कांजीवरम साडी... हातात बांगड्या, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली... भारतीयत्वात रंगलेले संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि तिने निवडलेले संगीत कोणते तर पॉप संगीत. कोण ते तुम्ही ओळखलंच असेल… उषा उत्थुप. डिस्को गाणी... रंभा हो... किंवा मग हरी ओम हरी किंवा कोई यहाँ नाचे नाचे… यांसारखी गाणी गाऊन त्यांनी पॉप संगीताला एक वेगळी ओळख दिली आणि आपल्या दमदार आवाजाने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. चेहऱ्यावर नेहमी हसू असणाऱ्या उषा उत्थुप यांच्यावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती जानी चाको उत्थुप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या दु:खाच्या काळात चाहते उषा उत्थुप यांना धीर देत आहेत.
दरम्यान, उषाजींच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्सेही शेअर केले जात आहेत. त्यांची लव्हस्टोरी, त्यांची संगीत कारकीर्द, त्यांचा टिपिकल भारतीय लुक अन् त्यांची मोठी टिकली... परंतु तुम्ही कधी त्यांच्या टिकलीकडे लक्ष देऊन पाहिले आहे का? त्यांच्या टिकलीवर क हे अक्षर लिहिलेले असते. अर्थात या अक्षराचा आणि उषाजींचा काय संबंध आहे, हे आपण जाणून घेऊया.
तुमच्या क्वचितच लक्षात आले असेल, पण उषा उत्थुप नेहमी 'क ' अक्षरापासून सुरू होणारी टिकली लावतात. आणि असे करण्यामागचे कारण देखील खूप मनोरंजक आहे. अनेकदा एखाद्याच्या नावाचा टॅटू काढल्यावर किंवा काहीतरी घालण्यामागे त्याच्या जवळच्या व्यक्तीशी संबंध असतो, पण उषा उत्थुप यांच्या बाबतीत प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे. ना त्यांचे नाव क ने सुरू होते, ना त्यांच्या पतीचे किंवा मुलांचे. मग त्या क अक्षर असलेली बिंदी का लावतात?
उषा उत्थुप या मूळच्या तमिळ भाषिक आहेत, परंतु त्या कोलकाताच्या सांस्कृतिक राजदूत मानल्या जातात. त्यांनी कोलकात्याची संस्कृती आपल्या कपाळावर बिंबवली आणि कपाळ सजवले आहे असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या टिकलीवर कोलकात्याचे पहिले अक्षर सजवले आणि कपाळावर लावले म्हणजेच त्यांच्या बिंदीवर लिहिलेले 'क' अक्षर कोलकात्याचे प्रतिनिधित्व करते.
काल जेव्हा सर्वांच्या आवडत्या गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन झाल्याची बातमी आली, तेव्हा सोशल मीडियावर लोक त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करत आहेत आणि या कठीण काळात त्यांना धीर देत आहेत.