करण जोहरने आपला आगामी चित्रपट किलच्या संदर्भात नवा अपडेट शेअर केला आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतरच या ॲक्शन थ्रिलरबद्दलची उत्सुकता वाढली आहे. शेवटी करणने चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे सांगितले आहे. या चित्रपटामध्ये लक्ष्य लालवानी सोबत तान्या मानिकतला आणि राघवन जुयल देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत.
'मिस्टर अँड मिसेज माही' याची क्रेझ अजून संपत नाही तोवर करण जोहरने आपल्या आगामी किल चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाबाबत वाद निर्माण झाला होता. चित्रपटाची घोषणा कधीच झालेली असली तरी आता त्याबद्दलची अपडेट समोर आली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची ही एक ॲक्शन थ्रिलर निर्मिती आहे.घोषणेनंतर चित्रपटातील एकापेक्षा एक खतरनाक पोस्टर प्रदर्शित करून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जात आहे. याचा टीझरही जास्त मोठ्या प्रमाणात पसंत केला गेला होता.
टीझरनंतर ट्रेलरबद्दलची आतुरता नक्कीच वाढलेली आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु ट्रेलरपुर्वी करणने प्रेक्षकांना सल्ला दिला आहे. ही भारतातील सर्वाधिक हिंसक फिल्म असल्याचे त्याने म्हटले आहे. किलचे पोस्टर्स शेअर करत असताना दिग्दर्शकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, भारतीय सिनेमाची आत्तापर्यंतची सर्वाधिक खुनशी यात्रा अनुभवण्यासाठी तयार व्हा. या चित्रपटातील काही हिंसक प्रसंगांमुळे प्रेक्षकांना त्रास होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच हा चित्रपट पाहावा, असे त्याने म्हटले आहे.
किलचे दिग्दर्शन निखिल नागेश भट्ट यांनी केले असून त्यांनीच चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट सगळ्या चित्रपटगृहांमध्ये ५ जुलै २०२४ला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक अन् चाहते चित्रपटाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत.