- शं.रा. पेंडसे
अविनाशचे सारे व्यवहार व्यवस्थित चालू होते. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठंही विसंगती नव्हती. आपण काहीतरी लपवून ठेवतो आहोत. एखादी गोष्ट उघडकीस येऊ न देण्याचा आटापिटा करतो आहोत असं काहीही त्याच्या चेहर्यावर दिसत नव्हतं.
सा रे पुरुष एकजात बिलंदर असतात. बायकांना कसं बनवायचं हे सगळ्यांनाच चांगलं जमतं. आता तुम्ही म्हणाल आमचे “हे” चेहर्यावरून किती भोळे वाटतात. बोलणं चालणं आदबशीर आहे. माणूस पाहिलात तर इतका साधा भोळा, गरीब गाय वाटतो, पण हा माणूससुद्धा इतका बेरकी असेल असं सांगूनसुद्धा कोणाला खरं वाटणार नाही. त्या दिवशी शेजारच्या नीमाताईंना ह्यांचा तो किस्सा मी सांगितला तर म्हणतात कशा, “कशाला बिचार्या अविनाशरावांवर असला आळ घेता? असं कधी तरी ते करतील का? नाकासमोर बघून सरळ चालणारा तो माणूस!”
आमच्या सोसायटीत “ह्यांची” ख्याती एक सालस, प्रेमळ, निरुपद्रवी, सरळ मनाचा माणूस अशी आहे. पण कसचं काय?? त्या दिवशी काय झालं. एक अनोळखी गृहस्थ ह्यांचा पत्ता शोधीत आमच्या घरी आले. अविनाश कचेरीत गेलेले होते. मी जेव्हा ते घरी नाहीत असं सांगितलं तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, “अहो, त्यांचा पास आणि पाकीट गाडीत मारलं गेलं होतं का?”
मी झटकन नाही म्हटलं. कारण आपलं पासपाकीट हरवल्याचं अविनाश कधीही माझ्याजवळ बोलले नव्हते.
“अहो असं कसं होईल? त्यांचं हरवलेलं पास पाकीट मला दोन दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये सापडलं आहे. बाकड्याच्या खाली पडलेलं होतं.”
मी एकदम आश्चर्यचकीत झाले, ‘’अहो तुमचं काहीतरी चुकतय. ते पाकीट अविनाशचं नसेल. दुसर्याच कोणाचं
तरी असेल.”
आपल्या बॅगमधून एक पाकीट काढून माझ्या समोर ठेवीत ते म्हणाले, “हे बघा, हे तुमच्या मिस्टरांचेच
आहे ना?”
मी पाकीट बघितलं. ते तर यांचंच होतं. आत पास होता. काही कागद, रिसिट्स होत्या. एक रुपयाची
नोट होती.
“पाकीट मारल्यावर चोरटे पैसे काढून घेतात आणि रिकामं पाकीट तसंच गाडीत फेकून देतात… तसं हे मारलेलं पाकीट आहे.” ते
गृहस्थ म्हणाले.
मी त्या गृहस्थांना बसा सुद्धा म्हटलं नव्हतं. खुर्ची पुढे सरकवीत मी त्यांना बसा म्हटलं. “अहो, हे तर ह्यांचंच पाकीट आहे. तुम्हाला कुठे सापडलं?”
आलेल्या गृहस्थांना ठाणे दादर लोकलमध्ये एका बाकाखाली ते पाकीट मिळालं होतं. ठाण्याचा पास पाहून त्यांची उत्सुकता जागृत झाली होती. पत्ता वाचल्यानंतर ते गृहस्थ त्याच भागात राहत असल्यामुळे स्वतःहून ते हरवलेलं पाकीट घेऊन आमच्या घरी आले होते.
मी ते पाकीट ठेवून घेतले आणि त्या गृहस्थांचे आभार मानले.
माझं चित्त काही कामात लागेना. दोन दिवसांपूर्वी अविनाशचं पाकीट गाडीत मारलं गेलं तरी ती गोष्ट त्यांनी मला सांगितली कशी नाही. आज सकाळी सुद्धा ऑफिसमध्ये जाताना ते पासपाकीटचा मंत्र म्हणून कचेरीत गेले.
हे कोडं काही केल्या मला सुटेना. मी पुन्हा पुन्हा ते पाकीट उलटं सुलटं करून पाहिले. ते अविनाशचंच होतं. आत अविनाशच्या सहीचाच आणि संपूर्ण पत्ता असलेला रेल्वेचा पास होता. आयडेंटिटी कार्ड होतं वर अविनाशचा फोटो होता. आत एक लॉन्ड्री रिसिट होती. औषध खरेदीच्या दोन पावत्या होत्या. आणि एक रुपयाची एक नोट होती. म्हणजे पाकीटमाराने आतले पैसे काढून पाकीट तसंच लोकल ट्रेनमध्ये फेकून दिलं होतं. तेच या गृहस्थांना सापडलं होतं आणि ते त्यांनी आमच्या घरी आणून दिलं होतं. आता या कोड्याचा उलगडा फक्त हेच करू शकणार होते.
संध्याकाळी अविनाश घरी आल्यावर चहाचा कप पुढे करताना मी त्यांना म्हटलं,“अविनाश, तुमचं पाकीट गाडीत मारलं गेलं की काय?”
माझ्या प्रश्नाने अविनाश एकदम दचकले. “पाकीट? कुणी मारलं?… आणि तुला कोणी सांगितलं?”
आपण त्या गावचेच नाही अशा आर्विभावात अविनाश स्वतःला सावरून घेत म्हणाले,
“अविनाश, कुणी सांगितलं नाही… म्हटलं गाडीमध्ये पाकीट मारण्याच्या अनेक घटना हल्ली घडताहेत. सावध करण्याच्या दृष्टीनं म्हटलं!” मी कावेबाजपणे डाव खेळायला सुरुवात केली.
आता मात्र अविनाश सावरले, “अंजली, अग माझं पाकीट मारणारा अजून जन्माला यायचा आहे.”
“अविनाश, आता इतर नवर्यांप्रमाणे तू धांदरट नाहीस, विसराळू नाहीस, गाफील नाहीस. एकदम मान्य! अरे नेहाच्या नवर्याला दर पंधरवड्याला नवीन बॉलपेन लागतं… नेहमी कुठंतरी बॉलपेन विसरतो. आणि त्या मेघनाच्या नवर्याची तर कमालच आहे. कुठे तरी डोळेच विसरून आला.”
“डोळे विसरला? काय सांगत्येस काय तू अंजू?” अविनाश आता पूर्ण सावरला होता. “अरे, मेघनाच्या नवर्याचा चष्मा कुठेतरी हरवला. चार दोन ठिकाणी कुठंतरी फोन केला तेव्हा कुठं पत्ता लागला.” मी म्हटलं.
“अग, तुला यापासून मला काय सांगायचं आहे?” अविनाशच्या मनात अजूनही कुठेतरी पाल
चुकचुकत होती.
“अविनाश मला हेच सांगायचं होतं की तू त्या नवर्यांसारखा नाहीस. म्हणजे तुझं पाकीट मारलं जाणं शक्यच नाही.” खरं म्हणजे हे बोलायला मला किती यातना झाल्या असतील, पण माझ्या या वक्तव्यावर आनंदाने उसळी मारून अविनाश म्हणाला, “आता कसं करोडपतीमधल्या कॉन्फीडन्ट उत्तरकर्त्या सारखं बोललीस? मी म्हणजे काय असा तसा नवरा आहे का?” अविनाशने टी.व्ही. सुरू केला आणि हा विषय तिथंच संपवला.
दुसर्या दिवशी अविनाश कचेरीत गेला आणि मी पुन्हा विचारात पडले. आता “कॉन्फीडन्ट” अविनाश होता की मी हाच माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. मी परत ते पाकीट काढलं. हे पाकीट तर बनावट नसेल ना? पण अविनाशचं बनावट पाकीट करण्याची कुणाला गरजच काय? आणि रेल्वेचा तो तीन महिन्यांचा पास! माझी मीच गोंधळून गेले.
अविनाशचे सारे व्यवहार व्यवस्थित चालू होते. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठंही विसंगती नव्हती. आपण काहीतरी लपवून ठेवतो आहोत. एखादी गोष्ट उघडकीस येऊ न देण्याचा आटापिटा करतो आहोत असं काहीही त्याच्या चेहर्यावर दिसत नव्हतं. त्यानंतर तीनचार दिवसांची गोष्ट. मित्राने हाक मारल्याने अविनाश बाहेर गेला होता. तेवढ्यात राधा मावशी गोडा मसाला घेऊन आल्या. त्यांना द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. म्हणून अविनाशची बॅग मी उघडली. त्याचं पाकीट बाहेर काढलं. पैसे काढून राधा मावशींना दिले. त्या गेल्यावर सहज त्या पाकीटातून अविनाशचा पास काढून बघितला. तो त्याने चार दिवसांपूर्वींच काढला होता. पासकरिता लागणारं फोटो आयडेंटिटी कार्ड बघितलं ते तर नवीन होतं. त्यावर आणि पासवर तारीख एकच होती.
माझ्यातला पोलीस जागा झाला. नाहीतरी एका सीआयडी ऑफिसरची मी मुलगी होते. पोलीस तपासाच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य गोष्टी मी वडिलांच्या तोंडून ऐकल्या होत्या. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. नेमका चार दिवसापूर्वीच अविनाशने रेल्वे पास का काढावा? बरं रेल्वे पास पूर्वीचा संपल्यामुळे काढला तर समजू शकते पण तो मिळण्यासाठी लागणारं फोटो आयडेंटीटी कार्ड त्यानं नवीन का काढावं? ते कार्ड काही दरमहा बदलावं लागत नाही. चांगलं पाच वर्षे चालतं. मग अविनाशने पास काढण्याकरिता लागणारं फोटो आयडी नवीन का काढलं? या प्रश्नाचं सरळ उत्तर असे होते की, पाकीट मारलं गेल्यानं रेल्वे पास आणि फोटो आयडी कार्डही हरवलं. नवीन पास काढणं जरूरीचं होतं नाहीतर रोज कामावर जायचं कसं आणि पास काढायचा म्हणजे फोटो आयडी कार्ड दाखवणं जरूरीचं होते. म्हणून अविनाशने त्याच दिवशी नवीन आयडी कार्डही काढले आणि त्यानंतर रेल्वेचा नवीन पास काढला. माझ्याजवळ असलेल्या पाकीटातला पास मी पाहिला. तो संपायला अजून वीस दिवस शिल्लक होते. म्हणूनच त्याने पास व आयडी कार्ड नवीन काढले होते. आणि तेही मला थांगपत्ता लागू न देता. त्याला काय कल्पना आपण झाकलेलं हे ‘कोंबडं’ अगदी त्याच्याच अंगणात हजर होईल.
झटकन एक कल्पना मनात आली. त्या गृहस्थांनी आणून दिलेले पाकीट मी अविनाशच्या बॅगेत ठेवून दिलं. अगदी जुन्या पास आणि आयडी कार्डसहीत. आता मोठी गंमत होणार होती. कारण अविनाशच्या बॅगेत दोन पाकीटं होती. दोन्ही पाकीटात रेल्वेचे पास होते.
माझी योजना हळूहळू पुढे येत होती. अविनाश आल्याबरोबर मी त्याचं पान वाढलं. जेवताना जणू काही झालेलंच नाही अशा थाटात मी वावरत होते. डायनिंग टेबलावर लाल गाजर पडलेलं होतं. गाजराचा एक एक तुकडा चावत चावत अविनाशची उलट तपासणी घ्यावी असा मोह मला झाला. पण तो मी आवरला.
जेवण झाल्यावर बडीशेप चघळीत अविनाश कोचावर बसला आणि पेपर चाळू लागला. तेव्हा मी अविनाशला म्हटलं, “अविनाश, अरे तुझ्या पाकीटाला ‘बाळ’ झालंय. तुझ्या बॅगेत एक नाही चांगली दोन पैशांची पाकीट आहेत. ”अविनाश असा चरकला म्हणून सांगू!
“काय बडबडतेस काय तू हे? तुला तरी अर्थ कळतोय का त्याचा?” अविनाश त्रासिकपणे म्हणाला.
“अरे, मला अर्थ कळतोय की नाही किंवा तुला कळत नाही याच्यावर वादविवाद कशाला. प्रत्यक्ष बॅग उघडून बघ ना!” मी म्हटलं.
अविनाश झटक्यात उठला आणि त्याने बॅग उघडली. बॅगेत दोन पाकीटं पाहताच त्याचा चेहरा साफ पडला. दुसरे पाकीट त्याने नीट न्याहाळले. आत पैसे नव्हतेच. काही रिसिट्स होत्या आणि एक रुपयाची एक नोट. रेल्वेचा पास आणि आयडी कार्ड…
‘’कुठं मिळालं तुला हे पाकीट?” माझ्या नजरेला नजर न देताच अविनाशने विचारले.
“आधी कबूल कर तुझं पाकीट गाडीमध्ये मारलं गेलं म्हणून.”
“अग, गाडीमध्ये कुणाची पाकीटं कधी मारली जात नाहीत का?” अविनाशने घुश्श्यातच विचारलं.
“अविनाश, मी असं एकदा तरी म्हटलं आहे का? खिशात पाकीट असलं तर कधीतरी मारलं जाऊ शकतं. हे त्रिवार सत्य आहे.” मी समजावणीच्या स्वरात म्हटलं.
“त्या दिवशी बॅग घेऊन गेलो नाही. त्यामुळे हा सारा घोटाळा झाला.”
“म्हणजे त्या दिवशी रेल्वे गाडीमध्ये तुझं पाकीट मारलं गेलं आणि आजपर्यंत तू हे माझ्यापासून लपवून ठेवलंस.” माझ्या आवाजाला धार येत होती. “तुला काय वाटलं ही भोळसट बाई अशी तशी बनेल. अरे, सत्य केव्हातरी उघडकीला येतं. तू नसताना एक सद्गृहस्थ येऊन तुझं गाडीत पडलेलं रिकामं पाकीट मला देऊन गेले, म्हणून मला याचा पत्ता तरी लागला.”
अविनाश खजील होऊन समोर उभा होता. “अंजू प्लीज मला माफ कर.”
मीही मुद्दाम म्हटले, “क्षमा नाही. मुळात ही अशी बनवाबनवी तू केलीसच का? सरळ सांगितलं असतंस अंजू, माझं पाकीट रेल्वेत मारलं गेलं. पाकीटात पाचशे रुपये होते.”
“अंजू तुला कसं कळलं पाचशे रुपये होते ते.” इति अविनाश.
“अरे, त्या चोराने मला फोन केला की तुमच्या मिस्टरांच्या पाकीटात पाचशे रुपये होते म्हणून. अविनाश, तुम्ही नवरे इतके बुद्धु कसे असता रे? अरे, मी खडा टाकला. कमी असते तर तू झटकन म्हणाला असतास अंजू, अग एवढे पाचशे रुपये मी पाकीटात कशाला ठेवीन. फक्त शंभर दिडशे रुपयेच होते.”
“अंजू खरंच मला माफ कर. यापुढे तुझ्यापासून मी काहीच लपवणार नाही. अग, मला कल्पाना नव्हती एवढ्या अफाट गर्दीत फेकलं गेलेलं पाकीट माझ्या घरी परत मिळेल. म्हणून तुला या गोष्टीचा छडा लागू न देण्याचा मी प्रयत्न केला.”
म्हणूनच कोणीतरी म्हटलंच आहे सारे पुरुष एकजात बिलंदर असतात.
ते हे असे.
Link Copied