अलाना पांडे आई झाली आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे मावशी झाली आहे. अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे हिने गोंडस बाळासा जन्म दिला आहे. अलाना ही चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडे आणि डॅनी पांडे यांची मुलगी आहे. अलान व आयव्हर मॅक्रे आई-बाबा झाले आहेत. अलानाने तिच्या इन्स्टाग्रामवर बाळाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अलानाने फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर आयव्हर मॅक्रे याच्याशी १६ मार्च २०२३ रोजी मुंबईत लग्न केलं होतं. आता लग्नानंतर १५ महिन्यांनी अलाना आई झाली आहे. अलानाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. “अवर लिटिल एंजल इज हिअर” असं कॅप्शन देत अलानाने व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती बाळाला कुशीत घेऊन दिसतेय. नंतर व्हिडीओत ती पती आयव्हरला किस करताना दिसते.
अलानाच्या या व्हिडीओवर बिपाशा बासू, अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप, सीमा सजदेह यांच्यासह चाहत्यांनी कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. अलानाने फेब्रुवारी महिन्यात ती आई होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर ती सातत्याने तिच्या बेबी बंपचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असायची. अलानाने तिला मुलगा होणार असल्याचंही फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं. अलानाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईतील तिच्या घरी पार पडला होता. त्यावेळी अनेक बॉलीवूड कलाकार या कार्यक्रमाला गेले होते.
अलानाने व्हिडीओ शेअर करून तिला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं होतं. अलाना पतीबरोबर लॉस एंजेलिसमध्ये राहते. अमेरिकेत बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे बेकायदेशीर नाही. त्यामुळेच अलानाने या व्हिडीओमध्ये मुलगा होणार की मुलगी ते सांगितलं होतं. आता तिची प्रसूती झाली असून तिने मुलाबरोबरचा एक गोंडस व्हिडीओ शेअर केला आहे.
अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. २९ वर्षीय अलाना आधी लिव्ह इनमध्ये राहत होती, त्यानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला व मुंबईत लग्न केलं. तिच्या लग्नाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)