बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘स्त्री’ने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवलं. २०१८ पासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वी ‘स्त्री २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
श्रद्धाबद्दल सांगायचं झालं, तर बॉलीवूड अभिनेते शक्ती कपूर यांची ती लेक आहे आणि अभिनेत्रीची आई मराठी आहे. त्यामुळे श्रद्धाला छान असं मराठी बोलता येतं. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या ती संपर्कात असते. नुकतीच एका मराठी अभिनेत्रीची श्रद्धाने भेट घेतली. एवढंच नव्हे तर भेट घेतल्यावर श्रद्धाने या अभिनेत्रीसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
“मला काल रात्री एक गोडुली पोरगी भेटली” असं कॅप्शन देत पुढे श्रद्धाने या मराठी अभिनेत्रीला टॅग केलं आहे. शिवाय कॅप्शनच्यापुढे लव्ह इमोजी देखील जोडले आहेत. श्रद्धा कपूरने कौतुक केलेल्या या अभिनेत्रीने नुकतंच ‘मुंज्या’ चित्रपटात काम केलं आहे. तिचं नाव आहे भाग्यश्री लिमये. ‘मुंज्या’च्या स्क्रिनिंग दरम्यान सध्या ‘स्त्री २’चा टीझर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे या अभिनेत्रींची भेट झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाग्यश्रीने यापूर्वी ‘घाडगे अँड सून’, ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती युट्यूबवरील अनेक शॉर्ट सीरिजमध्ये काम करते.
श्रद्धा कपूरशी भेट झाल्यावर भाग्यश्रीने एक स्टोरी शेअर केली होती. “मी या गोड मुलीला काल रात्री भेटले” असं कॅप्शन देत भाग्यश्रीने श्रद्धाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता. यामध्ये श्रद्धा कपूर “माझं नाव श्रद्धा आहे” असं मराठीत बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. हीच स्टोरी रिशेअर करत श्रद्धाने मराठमोळ्या भाग्यश्रीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, याशिवाय श्रद्धा कपूरने नुकताच तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबर फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अभिनेत्रीने पहिल्यांदाच दोघांचा एकत्र फोटो शेअर केल्याने त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.