मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत पहिली ट्रान्स वुमन म्हणून सहभागी होत नव्या सिंगने इतिहास रचला आहे
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ग्रँड फिनाले नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अवघ्या १८ वर्षांची भारतीय सौंदर्यवती रिया सिंघा मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ठरली आहे. ती आता जागतिक स्तरावर मिस युनिव्हर्स 2024 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशभरातून ५० हून अधिक तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सर्वांना मागे टाकत ती यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली. रियाबरोबर आणखी एक व्यक्ती यंदाच्या मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ स्पर्धेचे आकर्षण ठरली ती म्हणजे नव्या सिंग. नव्या सिंग ही एक ट्रान्स वुमन आहे आणि मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत भाग घेणारी ती पहिली ट्रान्स वुमन ठरली आहे.
बिहारमधील नव्या सिंगने २२ सप्टेंबर रोजी या स्पर्धेत सहभाग घेऊन एक इतिहास घडवला आहे. या स्पर्धेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत टॉप ११ फायनलिस्ट म्हणून निवड तिची निवड झाली. त्यानंतर नव्या हिने इतर दोन ट्रान्स वुमनबरोबर या स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. भारतीय सौंदर्य स्पर्धांमध्ये नव्याने सहभाग घेऊन तृतीयपंथीयांसाठी प्रतिनिधित्व करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नव्याचा जन्म बिहारमधील कटिहार येथे झाला. तिला किशोरवयात जेंडर डिस्फोरियाचा अनुभव आला आणि 2011 मध्ये ती मुंबईला आली आणि इथंच तिनं तिची खरी ओळख पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी सेक्स रीअसाइनमेंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बिहारपासून फॅशन जगतातील ग्लॅमर आणि ग्लिट्झपर्यंतचा तिचा प्रवास 2016 मध्ये सुरू झाला. २०१६ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये पदार्पण केल्यानंतर तिला पहिल्यांदा ओळख मिळाली आणि तेव्हापासून तिने अनेक टॉप डिझायनर्ससाठी काम केले आहे.
सुष्मिता सेनकडून मिळाली प्रेरणा
नव्याने तिच्या प्रवासाबद्दल हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, १९९४ मध्ये सुष्मिता सेनच्या मिस युनिव्हर्स विजयाने मला प्रेरणा दिली. सुष्मिता सेन नेहमीच माझी प्रेरणा राहिली आहे. मी तिचा प्रवास जवळून पाहिला. त्यावेळी ती फक्त १८ वर्षांची होती आणि तिने तिच्या भितीवर मात केली होती. मी रोज स्वतःला आठवण करून देते की, जर ती तिच्या आव्हानांवर मात करू शकली तर मी देखील माझ्या आव्हानांवर मात करू शकते. जरमाझ्या भीतीवर नियंत्रण ठेवले नाही तर माझी हार होईल आणि मी हारणार नाही.”
आपल्या इंस्टाग्रामवर अधिकृत घोषणा करत हे स्वप्न सत्यात उतरल्याचे सांगून सिंग म्हणाली, “बिहार, कटिहारमधून ते मिस युनिव्हर्स इंडियाच्या प्रतिष्ठेच्या मंचापर्यंत, हा प्रवास विलक्षण होता. माझ्या खऱ्या ओळखीसाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आणि असंख्य आव्हानांवर मात केल्यानंतर, मिस युनिव्हर्स इंडिया २०२४च्या अंतिम स्पर्धकांपैकी एक म्हणून माझी अधिकृतपणे निवड झाल्याचे जाहीर करताना मला कमालीचा अभिमान वाटतो!
ती पुढे म्हणाली की ही कामगिरी केवळ माझी नाही तर “समानता, विविधता आणि प्रत्येकाला सन्मानाची समान संधी मिळायला हवी या विश्वासाचा हा विजय आहे.”
गुजरातमधील रिया सिंघा हिला मिस युनिव्हर्स इंडिया २०२४चा ताज मिळाला होता, तर सिंगच्या या स्पर्धेतील सहभागामुळे निःसंशयपणे अधिक तृतीयपंथीय महिलांना सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा आणि सामाजिक नियमांना आव्हान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.