गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत सर्वात चर्चेत असलेले अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ हे दोघं नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अदितीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. या दोघांच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. अदिती-सिद्धार्थचे निवडक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे.
अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडला. साऊथमधील १०० वर्षे जुन्या प्रसिद्ध मंदिरात ते दोघं लग्नबंधनात अडकल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने लग्नात सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य परंपरेनुसार पांढरा कुर्ता घालून लुंगी नेसली होती. अदितीने शेअर केलेल्या फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.
अभिनेत्री कॅप्शनमध्ये लिहिते, “तू माझा सूर्य आहेस, चंद्र आहेस आणि माझ्यासाठी तू माझा तारा आहेस. लव्ह, लाइट अँड मॅजिक…मिस्टर अँड मिसेस अदु-सिद्धु” अभिनेत्रीच्या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांसह कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, अदिती-सिद्धार्थने २७ मार्च रोजी गुपचूप साखरपुडा उरकला. गेली अनेक वर्षे अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. ‘महासमुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये आले. २०२१ पासून यांनी आपल्या नात्यावर कुठेही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. परंतु, त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना अदिती-सिद्धार्थ एकत्र असल्याची कल्पना होती. आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)