अभिनेत्री दिव्या शाहची मुलगी मिहिका शाह हिचं सोमवारी (५ ऑगस्ट रोजी) निधन झालं. दिव्याने मंगळवारी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करून मुलीच्या निधनाची बातमी दिली. ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुषमा सेठ या मिहिका शाहच्या आजी आहेत.
दिव्या शाहने फेसबुकवर पोस्ट शेअर केली. “अत्यंत दु:खासह आम्ही तुम्हाला आमच्या प्रिय मिहिका शाहच्या निधनाची माहिती देत आहोत. ती ५ ऑगस्ट रोजी आम्हाला सोडून गेली,” असा मजकूर लिहिलेली एक पोस्ट दिव्याने केली आहे. यामध्ये दिव्या व तिचे पती सिद्धार्थ शाह यांची नावं आहेत. मिहिकाची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून चांगली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
गुरुवारी (८ ऑगस्ट रोजी) दुपारी ४ ते ६ या वेळेत मिहिकाची शोक सभा आयोजित करण्यात आली आहे. सिंध कॉलनी क्लब हाऊसमध्ये तिची शोक सभा होईल. दिव्या व तिचा पती सिद्धार्थ शाह यांनी ही पोस्ट करून मिहिकाच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. मिहिकाला ताप आला व त्यानंतर तिचं निधन झालं असं म्हटलं जात आहे. पण याबाबत कुटुंबाने अद्याप काहीही सांगितलेलं नाही.
मिहिकाच्या निधनाची पोस्ट दिव्याने शेअर केल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. काही जण मिहिकाला श्रद्धांजली वाहत आहेत, तर काहींना मिहिकाला नेमकं काय झालं होतं, याबाबत कमेंट करू विचारलं आहे. २९ जुलै रोजीच दिव्याने मुलगी मिहिका आणि आई सुषमा सेठ यांच्याबरोबरचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोत तिघीही आनंदाने पोज देताना दिसत आहेत. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मिहिकाच्या निधनाची बातमी आली आहे.
दिव्या सेठ ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘हम लोग’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘जब वी मेट’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘दिल धडकने दो’, ‘आर्टिकल ३७०’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दिव्याने ‘द मॅरीड मॅन’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ आणि ‘दुरंगा’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.