इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील गाझा शहरातील रफाह येथे हवाई हल्ले केले असून त्यात ४५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाले तर १८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या जास्त आहे. या हल्ल्यानंतर सर्वजण इस्रायलचा निषेध करत आहेत. यावर प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. आता बॉलीवूड स्टार्सनीही आपला संताप व्यक्त केला आहे. करीना कपूर, आलिया भट्टपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या वेदनादायक घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सध्या जवळपास सर्वच बॉलीवूड स्टार्स आपल्या स्टोरींमध्ये All Eyes On Rafah लिहून रफाहवरील हल्ल्याविरोधात आवाज उठवत आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधत आहेत. अगदी आलिया भट्ट, वरुण धवन आणि करीना कपूर यांनीही रफाह शहराबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे.
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, "प्रत्येक मुल प्रेमास पात्र आहे. प्रत्येक मूल सुरक्षिततेस पात्र आहे. प्रत्येक मूल शांततेस पात्र आहे. जगातील प्रत्येक आई आपल्या मुलांना हे सर्व देण्यास पात्र आहे."
करीना कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर युनिसेफची पोस्ट शेअर केली असून, रफाहमध्ये लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा निषेध करत तात्काळ युद्धबंदीची मागणी केली आहे. याशिवाय करिनानेही 'सर्वांचे लक्ष रफाहकडे आहे' असे लिहून या हल्ल्याला आपला विरोध व्यक्त केला आहे.
रफाहमध्ये घडलेल्या घटनेमुळे स्वरा भास्कर देखील संतापली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करून आपला राग व्यक्त केला आणि लिहिले, "आम्ही अशा जगात राहतो की ज्यावेळी मुलांना मारले जाते आणि तंबूत जाळले जाते तेव्हा आम्ही संतुलित विधान करावे अशी अपेक्षा असते. गोरे पुरुष आणि महिला किंवा लोकांनी हे केले, त्यासाठी निधी दिला, समर्थन केले ते सामान्य करण्यासाठी एक आख्यान तयार केले आणि ते साजरे केले, मला त्यांच्यासाठी फक्त एक शाप आहे, अशा लोकांचे जीवन या मुलांच्या किंकाळ्याने त्यांना क्षणभरही शांतता मिळू नये.
प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, फातिमा सना शेख, समंथा रुथ प्रभू, दिया मिर्झा यांनीही रफाहवरील ऑल आयजचा व्हायरल फोटो शेअर करून रफाहमध्ये घडलेल्या वेदनादायक घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर इस्रायलने रफाह शहरावर केलेल्या हल्ल्याला मोठा विरोध होत आहे. इस्रायलने ६ मे रोजी रफाहवर हल्ला करण्यास सुरुवात केली, त्यानंतर १० लाखांहून अधिक लोकांनी शहर सोडले. अलीकडे त्यांनी केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक लहान मुले आणि महिलांना जीव गमवावा लागला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी सतत पोस्ट शेअर करून इस्रायलविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या या पोस्ट सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहेत.