१७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करताता. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. त्यातही आषाढी एकादशीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीपासून चातुर्मासही सुरू होतो.
आषाढी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. भागवत संप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. महाराष्ट्रातील हजारो भाविक वारी करून पंढरपूरला जातात. परंतु तुम्हाला पंढरपूरला जायला मिळालं नसेल तर तुम्ही घरच्या घरी मनोभावे पूजा करू शकता. यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. एकादशी तिथी १६ जुलै रोजी रात्री ८.३३ वाजता सुरू होईल आणि १७ जुलै रोजी रात्री ९.२ वाजता समाप्त होईल.
असे मानले जाते की आषाढी एकादशीला उपवास केल्यास मनुष्याला धन, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या उपवासामुळे भगवान विष्णूची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात.
विश्वाचे नियंता आणि पालनकर्ते असं भगवान श्री हरी विष्णू यांना मानले जाते. अशा स्थितीत देवशयनी एकादशीनंतर संपूर्ण चार महिने देव योग निद्रामध्ये जातात. या कालावधीला देवाचा निद्राकाळ असेही म्हणतात. असे मानले जाते की भगवान विष्णू झोपी गेल्यानंतर भगवान शिव ब्रह्मांड चालवण्याची जबाबदारी घेतात, म्हणून चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान शिवाची पूजा करणे विशेषतः फलदायी असते.
आषाढी एकादशी हि हिंदू महिन्यात आषाढ (जून-जुलै) मध्ये साजरी केली जाते आणि तिचे फार आध्यात्मिक महत्त्व आहे. असा विश्वास आहे की हा दिवस भक्तिभावाने पाळणे आणि विधीवत पूजा, उपवास केल्याने पाप धुऊन मुक्ती (मोक्ष) प्राप्त होते. वर्षातील सर्व (२४) एकादशींला उपवास नाही केला तर आषाढी एकादशीला उपवास केल्यास भाविकांना पुण्य लाभते असते मानले जाते.