Close

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने ‘लाईफलाईन’ मधील व्यक्तीरेखेच्या पोस्टरचे अनावरण (On The Occasion Of Doctor’s Day, Poster Of The Character In ‘Lifeline’ Movie Released)

जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे पोस्टर बघून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील संघर्षमय जुगलबंदी पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंबईत साजऱ्या करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स डे सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते.

अशोक सराफ यांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला. या कार्यक्रमात अशोक सराफ आणि डॉक्टर अशी 'फॅन मुमेंट'ही पाहायला मिळाली. यावेळी डॉक्टरांच्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे काय महत्त्व आहे, हे सुद्धा त्यांनी यावेळी विशद केले. तसेच 'लाईफलाईन' चित्रपट पाहण्याचे आवाहनही अशोक सराफ यांनी केले.

आपल्या भूमिकेबद्दल आणि राष्ट्रीय डॅाक्टर दिनाबद्दल अभिनेते अशोक सराफ म्हणतात, ‘’ आज या प्रख्यात डॉक्टरांसोबत हा दिवस साजरा करता आला, हे मी माझे सौभाग्य मानतो. माझ्या आगामी चित्रपटामुळे मला हा क्षण अनुभवता आला. ‘लाईफलाईन’ या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा या खास दिनानिमित्ताने समोर आली असून मी यात एका डॅाक्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे. मुळात या क्षेत्राबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि या चित्रपटामुळे हा आदर अधिकच वाढला आहे. ही भूमिका साकारताना मला डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता, त्यांना करावा लागणारा विविध गोष्टींचा सामना, विरोध या सगळ्या गोष्टी मला या व्यक्तिरेखेमुळे अनुभवता आल्या. प्रत्येक गोष्टीमागे काही विज्ञान असते, हे रीतिरिवाजांमध्ये गुरफटलेल्यांना पटवून देणे किती जिकिरीचे काम आहे, हे मला या चित्रपटातून समजले.''

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट. राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Share this article