Close

जगज्जननी करवीर निवासिनी (Jagjjanani Karvir Nivasini)


महालक्ष्मी तप्त सुवर्ण कांतीची असून दिव्यकांतीची आहे. ती सात्विका सर्व चराचराची जननी आहे. सर्व सिद्धांची ध्यानयोग्य विषय असलेली, सर्व सिद्धी जिच्या दासी आहेत व जी सर्व सिद्धींची जननी, जन्मदात्री आहे.

वाराणस्याधिकं क्षेत्रं करवीरपुरं महत्।
आद्यं तु वैष्णवं क्षेत्रं शक्त्यागमसमान्वितम।
भक्तिमुक्तिप्रदं नृणां वाराणस्या यवाधिकम्॥
वाराणसीहून करवीर क्षेत्राचे महात्म्य अधिक आहे. हे आद्य वैष्णव क्षेत्र शक्तिपीठही आहे. ते मानवांना ऐहिक व पारलौकीक सुख देते. ती एकाच वेळी आपल्या भक्तांना भक्ती व मुक्ती दोन्ही प्रदान करते. हे तीर्थक्षेत्र वाराणसीहून जवभर अधिकच श्रेष्ठ आहे.
हे पीठ शक्तिपीठ असूनही सात्त्विक असल्यामुळे येथे प्राणीहत्या होत नाही. अशा देवीच्या परिसरातील देवतांचे महात्म्य हा सर्वत्र अभिमानाचा विषय आहे.
करवीर क्षेत्री श्री महालक्ष्मीचा निवास आहे. प्रत्यक्ष श्रीहरीच या स्थळी महालक्ष्मीच्या शरीरात प्रविष्ट होऊन राहिला आहे. त्यामुळे महालक्ष्मीच्या ठायी केलेली सेवा थेट विष्णूच्या चरणाप्रत जाऊन पोहोचते.
याठिकाणी श्री महालक्ष्मीला थोरपद देऊन, तिच्याकरवी प्रत्यक्ष श्री नारायणच भक्तांची सेवा स्विकारत आहेत व ते शेषरूपामध्ये तिच्या मस्तकी विराजमान झाले आहेत.

चराचराची जननी
मातुलिंग गक्षं खेटं पानपात्रं च बिभ्रती।
नागं लिंगंच योनींच बिभ्रती मस्तके सदा।
स्वर्णाभा दिव्यवर्णाच सर्ववर्णयुता सती।
सर्वसिद्धा महालक्ष्मी सर्वचित्त मनोहरा।
जी चार हातात मातुलिंग (लुंग) म्हणजेच म्हाळुंग, गदा, ढाल व पानपत्र धारण करते. जिने मस्तकावर नाग, लिंग व योनी धारण केलेले आहेत. अशी ती महालक्ष्मी तप्त सुवर्ण कांतीची असून दिव्यकांतीची आहे. ती सात्विका सर्व चराचराची जननी आहे. सर्व सिद्धांची ध्यानयोग्य विषय असलेली, सर्व सिद्धी जिच्या दासी आहेत व जी सर्व सिद्धींची जननी, जन्मदात्री आहे. सिद्धीच्या रूपात प्रगटणारी अशी ही महालक्ष्मी सर्वांच्या चित्ताला मनोहारी अशी आहे.
तिच्या उजव्या हातात मातुलिंग म्हणजे म्हाळुंगे नावाचे फळ आहे. डाव्या हातात पानपत्र म्हणजे एक भांडे आहे. जणू देवी या पृथ्वीतलावर भवतापाने त्रस्त झालेल्या तिच्या भक्तजनांना आवाहन करते आहे की या तापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही या पानपत्रातील रसाचे प्राशन करा व तो रस काहीसा कडू लागेल तर त्यावर तुम्ही हे म्हाळुंग खा.
उर्वरीत दोन हस्तामध्ये गदा व खेटक म्हणजेच ढाल धारण करणारी ही जगन्माता, जगज्जननी महालक्ष्मी जिच्या केवळ दर्शनमात्रानेच भक्तांची पापे नष्ट होतात. म्हणूनच तिला महामातृक असे संबोधले जाते.
योगबलाने योगीजन देहत्याग करतात. त्याची उत्तम फलप्राप्ती होते, पण करवीर क्षेत्री नैसर्गिक मृत्यू जरी आला तरी, तेथील निवासामुळे त्याच्या पापांचा समूळ नाश होऊन त्यास मोक्षप्राप्ती होते.
अनेक वेळा प्रलय, महाप्रलय आले. प्रलयकाळात पाण्यात पृथ्वी जसजशी बुडू लागते, तसतसे हे क्षेत्र साक्षात महालक्ष्मी वर करते. म्हणूनच हे क्षेत्र जंबुदीपामध्ये श्रेष्ठ आहे.
या भूतलावर करवीर नामक एक अतिपावन स्थान आहे. या स्थळी देव, तीर्थगण, मुनी, गंधर्व, सिद्ध, यक्ष, चारण, किन्नर इत्यादींचा निवास आहे. या स्थळी जलरूपात महादेव (शंकर), पाषाणरूपात विष्णू, वायुरूपात ऋषी-मुनींचा समुदाय, वृक्षरूपात देवांचा निवास आहे. त्रिभुवनातील साडेतीन कोटी तीर्थे, निवृत्तीसंगम किंवा सहस्त्र सूर्यग्रहणे यांच्यामध्ये स्नान केल्याने होणारी फलप्राप्ती इथे होते.


काशीहून जवभर जास्तच
या इहलोकातील संसाराच्या तापत्रयातून मुक्त करण्यसाठीच उत्तर दिशेला काशी व दक्षिण दिशेला करवीर या पवित्र क्षेत्राची स्थापना झाली. श्री महालक्ष्मी व प्रत्यक्ष भगवान विष्णू या उभयतांच्या निवासामुळे या क्षेत्राला काशीहून जवभर जास्तच महत्त्व प्राप्त झाले आहे. यांच्यासोबत उमापतीही आपल्या गणांसमवेत इथेच राहू लागले.
परमपावन अशा या क्षेत्री कथ्यपापदी पाच श्रेष्ठ ऋषींनी आणलेली पंचगंगा नदी (कासारी, कुंथी, तुळशी, भोगावती व गुप्तरूपात सरस्वती) पवित्र अशा गंगामाईने पण यामध्ये नंतर प्रवेश केला. ती तेथे वाहत आहे. तिच्या पवित्र जलात स्नान केल्याने मुक्ती मिळते. संगमस्थळी तेहतीस कोटी देवांची वस्ती आहे. या स्थळी मृत जीवाच्या अस्थिचे विसर्जन केल्यास त्या चक्रांकित होतील व जीव मोक्षपदी जाऊन पोहोचतो.
या ठिकाणची माती जरी कपाळी लावून घेतली तरी तो मानवप्राणी हा भवसागर लीलया पार करू शकतो. येथे आसन घालून जप-तप, साधना किंवा नामस्मरण केले तरी त्याची अपार फलप्राप्ती होते. येथे सदैव ब्रह्मज्योतीप्रकाश आपले तेज पसरवत असतो. येथे अनेक शिवलिंगे आहेत. त्यातील एकशे आठ शिवलिंगे प्रसिद्ध आहेत. रूद्रचरण असलेली रूद्रगया येथे आहे. या क्षेत्राच्या सर्व आठही दिशांना असलेली अष्टलिंगे या संपूर्ण क्षेत्राचे संरक्षण करीत आहेत. चक्रधारी, शेषगायी श्रीहरी स्वतः या क्षेत्राचे सर्व बाजूने रक्षण करीत आहे.
याच ठिकाणी रामेश्‍वर हे तीर्थस्थान आहे जे पापविनाशी म्हणून प्रसिद्ध आहे. या क्षेत्राच्या चारही दिशांना एक-एक याप्रमाणे श्रीधर व कम्मेश्‍वर अशी विख्यात स्थाने आहेत. येथील विश्‍वेशादी लिंगे दिव्य व अलौकीक अशी आहेत. श्री चक्रेशपुरीसुद्धा अगदी विलोभनीय आहे. या क्षेत्राच्या वायव्य दिशेला ‘प्रयाग’ हा पाच नद्यांचा संगम आहे. तेथील रूद्रपद हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
पश्‍चिम दिशेला विशाल तीर्थ, जिथे हटकेश्‍वर नावाचे लिंग व त्याच्याजवळ बदरिकावन आहे. जे मनोकामना पूर्ण करणारे व पापविनाशक म्हणून ओळखले जाते.

विटेश्वर आसनस्थ
नैऋत्य दिशेला भक्तवत्सल पांडुरंग, जो पुंडलिकाची मातृपितृभक्ती पाहून प्रसन्न होऊन त्याला वरदान देण्यासाठी आला पण मातापित्यांच्या सेवेत खंड न पाडता, आसन म्हणून त्याने फेकलेल्या विटेवर आसनस्थ झाला, उभा राहिला त्याच्या निवासाने पावन झालेले नंदवाळपूर हे स्थान आहे.
देवीने दृष्टांच्या विनाशाकरीता रंकभैरवाची योजना केली आहे. क्षेत्राच्या पूर्वव्दारी उज्वलांना व त्र्यंबुली पूर्वद्वारी असलेल्या उज्ज्वलांबेचे महात्म्य थोर आहे. एका महापापी, दुराचरणी शुद्राला उपरती झाली व त्याने पापमुक्त होण्यासाठी एका दिव्य मुनींना उपाय विचारला असता, “करवीर नगरीत जाऊन तेथील तीर्थात स्नान कर. जाताना हातात काळे तीळ घेऊन जा. स्नानोत्तर तीळ जर पांढरे झाले तर तू पापयुक्त झालास असे समज.” असे सांगितले. त्याने करवीर नगरीतील उज्ज्वल तीर्थावर स्नान करताच त्याच्या हातातील काळे तीळ पांढरे झाले. तो पापमुक्त झाला व परमानंदाने त्याने उज्जवलांबेचे पूजन केले. करवीर नगरीच्या पूर्वद्वारी श्री महालक्ष्मीने उज्ज्वलांबेची म्हणजेच आजच्या ‘उजळाईवाडी’ नियुक्ती केली आहे.
करवीर नगरीच्या दक्षिण दिशेला कात्यायनी देवी आहे. नाना प्रकारच्या वृक्षवेलींनी सुशोभित व पवित्र अमृतासमान उदकाने परिपूर्ण असा निर्सगरम्य व नयन मनोहर असा हा परिसर आहे.
येथील अमृतकुंडावर व्याघ्र-सिंह, गाय, मांजर, मूषक आदी सर्व प्राणी आपला नैसर्गिक वैरभाव विसरून गुण्यागोविंदाने राहतात.

अद्वितीय वास्तुशिल्प
जगज्जननी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदीर हे वास्तुशिल्पाचा पण एक अद्वितीय नमुना आहे.
प्रथमदर्शनी या मंदीराचे बांधकाम जरी हेमाडपंथी शैलीचे वाटत असते तरी याच्यासोबतच द्रविडीयन व नगरचे संमिश्र स्वरूप असलेल्या ‘वेसर’ या बांधकाम शैलीचा प्रभाव आढळतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
या शैलीच्या बांधकामामध्ये मुग्ध देवी, देवतेच्या, मंदीराच्या सर्व बाजूला छोटी-छोटी मंदीरे स्थापिली जातात. ‘स्टार’ आकार व बाजूला इतर तारका आणि संपूर्ण आवारात जागोजागी कोपर्‍यात हत्तीची मूर्ती. हे या शैलीचं मुख्य वैशिष्ट्य.
मंदीराचे एकूण आवार पूर्व पश्‍चिम तीनशे पन्नास फूट व दक्षिणोत्तर दोनशे फूट असा एकंदर सत्तावीस हजार स्न्वेअर फूट आहे.
मुख्य मंदीराची उंची पस्तीस फूट व कळसाची उंची पंचेचाळीस फूट इतकी आहे.
मंदीराच्या आतील व बाहेरील वास्तुरचनेमध्ये, पुनर्बांधणीमध्ये अनेक राजांचे योगदान आहे. अगदी चालुक्याच्या युगातील राजा मंगलेश पासून राजा जटिंग, गंधारादित्य, यादवकाळातील राजा सिंघन. साधारण नऊ ते तेराव्या शतकातील सर्व राज्यकर्ते. तेरा ते पंधरा शतकाच्या दरम्यान ‘दीपमाळा’, ‘नगारखाना’ व बाहेरील वाढीव मंदीरांची बांधणी मराठ्यांच्या राजवटीत झाली.
नयनरम्य मूर्ती पश्‍चिमाभिमुखी रत्नजडित सिंहासनावर आरूढ अशी तीन फूट उंचीची, चाळीस किलो वजनाची, मौल्यवान धातूपासून बनलेली दिव्यालंकार व दिव्यगंध यांनी विभूषित देवींची मूर्ती विलक्षण मनोहारी व नयनरम्य आहे.
मुख्य मूर्तीच्या गाभार्‍यावरच मात्युलिंगाची निर्मिती 12 व्या शतकात यादवांच्या काळात झाली असं म्हटलं जातं. देवीच्या मुकुटामध्ये कोरलेले शिवलिंग दृष्टीपथास येत नसल्यामुळे याची निर्मिती करण्यात आली होती.
अकराव्या शतकात राजा गंधारादित्य यांनी प्रदक्षिणा मार्गामध्ये मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला महासरस्वती व उजव्या बाजूला श्री महाकाली मंदिराची निर्मिती केली.
मंदीरात प्रवेश करण्यासाठी दोन, मंडप असून प्रथम ‘दर्शन मंडप’ व नंतर ‘कूर्म मंडप’ ज्याला सध्या ‘तीर्थ मंडप’ असेही संबोधले जाते. दोन्ही मंडपांचे छत हे अष्टकोनी असून अत्यंत रेखीव आहे व कोरीव कामाने समृद्ध अशा कडाप्पांच्या अनेक खांबावर उभे आहे.
याच्याच पुढे दोन्ही बाजुंना जाळीदार नक्षीकाम असणार्‍या चौकटीतून आत जाताच ‘गणपती चौक’ लागतो. ‘कूर्म मंडप’ व ‘गणपती चौक’ यांची निर्मिती यादवकालीन राजा सिंघन यांनी केली.
सर्वात बाहेरचा किंवा महाद्वार रोडवरून देवळात प्रवेश केल्यास सुरुवातीचा मंडप ज्याला ‘गरूड मंडप’ असे म्हटले जाते. त्याची बांधणी इंग्रज राजवटीत मंत्री श्री. दाजी कृष्णा पंडीत यांच्या कारकीदीत सन 1838 मध्ये झाली.
मंदीराच्या बाह्यभागावर वेगवेगळे भौमितीक आकार, फुले, नृत्य करणार्‍या अप्सरा, चौसष्ठ कला व वीस योगिनी अशा कलात्मक अप्रतिम मूर्तीचे कोरीव कामातून सजीव शिल्पदर्शन घडते.
मंदीराच्या बाहेर दिसणारी पाच शिखरे ही सन 1879 ते 1967 च्या दरम्यान संकेश्‍वरच्या शंकराचार्यांनी बांधून घेतली. यापैकी सर्वात उंच शिखर हे मध्यभागी असून मुख्य गाभार्‍यावर आहे व त्याच्या चारही दिशांना उत्तरेला महाकाली, दक्षिणेला महासरस्वती, मंदीरावर दोन आणि पश्‍चिमेला गणपती चौकावर एक व मुख्य शिखराच्या खाली कर्म मंडपावर एक आहे.
घाटी दरवाज्यातून प्रवेश करताच डाव्या हाताला ‘नवग्रह मंदीर’, खास दिवशी वापरात येणारी तोफ व ‘राधाकृष्ण’, ‘काळभैरव’, ‘तुळजाभवानी’, ‘लक्ष्मीनारायण’, ‘अन्नपूर्णा’, ‘इंद्रसभा’, ‘रामेश्‍वर’ अशी बरीच छोटी छोटी
मंदीरे आहेत.


जगप्रसिद्ध किरणोत्सव
वास्तूशिल्पाचा हा एक अद्वितीय नमुना आणखी एका कारणासाठी जगप्रसिद्ध आहे. ते म्हणजे येथील ‘किरणोत्सव.’
मंदीराच्या पश्‍चिम दिशेच्या भिंतीला असलेल्या छोट्या खिडकीमुळे, मावळत्या सुर्याची किरणे थेट देवीच्या गाभार्‍यात येऊन पोहोचतात. असं म्हटलं जातं की भगवान सुर्यनारायण पण देवीच्या दर्शनासाठी, देवीला वंदन करण्यासाठी आपली हजेरी लावतात.
हजारो भक्त डोळ्यात प्राण आणून या क्षणांची फार वाट पहात असतात. रथसप्तमीच्या दिवसांमध्ये म्हणजे 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारीला सूर्यकिरणे देवीच्या चरणकमलांना स्पर्श करतात. दुसर्‍या दिवशी मूर्तीच्या मध्यभागामध्ये व तिसर्‍या दिवशी देवीच्या मुखमंडलावर सुर्यकिरणे स्थिरावतात. तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. या दिवसांशिवाय नऊ, दहा व अकरा नोव्हेंबरला पण असाच ‘किरणोत्सव’ भक्तजन अनुभवतात.
देवीचा नवरात्रोत्सव पण अवर्णनीय असतो. यामध्ये रथोत्सवाचा सोहळा विशेष उल्लेखनीय ठरतो.
चंद्राच्या रथात विराजमान देवीची सालंकृत मूर्ती व रथाची व सर्वच प्रदक्षिणा मार्गाची सजावट विलोभनीय असते. फुलांचे व रांगोळीचे गालिचे, रोषणाई, पालखीच्या औक्षणासाठी मार्गावर जागोजागी आरतीची तबक घेऊन नटून थटून सज्ज सुवासिनी यांनी सर्वच वातावरण मंगलमय होऊन जाते. पालखीच्या वेळी नेत्रदीपक अशी आतषबाजी केली जाते. अष्टमी, नवमी या दिवसांबरोबरच, पंचमी-ललिता पंचमी याला नवरात्रोत्सवात विशेष महत्त्व आहे.
कोल्हासुराच्या वधानंतर त्याने बंदी बनवलेल्या सर्व देव-देवता, यक्ष, किन्नर राजकन्या यांना देवीने मुक्त करून तुम्ही योगिनी व्हाल, सामर्थ्यवान व्हाल तसेच माझ्या दर्शनाच्या आधी भक्त तुमचे पूजन, स्मरण करतील व इच्छित प्राप्त करून घेतील असा आशीर्वाद दिला.
देवीच्या दर्शनाआधी या योगिनींचे स्मरण, पूजन केले तरच करवीरची तीर्थयात्रा सफल, संपूर्ण होते असे मानण्यात येते.
कोल्हासूराच्या वधाचा प्रतिकात्मक विधी म्हणून ‘कुष्मांड भेद’ किंवा ‘कोहाळा भेद’ हा कार्यक्रम कुमारिकेच्या हस्ते ‘त्र्यंबुली’ देवीच्या आवारात दरवर्षी ‘ललितापंचमी’ केला जातो.
कुमारिकेच्या रूपात देवी प्रगटते व सर्व जगाला अशुभ व संकटापासून तारते असा समज आहे.
पतिव्रता सतीदेवीच्या मृत शरीराचे, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने 52 तुकडे केले व ते तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तीपिठांची निर्मिती झाली.
दक्षिण काशी, कोल्हापूर हे शक्तीपीठ देवीच्या पडलेल्या डोळ्यांपासून बनले असावे अशी आख्यायिका आहे.
देवीच्या सुवर्ण पालखीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी इच्छुक भक्तजनांनी यथाशक्ती दान करावे. कारण सर्व पर्वतात ‘हिमालय’ श्रेष्ठ, सर्व यज्ञात ‘अश्‍वमेध यज्ञ’ श्रेष्ठ, सर्व दानात ‘अभयदान’ श्रेष्ठ, सर्व मंत्रात ‘ओंकार’ श्रेष्ठ, सर्व विद्यांमध्ये ‘अध्यात्म’ श्रेष्ठ, सर्व स्त्रियांत ‘पार्वती’ श्रेष्ठ तसे सर्व क्षेत्रांमध्ये ‘करवीर’ क्षेत्र श्रेष्ठ.
सर्व चराचराचे रक्षण करणारी, एकमात्र देवी असून, तिला माझे नमन असो.
देवी प्रपन्नर्तिहारे प्रसीद
प्रसीद मातर्जगतो खिलस्य
प्रसीद विश्‍वेश्‍वरी पाहि विश्‍वं
त्वमीश्‍वरी देवि चराचरस्य
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
-गिरीजा गोडे

Share this article