Close

डबे! डबे!! आणि डबे!!! (Short Story: Dabe! Dabe!! Dabe!!!)

केतकीच्या लग्नाला आता सहा वर्षं होऊन गेली होती. तेवढ्या वर्षांत आईने डबे देण्याचा धूमधडाका सुरू केला होता. आधी काय तर, ‘अगं केतकी, तुझं नवं नवं लग्न झालंय. तुला कशाला स्वयंपाकाचा त्रास? शिवाय माझ्या हातचा पुलाव तुला किती आवडतो! आणि जावईबापूंना तर मी केलेली वालाची उसळ म्हणजे वा! वा! वा!’ असा स्वतःच निष्कर्ष काढून तिने आज उसळ, तर उद्या पुलाव, परवा चिकन मसाला, तर तेरवा पुरणपोळ्या… असा रोजचा रतीब लावला.

“किती वेळा आईला सांगायचं, डबे आणू नकोस म्हणून! ऐकतच नाही!”, केतकी चरफडत म्हणाली, “आता
हे अळूचं फतफतं, ही पीठ पेरून केलेली पडवळाची भाजी! कोण खाणार हे पदार्थ?”
“अगं, जाऊ दे ना! कामवाल्या बाईला दे!”, सौरभ कंटाळून म्हणाला.
कोणे एके काळी केतकीला अळूचं फतफतं आवडायचं. ती अगदी चाटून पुसून ते खायची. पण आता एका मुलीची आई झाल्यावर तिच्या आवडीनिवडी बदलल्या. तिला पिझ्झा आणि बर्गर्स आवडू लागले. सौरभसोबत चायनीज पदार्थ खाताना तिला जन्माचं सार्थक झालं, असं वाटू लागलं. अशात तिची आई जावईबापूंसाठी पीठ पेरून केलेली पडवळाची भाजी घेऊन येते, हा म्हणजे आता कहरच होता. एकदा सौरभने तिच्या माहेरी अगदी जिवावर येऊन ती भाजी खाल्ली होती. तिच्या आईला मात्र वाटलं की, पडवळ म्हणजे जावईबापूंसाठी जीव की प्राण! बरं
सौरभचा स्वभाव असा की, कधीच स्पष्ट बोलत नाही! सरळ सांगावं ना की, मला पडवळाची भाजी आवडत नाही म्हणून! पण छे! खुशाल खाऊन मोकळा! आई आपली मलाच ओरडतेय. तूच आळशी आहेस. तुलाच नको निगुतीने करून वाढायला! मग काय आईला अगदी ऊऽऽत आला!
“हॅलो केतकी, अगं जरा या बाजूला आले होते… येऊ का तुझ्या घरी?” आईने मोबाईलवरून विचारलं.
“मग ये ना आई!” केतकी बेसावधपणे म्हणाली. पाच मिनिटांत आई दारात हजर! पाणीबीणी पिऊन झाल्यावर म्हणाली, “अगं, तुला अळू आणलाय! आणि जावईबापूंसाठी पडवळाची भाजीही आणलीय!” पिशवीतून तिने उत्साहाने डबे बाहेर काढले. म्हणजे आई मुद्दाम आपल्याकडेच डबे द्यायला आली तर!
“अगं, डबे कशाला आणतेस गं?” केतकी जराशी नाराजीनेच म्हणाली.
“अगं, त्यात मला कसला आला त्रास? आणि हो, आठवणीने वाढ हं जावईबापूंना!”, आई सोफ्यावर ऐसपैस बसत म्हणाली.
“तुझ्या त्रासाचं नाही गं, पण कुणी खात नाही. छकुली तर आता अवघी चार वर्षांची आहे. ती तर अजून धड जेवायला बघत नाही. सारखं पिझ्झा,
बर्गर, ब्रेड बटर जॅम असलंच खात असते!” केतकी जीव तोडून आईला तिने डबे का आणू नयेत, याची कारणं सांगत होती. तर तिची आई म्हणते कशी, “अगं, छकुलीला अळूची भाजी भरव तर खरी! बघ कशी मटामटा खाईल ती!
अगं, अळूमध्ये आयर्न असतं!”
केतकीला काय बोलावं तेच सुचेना.
तिने आईला कॉफी करून दिली, आई मग थोड्या वेळाने निघून गेली. केतकी मात्र ते मोठाले डबे बघून डोक्याला हात लावून बसली. तिच्या लग्नाला आता सहा वर्षं होऊन गेली होती. तेवढ्या वर्षांत आईने डबे देण्याचा धूमधडाका सुरू केला होता. आधी काय तर, ‘अगं केतकी, तुझं नवं नवं लग्न झालंय. तुला कशाला स्वयंपाकाचा त्रास? शिवाय माझ्या हातचा पुलाव तुला किती आवडतो! आणि जावईबापूंना (खूपदा सौरभ म्हण असं सांगूनही ती त्याला जावईबापूच म्हणायची) तर मी केलेली वालाची उसळ म्हणजे वा! वा! वा!’ असा स्वतःच निष्कर्ष काढून तिने आज उसळ, तर उद्या पुलाव, परवा चिकन मसाला, तर तेरवा पुरणपोळ्या… असा रोजचा रतीब लावला. कधी बाबांबरोबर डबा पाठव, तर कधी धाकट्या भावाबरोबर! कधी ऑफिसच्या प्युनबरोबर, तर कधी शेजारच्या मोलकरणीबरोबर!
एकदा तर केतकी नुसती म्हणाली,
‘आई, जरा अशक्तपणा वाटतोय.’
तिने पंधरा दिवस चक्क एक डबेवाला लावून, रोज सकाळ-संध्याकाळ डबे पाठवून, केतकीला सळो की पळो करून सोडलं. केतकीला वाटायचं, एवढं सगळं बनविण्यासाठी आईकडे शक्ती तरी कुठून येते? त्यावर आईचं उत्तर एकच, “अगं, आपल्या मुलांसाठी आईला आपोआप बळ येतं बघ!” केतकीला मात्र आपण आई झाल्यावरही आपल्यात असं बळ आलेलं नाही, हे जाणवत होतं. उलट छकुलीच्या हट्टापुढे नाचताना तिला अगदी दमायला व्हायचं.
आईने आणून ठेवलेले डबे पाहताना तिचं हे डबे प्रकरण कसं थांबवायचं याचाच विचार केतकी करत होती आणि तेवढ्यात सौरभ घरी आला. त्याने या विषयाला म्हणावं तेवढं महत्त्व दिलं नाही. शेवटी केतकीने कामवाली, वॉचमन यांना त्या
भाज्या वाटून टाकल्या आणि अन्नदानाचं पुण्य, पदरात (म्हणजे ओढणीत) घेतलं.
लगेच दोनच दिवसांनी तिच्या आईने सौरभला आवडतात, म्हणून सांजोर्‍यांचा डबा दिलाच. जोडीला दुधीभोपळ्याची रस्साभाजीही होती. आता कामवाली आणि वॉचमनही जास्तीचं अन्न खाऊन कंटाळले होते. “ताई, आमचा डबा आणतो मी. मला आता काहीही देऊ नका!” असं त्याने अगदी दमात केतकीला सुनावलं. आता या डब्यावर जालीम उपाय काय नि कसा काढायचा, याचाच विचार केतकीच्या मनात सतत घोळत होता
आणि एके दिवशी दुपारी एक पुस्तक वाचता वाचता तिला साक्षात्कार व्हावा, तसा एक उपाय सुचला.
नेहमीप्रमाणे केतकीची आई सौरभला आवडणारी ओल्या वाटाण्याची उसळ आणि कांदा भजीचे डबे घेऊ आली. केतकीने आज डबे घेत म्हटलं, “अय्या! उसळ? भजी? वाव! अगं, सौरभ कालच आठवण काढत होता भज्यांची.” हे ऐकून केतकीची आई इतकी खूश झाली की, तिने चक्क
उठून गिरकी मारली स्वतःभोवती!
मग म्हणाली, “खरंच केतकी! आपल्या माणसानं आपली अशी कदर केली की कित्ती उमेद वाटते… हुरूप येतो काही करायला! देवाने किनई मला अन्नपूर्णा हाच रोल निभावायला या पृथ्वीतलावर पाठवलंय!” केतकीची आई मनापासून बोलत होती. तोच सौरभ आला. तशी आई अगदी परकर्‍या पोरीच्या उत्साहाने म्हणाली, “जावईबापू, थँक्यू हं! तुम्हाला माझी उसळ, भजी खूऽऽप आवडते म्हणून!” तेवढ्यात केतकीने डोळे मिचकावले आणि ठरल्याप्रमाणे सौरभ उत्तरला, “अहो आई, मलाच काय, माझ्या ऑफिसातल्या माझ्या तमाम मित्रांना, एवढंच नाही तर माझ्या बॉसलाही तुमच्या हातचे पदार्थ खूप म्हणजे खूपच आवडतात! किती सांगू? अहो, परवा तुम्ही दिलेली ती दुधीची भाजी नेली ना डब्याला, तर माझ्या बॉसने डब्याच्या झाकणाला लागलेली भाजीही चाटून पुसून खाल्ली! म्हणाले, मिस्टर निमकर, आता खास माझ्यासाठी चांगली डबा भरून भाजी करून आणा! त्यावर माझे मित्रही म्हणाले, यापुढे आम्हा सर्वांसाठीही डबे आणा!” सौरभ बोलता बोलता थांबला. त्याने हळूच केतकीला डोळा मारला.
आता आईही शांत बसली होती. केतकीला हायसं वाटलं. बरोबरच आहे म्हणा! ऑफिसातल्या पंचवीस जणांसाठी रोज भाज्यांचे, सांजोर्‍यांचे डबे पाठवायचे, म्हणजे काय सोपं काम आहे का?


आईला दिलासा देत केतकी म्हणाली, “अगं, सौरभ मस्करी करतोय गं!
तू नको मनावर घेऊस! तुझं वय बघ… तब्येत बघ! पंचवीस माणसांचं खाणं बनवणं कसं शक्य आहे?
तू किनई डबेच पाठवू नकोस! म्हणजे कुणालाच त्रास नाही!”
“हो आई! खरंच, तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात. पण ऑफिसातल्या मित्रांचं फुकटचं खाण्यात काय जातंय? तुम्ही नका लक्ष देऊ! केतकी आईसाठी चहा कर!” सौरभनेही केतकीची रीऽऽ ओढली. आईही बिचारी कसंबसं हसून चहा घेऊन निघून गेली. ती गेल्यावर दोघांनाही हुश्श वाटलं आणि दोघंही एकाच सुरात म्हणाले, “चला सुटलो या डब्यांच्या झंझटातून!”
दुसर्‍या दिवशी साडेनऊ वाजता सौरभ ऑफिसला जायला निघाला तोच बेल वाजली. केतकीने दार उघडलं, तर दारात एक डबेवाला उभा! त्याच्याजवळ सहा मोठ्ठे डबे होते. म्हणजे तो चक्क पंचवीस माणसांसाठीचं जेवण घेऊन आला होता. म्हणाला, “तुमच्या आईने हे पाच डबे दिलेत… सायबांच्या ऑफिससाठी… आणि हा डबा तुमच्यासाठी!”
“काऽऽय?” केतकी आणि सौरभ एकदम किंचाळले आणि सोफ्यावर पडले.

Share this article