क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या "धर्मवीर -२" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की' या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे. "धर्मवीर - २" हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
"धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच "धर्मवीर - २" चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते . "धर्मवीर - २" च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता "धर्मवीर - २" मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात… त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!' अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळते. त्यामुळे आता चित्रपटाविषयी तीव्र उत्सुकता निर्माण होत आहे. मात्र त्यासाठी आपल्याला ९ ऑगस्टची वाट पहावी लागणार आहे