Close

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आगामी मराठी सिनेमा ‘पाणी’ची घोषणा (Actress Priyanka Chopra Announced New Movie)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. तिचा 'पाणी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका चोप्रा, राजश्री एंटरटेन्मेंट आणि कोठारे व्हिजन पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून राजश्री एंटरटेन्मेंटसारखा मोठा बॅनर, इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन प्रा. लि.असे तिन्ही मोठे निर्माते एकत्र येत आहेत. या तिघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुभवायला मिळणार आहे.

नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या ‘पाणी’मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक प्रियांका चोप्रा जोनस म्हणाली, ”’पाणी’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. या चित्रपटात अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळण्यात येणार आहे. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.”

“पर्पल पेबल पिक्चर्स नेहमीच अनोख्या, अविश्वसनीय आणि भारतातील प्रत्येक प्रदेशातील स्थानिक कथांना प्रोत्साहन देते. ‘पाणी’ हे मनोरंजन आणि प्रेरणादायी चित्रपटाचे ज्वलंत उदाहरण आहे. आदिनाथचे दिग्दर्शन खास आहे. या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार. माझा चौथा मराठी चित्रपट मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासारख्या दोन बलशाली संस्थेसोबत घेऊन येत आहे. याचा मला आनंद आहे,’’ असं प्रियांका म्हणाली.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. “तुमच्यासाठी एक खास बातमी! आमचा आगामी मराठी चित्रपट ‘पाणी’, १८ ऑक्टोबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. तर लवकरच भेटू.. चित्रपटगृहात,” असं कॅप्शन प्रियांकाने व्हिडीओला दिलं आहे.

” प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेनमेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या चित्रपटाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो. ‘पाणी’ लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांसोबत राहील,” असं दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणाला.

Share this article