अभागी
-लता वानखेडे
पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी मतीमंद मुलींची शाळा ‘आधार’ सुरू केली, त्यावेळी फक्त पाच मुलींनी प्रवेश घेतला होता. फक्त एका रूममध्ये ही शाळा सुरू केली होती. आज त्या शाळेचे स्वरूप खूप वाढले होते. शाळेची दोन मजली इमारत गर्वाने उभी होती. एकूण पन्नास मुली येथे राहून शिक्षण घेत होत्या.
मी सकाळी दहा वाजता कार्यालयात आले. काही महत्त्वाच्या फाईल्स बघू लागले. तोच राधाने येऊन माझ्या हाताला घट्ट पकडले अन् मुख्य गेटजवळ नेले. तेथे कपड्यात काही तरी गुंडाळलेले पडले होते. मी खाली बसून तो कपडा हातात घेऊन पाहू लागले. ओढणीत गुंडाळलेले ते नवजात मूल पाहून मी अचंबित झाले.
ताबडतोब मी डॉक्टर जोशींना व इन्स्पेक्टर पवारांना फोन केला. त्या नवजात मुलीस मी दत्तक घेतले. आजन्म अविवाहित राहून मी
स्वतःला समाजकार्यास वाहून घेतले होते. मतीमंद मुलींसाठी शाळा काढून त्यांची सेवा करू लागले.
राधाची ही अशीच मनाला चटका लावणारी कथा! राधाची आई लोकांची धुणीभांडी करून घर चालवायची. नवरा दारू पिऊन तिला अन् राधालाही मारायचा. शिव्याही घालायचा. एके दिवशी आमच्या शाळेच्या गेटपाशी काही मुलं राधाला ‘वेडी-वेडी’ म्हणून चिडवीत होती, दगडं मारीत होती. राधा जोरजोरात रडत होती. त्या आवाजाने मी बाहेर आले. पाहते तर एक दहा वर्षांची गोरीपान, उंच मुलगी रडत होती. मी सर्व मुलांना हाकलून दिले. राधाला शाळेत घेऊन आले. ती येथेच राहू लागली.
एके दिवशी राधाची आई आली. तिने माझे पाय धरले, रडू लागली.
“बाईसाहेब, तुम्ही माझ्या मुलीला सहारा दिला. लई उपकार झाले बघा माझ्यावर. मी गरीब हाय. भांडी घासून पोट भरतीया. नवरा बेवडा हाय. खूप मारहाण करतो बघा. मी तुम्हाला पैसे नाय देऊ शकणार!”
मी तिला उठविले. तिचे अश्रू पुसले. “अगं बाई मी हे सर्व पैशासाठी नाही करत. माझीही अशीच एक लहान बहीण होती. खूप सुंदर, गोरीपान. ती पण राधासारखीच मतीमंद होती. ती फार हुशार होती. सर्व समज होती तिला. तिचे शरीर वाढले होते पण तिच्या मेंदूची वाढ झाली नव्हती. वयाने ती पंधरा वर्षांची झाली होती. पण मनाने ती तीन वर्षांच्या बाळासारखीच होती. एक दिवस अचानक ती गायब झाली. आम्ही तिला खूप शोधले. आठ दिवसांनी ती परत आली. कोणत्या तरी नराधमाने डाव साधला होता. ती गर्भवती होती. आमच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. आईला हे दुःख पचवता आले नाही. ती या धक्क्याने गेली. माझ्या बहिणीला मुलगी झाली. ती पण मतीमंद आहे. याच शाळेत शिकते.”
दोघींनीही डोळे पुसले.
“बाई! मागल्या जन्मी म्या काय पाय केलं आसल म्हणून राधासारखी वेडी मुलगी…”
“अगं! मागच्या जन्मीचं पाप वगैरे काही नसतं बरं! राधा काही वेडी बीडी नाही बरं. तिचं वय वाढलं, त्यामानानं तिच्या मेंदूचा विकास झाला नाही एवढंच.”
डोळे पुसतच राधाची आई निघून गेली. नंतर आठ दहा दिवस राधाची आई आलीच नाही. राधा आईची वाट पाहात बसायची. शेजारच्या झोपडपट्टीत ती राहायची. मी तेथे जाऊन विचारपूस केली. साधा ताप येऊन ती या जगातून कायमची निघून गेली होती.
मला एक जोरदार धक्का बसला. राधाला ही बातमी मी कशी सांगू? राधा ‘आधार’ मधून निघून गेल्यावर ही कोणाच्या आधाराने जगेल?
राधावर मी बारीक लक्ष ठेऊन असे. तिची खास काळजी घेत असे. एके दिवशी राधाचे वडील येऊन तिला घरी घेऊन गेले. प्रत्यक्ष जन्मदाता तिचा पिता. त्याला मी नकार कशी देणार होते?
रात्री मागून दिवस, दिवसामागून रात्र, नियतीचं चक्र अविरतपणे चालू होतं. कोणता फासा नियती आता फेकणार होती?
दोन वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला. एके दिवशी मी ऑफिसमध्ये काम करीत बसले होते. तेवढ्यात फोन वाजला. “हॅलो! मॅडम मी डॉक्टर लीलावती बोलतेय. मॅडम आपण लवकर सरकारी दवाखान्यात यावं. एक पेशंट आपली खूप आठवण काढीत आहे.” दहा मिनिटातच मी दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी मला एका पेशंटजवळ नेले. ती राधा होती. एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला होता. मला पाहताच ती उठून बसली. मला खुणेनेच बाळ पाहायला सांगितले. मी तिचे बाळ दुपट्यात गुंडाळून हाती घेतले. राधेचे प्रेम अथांग सागरासारखे भरभरून वाहात होते. तिची माया अपार होती.
त्या बाळाचा पिता कोण? त्याचे भविष्य काय? राधाचे भविष्य काय? या सर्व प्रश्नांचे ओझे पाठीशी घेऊन मी दवाखान्याबाहेर पाय ठेवला. समोर काळाकाभिन्न अंधार पसरला होता, कधीही न संपणारा!
असे कितीतरी अभागी जीव रोज जन्माला येत असतील. या काळ्याकाभिन्न कधीही न संपणार्या अंधार यात्रेत त्यांना प्रकाशाचा एकतरी किरण सापडेल का?