बॉलीवुड मध्ये स्वतःला सतत कार्यरत ठेवण्यासाठी कलाकारांना स्वतःला फिट ठेवणे अतिशय गरजेचे असते. बऱ्याचदा भूमिकेची गरज असेल त्याप्रमाणे त्यांना स्वतःच्या वजनात चढउतार करावा लागतो. चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत की जे स्वतःला फिट ठेवण्यासाठी कसून प्रयत्न करताना दिसतात. त्यापैकी काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेऊया की ज्यांनी फिट राहण्यासाठी जिममध्ये घाम गाळला आहे, शिवाय काही वेळा आपल्या आवडीचे पदार्थही खाणे बंद केले आहे.
कार्तिक आर्यन - बॉलीवुड ॲक्टर कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘चंदू चैंपियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसने चाहत्यांचे मन जिंकले आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने सिक्स पॅक ॲब्स बॉडी बनवली असून त्यासाठी त्याला त्याच्या डाएटमधून साखरेला दूर ठेवावे लागले होते. पण चित्रपटाचं शुटिंग संपताच कार्तिकने गुलाबजाम खाऊन त्याचं हे व्रत सोडलं.
मनोज बाजपेयी – मनोज बाजपेयीने त्याच्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळी पात्रं साकारली अन् आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे. अभिनयाबरोबरच मनोज बाजपेयी स्वतःच्या फिटनेसची देखील तितकीच काळजी घेतो. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, फिट राहण्यासाठी मागील १४ वर्षांपासून त्याने रात्रीचं जेवण सोडले आहे.
गुरमीत चौधरी – टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासून बॉलीवूडमध्ये जाणारा गुरमीत चौधरी देखील फिटनेसच्या बाबतीत नेहमी चर्चेत असतो. फिटनेससाठी तो स्वतःच्या दैनंदिनीकडे कटाक्षाने लक्ष देतो. अलिकडेच त्याने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना सांगितले होते की त्याने १५ वर्षांपासून समोसा खाल्लेला नाही.
दीपिका पादुकोण – बॉलीवुडची मॉम टू बी दीपिका पादुकोण देखील फिटनेसच्या बाबत अतिशय दक्ष असते. शारीरिक तंदुरुस्तीकरीता तिने भात खाणे सोडले असल्याचे ती नेहमीच सांगत असते.
सोनम कपूर – अभिनेत्री सोनम कपूर फॅशन सेन्ससोबतच फिटनेससाठीही सुपरिचीत आहे. फिट राहण्यासाठी सोनमने तिचा अतिशय आवडीचा पदार्थ त्यागला आहे. सोनमला योगर्ट अतिशय आवडते. परंतु ते तिच्या पोटाला नुकसान पोचवते त्यामुळे तिने ते खायचे सोडले आहे.