सध्या सगळीकडे ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलची चर्चा आहे. या फेस्टिवलमध्ये निरनिराळ्या देशातील कलाकार सहभागी होत असतात. त्यांच्या रेड कार्पेटवरील फोटोंसाठी सगळेच उत्सुक असतात. बहुचर्चित अशा 'कान फिल्म फेस्टिवल २०२४' मध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील हजेरी लावली होती. १४ मेपासून सुरू झालेला ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ २५ मेपर्यंत असणार आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय ते उर्वशी रौतेला यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्यांच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली. मात्र आता एका मराठी अभिनेत्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या 'कान फेस्टिव्हल'ला प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं आपल्या आईची साडी आणि नथ घालून उपस्थिती लावली. सोबतच तिने तिच्या आईसाठी खास पोस्टही शेअर केली आहे.
ही अभिनेत्री आहे छाया कदम. छायाने मराठीतील 'सैराट' ते बॉलिवूडमधील 'लापता लेडीज' अशी आपली प्रत्येक भूमिका सरसपणे गाजवली असून आता चक्क ती कान फेस्टिवलला पोहोचली आहे. तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं तर जिंकलीच सोबतच आपल्या चित्रपटात एक वेगळी छाप पाडण्यात ती यशस्वी ठरली आहे. तिच्या 'मडगाव एक्सप्रेस' आणि 'लापता लेडीज'ची अजूनही चर्चा आहे. अशातच केसात गजरा, नाकात नथ आणि आईची साडी अशा मराठमोळ्या लूकमध्ये ती तिथे पोहोचली.
छायाने तिचे काही फोटो शेअर करत लिहिलं, 'आई तुला विमानातून फिरवण्याचं माझं स्वप्न अधुरं राहिलं…पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून ‘कान फिल्म फेस्टिव्हल’पर्यंत घेऊन आले, याचं समाधान आहे. तरी आई आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू.'
पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या मल्याळम चित्रपटासाठी छाया कान्स फेस्टिव्हलमध्ये आली आहे. गेल्या ३० वर्षात कान्सच्या मुख्य श्रेणी (Palme d'Or) मध्ये स्पर्धा करणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
छायाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संगीतकार ए. आर. रहमान यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटोही छायाने शेअर केला आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने ही भेट होणं आणि निवांत अर्धा तास गप्पा मारत फ्रान्सच्या रस्त्यांवर फिरत फिरत शेवटी एक सेल्फी होणे म्हणजे, 'इन बहारों में दिल की कली खिल गई', असं छायाने म्हटलं आहे. छायाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमुळे सिनेसृष्टीतही अभिमानाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
छाया कदम या नुकतेच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्याचप्रमाणे मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय छायाने मराठी-हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे तिचे चित्रपटही विशेष गाजले.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम )