Close

नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, महिला निर्भिडतेवर आधारित ३ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला ( Navratra Special New Short Films Base On Woman Power)

सर्वत्र नवरात्रोत्सवाचं मंगलमय वातावरण आहे. याचं नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत अनुश्री फिल्म्स प्रस्तुत देवी, त्या दोघी
आणि शालिनीझ होम किचन असे तीन वैचारीक लघुपट प्रदर्शित होत आहेत. नवरात्राच्या पवित्र पर्वावर देवीची आराधना, तिची शक्ती आणि भक्तिरस यांचा अनुभव तुम्हाला या लघुपटांत पाहायला मिळणार आहे. तिन्ही शॉर्ट फिल्म्सचे विषय हे वेगळे असून प्रत्येकातून एक वेगळा संदेश दिला जात असल्याचे दिसून येते. या लघुपटांची निर्मिती मयुर तातुसकर यांनी केली आहे. तर लघुटांचे लेखन आणि दिग्दर्शन शुभम घाटगे याने केले आहे. ‘देवी’ या लघुपटात अमृता सुरेश, सौज्ञा उपाध्ये तर ‘त्या दोघी’ या लघुपटात ऐश्वर्या वखरे, सायली गीते, केशव देशपांडे आणि ‘शालिनीझ होम किचन’ या लघुपटात सुरभी ढमाळ, सौरभ अहिर, कुमार पाटोळे या उत्तम कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटांचे छायाचित्रण अविरत पाटील याने केले आहे. तसेच कला दिग्दर्शन पीयूषा चाळके यांनी केले आहे , ध्वनी श्रेयस किराड व तुषार कांगरकर व सहायक दिग्दर्शन अमिताभ भवार व कार्यकारी निर्मिती पराग जाधव यांनी केली आहे.

अनुश्री फिल्म्सचे निर्माते मयुर तातुसकर लघुपटांच्या संकल्पनेविषयी सांगतात, “स्त्री शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या कालावधीत तीन शॉर्ट फिल्म्स निर्माण करणे हे त्याच उद्देशाशी संबंधित आहे, कारण या काळात महिला सशक्तीकरणाचा विषय अधिक महत्त्वाचा वाटतो. आम्ही या सणाच्या माध्यमातून प्रेम, धार्मिक महत्व, साहस, भक्ती आणि प्रेरणा यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या शॉर्ट फिल्म्सची संकल्पना मी आणि माझे मित्र शुभम घाटगे ज्यांनी अनुश्री फिल्म्सच्या मागील भाव भक्ती विठोबा या लोकप्रिय गाण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या सोबत या नवरात्र उत्सवात जागर स्त्री शक्तीचा हा विषय विचारात घेऊन अंमलात आणताना वेगवेगळ्या विचारधारा आणि कथा एकत्र करून आम्ही ज्या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू इच्छित होतो, त्यावर चर्चा सुरू झाली आणि यामुळे या तीन कथा विकसित झाल्या.”

लेखक - दिग्दर्शक शुभम घाटगे लघुपटांच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “देवी या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पाषाण येथील सोमेश्वर मंदिर या खास आणि देखण्या ठिकाणी केले आहे, जिथे नवीनीकरण, पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम आहे. तर त्या दोघी आणि शालिनीझ होम किचन या लघुपटांचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले. चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय होता, तसेच कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीमुळे आम्हाला अत्यंत सजीव आणि प्रभावी चित्रण मिळाले. प्रत्येक क्षणामध्ये गहनता आणि भावना होती, ज्यामुळे हा अनुभव मनाशी बांधला गेला. प्रेक्षकांना हे तिनही लघुपट भावतील अशी मी आशा करतो.”

Share this article