- संगीता वाईकर
एका सुंदर सोनेरी फ्रेममध्ये रेखीव अक्षरात लिहिले होते ’राधा पंडीत-लेखिका.’ तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पण तिने ते परत फिरवले. आज तिच्या अस्तित्त्वाची नवी ओळख तिला मिळाली होती.
श्रावण महिना म्हणजे ऊन-पावसाचा खेळ. क्षणात ऊन तर क्षणातच पावसाची सर येईल असा निसर्गाचा खेळ चालत होता. तसे राधाच्या मनात ही अनेक विचार फिरून फिरून येतच होते. दुपारची निवांत वेळ, चहाचा वाफाळलेला कप हातात घेऊन खिडकीत उभी राहून ती जणू काही पाऊस कोसळण्याची मनापासून वाट बघत होती. पण तो ही हट्टीच. काही केल्या राधेच्या मनासारखे करायचे नाही, असा जणू चंगच त्याने बांधला.
मन कुठेतरी दूर दूर भटकंती करू लागले की आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान रहात नाही म्हणतात हेच खरं. दारावरची बेल कुणीतरी सतत वाजवत होतं. पण ढगांचा आवाज, वार्याचा वेग आणि मध्येच कडाडणार्या विजा हे सर्व निसर्ग संगीत ती बघत होती. त्यात जणू रंगूनच गेली होती. शास्त्रीय संगीतात जशा एकामागून एक ताना छेडल्या जातात तद्वतच निसर्गाचेही गायन चालू होते. का कोण जाणे अचानक राधा भानावर आली आणि लगबगीने धावत जाऊन तिने दार उघडले तर दाराबाहेर पोस्टमन उभा होता. त्याच्या हातात बरीच पत्रे होती. ती भिजू नये म्हणून तो जीवापाड जपत होता त्या पत्रांना. ही जनतेची सर्व आवश्यक कागदपत्रे भिजली तर त्याचे नाही पण लोकांचे नुकसान होणारच ना.
पोस्टमनने आवाज दिला, ’मोहन पंडितांचे घर ना हे! राधा पंडीत येथेच राहतात की?‘ तशी राधा म्हणाली, ”हो, काका मीच ती, राधा पंडीत.”
बरं बरं! दारावर पाटी आहे मोहन पंडीतांची, आपण त्यांच्या… हो हो पत्नीच. आता पुढच्या वेळी आपण आपल्या पत्त्यावर ’मोहन पंडीत’ हे नाव अवश्य लिहायला सांगा. म्हणजे घर शोधण्यात जास्त वेळ जात नाही ताई!” तिने राधा पंडीत असे नाव असलेले पत्र हाती घेतले. तिच्याच एका जुन्या मैत्रिणीचे पत्र होते.
खरं तर सकाळी सूर्य उगवल्यापासून सतत एकानंतर दुसरे असे काम करता करता दुपार कधी होत असे याचेही भान तिला रहात नसे. मोहन अगदी सकाळी चहा-नाश्ता व डबा घेऊन कंपनीत निघून जात असे. मग
त्यानंतर अमेय. त्याची शाळेची तयारी, वह्या-पुस्तके, डबा, पाण्याची बाटली अगदी सर्व सर्व बघायचे. मग बस स्टॉपवर त्याला न्यायचे आणि नंतर घरातली उरली सुरली कामे. यातच दुपार होत असे.
राधा-मोहन यांच्या लग्नाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली होती. चार वर्षांचा अमेय आणि पतीदेव मोहन यांच्या भोवतीच तिचा संपूर्ण दिवस जात असे. मग आला गेला पै पाहुणा, घरातले, बाहेरचे सर्व कामात ती पूर्णपणे व्यस्त झाली होती. खरं तर साहित्याची फार आवड असलेली राधा एखाद्या महाविद्यालयात अध्यापक व्हायची. मुळातच लेखन-वाचनाची आवड जोपासलेली राधा. पण संसारात व्यस्त झाली होती. तरी देखील कधी वेळ मिळालाच तर आपल्या मनातले काही शब्द लेखणीने कागदावर उतरवत होती. पण ते फक्त तिच्या पुरतेच. कुणाला कधी बोलणे नाही की सांगणे नाही.
आपल्याच विचारात रमलेली राधा एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करती झाली. जेव्हा पोस्टमन तिला म्हणाला ”ताई, साहेबांचे नाव असेल तर घर शोधायला काही वेळ लागत नाही बघा. नाहीतर प्रत्येक घरात विचारावे लागते आणि फार दमछाक होते हो. वेळ तर जातोच आणि त्रासही होता बघा!“ तिलाही त्यांचे म्हणणे पटले होते. तिनं विचार केला, आजच मोहनजवळ बोलून तिच्या नावाची पाटी तयार करून घेऊ आणि दारावर लावू म्हणजे काही प्रश्नच येणार नाही.
संध्याकाळ झाली. अमेय शाळेतून आला आणि खेळायला बागेतही गेेला. ती पुन्हा आपल्या संध्याकाळच्या जेवणात काय करायचे या विचारात गुंतली. रात्री उशिरा मोहन आला. मग जेवण आटोपले. अमेयही झोपला आणि मग ती मोहन जवळ येत म्हणाली, ”मोहन, मी काय म्हणते. आज पोस्टमन आला होता. म्हणाला घर शोधण्यात फार त्रास झाला. माझे नाव घरावर नसल्याने गोंधळला होता. तर… माझ्या नावाची पाटी करून लावूया का दारावर, म्हणजे कोणते पत्र कुरीअर आले किंवा कुणी भेटायला आले तर सोपे जाईल त्यांना!”
तिचे ऐकून न ऐकल्यासारखेच केले मोहनने. जणू काही कळलेच नाही अशा विचारात तो तसाच उभा होता. तेव्हा मात्र राधा नाराज झाली. पुुन्हा तिने तेच त्याला सांगितले. आता मात्र तो हसायला लागला. पण त्याच्या हसण्याचे कारण काही तिला कळेना. ती रुसली आणि थेट घरात निघून गेली. खरं तर त्याला तिचे म्हणणे काही पटले नाही. ”घरातल्या घरात बसून काहीही विचार करत असतेस, राधा तू! तुझ्याकडे येतं तरी कोण ग! जे येतात ते तर माझ्या ओळखीचे असतात. मग त्यांना असा प्रश्न कसा काय पडणार. तुझ्यापेक्षा जास्त तर अमेयचे मित्र-मैत्रिणी येतात घरी, खरं तर त्याच्याच नावाची पाटी दारावर लावायला हवी.“
राधाचे मन खट्टू झाले. डोळ्यात पाणी जमा झाले. माझी किंमत किती आहे. माझे लेखनही त्याला आवडत नाही. काहीतरी वेळ घालवण्यासाठी काळ्यावर पांढरे करत असते. एवढेच त्याला ठाऊक होते. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. ’चल झोपू या’ म्हणत तो झोपेच्या आधीनही झाला आणि याचेच राधाला फार वाईट वाटले. तिच्या मनाचा विचार करणारा जोडीदार नाही, हेच तिच्या मनातले दुःख होते. असेच वर्ष दोन वर्ष निघून गेले आणि या विषयावर पडदा पडला. घरातले काम आणि मोहन, अमेयचे रोजचे काम हेच तिचे प्रथम कर्तव्य त्यात ती रमली. काय करणार?
काही दिवसांनंतर मात्र तिने
स्वतःसाठी थोडा वेळ काढून लेखन करण्याचे ठरवले. मनातल्या काही गोष्टी कल्पनाशक्तीने कागदावर उतरवायला सुरुवात केली. खरं तर तिचे बाबा तिला नेहमी म्हणायचे, ”बेटा राधा, लेखन ही एक ऊर्जा आहे. तिचा वापर कर. निश्चितच तुला यश मिळेल.” पण तेव्हा मात्र तिने लक्ष दिले नाही. आपले अनुभव योग्य शब्दात मांडून तिने वृत्तपत्रात लेखन करायला सुरुवात केली आणि तिचे सुंदर विषय, शब्दबद्ध रचना प्रकाशित होऊ लागल्या. हळूहळू तिचे लेखन लोकप्रिय होऊ लागले. आता तिला एक नवा मार्ग सापडला होता. तशी ती लेखनात तरबेज होऊ लागली. पण मोहन मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करीत होता. पण ती मात्र तिची नवी ओळख निर्माण करू लागली.
एक दिवस दुपारी एक सुप्रसिद्ध मासिक बघत असताना तिची नजर एका जाहिरातीवर गेली. ’कथा स्पर्धा’ अशा तर्हेची ती जाहिरात आणि प्रथम पुरस्कार पन्नास हजार, द्वितीय पुरस्कार तीस हजार तर तृतीय पुरस्कार दहा हजार अशा आशयाची ती जाहिरात पुन्हा पुन्हा ती बघत होती. पुन्हा पान मिटून विचार करत होती. असे बराच वेळ चालले. ’काय करावे काही सुचेना’ या गीताप्रमाणे तिची अवस्था झाली. बक्षीसाबरोबरच एक नवी ओळखही लेखिकेला मिळणार हे निश्चित. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने एका कथेला प्रारंभ केला होता. ती आता पूर्णत्वास येणार होती. पण ती मनाने साशंक होती. खरंच चांगली झाली आहे का माझी कथा. खरं तर ती आपल्या कथेबद्दल कुणाशीच बोलली नव्हती. पण जन्मदाता पिता, त्यांना मात्र तिने थोडे सांगितले होते.
एवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली आणि ती विचारांच्या साखळीतून बाहेर आली. तिचे लाडके बाबाच फोनवर होते आणि ती एकदम आनंदी झाली. तिने बाबांना सर्व सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ”हे बघ राधा, एकदा प्रयत्न तर करून बघ. प्रयत्न केल्याशिवाय आपण ठरवणार कसे की आपली कथा कशी आहे ते. प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही. नंतर असं नको वाटायला की आपली कथा पाठवायला हवी होती. वेळ निघून गेल्यावर संधीचा काही उपयोग नसतो बेटा. होऊ शकतं की तुझीच कथा उत्कृष्ट असायची आणि तुला तो पुरस्कार ही मिळायचा. पण त्यासाठी प्रयत्न हेच महत्त्वाचे आहेत.” तिच्या मनातही हाच विचार पुन्हा पुन्हा फेर धरू लागला आणि चार पाच दिवसातच तिने मासिकातील पत्त्यावर तिची कथा पाठवून दिली. पुढे काही दिवस निघून गेले. ती पुन्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात गुंतली. असेच सहा सात महिने गेले. तिला कथा पाठवल्याचा विसरही पडला.
एक दिवस अचानक कुणाचा फोन आला. मोहन बराच वेळ बोलत होता. पण असेल त्याच्या कामाचा म्हणून तिने काही लक्ष दिले नाही. दुसरा दिवस सुट्टीचा. रविवार. अमेय आणि मोहन उशिरापर्यंत झोपणारे, पण सकाळी सकाळीच घराबाहेर पडले आणि थोड्या वेळातच राधाच्या मैत्रिणी आणि मोहनचे मित्र सहपरिवार घरी येऊ लागले. तिला कळेना हे काय प्रकरण आहे. न बोलवता आज सगळे हजर आणि मोहनही घरी नाही. खरं तर आज तिचा वाढदिवस होता आणि त्यासाठी सगळे शुभेच्छा, भेटवस्तू, मिठाई घेऊन घरी आले होते. तिला शुभेच्छा तर देतच होते. पण त्यापेक्षा आनंदाची बाब म्हणजे मोहन सर्वांना अतिशय आनंदाने राधाला कथा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याचे मनापासून आणि अभिमानाने सांगत होता.
वाढदिवस आणि पुरस्कार या दुहेरी आनंदात राधा विहरत होती. तिच्या कादंबरी लेखनाचा प्रस्तावही संपादकांनी दिला होता. आई- बाबा, बहीण-भाऊ सर्व नातलग तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करू लागले. खरं तर त्याला कालच कळले होते. पण राधास तिची आवडती भेट द्यायची म्हणून तो व्यस्त होता. तिला तिची ओळख आज मिळाली होती. तिचे अस्तित्त्व तिने स्वबळावर सिद्ध केले होते. हा पुरस्कार तिला समाजात एक नवी ओळख देणारा आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देणारा होता. थोडा वेळ मोहन, कुठे तो तिला दिसलाच नाही. सर्व आनंदात तिला त्याची साथ महत्त्वाची वाटत होती. पण तो मात्र गायब, ती हिरमुसली. नाराज झाली पण काही वेळातच तो आला आणि त्याने तिचे डोळे दोन्ही हातांनी बंद केले आणि अमेयला हाक मारली. ”अमेय! ये आईला वाढदिवसाची भेट दे!“ अमेयने आईच्या हातात एक सुंदर कागदाने आच्छादलेली भेटवस्तू दिली आणि एक गोड पापा पण तिला दिला. ”आई! वाढदिवसाच्या शुभेच्छा!“
राधाला काही कळेना काय करावे. यात तिने त्या भेटवस्तूची रिबन सोडली, तर एका सुंदर सोनेरी फ्रेममध्ये रेखीव अक्षरात लिहिले होते ’राधा पंडीत-लेखिका.’ तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पण तिने ते परत फिरवले.
आज तिच्या अस्तित्त्वाची नवी ओळख तिला मिळाली होती. वाढदिवसाची ही दुहेरी आनंदाची भेट तिला नवजीवन देणारी होती. खूप खूप आनंदात होती आज राधा!
Link Copied