चॉकलेट मोदक
साहित्य : 1 कंडेन्स्ड मिल्कचा टिन, 1 कप कोको पावडर, 100 ग्रॅम बटर, अर्धा कप बदामाचे बारीक तुकडे.
कृती : बटर आणि कोको पावडर एकत्र करून जाड बुडाच्या पॅनमध्ये मध्यम आचेवर ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. थोड्या वेळाने ते दाट होईल. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि बदामाचे तुकडे घालून मिश्रण गोळा होईपर्यंत सतत ढवळत शिजवा. नंतर हे मिश्रण आचेवरून उतरवून थोडं थंड होऊ द्या. मिश्रण थोडं थंड झालं की, ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये दाब देऊन भरा आणि मोदक तयार करा.
खजुराचे मोदक
साहित्य : 20 खजूर, अर्धा कप काजू आणि पिस्ता, आवश्यकतेनुसार साजूक तूप.
कृती : तुपावर काजू आणि पिस्ता मध्यम आचेवर हलके परतवून घ्या.
त्यांचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या. खजुराच्या बिया काढून टाका.
काजू-पिस्ते थंड झाले की, मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. हे मिश्रण एका मोठ्या वाडग्यात काढा. आता खजूर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. खजुराचं वाटण काजू-पिस्त्याच्या मिश्रणात घालून एकजीव मिश्रण तयार करा. ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण दाब देऊन भरा आणि मोदक तयार करा.