तंत्रज्ञानावर आधारित 'गूगल आई' हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक जबरदस्त टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत 'गूगल आई'ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले असून डॉलर्स दिवाकर रेड्डी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अतिशय रोमांचक असा हा टिझर रहस्यांनी भरलेला आहे.
टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून 'गूगल आई' या कुटुंबाला कसे बाहेर काढते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. दरम्यान हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट असून यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, "एका लहान मुलीची ही कथा आहे, जी संकटात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला 'गूगल आई' कसे बाहेर काढते. आता हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.'