातच घालून शिकवले. त्यातील एका आवडत्या विद्यार्थ्याशी लग्न करून आई इथेच राहिली. आता एकाच्या बारा शाळा झाल्यात. पण सगळ्या दुर्गम भागात. तरी सरकारी झाल्यामुळे तितकी पैशाची ओढग्रस्त नाही, पण आई आणि बाबा सदैव त्याच विचारात असतात ते आवडत नाही. आता मेघालयमधे तिथली एक संस्था शाळा काढणार म्हणे.. त्यांना मार्गदर्शन करायला आई आणि बाबाच बरे दिसतात. माझे पुढचे दहावीचे महत्त्वाचे वर्ष.. आणि हे निघाले.. लोकांच्या मुलांना मदत करायला..
कचकन सुरी बोटात घुसली अन् मी भानावर आले. आईला कळले तर उगाचच ‘लक्ष कुठे असते? साधी काकडी कापता येत नाही.. तुझ्या वयाची होते तेव्हा आई नव्हती म्हणून सगळा स्वैपाक करत होते..’ असे ओरडेल. पोळी भाजी किंवा आमटी भात म्हणजे सगळा स्वैपाक.. चित्रामावशीकडे बघ.. चटणी कोशिंबीर, भाज्या.. पुर्‍या सगळे ताट भरलेले असते. अन् विक्रमकाका तरी कापं वा भजी तरी कर म्हणून चित्रामावशीला उठवणार.. घरात सकाळ संध्याकाळ येऊन ताजा स्वैपाक करणारी बाई आहे.. घर झाडापुसायला नोकर आहे. अन् माळी वेगळा, ड्रायव्हर वेगळा.. त्यांच्याकडे आईपेक्षा अन् माझ्यापेक्षा जास्त कपडे असतील. बोट चोखून रक्त थांबले तसे उरलेल्या तीन बोटांनी कशीबशी काकडी कापली. तरी मधे मधे रक्त येतच होते. जरा काकडीला लागले तेव्हा सरळ तो तुकडा तोंडात घातला.


बाबा आणि आई, जेवणाच्या टेबलवर मेघालयला जायच्याच गोष्टी करत होते. शाळा तेरा जूनला सुरू.. एक महिना आधी चित्रामावशीकडे जाऊन मी तिथे काय करू? त्यापेक्षा दादासोबत मुंबईला आत्याकडे रहाते, असे मी मधेच
सांगून पाहिले.
“नको, आधीच तिथे दादा आहे, त्याला आत्याचा नवरा आपल्यासोबत दुकानात घेऊन जातो. अन् तो तिथे काम करतो. तिच्या नवर्‍याला दादावर दुकान सोपवून दुपारचे जेवायला वा खरेदीला, बॅन्केत जाता येते. तिची जेमतेम तीन खोल्यांची जागा.., खाजगी नोकरी, दोन लहान मुले. दादा अन् तू कुठे मावणार.. आणि कॉलेज सुरू झाले की तो हॉस्टेलला जाईल. आत्या झाली तरी उगाच तिच्यावर भार नको.” आईने कचकन तुकडा मोडून टाकला.
“मग मी चित्रामावशीकडे महिनाभर आधी जाऊन करू तरी काय?”
“पुण्याला हजार प्रकारचे क्लासेस असतात. तिथे कुठे तरी तुला घालायला सांगते.”
“नको, त्याची फी असते. अन् विक्रमकाकानी त्यावरून टोमणा मारला तर मला नाही खपणार..”
“मग त्यांच्या बरोबर दवाखान्यात जा. अन् त्यांना मदत कर.. तुला मेडिकलला जायचेय असे म्हणत असतेस ना? आतापासून तयारी कर.”
“किती मागे लागशील तिच्या.. एकदा ठरलेय ना? मग चित्रा अन् विक्रम बघून घेतील.. तुला पंचायती नकोत. ते कुणी दुश्मन नाही आहेत तिचे.. विक्रम अन् चित्रा तर मुलीसारखे प्रेम करतात तिच्यावर.”
असेच काही काही वाद होत नेहमीप्रमाणे जेवण पूर्ण झाले.
आमच्याकडे हे नेहमीचेच होते. एखाद्या बाबतीत चर्चा सुरू झाली की प्रत्येकजण हिरीरीने मते मांडणार, बाबा सगळे ऐकून घेणार. अन् शेवटी आपल्याला हवे तेच करणार. आता मला पुण्याला एक वर्ष रहायचे म्हणजे अंगावर काटाच आला. तिथे घरात सगळे म्हणजे चित्रामावशी अन् नोकर अगदी गप्प गप्प असतात. एकटे विक्रमकाका मोठमोठ्याने बोलत असतात. साधे जेवताना काही हवे असले तरी हळू बोलून मागायचे.. चित्रामावशी खूप लाड करते, पण कुठे जायचे म्हणजे विक्रमकाका सतरा प्रश्न विचारून शेवटी मोडताच घालणार. मग त्यांच्या रविवारच्या अर्ध्या दिवसाच्या सुटीत त्याच जागी घेऊन जाणार..
त्यांचा म्हणे प्रेमविवाह आहे. कसे केले असेल चित्रामावशीने त्यांच्यावर प्रेम?
रात्री मला पुण्याला आपल्याला एका तुरुंगाच्या, एवढास्सा झरोका असलेल्या खोलीत बंद करून ठेवलेय असे स्वप्न पडले. सकाळी चहा पिताना आईला सांगितले तर म्हणाली..
“तुला तसेच ठेवायची गरज आहे. कसेही येरवड्याच्या तुरुंगातल्या कैद्यांच्या मुलांना शिकवायला आपल्या सिंहगडच्या शाळेतील कोरपेबाई जातात. त्यांना विचारून तुझी तिथे येरवड्यालाच एका वर्षासाठी सोय करू का? मग कळेल, काही मुलांना कसे रहावे लागते.”
“नको.. तुझ्याशी बोलायची सोय नाही.. मी इथेच रहाते ना? रातंजनकर आजी ठेवून घेतील मला.. आता सगळ्या मैत्रिणी बदलणार.. शाळा वेगळी..टीचर वेगळे.. नको ना
ग आई.”
“चांगले चित्राच्या बंगल्यात रहायला मिळतेय तर नाक किती वाकडे करतेस?”
आमचा वाद सुरू झाला अन् बाबा मधे पडले.
“आज कामावर जायचे आहे की नाही? शाळेला सुटी असली तरी आपल्या मेघालयच्या प्लॅनची चर्चा आहे दहा वाजता.. लक्षात आहे ना?”
“जा एकुलत्या मुलीला रस्त्यावर टाकून सामाजिक कार्य करा..” मी किंचाळले.
आईने दुर्लक्ष करून मला आंघोळीला ढकलले. “आज अकरा वाजता तिथे ये. मग मिटींग संपल्यावर बाजारात जाऊन तुला चार कपडे घेऊ.. गेल्या गेल्या चित्रामावशीला भुर्दंड नको..” तिने जणू वाद संपवूनच टाकला.
पुण्याला चित्रामावशीच्या घरी रविवारी सकाळी आम्ही पोचलो, तेव्हा विक्रमकाका मोठ्याने हसत स्वागताला
समोर आले..
“काय सान्वी, मेघालयला जाऊन रहाण्यापेक्षा इथे पुणेकरीण होणार तर.. वेलकम..” त्यांनी हात पुढे केला अन् मी शेक हॅन्ड केला. मग जवळ घेतले. डोक्यावर थोपटले. त्यांच्या स्पर्शात मला खरेच माया जाणवली. दुपारी जेवताना मोठ्ठा केक मला कापायला लावला.. हे म्हणजे सरप्राईझ होते. चित्रामावशीलाही ठाऊक नव्हते. काकांनी कॅम्पातून खास केक मागवला होता, माझ्या स्वागतासाठी. त्यावर ‘वेलकम सान्वी’ असे लिहिलेले होते. तो कापताना ते माझ्याकडे बघत म्हणाले
“संजय, या पोरीला मला देऊन टाक.. मी अगदी फुलासारखे जपेन.. चित्रालाही आवडेल.. चालेल ना ग?”
चित्रामावशीने होय किंवा नाही अशी मधलीच मान हलवली. मी मात्र मधेच म्हणून टाकले, “मला चालेल विक्रमकाका, फक्त माझ्या बाबांना अन् आईला तुम्ही काही नावे ठेवत म्हणायचे नाही..”
आईने डोळे मोठे करत मलाच दटावले.. अन् वर
हसत म्हणाली..
“नाहीतरी तिला तुमच्यासारखे डॉक्टरच व्हायचे आहे, ते काय आम्हाला परवडेल असे वाटत नाही.. तेव्हा खुशाल तिला इथेच ठेवून घ्या.. माझी काहीच हरकत नाही..”
जेवताना एवढेच बोलणे झाले. अन् मग आईबाबा स्टेशनवर गेले. जाताना पोचवायला जायची माझी खूप इच्छा होती. चित्रामावशीची पण असावी, तिथून आपण क्लबला जाणार असे विक्रमकाकानी आधीच जाहीर केले. अन् मग आम्ही घरातूनच निरोप दिला.
जाईपर्यंत आईने मला हजार तरी सूचना दिल्या असतील. शेवटी चित्रामावशीनेच तिला ‘आता पुरे’ म्हणून दटावले. आम्ही माझ्या नव्या खोलीत बॅग खाली करून कपाटात कपडे लावत होतो.
“चित्रे, तिला श्रीमंती सवयी लावू नकोस हं. पुढच्या वर्षी आम्हाला जड जाईल, नाहीतर विक्रम म्हणतोय तसे खरेच इथे ठेवून घ्यायची पाळी येईल.”
“नको ग, तिथे देऊळवाडीला बरी मजेत आहे, तुझ्या अन् संजयच्या तालमीत तयार होते आहे. आता सुध्दा तुझी गरज म्हणून मी होकार दिलाय, मित्रा.. सान्वी मला माझी मुलगी झालेली किती आवडेल हे तुला मी सांगायलाच हवे का?”
दोघींनी एकमेकींना गच्च मिठी मारली. मला स्पष्ट दिसले. दोघींच्याही डोळ्यात पाणी होते. मी ते बघते आहे हे आईच्या लक्षात आले. तसे तिने मलाही जवळ ओढले. माझ्या तोंडून नकळत शब्द सुटले,
“आई, तू अगदी काळजी करू नको, मी चित्रामावशीला अजिबात त्रास देणार नाही.. विक्रमकाकांना उलटून बोलणार नाही..अगदी शहाण्यासारखी राहीन. आठवड्यातून एकदा फोन मात्र कर.”
तेवढ्यात खोलीत बाबा आले. मग दोघी काहीच झाले नाही असे भासवत वेगळ्या झाल्या.
रात्री जेवणाच्या टेबलावर विक्रमकाकानी माझ्या अभ्यासाची चौकशी केली. “सिंहगडच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जाणार तर.. इथे मात्र आजूबाजूला. अगदी घरातल्या नोकरांनाही ती सेंट कोलंबाला जाते म्हणून सांगायचे कळले?..” चित्रामावशीला दम भरलेल्या आवाजात त्यांनी सुनावले. अन् तिने खाली घातलेली मान हलवली.
“पण, असे खोटे कशाला सांगायचे? कुणी माझ्याशी इंग्लिश बोलू लागले तर मला फाड फाड बोलायला कुठे येते? मग सगळ्यांना कळेलच की.. त्यापेक्षा..”
“सान्वी, हे पुणे आहे, आणि मोठी माणसे ठरवतात ते मुलांच्या भल्यासाठीच असते. अजून शाळा सुरू व्हायला एक महिना आहे, तोवर तुला एका इंग्लिश टीचर घरी शिकवायला येईल अन् फाडफाड बोलायला शिकवेल. थोडे दिवस माझ्याशी अन् तुझ्या मावशीशी इंग्लिशमधे बोललीस तर येईल तुला.. आणि तिला चारचौघात मावशी ऐवजी ऑन्टी अन् मला अंकल म्हणत जा.. घरी कुणी माझे मित्र, पाहुणे आले तर ते काका, मावशी बरे दिसत नाही. उद्या मी दवाखान्यात गेलो की ड्रायव्हरला आणि एका अनिता नावाच्या ऑन्टीला घरी पाठवतो. मग तू अन् चित्रा आँटी बाजारात जाऊन त्या ऑन्टीच्या पसंतीने कपडे, अन् तुला लागणारे इतर सामान खरेदी करा. चितु, पैशाला मागेपुढे पाहू नकोस. हे माझे क्रेडिट कार्ड घे.. बाकी ती बघून घेईल. तिची मुलगी सान्वीपेक्षा एक वर्षाने मोठी आहे. तिला समजेल काय खरेदी करायचे ते. रोज संध्याकाळी टीचर पण तिनेच ठरवलाय..”
“काका, कपडे नकोत, आईने शाळेच्या युनिफॉर्मसह सारे कपडे नवे घेतलेत.. राहू दे.” मी माझ्या बोलण्याला अनुमोदन मिळावे म्हणून चित्रामावशीकडे पाह्यले. तिची
मान खालीच होती. अन् मी पायाने ढुपसले तरी तिने ती वर केली नाही.
“सान्वी बेटा, इथे रहायचे तर माझ्या पोझिशनला शोभेल असे राहावे लागेल. अन् ते मलाच समजेल नाही का? आणि पुण्यात डायनिंग टेबलवर जेवताना मधे मधे मुलांनी अजिबात बोलायचे नाही.. समजलं..”
मी मान हलवली. नवे महागडे स्टायलिश कपडे मिळावेत ही माझी कितीतरी दिवसाची इच्छा आता पूर्ण होणार होती. पण मला मग आनंद का होत नव्हता, याचे कारण कळले नाही.
“चितु, तिला न विसरता सकाळी अन रात्री पेलाभर गरम दूध, बोर्नव्हिटा, नाहीतर हॉर्लिक्स असे काहीतरी घालून दे. रोज सकाळी अन् संध्याकाळी एकतरी पदार्थ तिच्या आवडीचा करायला बाईना सांग.. सान्वी, इथे राहायचे तर वजन वाढायला हवे. किती बारीक आहेस, मुलींनी कसे नाजुक पण छान गुबगुबीत बाहुलीसारखे असायला हवे, अगदी तुझ्या चित्रा ऑन्टीसारखे.. नाहीतर तुझी आई सुमित्रा, कसं काय संजय चालवून घेतो कुणास ठाऊक..” त्यांनी पुढचे शब्द प्रयासाने गिळले असावेत. मग हसत माझ्या डोक्यावर चापट मारली.
रात्री चित्रामावशी खोलीत झोपायच्या आधी दूध घेऊन आली. “आज साधे आहे, उद्या तुझ्या आवडीचे चॉकलेट वा बदाम मिक्स काहीतरी आत घालायला आणेन. एकटी झोपशील ना. का भिती वाटेल..?”
“झोपेन ना? दादा मुंबईला गेल्यापासून बाहेरच्या खोलीत मी एकटीच झोपते.. अर्थात हाक मारली तर आई लगेच उठून येते. देऊळवाडीला तीनच लहान खोल्या आहेत ना.. त्यामुळे तशी भिती वाटत नाही. ही नवी जागा आहे म्हणून भिती वाटली तर तुझ्याकडे वरती येईन..”
“आज नको, तुझ्या काकांना आवडत नाही. उद्या तुझ्यासाठी एक मोबाईल फोन घेईन, मग भीती वाटली तर मला मेसेज कर.. मीच खाली येईन.. चालेल ना?”
“वाः नवा मोबाईल फोन.. मस्तच की.. मला केव्हापासून हवा आहे पण आई बाबा म्हणतात मी बारावी झाल्याशिवाय मिळणार नाही.. बरं झालं मी इथे पुण्याला आले ते..”
माझ्या डोक्यावरून हात फिरवत मावशी म्हणाली.. “आपण दोघीच असताना मला मावशीच म्हण, पण नोकर वा ह्यांच्यासमोर मात्र ऑन्टी म्हणशील ना?”
मी मान हलवली. तिने चादर पांघरून माझी वाकून पापी घेतली. तोवर काका आले अन् दारातूनच सगळे नीट पहात म्हणाले.. “हिच्यासाठी एक स्टडी टेबल घ्यायला हवे.. उद्या आठवण कर.. गुड नाईट बेटा..”
जाताना त्यांनी दारापाशीच चित्रामावशीच्या कमरेभोवती हात लपेटला अन् तिला जवळ ओढले. तिने दार ओढून घेताना उगाचच अंग झटकल्याचा मला भासच झाला असणार..!
रात्री मधेच केव्हातरी जाग आली अन् क्षणभर मला कळेच ना मी कुठे आहे. तोंडातुन शब्द आले, ‘आई.. आई.. बाबा..’ मग दिव्याचा निळसर उजेड डोळ्यात घुसला. इतका मऊ रुंद बिछाना, कापसाची मऊ मऊ दुलई.. आपण चित्रामावशीकडे आहोत..
उठून मी खोलीतच असलेल्या बाथरूममधे जाऊन आले. तिथल्या मोठ्या आरशात माझे प्रतिबिंब दिसले अन् मीच दचकले. शेल्फवर नक्षीच्या काचेच्या साताठ बाटल्या होत्या. शांपू, कंडिशनर, क्रीम, लोशन…. वॉव उद्या मावशीला कशासाठी काय, ते विचारून घ्यायला हवे. बिछान्यावर पडले तरी बराच वेळ झोप येईना..कालच्या दिवसात घडलेले एक एक डोळ्यासमोर येत गेले. एका दिवसात अन् रात्रीत इतके एकटे वाटतेय.. कसे काढणार आपण एक वर्ष.. आईबाबांचा रागच आला.. ह्यांचे सोशल वर्क अन् मला असे मावशीकडे टाकून देणे.. डोळ्यात पाणीच येऊ लागले..
एक एक दिवस उलटू लागला. काहीच करायचे नसे. सगळ्या कामाला नोकर होते. चित्रामावशी थोडा वेळ कॅरम खेळायची, पण विक्रमकाकांचा केव्हाही फोन येई. तेव्हा हातातले असेल ते टाकून फोनवर ‘हो, हो, नाही, नको’ असे एक एक शब्दात उत्तर देई. तिने मला लायब्ररीत नाव घालून पुस्तके आणून वाचायला सांगितले. पण किती वाचणार.. बागेत खेळायला, त्यापेक्षा बोलायला सोबत कुणी नसेल तर .. काय उपयोग.. संध्याकाळी एक बाई यायची. ती इंग्लिश शिकवायची. ते मात्र आता जरा जरा बोलायला येत होते. शेजारच्या बंगल्यातल्या एका मुलाने एकदा कोण तू म्हणून विचारले. तो सातवीत होता. त्याला मी सेंट कोलंबाला
जाते असे खोटे सांगितले तर म्हणाला.. “पलिकडच्या बंगल्यातली मुलगी त्याच शाळेला जाते. चल तुझी ओळख करून देतो..”
कसेबसे त्याला वाटेला लावले अन् घरात पळत आले. आपल्याला आईने खोटे बोलायला शिकवले नाही. इथे आपले निभणार नाही. फक्त छान खायला असले, बाथरूममधे ढीगभर चमचमत्या बाटल्या असल्या अन् मोबाईल मिळाला तरी आपल्याला आनंद होतच नाही हे मला कळून चुकले. मोबाईलवर बोलायला एकही मैत्रीण नाही, चित्रामावशी शिवाय कोणच नाही. एकटी त्यावर गेम्स तरी किती खेळणार..
एकदा दुपारी जाम कंटाळा आला म्हणून माडीवर गेले. चित्रामावशी तिच्या खोलीत मला सांगूनच झोपायला गेली होती. इथे येऊन पंधरा दिवस झाले पण अजून मी माडीवर गेले नव्हते. दोन रविवार तेवढे काका बाहेर घेऊन गेले. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर अन् रात्री जेवताना तेवढे ’काय पुणे आवडतेय ना? सुमित्रा, संजयचा फोन आला होता का?’ मोजून दोन प्रश्न. त्यात चित्रामावशी अन् काका एकमेकांशी काहीच कसे बोलत नाहीत? हा मला प्रश्नच पडत होता. आमच्याकडे जेवण म्हणजे युध्दभूमी असे. बाबा
आणि आई सारखे वाद घालत. आपणही वाट्टेल ते बोलत होतो. दादा असला तर हात सुके होईपर्यंत काय काय सांगत बसे. इथे कुणाशी आणि काय बोलणार? कधी तरी चित्रामावशी खालच्या आवाजात आईच्या लहानपणच्या गोष्टी सांगते.. बस्स.
मला तर कंटाळा आला होता. वर तिच्या खोलीत गेले तर दार नुसते ओढलेले होते. मी ढकलून आत गेले. चित्रामावशी तिच्या मोठ्ठ्या पलंगावर कुशीवर एवढुश्या जागेत मुटकुळी करून झोपली होती. एका बाजूला भिंतभर आरसा होता अन् त्यात चित्रामावशीचे प्रतिबिंब दिसत होते. मग एकदम एक आक्रीत दिसले. ती झोपली होती त्या पलंगाच्या फ्रेमवर एक आरसा वरती होता. म्हणजे झोपलेल्याला आपले प्रतिबिंब झोपलेल्या अवस्थेतही दिसेल. असा आरसा मी कधीच कोणाच्या घरी पाह्यला नव्हता. मला हसूच आले. मावशीची झोपमोड होऊ नये म्हणून मी तोंडावर हात दाबला. बाजूच्या टेबलवर अनेक सुंदर सुंदर फ्रेममधे मावशीचे फोटो ठेवलेले होते. मी जाऊन बघू लागले. एक तिचा अगदी लग्न झाल्या झाल्या काढलेला फोटो होता. अन् त्याच्या बाजूला एकटीचा एक पूर्ण उभा फोटो.. त्यात तिच्या डोक्यावर छान टोपी होती, अगदी घट्ट बसलेला अर्ध्या मांडीपर्यंतचा स्कर्ट.. अन् पूर्ण काळे पातळ पायमोजे घातलेले. आणि मग कुठे कुठे पोजमधे काकांसोबत.. एकात तर काकानी तिला उचलून पाठीवर कुकमरी घेतलेले होते. मला हसूच आले. दचकून मावशी उठली. “कित्ती छान फोटो आहेत, मावशी, कध्धी दाखवले नाहीस. हा युनिफॉर्म म्हणजे……”
तिने चटकन उठून मला बाहेर नेत म्हटले.. “तू वर येताना, खोलीत येताना दामूने, बाईने तुला पाह्यले नाही ना?”
“नाही, दामू तर बागेत काम करतोय, अन् बाई बाहेर गेल्यात, मला कंटाळा आला म्हणून आले.. अग पण तू एवढी घाबरली का आहेस? वाईट स्वप्न वगैरे पडलेय का?”
आम्ही दोघी खाली आलो. टेबलापाशी बसलो. मावशीचा ऊर अजूनही धपापत होता. माझ्यासमोर धपकन खुर्चीत बसत ती म्हणाली..
“तुझ्या काकांना कुणी खोलीत आलेले चालत नाही.. परत कधी येऊ नको हं.. इथे पुण्यात असे कुणाच्याही खोलीत, त्यात बेडरूममधे जायचे नसते.” तिच्या आवाजात उगाचच अजिजी करत असल्याचा भाव होता.
“नाही येणार.. मला खरेच कल्पना नव्हती.. पण मावशी, तुझ्या खोलीत काय मस्त मस्त आरसे आहेत. तो पलंगाच्या वरचा उलटा, तसा तर मी कध्दी कुठे पाह्यला नव्हता. तुझा तो फोटो? तो पूर्ण काळे पायमोजे घातलेला.. किती सुंदर दिसतेस त्या फोटोत, तो कुठला आहे?”
आता तिचा आवाज खुलला, डोळ्यात चमक आली.
“अगं मी बारावीला होते तेव्हा माझ्या बाबांनी मला मेडिकलला घालायचे म्हणून कोल्हापुरला एका कार्यकर्त्याच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून ठेवले होते. कारण देऊळवाडीला तेव्हा फक्त अकरावी बारावी आर्टस् अन् कॉमर्स होते. तिथे कॉलेजमधे एकदा मैत्रिणींच्या नादाने मी एअर होस्टेस भरतीसाठी अर्ज केला. अन् पहिल्याच फेरीला सिलेक्ट झाले. त्यात बारावीला कमी मार्क पडले अन मेरीटवर मेडिकलला प्रवेश मिळाला नाही. मग मी बाबांच्या मनाविरुध्द जाऊन मुंबईला एअर होस्टेसच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथे स्टायपेंड होता. ट्रेनिंगनंतर चार वर्षे मी आकाशात उडत होते. पहिली भारतात अन् मग दुबई, लंडन, पॅरीस, सिंगापूर.. फार छान दिवस होते ते..”
“मग, तुला विक्रमकाका कुठे भेटले?”
“मैत्रिणीबरोबर मी लोणावळ्याला दोन दिवसाच्या पिकनिकला आले, तिथे एक लहानसा अपघात झाला अन् माझा पाय मोडला. आमच्याच हॉटेलात विक्रम आले होते, त्यांनी गाडीतून मला इथे आपल्या हॉस्पिटलमधे आणले. त्यावेळी मोबाईल नव्हते, मग मी त्यांच्या मॅटर्निटी होममधे चार दिवस राहिले. देऊळवाडीहून तुझे आजोबा अन् मित्रा येईपर्यंत त्यांनीच माझी काळजी घेतली.”
“ते तुझ्याहून बरेच मोठे आहेत ना..”
“हो, बारा वर्षानी मोठे आहेत, मी फक्त तेवीस वर्षाची होते अन् ते पस्तीस.. पहिली डॉक्टर बायको सोडून गेली होती.. मी प्रेमातच पडले. त्यांच्या इतके जग हिंडले, पण माणसे नाही समजली.. साधी ओळखता आली नाहीत. मग एक महिना पायाला प्लास्टर घालून घरी देऊळवाडीला होते तर रोज त्यांचा फोन येत असे, दोनदा भेटायला आले तेव्हा ह्या इतक्या भेटी आणल्या.. मग काय नोकरीचा राजिनामा दिला अन् लग्न केले. बाबाना वयातील अंतर जास्त वाटत होते तर मीच ते मी बघून घेईन असे त्यांना ऐकवले. मग हळुहळू या बंगल्याची अन् त्यांची कधी कैदी झाले समजलेच नाही, आता तर पंख हरवलेल्या जखमी पक्ष्यासारखी अवस्था झालेली आहे..”
“विक्रमकाकाच्या हॉस्पिटलात इतकी बाळे जन्माला येतात, त्यातले एखादे घरी का आणत नाही..? काही वेळा बायका मुले सोडून जातात, किंवा आईच्या आश्रमातील एखादे गरीब विद्यार्थी..”
“नाही, कधीच तसे वाटले नाही, फक्त तू जन्मलीस तेव्हा वाटले, मित्राला सांगावे, हिला मला दे, हवे तर तुला आणखी एक होऊ दे, हिला दिलेस तर फार उपकार होतील. तिने नसता, तरी संजयने खात्रीने माझ्या विनंतीला मान दिला असता. पण तोवर माझ्या लक्षात येत गेले, हे घर मूल वाढवायच्या लायकीचे नाही आहे. दुसरा विक्रम मला माझ्या आसपास नको आहे, नव्हे या जगातच यायला नको आहे. म्हणूनच माझी कूस उजवली नसेल.”
तिने बोलता बोलता मला जवळ घेतले. ती खुर्चीवर बसली होती अन् मी बाजूला उभी.. तिची मान माझ्या छातीवर.. अन् डोके मानेपाशी.. तिच्या केसांना इतका मस्त वास होता.. पण तिचा हुंदका ऐकला, अन् मला काय झाले कळलेच नाही. मी हळूच तिच्या केसावर हात फिरवून म्हटले, “मावशी रडू नको, मी मोठी झाले की तुला इथून माझ्याकडे कायमची घेऊन जाईन. आईने दिले नसले तरी मी स्वत:हून तुझी मुलगी होईन, फक्त मला डॉक्टर होऊ दे..”


मला हे शब्द कसे सुचले कळले नाही. पण त्या क्षणी मला वाटले की माझ्या छातीत कुणीतरी बसून रडतेय अन् मला ते ऐकू येतेय. हृदयात कसेतरी होते आहे. मी मावशीची आई झालेली आहे. अन् ती माझी चौदा पंधरा वर्षाची सान्वी आहे.
तेवढ्यात मागच्या दाराने किल्ली फिरवून बाई आत आल्या. अन् आम्हा दोघींकडे पहात म्हणाल्या,
“वा, वा, छान टीव्हीवरची मालिका चाललीय वाटते! दादांना बघायला बोलवायला हवे, मावशी-भाचीना चहा हवा आहे का?”
मावशी चटकन भानावर येत म्हणाली.. “हो, थोडं आलं ठेचून घाला, अन् सान्वीला दुधात चॉकलेट पावडर घाला. रात्रीच्या जेवणात तिच्या आवडीचे मासे तळा.. दादा विचारतील तर सांगायला हवे..”
एका क्षणात ती परत चेहर्‍यावर कोरडे भाव असलेली चित्रामावशी झाली होती. त्यात बाई खरेच विक्रमकाकांना आम्ही दोघी मिठी मारुन रडत होतो हे सांगेल याची भीतीही तरळते आहे, असा मला भास झाला. त्यानंतर मी कधीही कसलाही हट्ट मावशीकडे करायचा नाही हे ठरवून टाकले. नव्या नव्या वस्तू आणून, मस्त मस्त चॉकलेटे आणून विक्रमकाका माझे खरेच लाड करत होते. पण मलाच आता ते पाहिजे असे वाटत नव्हते. त्यानंतर रोज मंगळवारी आईचा फोन आला की मी तक्रारी करत होते. त्याही बंद केल्या. मावशीला किती त्रास आहे हे मला थोडे थोडे कळले होते, अन् त्याने मला एकदम मोठे केले होते.
एकदाची शाळा सुरू झाली. अन् माझे रुटीन बसले. जायला यायला विक्रमकाका गाडी पाठवत, मी शाळेच्या गेटातून आत गेल्याची खात्री करूनच ड्रायव्हरकाका आत जात. अन् शाळा सुटायच्या वेळेला गेटापाशी उभे असत. त्यांच्याशी अजिबात बोलायचे नाही असे काकांनी पहिल्याच दिवशी मला करड्या पण शांत, एकही सूर वर न चढवता सांगितलेले होते. कधी कधी मला शाळेतून परतताना काकांच्या हॉस्पिटलमधे जावे लागे. काकांना कुठे जायचे असले तर आम्ही दोघे एकत्र घरी येत असू. अन् मग काका चित्रामावशीला घेऊन पार्टीला वा कुठे तरी जात. तिथे हॉस्पिटलात थांबले की मला काही बाही दिसत राही. खोल्याखोल्यातून फिरत जन्मलेली लालचुटुक बाळे बघायला मला फार आवडे. अनिता ऑन्टी, आणि मेट्रनबाई, नर्सेस माझे लाड करत. एकदोनदा मी काकांना अनिता ऑन्टीच्या कमरेत हात घालताना पाहिले. एकदा तर मी चुकून धावत काकांच्या चेंबरमधे गेले. कारण मला आंतरशालेय वक्तृत्व
स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची ढाल मिळाली होती. ती मला विक्रमकाकांना दाखवायची होती. तर ते तिच्याशी बोलताना तिच्या छातीवर अन् नितंबावर दाबत होते.. अन् ती ही गुदगुल्या झाल्यासारखी हसत होती. ती जवळ जवळ काकांच्या मांडीवर बसलेली होती. मला बघताच ती उठू लागली तर त्यांनी तसेच पकडून धरत म्हटले,
“अग सान्वी आता लहान नाही आहे, तिला सगळे कळते.. हो ना बेटा. असे दार न वाजवता कुणाच्याही खोलीत जायचे नसते.. बोल..” मग ती सावकाश उठली अन् बाहेर गेली. मी हातातली ढाल तशीच ठेवली होती.. ती पहात ते म्हणाले, “वा छान, कशात बक्षीस मिळाली तुला, त्या गावंढळ शाळेत कसल्या कसल्या स्पर्धा होतात?”
“ही आंतरशालेय स्पर्धेत मिळाली.. पुण्यातल्या तीस बत्तीस शाळा होत्या..”
“वाः सगळ्या मराठी माध्यमातल्या का?”
“नाही बारा इंग्लिश माध्यमाच्या होत्या. पण स्पर्धा मराठीतून होती.”
“गुड, आता तुला छानशी गिफ्ट द्यायला हवी..”
त्यांनी बेल वाजवून अनिता ऑन्टीला परत आत बोलावले.
“जरा सोबत चल, हिच्यासाठी मस्त गिफ्ट घेऊ. अन् मग आईस्क्रीम खाऊ, रात्री क्लबमधे पार्टी आहे त्याला जाऊ. चित्राचे डोके दुखतेय म्हणून मगाशी फोन होता..”
“मला आईस्क्रीम नको, आधी घरी जाऊन चित्रामा..ऑन्टीला ढाल दाखवायची आहे..”
मग मी, काका अन् अनिता ऑन्टी कॅम्पातल्या दुकानात गेलो. मला पुस्तके नि छान ड्रेस घेतला, आईस्क्रीमचे पॅक घेतले. अन् आम्ही घरी आलो. गाडीतून उतरताना काका हसत पण करड्या आवाजात म्हणाले,
“चित्राला काय सांगायचे अन् काय नाही हे समजण्याइतकी सान्वीबेटी मोठी झालीय, होय ना?”
मला त्यांच्या नजरेला नजर देववली नाही, मी फक्त मुंडी हलवली.
मला दारातच सोडून ते दोघे गाडीतूनच टाटा करून गेले.
इथे येऊन मला फक्त तीन महिने झाले होते. अन् अनेक नव्या गोष्टी कळत होत्या. देऊळवाडीला राहून त्या मला कधीच समजल्या नसत्या. दुसरे दिवशी नाश्त्याच्या टेबलवर काकांनी विचारले,
“सान्वी कालचे आईस्क्रीम आवडले की नाही?”
मी फक्त होकारार्थी मुंडी हलवली. मावशीने चमकून माझ्याकडे पाहिले पण ती काहीच बोलली नाही. मी पहिल्यांदाच विक्रमकाकांशी खोटे बोलले होते. मी काल घसा दुखतो आहे असे खोटे सांगून आईस्क्रीम खाल्ले नव्हते. प्रत्येक नवा दिवस काहीतरी मला नवे शिकवून जात होता. आईशी फोनवर बोलताना त्यातले काय सांगायचे अन् काय नाही हे ही उमगू लागले होते. यालाच मोठे होणे म्हणतात का? असेच दिवस जात राहिले. अन् मी वर्ष कधी संपते ते मोजत राहिले.
त्या शनिवारी दुपारी मी शाळेतून आल्यावर ते पत्र आले. तेव्हा मी दारापाशी टांगलेल्या वेताच्या खुर्चीत बसून झुलत पुस्तक वाचत होते. एरव्ही दामू पत्रे उचलतो अन् सरळ विक्रमकाकांच्या खोलीत ठेवतो. त्यात जर आईचे वा बाबांचे किंवा कुणाचेही मला वा चित्रामावशीला पत्र असले तर दुपारी वा रात्री जेवताना ते फोडलेल्या अवस्थेत आमच्या हातात येते. याचीही मला सवय झालेली होती. पोस्टमनने पत्रे माझ्या हातात दिली. दामूकाका बहुतेक बाजारात गेला असावा. मी ती सरळ मावशीच्या हातात जाऊन दिली. त्यातले एक मोठे निळसर पाकीट तिचे चटकन बाजूला काढून आपल्या ब्लाऊजमधे घातलेले मी पाहून न पाहिल्यासारखे केले. बाकी सारी पत्रे तिने बाईच्या हातात देऊन साहेबांच्या ऑफिसच्या खोलीत टेबलावर ठेवायला सांगितली. मग खोलीत जाऊन थोड्या वेळाने ती हळूच माझ्यापाशी येत म्हणाली.. “आज रात्री जेवताना तुझ्या शाळेत पालकांना बोलावले आहे असा निरोप रात्री जेवताना काकांसमोर मला देशील? एका महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जायचे आहे.”
“हो, देईन ना.. पण काकाना न सांगता का? तुला ते बाहेर जायला देतातच की..”
“पण त्यांना मी कुठे जातेय ते मला सांगायचे नाही आहे.”
“तू काकाना एवढी घाबरतेस का? ते तर..”
“हो ग, माझ्यावर त्यांचे खूप प्रेम आहे, पण त्यात मालकीचा भाग फार मोठा आहे. आणि संशय तर इतका घेतात की.. असे करकचून बांधून ठेवणारे प्रेम किती असह्य असते तुला नाही समजणार.. त्यात मूल त्यांच्यातील कमतरतेमुळे झालेले नाही हे त्यांना कळल्यापासून तर ते चवताळलेच आहेत, त्यांची पहिली बायको त्याना त्यापायीच सोडून गेली. तिचे लगेचच दुसरे लग्न झाले अन् दोन मुलेही झाली. मस्त सुखात आहे ती..”
“मग तू ही तसे का करत नाहीस.. आई तुला खात्रीने मदत करेल..”
“नाही, आता माझे जणू त्यानी पंखच कापलेत. शिक्षण म्हणशील तर फक्त बारावी. परत कुणाला सांगणार.. आता तू पहातेसच. तुला या चार सहा महिन्यात जे जे कळलेय त्यातले दहा टक्केही तुझ्या आईला माहीत नाही. ते जाऊ दे.. सान्वी, कधी कधी तू फक्त चौदा संपून पंधरावे लागलेली अबोध मुलगी आहेस. हे मी विसरुनच जाते. तू एकमेव मैत्रीण राहिली आहेस माझी..
पण मला मात्र खरे ते सांगशील ना?”
“हो अग-”
तिने वाकून पहात बाई, दामू आपापल्या कामात व्यस्त आहेत हे पाहून खात्री करून घेतली. विक्रमच्या सख्ख्या बहिणीचे पत्र आलेय. त्यात तिने लिहिलेय की “दादा, हे शेवटचे पत्र, तू माझे फोन उचलत नाहीस, पत्रांना उत्तरे देत नाहीस.. मान्य आहे की मी तुझ्या मनाविरुध्द लग्न केले. पण आज मला तुझी गरज आहे सान्वी. तिचा एकुलता मुलगा आजारी आहे, त्याला पुण्याला आणून काही ऑपरेशन्स केली तर तो वाचेल. मेंदूत गाठ आहे अन् ती बिनाईन आहे. खर्च तिला परवडणार नाही.. अन् ऑपरेशन नीट झाले नाही तर त्याची वाचा, डोळे, कान असे काहीतरी कायमचे जाऊ शकते. ती धुळ्याजवळ एका खेड्यात रहाते. नवरा अन् ती जेमतेम कमावतात. ती सर्व पुण्याला आली आहेत. तिने म्हणे आधी तीन पत्रे पाठवली. पण ह्यांनी उत्तरच दिले नाही.. न फोडता, न वाचता फेकून दिली असणार, मी जाऊन तिला भेटू्न धीर देणार. अन् पैसेही देणार.. पण ह्यांना चोरून.. एकदा ती इथे आली होती तेव्हा ह्यांनी तिला व्हरांड्यातून आत येऊ दिले नाही. मी आतून बघत होते, मलाही बाहेर येऊ दिले नाही. तेव्हाही बिचारी नवर्‍याच्या ट्रीटमेंटसाठी आली होती. तिचा नवरा खालच्या जातीचा आहे, फालतू नोकरीत आहे, हे ह्यांच्या रागाचे कारण.. सान्वी, मला मदत करशील ना? हे मित्राच्या आश्रमशाळेच्या मुलांना इतकी मदत करतात. पण सख्ख्या भाच्याला असे वागवतात. किती मुजोरी बघ.. सारे काही आपल्या इच्छेप्रमाणे हवे, पण आता मात्र मी ऐकणार नाही..”
मावशीचा चेहरा लालसर झाला होता.. डोळ्यात पाणी जमून आले होते.. अन् त्यात एक ठिणगी पेटलीय असे मला वाटत होते. कुणी सांगावे.. त्याचा वणवा झाला तर मावशी तावून सुलाखून बाहेर पडेल. अन् सोन्यासारखी चमकू लागेल..
मी तिचा हात पकडला.. “मी तुझ्या सोबत येईन. सोमवारी आपण दुपारच्या सुटीत बाईना सांगून बाहेर पडूया..”
त्या संध्याकाळी आम्ही जवळच्या मारुतीला जायला निघालो. तिथे देवळाच्या पारावरून मावशीने माझ्या मोबाइलवरून फोन केला. काका मधे मधे तिचा मोबाईल तपासतात म्हणे..तिने सर्व काही पलिकडच्या जान्हवी नावाच्या बाईला सांगितले. एका चिठ्ठीवर नाव लिहून घेतले अन् आम्ही घरी निघालो. तिने ती चिठ्ठी माझ्याच पुस्तकात लपवायला माझ्याकडे दिली.
“जान्हवी कोण? तू कुणाशी बोललीस..?” मी न रहावून विचारले.


“जान्हवी म्हणजे विक्रमची पहिली बायको.. तिला विशाखा म्हणजे विक्रमच्या बहिणीच्या मुलाबद्दल सारे काही सांगितले. माझ्याकडे आईचा हार आणि बांगड्या आहेत. दहा तोळे तरी सोने असेल. ह्यांना ठाऊक नाही. जान्हवीने स्वत: थोडे पैसे देते म्हटलेय, अन् लागेल ती मेडिकल मदत, औषधे वगैरे.. पण ती असते भोरला.. आणि गरज तीन चार लाखांची तरी असेल. तिने एका सोनाराचे नाव सांगितलेय.. त्याला ती फोन करून सांगेल. आपण सोमवारी दुपारी जाऊन माझ्या आईचे दागिने देऊ. अन् पैसे घेऊन विशाखाला जाऊन देऊन येऊ. मला ह्यांनी दागिन्याने मढवलेय, पण ते सारे कपाटात, अन् चावी त्यांच्या ब्रीफकेसमधे असते. ते देतात तेव्हा घालते अन आल्यावर काढून परत त्यांच्याकडेच देते. तसे तीन चार हजार रुपये हातखर्चासाठी असतात माझ्याकडे, पण त्याने काय होणार? सान्वी, तू सोबत आहेस म्हणून मी हे धाडस करतेय.. विक्रमने माझा कसा भुस्सा केलाय बघ.. काडीइतके अधिकार नाहीत, अन् कवडीइतकी किंमत नाही. त्याची प्रेमाची व्याख्याच ही आहे. आता दामू अन् बाईंपासूनही सारे लपवायला हवे, ते केव्हाही त्यांना फोन करून सारे सांगतात. सगळ्यांना पैशाने विकत घेतलेय त्याने.. तुझ्या येण्याने, सोबत रहाण्याने, मला बळ आलेय.. थॅन्क्यू सान्वी..” तिने घरी परतेपर्यंत माझा हात गच्च धरुन ठेवला होता.
सोमवार उजाडला. अन् सकाळपासून मावशीचा चेहरा ताण असल्यासारखा उग्र दिसू लागला. काकानी तिला विचारले सुध्द्दा.. “डोके बिके दुखतेय का? कुठेतरी वापरलेले दिसतेय.. मग दुखणारच.” डोळे मिचकावत त्यांनी मोठ्याने हसत हात पुढे केला, अन् मी तसेच हसत त्यावर टाळी दिली. “बघ, सान्वीलाही समजते.. सुंदर बायकानी फक्त.. जे आहे तेच वापरावे..” काकांनी डोळा मारत मावशीकडे बघितले. तिने मान उचललीच नाही.“दुपारी सान्वीच्या शाळेत जायला मला जमणार नाही, आज सोमवार आहे. अनितासोबत अनाथ बायकांच्या आश्रमात रुटीन व्हिजिट आहे.. मी ड्रायव्हरला पाठवतो.. तो तुला तिथे सोडून येईल.. मग मला चारला गाडी लागेल, त्या आधी शाळेतील मिटिंग संपली तर त्याला थांबवून घे. नाहीतर परत पाठव, आणि तुम्ही दोघी रिक्षानी या..”
मावशीने मान हलवली.
शाळेत गेल्यागेल्या आम्ही ऑफिसात गेलो आणि लगेचच परवानगी घेऊन बाहेर पडलो. त्यापूर्वी मिटींग संपायला वेळ होईल म्हणून ड्रायव्हरला परत पाठवले. मग रिक्षाने त्या सोनाराकडे गेलो, नीट वजन करून त्याने जान्हवीताईंचा फोन आला होता, असे सांगून बाजारभावाने पैसे दिले. हवे तर गहाणपत्र करा असेही म्हटले.. पण मावशीला ते नकोच होते. त्याने आणखी पन्नास हजार वरती देत म्हटले की ‘हे जान्हवीताईनी द्यायला सांगितलेत..’ त्यांनी इतक्या रकमेचा चेक मला शनिवारी कुरियर केला, हा तासापूर्वी आला बघा.. म्हणून दाखवला. बाहेर आल्यावर आम्ही परत जान्हवीताईना फोन केला. ती विशाखाबरोबर तीन वर्षे एकत्र राहिलेली होती. तिने विशाखाचा मोबाईल, पत्ता सारे पाठवायला सांगितले.. अन् भोरला येऊन आपल्या हॉस्पिटलमधे येऊन, तिला नंतर रहायला सुचव, असेही मावशीला सांगितले..
पुन्हा रिक्षा घेऊन आम्ही विशाखाकडे गेलो. तिने मावशीला घट्ट मिठी मारली, अन् ती हमसून हमसून रडली. दोघी एकदाच, ते ही दुरून एकमेकींना फक्त पहाण्यापुरते भेटल्या होत्या. मग आत जाऊन आम्ही तिच्या साध्यासुध्या नवर्‍याला भेटलो अन् मुलालाही.. साडेतीन लाख रुपये मावशीने तिला दिले.. जान्हवीचा निरोप दिला. ती म्हणाली की खर्च तीनच लाख येणार आहे, हे पन्नास परत घे.. तर मावशीने बळे बळे हातात परत कोंबत म्हटले.. “असू दे, हे मी सर्व तुझ्या दादाला चोरून करते आहे हे ध्यानात ठेव. दर दोन दिवसांनी संधी मिळाली की मीच फोन करेन.. काही मदत लागली तर जान्हवीकडून निःसंकोचपणे घे. दादाने तोडले तरी माणुसकीचे संबंध तिने जपलेले आहेत.. मावशी परत परत तिला हेच सांगत राहिली. साधारण शाळा सुटायच्या वेळी घरी परतू, अशा अंदाजाने आम्ही परत निघालो. दुर्दैवाने रिक्षा ट्रॅफिक जाम मधे अडकली. अन् आम्ही अर्धा तास वेळाने घरी पोचलो. रिक्षाचे पैसे देतानाच पाह्यले की विक्रमकाका दारातच वेताच्या खुर्चीत बसून झुलत आहेत. मावशीने मोड घ्यायला पुढे केलेला हात तसाच मागे घेतला. ठेवून घ्या तुम्हाला, असे मीच पुढे होऊन म्हटले अन् रिक्षावाल्याला जायला सांगितले.
आम्ही पायर्‍या चढतानाच त्यानी शांत आवाजात ‘बसा’ म्हटले.. मी अन् मावशी उभ्याच राहिलो.
“कुठे गेला होता..?”
“सान्वीच्या शा..शाळेत..’
“तिथे कोणतीही मिटिंग नव्हती हे मला माहीत आहे. माझे काम लवकर संपले म्हणून मी तिथे तुम्हाला न्यायला आलो होतो. तुम्ही दोनलाच महत्त्वाचे काम आहे असे सांगून बाहेर पडलात हे मला कळलेय.. तिथून आतापर्यंत कुठे होता हे
मी विचारतोय..?”
त्यांचा आवाज थंड होता. मावशीचा आवाज घशातच रुतला.. “आम्ही, मी, हॉस्पिटल..” चाचरत तिने चार शब्द उच्चारले, अन् खुर्चीत बसकण मारत डोळे मिटले.. चेहरा लाल लाल झाला.. मी पटकन आतून पाणी आणून तिच्या जवळ गेले.. ‘मावशी.. मावशी..’ मी चार थेंब तिच्या चेहर्‍यावर उडवत तिला हाक मारली. तिने सावकाश डोळे उघडले अन् पेला घेऊन चार घोट घेतले..
“चितू मी विचारतोय कुठे गेला होता..?“ त्यांच्या आवाजातली जरब असह्य होती..
मला आई आठवली. बाबा अन् दादा डोळ्यासमोर दिसले अन् ठाम आवाजात मी बोलायला सुरुवात केली..
“विक्रम अंकल, परवा शनिवारी संध्याकाळी आम्ही मारुतीच्या देवळात गेलो. तेव्हा आम्हाला विशाखा ऑन्टी भेटली, ती इथेच तुमच्या घरी येत होती. तुम्ही तिचे फोन उचलले नाहीत, पत्रांना उत्तर दिले नाही, असे तिने मावशीला सांगीतले. मग तिच्या मुलाच्या ब्रेनच्या ऑपरेशनला तिने मावशीकडे पैसे मागितले. मावशी म्हणाली तिच्याकडे नाही आहेत.. तुम्हाला विचारून देईन.. तर ती म्हणाली.. ‘पदर पसरते.. वहिनी इतकी नड संभाळ, माझ्या मुलाच्या जगण्याचा प्रश्न आहे..’ मग मीच मावशीला म्हटले की आईने माझ्याकडे आजीचा हार अन् बांगड्या दिल्यात. तिथे देऊळवाडीला चोरीला जातील अन् मेघालयला नेणे सोयीचे होणार नाही. इथे चित्राच्या बंगल्यात सुरक्षित रहातील.. म्हणून माझ्या बॅगेच्या तळाशी पुडी ठेवली.”
“पण आईला विचारल्याशिवाय तू ते मावशीला कसे दिलेस..?”


“आई अशा कामाला कधीच नाही म्हणणार नाही याची मला खात्री आहे. दर मंगळवारी तिचा फोन येतो तेव्हा उद्या मी तिला सांगणारच होते. ती मला खात्रीने शाबासकी देईल. त्यात ते आजीचे दागिने माझ्या लग्नासाठी आजोबांनी मला ठेवलेत, ते माझ्या मेडिकलच्या शिक्षणाला वापरायचे म्हणून आईने मोडले नाहीत. आता तुम्ही माझ्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहात मग हे दागिने विशाखा ऑन्टीच्या मुलाच्या ऑपरेशनला दे म्हणून मीच मावशीला आग्रह केला. ती नकोच म्हणत होती.. तुम्हाला विचारल्याशिवाय काही नको करुया, असे मला सांगत होती.. पण मग तो मुलगा, उध्दव सारा पाच वर्षाचा आहे हे आठवले तसे ती हो म्हणाली..”
“दागिने कुठे मोडले..?”
“माझ्या शाळेतील एका मैत्रिणीचे वडील सोनार आहेत, तिला मी विचारले.”
“केव्हा विचारलेस?”
“शनिवारी रात्री मोबाईलवर फोन करून विचारले. आज रात्री जेवताना मी तुम्हाला हे सर्व सांगणारच होते.. मला उध्दवला बघून फार भीती वाटली विक्रम अंकल. त्याचे डोळे ना असे मंद अन मोठ्ठे झालेत.. डोके डुगडुग हलते, तो बरा होईल ना? त्यात मी दागिने दिले हे कळल्यावर विशाखा ऑन्टीने माझे पाय धरले.. असे कुणी लहान मुलीचे पाय धरतात का?”
मी चटकन विक्रम अंकलजवळ जाऊन त्यांच्या मांडीवर बसले, कुशीत शिरले.. घाबरल्याचे नाटक करताना मी आईची मनातल्या मनात क्षमा मागितली. मी आज बरेच खोटे बोलले होते. त्यांनी मात्र मला जवळ घेतले अन् थोपटत म्हणाले.. “अगदी संजय अन् सुमित्राची पोर आहेस, मूर्ख कुठली.. यापुढे स्वत:ची अक्कल पाजळायची नाही. आत्ता त्या मैत्रिणीला फोन कर अन् उद्या ड्रायव्हरला पाठवतो. शाळेतून येताना त्याचे पैसे दे. अन् दागिने घेऊन ये.. मी कोरा चेक देतो.”
“खरेच नको अंकल, तुम्ही माझी मेडिकलची फी द्या, मी खूप अभ्यास करेन, मेरीटवर प्रवेश मिळवेन अन तुमच्यासारखी स्त्रीरोग तज्ज्ञ होऊन तुमच्यासारखी लोकांची सेवा करेन. तुम्ही कसे बाबांच्या आश्रमातील मुलांना, बायांना फुकट तपासून वरती औषधे देता, मी ही तसेच करेन..”
त्यांनी मला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला, अगदी बाबांसारखा, अन् केसावर थोपटत म्हटले..
“यापुढे असे काही करण्यापूर्वी मला सांगत जा आणि उद्या दागिने घेऊन ये.” मी लगेचच मान डोलावली.
मावशीकडे बघत ते म्हणाले “चितु, बाईना आत जाऊन सांग, सान्वीच्या आवडीची बटाट्याची भजी तळायला घ्या म्हणावं, आणि यापुढे विशाखाचा फोन आला तर घ्यायचा नाही, माझ्याकडे द्यायचा. समजलं.”
मावशीने मान हलवत पदरात तोंड लपवून जोराचा हुंदका दिला अन् ती आत गेली.
रात्री ती गुड नाईट करायला रोजच्यासारखी दुधाचा पेला घेऊन माझ्या खोलीत आली. अन् माझ्या मांडीवर तिने डोके टेकले..
“सान्वी..”
“काही बोलू नको आता, काका ओरडले तर गप्पच बस.. मी आहे तुझ्यासोबत.”
आज मी त्यांच्यातला खराखुरा, मुलांचे अपराध पोटात घालणारा बाप काही क्षणापुरता जागवला होता. मला नव्याने माझीच ओळख झाली होती. आई म्हणाली ते खरे होते, पुण्याला इथे राहून मी बरेच काही शिकले होते. मला दारात त्यांची सावली दिसली. ते ही रोज मला गुड नाईट करायला येतात. मी आवाज वाढवला,
“मावशी, उद्या आईचा फोन आला की मी तिला सांगणार आहे, चित्रामावशी अन् विक्रमकाका मला खूप खूप आवडतात. माझे खर्रे लाड करतात. मी इथे पुण्यालाच त्यांच्या घरी राहून दहावी, अकरावी, बारावी करेन. इथे चांगले क्लासेस आहेत, काका मला त्यात घालतील. त्यानी इंग्लिशला टीचर ठेवला अन् मला शाळेत अगदी सोपे गेले. मग काकांसारखी मी मेडिकलला जाईन.. त्यांच्यासारखी डॉक्टर होईन.. लोकांची सेवा करेन, तुला चालेल ना मावशी?” तिने माझ्या मांडीवरची मान घुसळली.
दारातून काका ऐकत आहेत हे मला ठाऊक होते. मोठ्यांची दुनिया वेगळी असते अन् तिच्यात वेगळ्या पध्दतीने वावरावे लागते हे ही मला कळले होते. मी मावशीच्या डोक्यावरून हात फिरवत होते. मी खरेच आता एकाऐवजी चार वर्षे पुण्याला राहून मावशीच्या आईची आणि विक्रमकाकाच्या मुलीची, अशा दोन अगदी विरुध्द भूमिका मला जमेल तशा निभावायच्या असे मनाशी ठरवले होते. कोण जाणे, त्यातून कदाचित तिच्या पंखात उडण्याइतके बळ येईल.विक्रमकाकामधील बाप आणखी मोठा होईल.. कदाचित कायमचा वस्तीला येईल, भविष्याच्या पोटात काय आहे मला काहीच माहीत नाही. पण मी आता पुढे काय करायचे ते मला अंधुक दिसत होते.. आईला आणि बाबांना मी हे असे वागलेले आवडेल असे वाटत होते, आणि ते मी सर्व शक्तीनिशी करायचे ठरवले होते.
मला लख्ख समजले होते, मी मोठी झाले होते!

Share this article