Close

आमरसाचं महानाट्य… (Amrasa’s Grand Play…)

बायकोच्या बर्‍याच फोनाफोनी नंतर अगदी अस्सल आणि निवडलेल्या रसभरित हापूस आंब्याची सिझनची पहिली पेटी घरात येते आणि पाडव्यापासून सुरू होतो आमरसाचा एक भव्यदिव्य रसभरित सोहळा व उभं होतं पुढील दोन महिन्यांचं आंब्याचं अर्थात आमरसाचं महानाट्य…
होळी झाली की, पाडव्याचं आगमन होऊ लागतं… आणि त्याच वेळी वेध लागतात आंब्याचे… अर्थात आमरसाचे… खरं तर आमरसाची सुरुवात अक्षयतृतीयेपासून करतात; पण तोपर्यंत काही कळ निघत नाही…. जीभ आणि पोट अक्षरशः बंड करू पाहतं… इतक्या वर्षांत कोकणात बर्‍याचशा आढी आणि वाड्यावर आमच्या पत्नीच्या खूप ओळखी झालेल्या असल्याकारणाने तिकडून फोन/निरोप यायला सुरुवात होते. बायकोच्या बर्‍याच फोनाफोनी नंतर अगदी अस्सल आणि निवडलेल्या रसभरित हापूस आंब्याची सिझनची पहिली पेटी घरात येते आणि पाडव्यापासून सुरू होतो आमरसाचा एक भव्यदिव्य रसभरित सोहळा व उभं होतं पुढील दोन महिन्याचं आंब्याचं अर्थात आमरसाचं महानाट्य…
पेटीतले पहिले दोन आंबे देवाला प्रसाद म्हणून ठेवले की, अगदी आतुरतेने वाट पाहायची पाडव्याची… त्या दिवशी आमरसाचा श्रीगणेशा होतो.
सुवासाचं वैभव
त्या आधीच दोन दिवस घरात आंब्याच्या वासाचा घमघमाट असतो… बाहेरून घरात प्रवेश केल्यावर या सुवासाने मन प्रफुल्लित होतं… अशा या सुवासाचं वैभव छाती फुगवून मिरवायला जाम आनंद होतो…
मग येतो पाडवा… या दिवशी पहिला आमरस पुरीचा बेत. अक्षरशः एखाद्या युद्धाला जाण्याच्या आवेशात त्या वेळी आमरसावर तुटून पडण्यासाठी मी आतुर असतो…
म्हाळसा आमरस तयार करत असताना तिच्या चेहर्‍यावरचे भाव बघितले की, जाणीव होते की त्या आमरसात तिचा भाव, तिचं प्रेम, तिची माया, तिचं ममत्व सगळं सगळं उतरवत असतं…
चांगला घट्ट अस्सल हापूस आमरस तयार होतो… या वेळी आपण मात्र सज्ज असावं…देवाला प्रसादाचं ताट नैवेद्याला दिलं की, आपण आपली राजेशाही बैठक मारावी. ते टेबल खुर्चीवर बसून आमरस खाण्यात काही राम नाही. ते म्हणजे, निव्वळ अरसिकतेचं लक्षण… मस्त जमिनीवर मांडीबिंडी घालून फतकल मारावी…
अंगावर पांढरा शुभ्र बनियन आणि साधी विजार किंवा पायजमा असा साधा मोकळा ढाकळा ऐसपैस पोशाख असावा…

राजश्री पदार्थ
मस्त समोर ताट यावं. पुरी किंवा पोळी…एखादी चटपटीत, चमचमीत भाजी, कुरकुरीत पापड किंवा कुरडई, कुरकुरीत भजी… आणि चांगला वाडगाभर आमरस. आता हा वाडगा म्हणजे, कमीत कमी दोन वाट्या आमरस बसेल एवढा मोठा असावा. उगाच चिचुंद्य्रा वाटीत आमरस घेऊन या राजश्री पदार्थाचा अवमान करू नये. ताट समोर आलं की त्या घट्ट, रवाळ थंडगार आमरसावर घरातल्या चांगल्या कढत तुपाची धार सोडावी. आपल्या हाताच्या अनामिकेने ते तूप त्या वाडग्यातल्या आमरसात मिसळावं.
चुकूनही चमचा वापरू नये आणि यथेच्छ मिसळून झालं की, आमरसाने न्हालेलं ते बोट डोळे घट्ट मिटून तोंडात टाकावं आणि पहिल्यावहिल्या आमरसाच्या चवीचा स्वाद घ्यावा.
आमरसाची चव लागताच जिभेची रंध्रं-रंध्रं उत्तेजित होऊ लागतात. घसा आमरसासाठी व्याकूळ होऊ लागतो.पोटातला अग्नी प्रज्वलित होतो आणि जठरं आमरसाला मिठी मारण्यास आतुर होऊ लागतात. त्याच वेळी भीमपलासी किंवा मुलतानी रागातली उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची मंद आवाजातली सनई सुरू असावी आणि त्याला त्रितालाची साथ असावी. आहाहा… आणि मग सुरू करावा आमरस सेवनाचा साग्रसंगीत सोहळा… प्रत्येक घास आणि त्याबरोबरचा प्राशन केलेला आमरस तनामनात एक सळसळता उत्साह जागृत करतो. हात व जीभ यांच्यात स्पर्धा सुरू होते. जिभेची अभिलाषा नि हाताची आमरस धारण करण्याची नजाकता यात रस्सीखेच सुरू होते.

आमरसाची याचना
जिभेला झालेला आमरसाचा पहिला अभिषेक थेट मेंदूपर्यंत जातो. डोळ्यात तृप्तीची एक चमक दिसू लागते आणि तळपणारी रसना आणखी आमरसाची याचना करते. हा आमरसाच्या प्राशनाचा सोहळा वाडग्यामागून वाडगे सुरू होतो. आतडं आमरसाला आलिंगन देत सामावून घेतात. घसा अविरत आनंदाने कृतज्ञ होत असतो. हे सर्व होत असताना आपल्या पांढर्‍या शुभ्र बनियनवर पडलेले, ओघळलेले आमरसाचे डाग म्हणजे आपल्या अभिजात आमरस रस-ग्रहण शक्तीचं द्योतक असतं. ते अगदी अभिमानाने मिरवावं…
वाडग्यातून रस ओरपताना आपल्या मिश्यांच्या केसांच्या टोकावर चिकटलेले आमरसाचे दवबिंदू आपल्या आमरसाबरोबरच्या मधाळ नात्याचं प्रतीक असतात.
पाच-सहा वाडग्यांच्या प्राशनानंतर चार ढेकरांच्या सलामीने आमरस पोहोचल्याचं पोटाकडून कळवण्यात येतं आणि रिकाम्या होत आलेल्या पातेल्याकडे कृतार्थ नजरेने बघत आणि लवकरच पुनर्भेटीची अभिलाषा बाळगत हा सोहळा संपन्न होतो.
इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे आमरसाध्याय समाप्त: ऊदरारप्रणमस्तू:।

Share this article