- अंजली ओझरकर
सासुरवास हा प्रकारच अनघाच्या बाबतीत नव्हता. नाही म्हणायला नितीनचा धाकटा भाऊ होता. पण या सुखी संसारात कसलीही उणीव भासणार नाही, याची ग्वाहीच जणू नितीननं अनघाला सुरुवातीलाच दिली होती…
एव्हाना नवपरिणिता अनघाच्या सुखी संसाराची वेल बहरू लागली होती. तिचा पती नितीन उमदा, मेहनती नि सुस्वभावी होता. नितीनला एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली होती. मनमिळाऊ स्वभावाचा सालस नितीन सहजच आपल्या बोलण्यानं कुणाचंही मन जिंकून घेत असे.
“माप ओलांडून आत येताना लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये,” असं सांगणारी सासू अनघाच्या नशिबी नव्हती. सासरे, नणंद अशी सासरची कुणी माणसंही घरात नसल्यानं सासुरवास हा प्रकारच अनघाच्या बाबतीत नव्हता. नाही म्हणायला नितीनचा धाकटा भाऊ पुण्याला होता. पण या सुखी संसारात कसलीही उणीव भासणार नाही, याची ग्वाहीच जणू नितीननं अनघाला सुरुवातीलाच दिली होती. माहेरच्या माणसांची आठवण येऊ नये, इतका प्रेमाचा वर्षाव नितीन करत होता. मध्यमवर्गीय असलेल्या नितीनचा दोन खोल्यांचा छोटासा फ्लॅट होता. खिडकीजवळ नितीननं छोटंसं गुलाबाचं रोपटं आणून लावलं होतं. तो गेंदेदार गुलाबी आविष्कार पाहून रोज नितीनच्या दिनचर्येस सुरुवात होई. फुलवेडा नितीन तिच्यासाठी रोज मोगर्याचा गजरा न विसरता घेऊन येई.
गोर्यापान अनघाची नाजूक शरीरसंपदा नि तिचे काळेभोर टपोरे डोळे, हेवा वाटण्यासारखेच होते. विवाहानंतर माथेरानला झुकझुक गाडीतून जाताना नितीन आणि अनघाला मोठी गंमत वाटत होती.
तिथे पोहोचल्यानंतर एके ठिकाणी गर्भरेशमी हिरवळ पाहून नितीन हरखून गेला होता. तिथले पॉइंट्स पाहण्यापेक्षा नितीनला अनघाच्या संगतीत राहून तिच्याशी गप्पा मारत राहणंच आवडे. केवळ देखणं सौंदर्य एवढंच अनघाचं सामर्थ्य नव्हतं. प्रेमळ नि समंजस अशी ही कोमलांगी. प्रसंगी तिच्या अंगी विद्युल्लतेची चपळाई येई. या सर्व गुणांचा प्रत्यय नितीनला विवाहानंतरच्या काही महिन्यातच आला होता. सर्वत्र सुखाचं चांदणं बरसत असताना अनघाला काही गोष्टींचं मात्र नवल वाटे. टेकडीवरून सनसेट पाहताना नितीन का कोण जाणे खिन्न होऊन जाई. त्याला त्याचं कारणही सांगता येत नसे.
अनघा मुंबईला परत आल्यावर आता संसारात चांगलीच रुळली होती. विवाहाला आता एक वर्ष होत आलं होतं. दोघंही आता बाळराजांची स्वप्नं रंगवत होते. अनघा आयुष्यातले सुवर्णक्षण वेचत होती. पण…!
या सुखी जोडप्यांच्या इंद्रधनुषी सौख्याला, रुपेरी कमान लाभण्याऐवजी काळी किनार एका घटनेमुळे लागली. त्या दिवशी नितीनच्या कंपनीतल्याच सहकार्यांनी नितीनला टॅक्सीत घालून घरी आणलं. त्याला काम करताना चक्कर आल्यानं त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन घरी आणून पोहचवलं होतं. अनघाला आता वेळ दवडणं शक्य नव्हतं. ती तडक नितीनला स्पेशॅलिस्ट डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यांनी दुसर्या दिवशी जो रिपोर्ट दिला त्याने अनघावर जणू वीजच कोसळली होती. डॉक्टरांनी किडनीच्या दुर्धर आजाराच्या जोडीला ब्लड-कॅन्सरचंही निदान केलं होतं. एवढंच नव्हे तर, कंपनीच्या कामाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं.
अनघाच्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक? एरवी असे काही आजार नितीनचं शरीर पोखरत असतील, हे कुणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. आता मात्र खरी परीक्षा होती, ती बिचार्या अनघाची. कारण घरात नितीनची काळजी घ्यायला तिच्याशिवाय कुणीही नव्हतं. शिवाय कॅन्सरची फार पुढली स्टेप नसली, तरी औषधोपचारासाठी फार पैसे लागणार होते. आता तर नितीनला नोकरी करू देणंही शक्य नव्हतं. तोही डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यादिवसापासून मनाने खंगला होता.
सुखी राहणं माणसाच्या हाती नसतं, ही गोष्ट मात्र खरीच! सौख्याची गोड स्वप्नं पाहणार्या कोमल स्वभावाच्या अनघापुढे नियतीनं कसलं ताट वाढून ठेवलं होतं, याची अनघाला कल्पनाही नव्हती. नितीनचा खिडकीजवळ लावलेला आवडता गुलाब कोमेजून गेला होता. स्वप्नांचा मामला संपून अनघाची नियतीशी प्रदीर्घ झुंज सुरू झाली होती.
सर्वात मोठा प्रश्न होता तो पैशांचा. तिच्या माहेरीही
पैशांची वानवाच होती, त्यामुळे माहेरची माणसं मदत करणं कठीणच होतं. शिवाय अनघा स्वाभिमानी होती. आता काय
मार्ग शोधावा? या विचारात असतानाच वर्तमानपत्रात तिनं एका कंपनीची स्टेनोच्या पदासाठीची जाहिरात पाहिली.
तिने कॉलेजात असताना स्टेनोग्राफीसोबतच कॉम्प्युटरचा कोर्सही पूर्ण केला होता. क्षणाचाही विचार न करता अनघानं त्या जागेसाठी अर्ज केला.
पूर्वीच्या परिस्थितीत नितीननं तिला नोकरीसाठी अर्ज करू दिला नसता. पण आता सर्वच विस्कटून गेलं होतं. अनघा कॅन्सर सेंटरवर जाऊन आली. नितीनसाठी थोडीफार मोफत औषधोपचाराची तजवीजही करून आली, परंतु एवढ्यावर भागणार होतं थोडंच! किडनीचाही दुर्धर आजार त्याला होताच! त्यामुळे नितीनला महिन्यातून एकदा डायलिसीससाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागे. डायलिसीस ही तशी खर्चीकच बाब होती. पण त्याला काहीच इलाज नव्हता. आभाळच फाटलं होतं नि बिचारी अनघा त्याला ठिगळं लावू पाहत होती. अनघाच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. एवढी हिंमत तिनं नितीनवरील निखळ नि समर्पित प्रेमापोटी अंगी आणली होती.
नोकरीचा अर्ज केल्याला चार-सहा दिवस झाले होते. अनघा उत्तरासाठी पोस्टमनची वाट पाहत होती. इतक्यात पोस्टमन आलाच! पोस्टमननं दिलेलं पाकीट अनघानं उघडून पाहिलं तेव्हा तिला बरं वाटलं. कंपनीनं तिची स्टेनो म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे दुःखातही तिला फार मोठा आधार वाटला. सकाळपासून कामानं शिणल्यानं तिचा डोळा लागला.
अनघा जागी झाली ती बेलच्या आवाजाने! तिची मैत्रीण सुनिता आली होती. तिला अनघानं ही नवी बातमी दिली. तिलाही बरं वाटलं. तिनं नितीनची हालहवाल विचारली आणि बरीच बडबड केल्यावर ती निघून गेली. ती गेल्यावर अनघा पुन्हा उद्याच्या कामांचा विचार करत झोपी गेली.
दुसर्या दिवशी नितीन गावाहून परत आला. त्याला अनघानं हलकेच ही बातमी दिली. इतक्यात आज डायलिसीसचचा दिवस असल्याची अनघाला आठवण झाली. डायलिसीस आटोपून दोघं लवकर परत आले. आता नोकरी लागल्यानंतर अनघाला ही सर्व तारेवरची कसरत करावी लागणार होती.
आज सकाळीच लवकर कामं आटोपून सर्व तयारीनिशी ती ऑफिसला गेली. आयुष्यात प्रथमच अनघानं एवढं सुसज्ज ऑफिस पाहिलं होतं. टापटीप आणि शिस्त याबाबतीत खरोखर अचंबा वाटावा इतकं सुंदर काटेकोर नियोजन तिथे प्रत्येक बाबतीत दिसून येत होतं. अनघाला चांगली संधी मिळाली
होती. फर्मचे एक व्यवस्थापकीय संचालक सुधीर घोष यांची स्टेनो म्हणून तिला काम दिलं होतं. अनघाला एक वातानुकूलित केबिन दिली होती. सुधीर घोष हे रुबाबदार आणि विलासी व्यक्तिमत्त्व होतं. पाणीदार डोळ्यांचा हा मृदुभाषी तरुण मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावाचा वाटल्यानं अनघाचं नोकरीचं टेन्शन थोडं कमी झालं.
पहिल्याच दिवशी अनघाला सुधीरच्या स्वभावाचे पैलू दिसून आले. अनघाला डिक्टेशन देता देता तो फोनही अटेंड करत असे अन् त्याचवेळी अनघाच्या सुंदर चेहर्याकडे गहिर्या नजरेनं पाहून तिला न्याहाळत असे. तिलाही ते खटकलं; पण तिनं तिकडे दुर्लक्षच केलं.
आज नितीनलाही बरं वाटत नव्हतं. तो अंथरुणावर पडून होता. अनघाला नोकरी लागल्याला जेमतेम दोन महिने झाले होते. आजही कसंबसं काम आटोपून ती ऑफिसला गेली होती. आज मात्र सुधीरचा मूड काही वेगळाच दिसत होता. त्यानं नेहमीपेक्षा झटपट काम उरकलं आणि अनघाशी अवांतर बोलू लागला. त्याचं अवांतर बोलणं नेहमीचच असल्यानं अनघाही आपली मतं मांडताना काहीवेळा बिचकत नसे. कामाचा व्याप आणि ताप कमी करण्यासाठी अशी अवांतर चर्चा आवश्यक आहे, असं सुधीरचं म्हणणं असल्याने अनघा त्यात भाग घेत असे. बोलता बोलता सुधीर बराच वाहवत गेला. त्यानं अनघाकडे नको ती भलतीच मागणी केली. अनघाला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. मनमोकळा असला तरी सुधीर शेवटी ‘त्या’ बॉस लोकांसारखाच होता तर! एवढी धीराची मुलगी; पण आज मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली! सुधीर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याऐवजी फक्त नोकरी सोडण्याचाच पर्याय ठेवून मोकळा झाला.
अनघाची मनःस्थिती मोठीच विचित्र झाली होती. अनघा हातपाय गाळून बसली असती, तर अनर्थच झाला असता. सुधीर हा केवळ फर्मचा डायरेक्टरच नव्हता, तर त्या फर्मचा पार्टनरही होता. त्यामुळे ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा गहन प्रश्न अनघाला पडला. एकतर ती अतिशय संवेदनशील आणि एका सुशील पतीची पत्नी होती. एक नोकरी जरी अशा कारणासाठी सोडली तरी पुन्हा तोच अनुभव येणार, असं तिला वाटू लागलं. तिनं डोकं शांत ठेवून काही दिवस रजा घेतली.
रविवारी दुपारी ती सुनिताकडे गेली. सुनिता घरात एकटीच होती. तिच्याकडील थंडगार सरबताचा पाहुणचार घेतल्यावर आपल्या बॉसचा आगाऊपणा अनघानं तिच्या कानावर घातला. सुनिताला त्यात काहीच नवल वाटलं नाही, कारण तीदेखील पूर्वी एका कंपनीत स्टेनो म्हणून काम करत होती. त्यामुळे तिनं मोठा धक्का देणारा मार्ग अनघाला सांगितला.
सुनिताचं म्हणणं असं होतं की, स्टेनोची नोकरी करायची म्हणजे अशी ‘अॅडजस्टमेंट’ करावीच लागते. ही गोष्ट
इतरांपासून गुपित ठेवायची म्हणजे झालं. बेडर नि स्वतंत्र वृत्तीच्या सुनिताचे हे विचार तिच्या चंगळवादी स्वभावाला साजेसेच होते. तिच्यासाठी ही अनिवार्य गोष्ट होती. तिनं पूर्वी नोकरीत अशी अॅडजस्टमेंट केली होती, हेही तिनं अनघाला सांगितलं. नोकरीच्या पैशांची निकड असल्यानं अशा गोष्टींना काही इलाज नाही, तसंच स्त्री स्वातंत्र्याच्या युगामध्ये स्त्रियांनी ‘शीला’संबंधी आपल्या जुन्या पूर्वापारच्या कल्पना बदलल्या पाहिजेत, असं तिचं म्हणणं होतं नि तेच ती अनघाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु अनघाला काही केल्या ही गोष्ट पटेना. सात फेरे
घेऊन ज्याला परमेश्वर मानलं त्याच्याशी विश्वासघात? नोकरीची कितीही गरज असली नि बभ्रा होण्याची शक्यता नसली तरीही अनघाला ही गोष्ट पटणारी नव्हती. पण… जगात गरजवंताच्या मताला किंमत नसते, याचा पुरेपूर अनुभव तिला आला.
अशी मनाची घालमेल अनघानं पूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती. तिचं एक मन म्हणे की, सुनिता म्हणते ते अगदी गैर आहे. असा विचार मनात येणंही पाप आहे. तर दुसरं मन म्हणे, त्यात काय गैर आहे? सुनिताचं ‘जीवनात तडजोड ही करावीच लागते’ हे वाक्य अनघानं आत्तापर्यंत जपलेल्या जीवनमूल्यांना तिलांजलीच ठरणार होतं.
ही असली तडजोड? अनघाऐवजी दुसरी एखादी नवविवाहिता असती तर असल्या परिस्थितीच्या आघातानंच तिच्या संसाराचा डोलारा कोसळला असता. लहानपणापासून संस्काराचे बाळकडू प्यायलेल्या अनघाला हे सर्व नवीनच होतं. नको ती नोकरी अन् नको तो पापाचा पैसा, असं तिला शेवटी वाटायला लागलं. पण नितीनच्या डायलिसीससारख्या खर्चीक उपचारासाठी आणि कॅन्सरच्या इलाजासाठी पैसा मिळवणं जरूर होतं. नितीनला ती तळहातावरील फोडाप्रमाणं जपत होती. ही ज्योत विझू नये म्हणून नाइलाजानं ती नोकरी करत होती. आपण सुनिताचा सल्ला घ्यायला गेलोच कशाला? असं अनघाला वाटलं. बरं समस्या अशी होती की, कोणाला सांगताही येत नव्हती अन् मार्गही दिसत नव्हता.
या सर्व गदारोळात मनःशांती मिळवण्यासाठी अनघा जवळच्याच महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेली. तिथे क्षणभर तिला आपल्या जीवघेण्या परिस्थितीचा विसर पडला. मंदिरातच एका बाजूला लोकांच्या शंकांचं निरसन करणारे साधूमहाराज बसलेले दिसले. तिला सहजच वाटलं की, आपली समस्या या साधूला सांगून बघावी. न जाणो त्यांनी यातूनही काही
मार्ग शोधला तर?
शेवटी अनघाने हिंमत करून त्यांना विचारलंच. काही वेळ ध्यानस्थ होऊन नंतर साधुबाबा तिला एकच वाक्य बोलले. ते म्हणाले, “बेटी! शील हाच खरा स्त्रीचा आत्मा आहे. शील गमावण्याचा अधर्म तू ज्या पतीसेवेसाठी करशील ती पतीसेवाही त्यामुळे व्यर्थ ठरेल.” प्रत्यक्ष व्यवहारातही कुणीतरी अनघाला मदत करेल यावर साधुबाबांचा ठाम विश्वास दिसला. अनघाने साधूंना नमस्कार केला आणि घरी परत आली. तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. साक्षात धर्मच जणू साधूंच्या मुखातून बोलला, असं तिला वाटलं. आता शीलाचं पारडं जड झालं होतं.
अशा समस्या पूर्वीही होत्याच. परंतु त्यांचं स्वरूप वेगळं होतं इतकंच. पूर्वी स्त्रियांना फारसं घराबाहेर पडावं लागत नसे. शिवाय एकत्र कुटुंबात असे प्रसंग झेलायला अनेक हात असत. बरं अनघाची समस्या काही तिची एकटीची नव्हती, तर ती एक जटील सामाजिक समस्या होती. कारण एखादी नोकरी जरी अशा कारणाकरिता सोडली तरी सर्वच स्त्रिया पुन्हा पुन्हा नोकरी शोधण्याइतक्या खंबीर मनाच्या असतील असं नाही. अनघासारख्या भावनाप्रधान स्त्रिया अशा अनुभवानं खचून जातात आणि जगातल्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास उडून जातो.
एका गोष्टीबद्दल मात्र अनघा परत परत देवाचे आभार मानत होती की, या गदारोळात तिच्या बॉसचा आगाऊपणा नितीनच्या कानावर गेला नव्हता. नितीनचं दुःख आधीच खूप होतं आणि त्यात भर घालण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. आणखी एक गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, पती हेच स्त्रीचं सर्वस्व असतं. बाकी कुणालाही तिची फारशी किंमत ठेवावीशी वाटत नाही. कितीही आर्थिक स्वावलंबनाच्या गोष्टी केल्या तरी हे आर्थिक आधार लटके असतात आणि शेवटी स्त्रीलाच त्याची किंमत मोजावी लागते. स्त्री मुक्तीचा डांगोरा पिटणारी जीवनाबद्दलची पाश्चिमात्य संकल्पना किती भ्रामक आहे आणि स्त्रीला भोगवस्तू समजणारी रानटी पुरुषी वृत्ती स्त्रियांच्या प्रगतीआड कशी येते, याचा ती प्रत्यक्षच अनुभव घेत होती.
अनघाला आता डोळ्यापुढे तिचा भविष्यकाळ स्पष्ट दिसू लागला. एका बाजूला त्यांची परिस्थिती, अडचण समजून न घेणारे, तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे नातलग नि परिचित, तर दुसर्या बाजूला आपल्या अधिकारपदाचा गैरवापर करून आपला घृणास्पद हेतू साध्य करू पाहणारे अनेक सुधीर तिला वाकुल्या दाखवू लागले. साधुबाबांच्या मार्गदर्शनानं तिला शांती आणि बळ मिळालं असलं, तरी एकाकी झुंज देत तिला तिच्या जीवनाची परिक्रमा करायची होती.
नितीनही परिस्थितीबद्दल अगदीच अनभिज्ञ होता. कर्ता माणूस असूनही आर्थिक हातभार लावण्यास हतबल ठरल्याने त्याची स्थिती अतिशय केविलवाणी झाली होती. अशा अवस्थेत अनाघाची एकाकी झुंज तो मूकपणे पाहत होता. अनघाची बुद्धी तशी कुशाग्र होती. आता दोघांच्या आयुष्यातली ससेहोलपट कमी होण्याची चिन्हं दिसू लागली होती. अनघाला मार्गदर्शन करणारे साधूबाबा संन्यास घेण्याआधी एका स्वयंसेवी संघटनेचे ट्रस्टी होते. या संस्थेची ‘रुग्ण सेवा ट्रस्ट’ या नावानं एक ट्रस्ट होती. त्या दिवशी अनघानं तिची परिस्थिती सांगितल्यानंतर साधूबाबांना या ट्रस्टची मदत घेऊन या जोडप्याचं दुःख हलकं करण्याचं सुचलं होतं. शिवाय या ट्रस्टवर साधूबाबांचेच एक शिष्य काम करत असल्यानं, हे शक्य झालं होतं.
विशिष्ट परिस्थितीतल्या रुग्णांसाठीच या ट्रस्टची स्थापना झालेली होती. नितीनच्या चिकित्सेचा आणि औषधोपचाराचा सर्व खर्च आता ही ट्रस्टच करणार होती. साधुबाबांनी केवळ सांत्वन न करता प्रत्यक्ष मदत केल्यानं अनघाच्या डोक्यावरचा परिस्थितीचा भार हलका झाला होता. अनघाचा राजीनामा देण्याचा मार्ग आता मोकळा झाला होता. तिच्या मनाशीच चाललेल्या झुंजीचा एक खडतर टप्पा तर संपला होता!
पण प्रखर वास्तवाशी अजूनही प्रदीर्घ झुंज द्यायची होती. नियतीला मात द्यायची होती. तिनं नितीनला चहा करून
दिला आणि लगेचच नोकरीचा राजीनामा लिहिला नि तो टपालपेटीत नेऊन टाकला.
अनघा केवळ सुशील पत्नीच नव्हती, तर तत्त्वासाठी, प्रेमासाठी जिद्दीनं संघर्ष करताना विद्युल्लतेप्रमाणे तुटून पडणारी सौदामिनी होती. आभाळ फाटलेलं असतानाही डोळ्यात
आसवं न आणणारी नि कोणत्याही मोहजालात न फसता आपल्याला अखंड साथ देणारी आपली पत्नी आपल्यावर
एवढं गाढ प्रेम करताना पाहून नितीनच्या चेहर्यावरही आज अलौकिक समाधान दिसत होतं.
आता अनघाच्या मनाला वेगळीच उभारी आली होती. तिची नियतीशी झुंज तर यापुढेही चालू राहणार होती.
पण तिनं खिडकीवरचा पडदा दूर करून वर आकाशाकडे पाहिलं. आता काळे ढग निघून गेले होते नि आकाश कसं
स्वच्छ होतं.