उकाड्यामुळे घामेजलेल्या, तेलकट, चिकचिकीत झालेल्या चेहर्यावर सुंदर दिसेल असा मेकअप करणं आणि तो टिकवून ठेवणं, हे महाकठीण काम असतं. मात्र मेकअप करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर काही खबरदारी घेतली, तर उन्हाळ्यातही मेकअप आकर्षक दिसू शकतो आणि तो अधिक काळ टिकूनही राहू शकतो.
उन्हाळा म्हणजे सुर्याचा तळतळाट… आणि लग्नसमारंभांचा सुळसुळाट. एका बाजूला उकाड्यामुळे शरीर घामेजलेलं, तेलकट, चिकचिकीत झालेलं असतं आणि त्यातच अनेक लग्नसमारंभांच्या निमंत्रण पत्रिका घरात दाखल होतात. आता लग्नसमारंभाला जायचं, म्हणजे मेकअप आलाच. एक तर या अशा चिकचिकीतपणामुळे मेकअप करायची मुळी इच्छाच होत नाही आणि केला तरी, तो करायला जितका वेळ लागतो, तितका वेळही टिकत नाही. कारण उन्हाळा म्हणजे, उकाडा… उकाडा म्हणजे घाम… आणि घाम म्हणजे मेकअपचे तीनतेरा!
उकाड्यामुळे त्वचेमध्ये निर्माण झालेल्या अतिरिक्त तेलामुळे मेकअप संदर्भात अनेक समस्या उभ्या राहत असतात. मात्र मेकअप करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर काही खबरदारी घेतल्यास उन्हाळ्यातही मेकअप आकर्षक दिसू शकतो आणि अधिक काळ टिकूनही राहू शकतो. त्याकरिता या टिप्स तुम्हाला मदतनीस ठरू शकतात.सनस्क्रीन
मेकअप आकर्षक दिसावा असं वाटत असेल, तर आधी त्याचा पाया अर्थात त्वचा चांगली राहील, याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये त्वचा काळवंडण्याची शक्यता अधिक असते. त्वचेचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क आला, तर सनबर्न होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी सनस्क्रीनला पर्याय नाही. प्रत्येक तीन तासांनंतर चेहर्यावर सनस्क्रीन लोशन लावल्यास, त्वचेचं नुकसान होत नाही, तेव्हा हा नियम अवश्य पाळा.
फाउंडेशन
उन्हाळ्यातली सर्वांत महत्त्वाची आणि अगदी मूलभूत मेकअप टीप म्हणजे, फाउंडेशनचा वापर टाळणं. उन्हाळ्यात फाउंडेशन लावण्यापेक्षा एखादं हलकं क्रीम लावा. त्वचेच्या रंगाचं मॉइश्चरायझर लावता येईल. गरज असेल तिथे, त्वचेवरील डाग लपवण्यासाठी टिंटेड कन्सिलरचा वापर करा. फाउंडेशनचा वापर टाळणं शक्य नसेल, तर फाउंडेशन लावण्यापूर्वी चेहर्यावर प्रायमर लावा. त्यानंतर कमीत कमी फाउंडेशन लावा. उन्हाळ्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात फाउंडेशन लावण्याचा मूर्खपणा मुळीच करू नका. त्यानंतर कॉम्पॅक्ट किंवा सेटलिंग पावडर लावा.
आयशॅडो
उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक समस्या असते, ती डोळ्यांच्या मेकअपसंदर्भात. उष्णतेमुळे बरेचदा आयशॅडोच्या खपल्या होऊ लागतात. हे टाळण्यासाठी सिलिकॉन-बेस्ड किंवा प्रेस पावडर आयशॅडो वापरा. त्याआधी आयशॅडो प्रायमरचा वापर करा. त्यामुळे कन्सिलर सुरकुतल्यासारखा दिसणार नाही, अधिक काळ टिकून राहील आणि आयशॅडोचा रंगही आकर्षक दिसेल.
मस्कारा
घामामुळे बरेचदा मस्कारा डोळ्यांभोवती पसरतो. हे टाळण्यासाठी मस्कारा लावण्यापूर्वी डोळे बंद करून, पापण्यांवर थोडी ट्रान्सलुसेंट पावडर भुरभुरा. नंतर मस्कारा लावा. यामुळे मस्कारा पावडरला चिकटून राहील आणि अधिक काळ टिकूनही राहील. शिवाय त्यामुळे पापण्या भरीवही दिसतील. त्यातही वॉटरप्रूफ मस्कारापेक्षा वॉटर-रेझिस्टंट मस्कार्याचा वापर करा.
लिपस्टिक
उन्हाळ्यामध्ये लिपस्टिक लावली की, थोड्या वेळाने ती डागाळलेली दिसते. हे टाळण्यासाठी लाँग लास्टिंग, अर्थात अधिक काळ टिकणार्या लिपस्टिकचा पर्याय योग्य ठरतो. त्यातही लिपस्टिक किंवा लिप ग्लॉसपेक्षा लिप स्टेनचा वापर करा. ते नैसर्गिक तर दिसतंच, शिवाय अधिक काळ टिकूनही राहतं. तसंच सर्वप्रथम ओठांवर फाउंडेशन लावा आणि नंतर लिपस्टिक लावा. त्यामुळे लिपस्टिक अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते. शिवाय ओठ आर्द्र दिसण्यासाठी लिपस्टिकवर वारंवार लिपबाम लावत राहा.
हेही लक्षात ठेवा
- चेहर्यावरील तेलकटपणा आटोक्यात आणण्यासाठी आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचा मास्क लावा.
- उन्हाळ्याला सुरुवात झाली की, वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करण्यावर भर द्या. लिपस्टिक, फाउंडेशन, आयलायनर इत्यादी सर्वांबाबतच वॉटरप्रूफ मेकअपचा पर्याय स्वीकारा. यामुळे लूक आकर्षक दिसेल, शिवाय मेकअपच्या खपल्याही उडणार नाहीत.
- मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि संपूर्ण चेहर्यावर एक बर्फाचा तुकडा फिरवा. नंतर चेहरा टिश्यूने टिपून घ्या आणि मेकअप करायला सुरुवात करा. यामुळे मेकअप चेहर्यावर अधिक काळ टिकून राहील.
- मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांना छान आकार देण्यासाठी, आयलॅश कर्लर थोडासा गरम करून, काळजीपूर्वक वापरा. पापण्यांच्या मध्यभागी आणि कडेला अशा प्रकारे दोनदा, अगदी काळजीपूर्वक त्याचा वापर करा. आयलॅश कर्लर गरम करण्यासाठी ब्लोअरचा वापर करता येईल.
- बॅगेमध्ये एखादा मेकअप स्पंज ठेवा, म्हणजे चेहरा सुरकुतल्यासारखा दिसू लागला, तर या स्पंजच्या साहाय्याने मेकअप स्मूथ करता येईल.
- स्वतःसोबत वेट वाइप्स किंवा ब्लॉटिंग पेपर्स, वेट टिश्यू बाळगा. प्रखर सूर्यप्रकाशामुळे अधिक प्रमाणात घाम येतो, चेहरा तेलकट होतो. चेहरा तेलकट होतोय, असं वाटलं की, या पेपरचा वापर करा. मुख्य म्हणजे, त्याने चेहरा घासू नका, फक्त टिपून घ्या.
- दिवसभर कडक उन्हात राहिल्यामुळे त्वचा थकल्यासारखी आणि निस्तेज दिसत असेल, तर चेहर्यावर मिस्ट स्प्रे करा आणि त्वरित ताजेतवाने व्हा. यासाठी चेहर्यावर मिस्ट स्प्रे करून, चेहरा ब्लॉटिंग पेपरने टिपून घ्या. चेहर्यावर छान चमक येईल.
उन्हाळा म्हणजे रंगांचा ऋतू. सौम्य, व्हायब्रंट रंगांचा ऋतू. त्यामुळे या ऋतूमध्ये मेकअपच्या बाबतीत रंगांसोबत खेळता येतं. त्यातही मेकअपच्या अॅक्वा, लव्हेंडर, पर्पल अशा रंगछटांमुळे उन्हाळ्यात अधिक आकर्षक लूक मिळवता येतो. या वातावरणात गडद रंगाचा मेकअप मुळीच शोभून दिसत नाही, हे लक्षात ठेवा.