Close

महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगसाठी रितेश देशमुख नव्हे तर…‘या’ दोन अभिनेत्यांना केली होती विचारणा (Mahesh Manjrekar Had Asked Shivaji Satam And Siddharth Jadhav To Host Bigg Boss Marathi During He Was Ill)     

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. ६ ऑक्टोबरला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. पण गेल्या दोन आठवड्यापासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुख गैरहजर आहे. कामानिमित्ताने परदेशात असल्यामुळे रितेश ‘भाऊच्या धक्क्या’वर पाहायला मिळत नाहीये. त्याच्या जागी डॉ. निलेश साबळे होस्टिंग करताना दिसत आहे. असं असलं तरी ६ ऑक्टोबरला महाअंतिम फेरीचं होस्टिंग मात्र रितेश देशमुखच करणार आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगविषयी एका ज्येष्ठ अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंग संदर्भात ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना विचारणा केली होती. त्यासंदर्भात शिवाजी साटम यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. मुलाखतीमध्ये शिवाजी साटम यांना, तुम्ही ‘बिग बॉस मराठी’ पाहता का? असे विचारल्यावर अभिनेते शिवाजी साटम म्हणाले, “खरं सांगू का, मी जेव्हा ‘बिग बॉस’ हिंदी सुरू झालं तेव्हापासूनच पाहिलं नाही. आता मराठीत आल्यानंतर महेश मांजेरकर करत होता तेव्हा देखील पाहिलं नाही. फक्त आणि फक्त पहिलं पर्व पाहिलं. महेश मांजेरकर करत होता म्हणून पाहिलं. माझं लक्ष फक्त महेशवर होतं. कोण काम करतंय काही माहीत नाही. ‘बिग बदर्स’ नावाच्या शोवरून ‘बिग बॉस’ प्रयोग केला आहे. तो त्यांच्या संस्कृतीमध्ये चालतो. इथे म्हणजे आपल्याच घरात येऊन आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणीतरी बघतंय. माझ्या घरात काय चाललंय हे पाहून वेगळा असा आनंद मिळतोय. हा स्वभाव माझा नाहीये. त्यामुळे मी ते बघणं टाळतो. सोशल मीडियावर तर मुळीच बघत नाही. जरी आलं तरी स्क्रॉल करतो.”

पुढे शिवाजी साटम यांना विचारलं की, ‘बिग बॉस मराठी’ करत असताना महेश मांजरेकर आजारी होते. तेव्हा ‘बिग बॉस मराठी’चे काही भाग तुम्ही करावे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं? या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेते म्हणाले, “हो. तेव्हा मी त्याला सांगितलं, महेश मी करत नाही आणि करू शकणार देखील नाही. तू इतका छान करतो. खूप सुंदर पद्धतीने करतो. मला ते खूप आवडायचं. त्याच्यातून महेश गंमती-जमती पण काढायचा आणि तो स्वतः नीट बघायचा. पण मला स्वतःला तो कार्यक्रम रंजक वाटत नाही. त्यामुळे मला तो नाही करायचा. जरी तुझा प्रॉब्लेम असला तरी तू दुसऱ्या कोणाला तरी बघ, असं मी सांगितलं होतं. त्यानंतर मला वाटतं, त्याने सिद्धार्थ जाधवला वगैरे विचारलं होतं.”

पहिली फायनलिस्ट मिळाली

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम टप्प्यापर्यंत अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी पोहोचली आहे. यामधील निक्कीने तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील ती पहिली फायनलिस्ट ठरली आहे.

सोमवारी ( ३० सप्टेंबर ) तिकीट टू फिनालेचा टास्क झाला. याआधी घरातील सात सदस्यांमध्ये बाबागाडीचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये बाबागाडीवरून सदस्यांना घरात ठेवलेले झेंडे जमा करायचे होते. कमी वेळेत सर्वाधिक झेंडे जमा करून सूरज हा तिकीट टू फिनालेच्या टास्कसाठी निवडला गेला. त्याआधी निक्कीने म्युच्युअल फंडमधील कॉइनचा वापर करून थेट तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये एन्ट्री केली होती. त्यामुळे सूरज विरुद्ध निक्की असा तिकीट टू फिनालेचा टास्क पाहायला मिळाला. यावेळी निक्की विजयी झाली आणि तिने तिकीट टू फिनाले जिंकलं.

Share this article