Close

झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय मालिकांमधे पाहायला मिळणार वटपौर्णिमा विशेष भाग…(Vat Purnima Special Episodes In Marathi Serials Zee Marathi)

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'शिवा', 'पारू', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांमध्ये 'वटपौणिमा विशेष भाग' पहायला मिळणार आहे.

वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकांमध्येही साजरा होणार आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघंही घर सोडून नवीन संसार सुरू करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने वट सावित्रीचा उपवास केला आहे. अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपतीदेखील पूजेमध्ये तिच्यासोबत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या दोघांवर एक विशेष गाणंदेखील चित्रित झालं आहे.

'नवरी मिळे हिटलरला'मध्ये दुर्गा, कालिंदीसमोर जहागीरदार घराण्याच्या एका अशा प्रथेचा उल्लेख करते ज्यामध्ये जर नव्या नवरीने वडाच्या झाडाला १००१ फेऱ्या मारल्या तर संसार सुखाचा होतो. कालिंदीच्या मनात ती गोष्ट घर करून आहे आणि ती लीलाकडून १००१ फेऱ्या मारून घेण्याचा निश्चय करते. फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडते. आता अभिराम यात लीलाला कशी साथ देतो हे पाहणं रंजक असणार आहे.

'पारू' मालिकेत अहिल्यादेवी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांसाठी जेवण बनवायचं ठरवते. तर दुसरीकडे कोणाच्याही नकळत पारू वडाच्या झाडाची पूजा करायचं ठरवते. वटपौर्णिमेच्या दिवशी पारू आदित्यच्या ताटातलं उष्ट जेवण जेवते. हे सगळं सावित्री पाहते. पारूचं सत्य सावित्रीसमोर येईल का हे मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

'शिवा'च्या पहिल्या वट सावित्रीसाठी रामभाऊ आणि संपूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरूवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण यात आशूवर वार होतो.  तिकडे  शिवा आशूच्या मदतीला येते. वट सावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा या गुंडांपासून कशी करणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये वसुंधरा आपल्या जुन्या नात्यांच्या धाग्यांना तोडून आकाशसोबत एक नवीन विश्व उभारण्याचा निर्णय घेईल का हे या वटपौर्णिमा विशेष भागात मिळणार आहे. हा मोठा निर्णय घेत असताना वसुंधराचा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share this article