Close

कवडीचे मोल!! (kavdiche Mole)

एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हार्‍यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मीळ झाली आहे. सध्या या कवडीचे मोल कवडीमोलाचे झाले असल्याचे आपणास अनुभवण्यास येते. परंतु याच कवडीचे महात्म्य जाणून घेतल्यानंतर तुम्हाला तिचे मोल खर्‍या अर्थाने उमजेल.

कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे. एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हार्‍यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मीळ झाली आहे. परंतु या कवडीचे महात्म्य जाणून घेण्यासारखे आहे.
कवडीचे महात्म्य सांगणारी कथा
एकदा शिव पार्वती भारती मठात सारिपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्‍न केला की, माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेवांना हरवता आहात आपण; त्यावर महादेवीनी सारिपाटावरील एक कवडी नारदमुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले.
नारदमुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसर्‍या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजू विशाल झाला. कुबेरभांडार खाली झाले; किंतु कवडी तुल्य धन होईना. देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वत:चा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीला तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज इंद्रासह सर्व देव शिव शक्ती समीप आले. अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ इंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तीर्थाची निर्मिती केली.
हेच तुळजापुरातील कल्होळ तीर्थ जे इंद्र व चंद्र देवानी बांधले असून ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तीर्थांना इथे येण्यास सांगितले. या तीर्थांचा एकत्र कल्लोळ झाला, तेच हे पवित्र कल्होळ तीर्थ होय. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले.

चलनाचे साधन होती कवडी
पूर्वी राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत. कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जात असे. पेशवाई काळातही या कवड्यांच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.
चलन उदयास येण्यापूर्वी सर्व व्यवहार (एक्सचेंज) बार्टरच्या रूपात होते. म्हणजे एखाद्याकडे दोन पोते गहू असतील तर ते देऊन त्याने दुसर्‍याकडचे तांदूळ घेणे म्हणजे वस्तू विनिमय. पुढे व्यवहारात चलन आले. त्या काळी व्यवहारात कवडी ही चलनासाठी वापरण्याचे साधन म्हणून अस्तित्वात होती. मुगल काळापासून म्हणजे इ. स. 1526 ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे 1947-48 पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता. कवडी चलनात आल्यानंतर जनजीवनात ती इतकी रुळली की त्यावरून वाक्प्रचार आणि म्हणीही तयार झाल्या. तेव्हापासून अत्यंत कंजुस व्यक्तीला कवडी चुंबक संबोधले जाऊ लागले. सगळ्यात कमी मूल्याचे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै, ढेला, पैसा, आणा व रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती.

जाणून घ्या कवडीची किंमत
एका चांगल्या कवडीची किंमत तीन फुटक्या कवड्या होती. दहा चांगल्या कवड्यांची किंमत एक दमडी होती. चार दमड्यांची किंमत एक पै, दोन दमड्यांची किंमत एक ढेला, दोन ढेल्यांची किंमत पैसा अशी होती. एक रुपयाची किंमत 256 दमड्या होती. ‘खिशात फुटकी कवडी नाही’ हा वाक्प्रचार तेव्हापासून रूढ झालेला आहे. या हिशेबानुसार तेव्हा एक रुपयासाठी तब्बल 10,240 कवड्या मोजाव्या लागत असत, तर 30 हजार 720 फुटक्या कवड्या मोजून रुपयाच्या मूल्याची प्रतिपूर्ती होत असे. आता कवडीला होलसेलमध्ये दोन रुपये तर किरकोळ बाजारात पाच रुपये किंमत आहे. यानुसार कवडीने 20 हजार ते 50 हजार पट जास्त वाढ नोंदवली असून, तिचे मूल्य आता रुपयाच्या पुढे गेले आहे. यानुसार कवडीला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित व्हावे.

कवडीचा उगम कुठे?
कवडी ही शंख शिंपल्याबरोबरच समुद्रातून शोधली जाते. गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनार्‍यालगतच्या भागातून कवडी मुख्यत: धार्मिक स्थळांवर विकायला येते. साधारण चारशे रुपये किलोप्रमाणे ती सध्या मिळते. एका किलोत आकारानुसार दोनशे ते अडीचशे कवड्या बसतात. रामकुंड, त्र्यंबकेश्‍वर आदी धार्मिक स्थळी शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्याच्या माळा विकणारे पथारीवाले असतात. व्यक्तीच्या गरजेनुसार व त्याच्या आर्थिक कुवतीनुसार पाच रुपये ते अगदी काळी कवडी असेल तर 50 रुपयांपर्यंतही ती विकली जाते.
शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. सारिपाट, चौसर आदी खेळांमध्ये कवड्यांचे महत्त्व होते. म्हणूनच आजही या खेळातील सोंगट्यांना ‘कवड्या’ असेच म्हटले जाते.

धार्मिक क्षेत्रातही महत्त्व
मराठी विश्वकोषातील माहितीनुसार दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी इत्यादी नावांनी गाजलेल्या देवींच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात.
गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचा शंकाकार टोप बाहेरून कवड्यांनी मढविलेला असतो. ते गळ्यातही कवड्यांच्या माळा घालतात. जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात. काखेत अडकविलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात आणि या सर्व उपासकवर्गांच्या कंठातून गळ्यात असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवालाही कवड्यांचा श्रृंगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे. तंत्रविद्येतही कवडीला प्रचंड महत्त्व आहे.

कवड्यांचे प्रकार किती व कोणते?
तसे पाहता बर्‍याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात. परंतु पूजेमध्ये अथवा देवीच्या शृंगारामधे काही विशेष कवड्यांचा समावेश होतो.

  1. महालक्ष्मी कवडी - या कवडीवर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.
  2. आंबिका बट कवडी - ही खडबडीत व पिवळसर रंगाची असते.
  3. येडेश्वरी कवडी - राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा असलेली ही कवडी असते.
  4. यल्लम्मा कवडी - ही कवडी शुभ्र व दुधासमान निष्कलंक असते.
    आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. कवडी माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे.
    कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग
    बंद्या रुपयाबरोबर 3 तपकिरी कवड्या बांधून, त्या लॉकर किंवा तिजोरीत ठेवाव्या. यामुळे लक्ष्मी आपल्याकडे निरंतर राहील. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याची पूजा करावी.
    एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी, इंटरव्यूसाठी जात असाल, तर घराबाहेर पड़ताना
    1 पांढरी कवडी उजव्या खिशात ठेवावी. कार्य यशस्वी होते.
    नवीन वाहनाला काळ्या दोर्‍यात ओवलेली तपकिरी कवडी, दिवेलागणीच्या वेळी बांधल्यास अपघाताचे भय राहत नाही.
    दुकानाच्या गल्ल्यात 3,5,7 अशा विषम संख्येत कवडी ठेवली, तर पैशाचा ओघ सातत्याने सुरू राहतो .
    लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते, त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोर्‍यात ओवून बांधावी.
    ज्यांच्याकड़े लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे, अशा लोकांनी 7 पांढर्‍या कवडींना केशर मिश्रित हळदीचा लेप लावावा व त्या नव्या कोर्‍या पिवळ्या कापड़ात गुंडाळून देव्हार्‍यात ठेवाव्या. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल.
    काही कारणाने पती-पत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल, तर 21 पांढर्‍या कवडींची माळ उशी खाली ठेवावी. अल्पावधीत वादळ शांत होईल व जीवन सुखी होईल.
    लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दात विना
    त्रासाने येतात……!!

Share this article