Close

माझे मलाच कळले (Short Story: Majhe Malach Kalale)

  • प्रियंवदा करंडे

  • अग पण मला हे कळत नाही,” राजेशला मध्येच अडवत रिया म्हणाली.
    “पण राजा, मला कळतं ना! मला माझ्यातल्या टॅलेन्टची ओळख झालीय ना सोन्या!” रिया हळूवारपणे, गोड स्वरात बोलत होती. राजेशच्या काळजात धडधडलं, अरे बापरे! आता आणि कुठल्या टॅलेन्टची हिला ओळख झाली? गेल्या वेळेस आपण उत्तम ड्रेस डिझायनर आहोत असा साक्षात्कार हिला झाला. त्याचं काय झालं, रियाच्या दादाला मुलगी झाली, आणि अर्थात्च रियाकडे ‘आत्याबाईचा’ मान, तोरा आलाच. मग काय! स्वतःच्या हाताने भाचीसाठी बाळंतविडा करायला रियाने भारी कापडं आणली. त्याच्या गोधड्या शिवल्या, झबली शिवली, इवलेसे फ्रॉक्स शिवले. अर्थात् हे सर्व तिने तिच्या शिवणकलेत पारंगत असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने केलं, पण ती सुंदर झबली वगैरे पाहून रियाला एक नवीच जाणीव झाली की, अगबाई! खरंच आपल्याकडे ओरिजिनॅलिटी आहे? एवढी? हे म्हणजे त्या कस्तुरी मृगासारखंच झालं की! त्याला जसं स्वतःच्या बेंबीत कस्तुरी आहे, एवढी मौल्यवान चीज आहे हे कळत नाही तस्संच आपलं झालंय्!
    आपला जन्म ड्रेस डिझायनिंगसाठी आहे, त्याचं सार्थक करायला हवं तर नमीता पर्वते या ड्रेस डिझाइनिंगच्या क्षेत्रातील नंबर वन मॅडमना भेटायला हवं. ठरलं तर मग! स्वतःच्या डोक्याने दहा बारा वेगवेगळ्या गळ्याची नि आकाराची झबली शिवून रियाने ती नमिता मॅडमना दाखवून म्हटलं, “बघा हे शॉर्ट टॉपस्!”
    “शॉर्ट टॉपस्? म्हणजे?” ते त्रिकोणी, चौकोनी, षट्कोनी, बिनकोनी कापडाचे तुकडे पाहून जोरात हसत नमीताने विचारलं. “अहो म्हणजे मराठीत यांना झबली म्हणतात; आहेत ना डिझायनर झबली? मी सप्लाय करीन हं मॅम तुम्हाला… पण एका कंडिशनवर!” रिया आता प्रोफेशनल आस्पेक्ट ठेवून व्यवहाराची बोलणी करायला लागली. ते मनाला येईल तसे फाडून धावदोरा मारून शिवलेले कापडाचे तुकडे
    पाहून नमीता मॅम रियाची शिवणकला पूर्ण समजल्या.
    “अगबाई! कंडिशन? खरंच, तुम्ही तर अगदी युनिक ड्रेस डिझायनर आहात, हे कळतंच बरं का या शॉर्ट टॉपस् स्टिचिंगवरून…. मला नाही परवडणार हे टॉपस् विकत घ्यायला तुमच्याकडून… मी बापडी सामान्य डिझायनर आहे हो….” नमीता मॅम नम्रपणे चाचरत म्हणाल्या.
    रिया आपली झबली उचलत म्हणाली, “ओ! रिअली? तर आता मी माझं स्वतःचच बुटिक काढते…” आणि ती नमिता मॅमच्या शॉपबाहेर पडली. नंतर जवळजवळ दहा दिवस राजेश तिला समजावत होता की, “रियु डार्लिंग, तू सुंदर आहेस, नाजुक आहेस, तू अशी स्टिचिंग, स्केचिंग वगैरे सारखी काम का करतेस? तुझा जन्म दुसर्‍यांनी शिवलेल्या झबल्यांची खरेदी करण्यासाठी आहे आणि ती खरेदी करायची असेल तर त्यासाठी बाळ जन्माला घालण्यासाठी आहे….”
    “इश्य्!” रिया लाजून लाल झाली नि पुढच्याच वर्षी मोठ्या शॉपीमध्ये झबली आणायला गेली. आता त्यांची सोनू चार वर्षांची आहे, तिचं हवं नको जास्त करून ‘हवं’ हे बघण्यातच रिया दंग असते. असं असताना आज रियाला तिच्यातल्या कुठल्या नव्या टॅलेन्टची जाणीव झाली हे राजेशला कळेना.
    “किनई मला जाणवलंय्… मी आता तेच करणार ज्यासाठी मला परमेश्‍वराने या पृथ्वीतलावर पाठवलं आहे…” अशी जेव्हा रियाने सुरुवात केली तेव्हा राजेशच्या हृदयात नुसती धडधड सुरू झाली. आता हिला आपण नृत्यांगना आहोत असं तर नाही ना जाणवत? किंवा फार मोठ्या विदुषी आहोत असं नाही ना वाटत? नाहीतर ही आपली सरळ इनव्हेस्टमेंट कुठे करायची, कशी करायची याची कन्सल्टन्सी सुरू करायला ऑफिससाठी जागा घे, असा आपल्यामागे तगादा लावायची.
    म्हणून तो म्हणाला, कुठल्या टॅलेन्टची ओळख झाली माझ्या रियाराणीला ते आम्हाला कळलंय्.”
    “अय्याऽऽ? खरंच?”
    “होऽऽ तुला बालसंगोपनाचं उत्तम ज्ञान आहे, हे तुझं टॅलेन्ट तू सोनूला वाढवताना दिसंत ना! तेव्हा तसंच चालू ठेव, आणि मला नाश्ता दे ऑफिसला जायला उशीर होतोय.” त्याच्या पुढे नाश्त्याची डिश ठेवत रियाने म्हटलं, “ते तर राहाणारच चालू! पण आधी ओळख बघू हा पदार्थ!” डिशमधला एक रंगीबेरंगी पदार्थाचा इवलासा गोळा न्याहाळत राजेश म्हणाला, “सोप्पं आहे हा तर कलरफुल फोडणीचा भात!”
    “चूक! भात फोफशं बनवतो शरीराला! ही नाचणीच्या पिठात लाल, हिरवी, पिवळी, निळी भोपळी मिरचीचे बारीक तुकडे घालून त्यात सोयाबीन, सगळ्या भाज्यांची सालं घालून त्याची उकड काढलीय्! ना तेल, ना तूप, ना मीठ! खा! आणि मस्त रहा! मी अशा हेल्दी रेसिपीजच पुस्तक लिहिणार राजुड्या!” रिया स्वतःभोवती गिरकी घेत म्हणाली. “अरे नुसत्या भाताचेच 100-150 प्रकार लिहितेय…”
    “काऽऽय? म्हणजे करपलेला भात, कच्चा भात, चिखल भात, कडक भात…. आणि… आणि…” राजेशला थांबवत रिया म्हणाली आणि
    शाऽऽई भात! म्हणजे आधी बासमती तांदूळ घ्या, ते किनई काश्मिरमधून आणावेत. स्वतः जाऊन, तरच ओरिजिनल बासमती तांदूळ मिळतील. तर अस्सल बासमती तांदूळ घ्या, त्यात सगळी ड्रायफ्रुटस् टाका, कुकरमधून शिजवून बाहेर काढा…. आणि त्यावर शाई सारख्या रंगाचं निळं आंबटगोड सरबत टाका!”
    “काऽऽय? असं लिहिणार तू?” राजेशने किंचाळून विचारलं.
    “हो अरे! किंचाळतोस काय? वेगळेपणा नको का स्वैपाकात? सगळे शेफ शाही पुलाव करतील, पण शाई भात फक्त रिया मॅडमच करू शकतात! काऽऽय?”
    “अग पण, हे सगळं तू आधी करून पाहिलंस का?” राजेशने तिला बरोब्बर कोंडीत पकडत विचारलं.
    “हो रे! खरं तर करून बघून मगच लिहायचं ठरवलंय्! म्हणून किनई राजेश, आपण तिघेजण काश्मिरला जायचंय्. तिथून तो अस्सल बासमती तांदूळ आणायचा, मग त्याचा शाऽऽई भात करून नंतर ती रेसिपी लिहायची, बरोबर ना? तू किनई किती सपोर्ट करतोस… आणि हो आपलं काश्मिरच्या फ्लाइटचं ऑनलाइन बुकींग मी केलंय्.. तुला कशाला त्रास ना सगळं एकट्याने करायचा? “खा! नाचणीची जादूई उकड खा!” गोऽऽड हसत रिया म्हणाली आणि राजेशने (अर्थात
    स्वतःच्याच) कपाळावर हात मारला.

Share this article