भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. मसाल्यांच्या पिकांमध्ये मिरी, दालचिनी, वेलची, लवंग, आलं, हळद इत्यादी पिकांना मानाचं स्थान आहे. आलं हेदेखील एक महत्त्वाचं पीक आहे. भारतामध्ये आल्याचा वापर कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र केला जातो. त्यामुळे आल्याची लागवड ही जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत केली जाते. आलं जेवणात वापरलं जातंच; पण आल्याचे औषधी गुणधर्म हे अगदी आयुर्वेदापासून सांगितले जातात. आल्याचं आयुर्वेदातील स्थान महत्त्वाचं आहे. आल्याचा वापर मुख्यत: सर्दी, खोकल्यावरील औषधं; तसंच पेय बनवण्यासाठी, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे आल्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आल्याचा वास व तिखटपणा आल्हाददायक असतो. आलं पाचक असल्याने अनेक पदार्थात आल्याचा उपयोग करतात. > आल्याचा किंवा सुंठीचा काढा पाच मिनिटं पाण्यात उकळून करतात. या उष्ण पेयामुळे रक्ताभिसरण सुधारतं. सर्दी, पडसे नाहीसं होतं. डोकेदुखी थांबते. आल्यात जंतुनाशक व उत्तेजक गुणधर्म आहेत. आल्याच्या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यातदेखील केला जातो. अतिसार झाल्यास आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. > आल्याचा रस व मध समप्रमाणात बाटलीमध्ये साठवून 2-2 चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात. > अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावं. आलं तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. > आल्याच्या सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ या विकारात उपयोगी आहे. आल्यामुळे चहा सुगंधी व स्वादिष्ट बनतो. आल्यामुळे चहातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं.
Link Copied